अजिंक्य कुलकर्णी

स्क्वॅशच्या खेळात कुठूनही फटके मारले, तरी ‘टी’वर परत यावं लागतं तसंच व्यक्तिगत आशाआकांक्षांच्या भराऱ्या घेताना कुटुंबाकडे यावं; कौटुंबिक दु:खांवर उतारा बाहेर जरूर शोधावा, पण कुटुंबातली माणसं जपावीत, असं सांगणारी ही कादंबरी..

A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
impact of new year resolutions
संकल्पांचे नवे धोरण
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Image of the stampede incident
“आईच्या मृत्यूबाबत मुलीला माहित नाही”, ‘पुष्पा २’ च्या प्रीमियर वेळी झालेल्या चेंगराचेंगरीतील पीडितेच्या पतीची हृदयद्रावक गोष्ट
Interesting story of father-son relationship Shri Ganesha movie Milind Kavade
बापलेकाच्या नात्याची रंजक गोष्ट
Marathi Book Ek hoti Maya Anant Sonawane Renuka Publications entertainment news
माया वाघिणीची रसभरित कहाणी
Manohar Sapre from Chandrapur Marathi cartoonist
चंद्रपूरचे मनोहर सप्रे

अधिक चांगल्या संधी आणि चांगल्या राहणीमानाच्या शोधार्थ भारतीय लोक गेल्या शतकभरापासून वेगवेगळय़ा खंडांत राहिले. यापैकी अनेक कुटुंबं तिथंच स्थिर झाली आणि त्यांच्या दुसऱ्यातिसऱ्या पिढय़ांना त्या-त्या खंडांतल्या देशाचं नागरिकत्व मिळालं. पण दोन-तीन पिढय़ा कितीही वेगवेगळय़ा संस्कृतींत वावरल्या तरी कौटुंबिक उबेची भारतीयांना वाटणारी पारंपरिक महत्ता त्यांच्यावर आपोआप संस्कारित झाली. चेतना मारू या केनियात जन्मलेल्या आणि ब्रिटनमध्ये जडणघडण झालेल्या, व्यवसायाने हिशेबनीस (अकाऊंटंट) असताना त्यांच्यात साहित्याचं ‘वारं’ धरलं. गेल्या दोन-तीन वर्षांत त्यांच्या भारतीय कुटुंबकथांचा सिलसिला अमेरिकी-ब्रिटिश मासिकांमधून सुरू झाला. त्यात गेल्या वर्षी पॅरिस रिव्ह्यूचं ‘प्लिम्टन’ कथापारितोषिक त्यांच्या ‘ब्रदर्स अ‍ॅण्ड सिस्टर्स’ या कथेला मिळालं. त्या पुरस्काराची चमक-धमक साहित्यवर्तुळात असताना ‘वेस्टर्न लेन’ या पहिल्याच कादंबरीनं बुकरच्या लघुयादीत स्थान मिळवून मारू ‘सुपरस्टार लेखिका’ बनल्या आहेत.

हेही वाचा >>> चाहूल : नेते असे घडविले जावेत!

जेव्हा एखाद्या शहरात आपण राहिलेलो असतो, आपलं बालपण त्या शहरातल्या एखाद्या विशिष्ट भागात गेलेलं असतं, आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे याचं चित्र स्पष्ट होत एक दिशा ज्या ठिकाणी मिळालेली असते त्या जागेविषयी आपल्याला एक विलक्षण आपुलकी असते. अशाच प्रकारची आपुलकी ‘वेस्टर्न लेन’ या भागाविषयी गोपी (११) या किशोरवयीन मुलीला वाटते. ‘वेस्टर्न लेन’ ही कादंबरी गोपीच्या निरागस भावविश्वाचा सूक्ष्म तपास करत जाते. गोपीच्या आईचं नुकतंच निधन झालं आहे. या दु:खद धक्क्यातून सावरण्यासाठी गोपी, तिच्या बहिणी, तिचे वडील काय प्रयत्न करतात ही गोष्ट ‘वेस्टर्न लेन’मधून साकारत जाते.

 ‘वेस्टर्न लेन’ ही कादंबरी गोपी तसंच तिच्या थोरल्या दोन बहिणी मोना (१३), खुश (१५) आणि या तिघींचे वडील चारू यांच्या कौटुंबिक नातेसंबंधांचा धागा पकडून कुटुंबव्यवस्थेच्या गरजेवर प्रकाश टाकू पाहते. हे एक गुजराती कुटुंब आहे. भारतातून इंग्लंडमध्ये आधीची पिढी स्थायिक झालेली आहे. या तीनही मुली मात्र पूर्णपणे ब्रिटिश संस्कारांत घडलेल्या आहेत. भारतीय खाणंपिणं सोडल्यास इतर कोणतेही देशी संस्कार त्यांच्या वागण्यात दिसत नाहीत. आई गेल्यानंतर या मुलींची रंजन नावाची आत्या त्यांचा ताबा घेऊ पाहाते. तिला वाटतं चारूंनी मुलींना कशात तरी गुंतवून ठेवायला हवं ज्यामुळे त्यांना काही वाईट सवयी लागणार नाहीत. हा सल्ला चारू यांना पटल्यामुळे ते आपल्या तिन्ही मुलींना लंडनच्याच ‘वेस्टर्न लेन’ या भागातील ‘स्क्वॅश’ शिकवणाऱ्या क्लबमध्ये दाखल करतात. खुश आणि मोना ‘स्क्वॅश’मध्ये बऱ्या असतात; पण गोपी या खेळात विशेष गती दाखवून तरबेज होते. गोपी दिवसा स्क्वॅशचा सराव करते आणि रात्री या खेळातले प्रसिद्ध पाकिस्तानी खेळाडू जहांगीर खान यांच्या खेळाचा अभ्यास करते. चारूही तिला सर्व प्रकारे मदत करतात.

बाप म्हणून चारू यांच्या स्वभावाचे एक वैशिष्टय़ आहे. ते मुलींची एखादी गोष्ट पटली नाही तरीही त्यांच्या तोंडावर स्पष्टपणे नापसंती कधीच दाखवत नाहीत. ते म्हणतात की, ‘हे अमुक केल्यानं असं होईल, तमुक केल्यानं तसं होईल. तुम्ही ठरवा काय करायचं ते.’ म्हणजे निर्णय मुलींवर सोपवतात. चारू मुलींना खडतर प्रशिक्षण देतात. गोपीचा चांगला सराव व्हावा म्हणून तेरा वर्षांच्या जेडसारखा तगडा प्रतिस्पर्धीसुद्धा शोधतात. हा खेळ खेळत असताना गोपीला आपलं समाधान त्या खेळात आणि कुटुंबात कसं आहे, हे हळूहळू उलगडत जातं. गोपीला स्वत:चं समाधान सापडतं, पण मोना आणि खुश यांचं काय? त्यांच्यात कुटुंबाबद्दलची, खेळाबद्दलची आत्मीयता आत्या रंजन आणि काका पवन हे कशी रुजवतात? मुलींची स्वप्नं पूर्ण व्हावी हे चारूच्या दृष्टीनं किती महत्त्वाचं आहे, या बहिणींचे परस्परांशी गैरसमज, त्यांचं प्रेम, त्यामागची कुटुंब भावना या सर्व गोष्टी कादंबरीत रंगतदार वर्णनांनी सजल्या आहेत.

हेही वाचा >>> बुकबातमी : मुंबईचा ‘लिटफेस्ट’ दसऱ्यानंतर लगेच!

ही कादंबरी मानवी शोक, प्रेम आणि स्क्वॅश यांची गोष्ट आहे. चेतना मारू यांचे लिखाण हे अगदी साधं-सोपं, पण उत्तम आहे. कादंबरी वाचायला सुरुवात करताच ती आपल्या मनाची पकड घेते खरी; पण पहिल्या काही पानांतच वाचकाचंही हृदयदेखील तुटतं, वाचताना मनातल्या मनात तरी एक हुंदका येतो. या कादंबरीत मला असं वाटतं की दु:खद आघातानंतरची शांतता, सांस्कृतिक फरक, वडीलधाऱ्या लोकांच्या मुलांकडून असलेल्या अपेक्षा हे मुख्य विषय कमीअधिक प्रमाणात येत राहतात.

या कादंबरीत मारू काही उपकथानकंही मांडतात. पण उपकथानकांना मात्र त्यांनी पुढे पूर्णत्वाकडे नेलेलं दिसत नाही. उदा. गोपीच्या सरावासाठी जेव्हा जेडला बोलावलं जातं, तेव्हा गोपीला तो आवडू लागतो. वाढत्या वयातल्या या आकर्षणाला मात्र कादंबरीत फक्त चवीपुरतंच वापरलं आहे. कोवळय़ा वयात आलेलं अपयश, या अपयशानं मनावर झालेला परिणाम, त्या धक्क्यातून सावरण्यासाठी कौटुंबिक ऊब किती आवश्यक आहे ही गोष्ट कादंबरी अगदी ठळकपणे मांडते. मानवी आयुष्य हेदेखील एका स्क्वॅश कोर्टप्रमाणे आहे. स्क्वॅशच्या कोर्टवर असताना, खेळाच्या मध्यभागी तुम्ही एकटे असताना आपला मार्ग हा आपल्यालाच शोधावा लागतो, हे स्क्वॅश शिकवतं. कोर्टवर प्रत्येक फटका मारण्यासाठी अनुकूल अशी जागा स्वत:लाच शोधावी लागते, अनुकूल असे शॉट्स कसे घ्यायचे हेदेखील आपलं आपण शोधायचं असतं.

जसं स्क्वॅश खेळाडूला कोर्टवर ‘टी’ (ळ)ला धरून राहावं लागतं, तसंच आपल्या माणसांनाही धरून राहावं लागतं. ‘टी’ला धरून राहण्यासाठी तिथे कोर्टवर कुणीही मदत करू शकत नाही. तुमच्या वतीनं तिथं इतर कोणी लक्ष केंद्रित करू शकत नाही. कोर्टवर सामना गमावण्याची भीती तुमच्या वतीनं इतर कोणी बाळगू शकत नाही. पण प्रत्येक वेळी हे असंच सत्य असेल असंही नाही. गोपी कोर्टवर एकटी नसते. तिच्यासोबत बहिणी, वडील, आत्या, काका यांच्या सदिच्छाही असतात.

ही कादंबरी वाचताना एक समस्या उद्भवू शकते. ती म्हणजे ज्या वाचकांना स्क्वॅश या खेळाची माहितीच नाही, हा खेळ नक्की कसा खेळतात याबद्दल काहीच कल्पना नसेल तर त्यांना कथानक समजून घेण्यासाठी अधिकचे प्रयत्न करावे लागतील. ही कादंबरी आणि त्यातील सर्व पात्रं स्क्वॅशभोवतीच फिरणारी असल्यानं तो खेळ नक्की काय आहे हे जरा माहिती करून घेतलं, तर ही कादंबरी अधिक उमजू शकेल.

 जगप्रसिद्ध पाकिस्तानी स्क्वॅशपटू जहांगीर खान यांचाही या कादंबरीत एक पात्र म्हणून सुरेख वापर केला गेला आहे. ही कादंबरी आणखी एका महत्त्वाच्या मुद्दय़ाकडे बोट दाखवते, तो म्हणजे लहान मुलांच्या दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या समस्या. छोटय़ा छोटय़ा समस्यांशी दोन हात करत असताना त्यांना कोणाच्या तरी आधाराची आवश्यकता असते. बरेचदा मुलांना गृहीत धरलं जातं. ‘हे इतकं साधं कामही तुला जमत नाही.’ हे पालकांच्या तोंडचं वाक्य तर नेहमीचंच आहे. भावनांचा अतिउद्रेकही काही कामाचा नसतो, कारण त्याचीही भीषण किंमत मोजावी लागते. यातलं गोपी हे पात्रं प्रथमपुरुषी निवेदन करतं. गोपी हे पात्र संवेदनशीलपणे रेखाटलं गेलं आहे. एखादी अकरा वर्षांची मुलगी जसा विचार करते, अगदी तसं हुबेहूब हे पात्र आपल्यासमोर उभं राहतं.

खेळातल्या एखाद्या विशिष्ट विजयासाठी जशी शारीरिक चिकाटीची गरज असते, तसेच त्यातून येणाऱ्या पराभवातून बाहेर पडण्यासाठी कुटुंबातल्या सदस्यांमध्ये लवचीकतेचीही गरज असते. या मुलीची आई नुकतीच वारली आहे. गोपी, मोना, खुश या मुलींना खडतर प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करणं, हा मुलींच्या आई गेल्याचं दु:ख कसं झेलता येईल यावरच्या प्रक्रियेचा भाग आहे. गोपी स्क्वॅशच्या स्पर्धेची तयारी कशी करते, यासाठी आवश्यक शारीरिक- मानसिक बळ कसं एकवटते, उच्च दबाव असलेला सामना गोपी कसा खेळते, त्यात ती स्वत:ची जागा निर्माण करते का? या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ही कादंबरी वाचणं आवश्यक. लेखिका भारतीय वंशाची म्हणून तिच्यावर उगाचच जसं भारतीय पुस्तकप्रेमींकडून लक्ष लागून आहे, त्यापेक्षा अधिक लक्ष ब्रिटनकडून लागलं आहे. कारण यंदा बुकरच्या लघुयादीत ही एकमेव ‘ब्रिटिश’ कादंबरी आहे!  

पुढील आठवडय़ात : जोनाथन एस्कोफेरी यांच्या ‘इफ आय सव्‍‌र्हाइव्ह यू’ या कथामालिका असलेल्या कादंबरीवर गणेश मतकरी यांचा लेख.

‘वेस्टर्न लेन’

लेखिका : चेतना मारू

प्रकाशक : पिकॅडोर इंडिया

पृष्ठे : १६४; किंमत : ४०० रुपये 

काही दुवे : 

चेतना मारू यांची ब्रॅड लिस्टी (@otherppl’) यांनी घेतलेली मुलाखत :

 https:// www. youtube. com/ watch? v=_ N02 k8 c2 XAo

बुकरच्या संकेतस्थळावरील मुलाखत :  https://thebookerprizes. com/the- booker- library/ features/ chetna- maroo- interview- western- lane

ajjukul007@gmail.com

Story img Loader