साठोत्तरीत किंवा ऐंशीउत्तरीत जन्मलेल्या जगभरातील पुरुषांच्या नव्वदोत्तरीतील दृश्यनोंदींचे उत्खनन करायला घेतले, तर त्यात मॉडेल आणि अभिनेत्री पामेला अॅण्डरसनचा तपशील सहज आढळून येईल. या गोलगोलीत सौंदर्याने संपृक्त ललनेच्या शारीर कामगिरीची फारच ओळख सर्वाना असली, तरी तिच्या लेखन कारागिरीचा गुण अमेरिकेतर देशांना फारसा माहीत नाही. २००४ साली तिने ‘स्टार’ नामक कादंबरी लिहिली. आत्मचरित्रात्मक संदर्भ घेऊन बिनधास्त वर्णनांसह लिहिलेल्या या कादंबरीला तिच्या वलयाने लोकप्रिय केले. मग ‘पॅचेस ऑफ लाइफ’ नामे तिचा एक कवितासंग्रहही आला. पुढे ‘स्टारस्ट्रक’ नावाचे अधिकृत आत्मचरित्र आले आणि तिच्यावरील संशोधनकर्त्यांना अंतर्गत माहितीचा साठा हाती लागला. त्यानंतर पाश्चिमात्य म्हणजेच अमेरिकी समाजाचा मुक्तछंदातील शारीर व्यवहार कसा संपत चालला आहे आणि तो वाचविण्यासाठी काय करावे लागेल, यावर विवेचन करणारे ‘लस्ट फॉर लव्ह’ हे पुस्तक लिहिले. मग ते जाणून घ्यायला या पुस्तकावर बऱ्याच उडय़ा पडल्या. नवी बातमी ही, की दहाच दिवसांपूर्वी पामेला अॅण्डरसनच्या आत्मलेखांचे नवे पुस्तक ‘लव्ह, पामेला’ बाजारात दाखल झाले आहे. (भारतीय किंमत हार्डकव्हरसाठी : १,६२० रुपये, पेपरबॅकसाठी १,२७५ रुपये) या पुस्तकात तिने आपल्या आयुष्यातील चढ-उतार आणि अनेक लोकप्रिय व्यक्तींशी गाठी-भेटींचे संदर्भ पेरलेत. यातले एक प्रकरण ग्रंथपाल होण्याच्या तिच्या महत्त्वाकांक्षेबाबतचे आहे. जर तिची ही महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली असती, तर तिच्या शहरगावची वाचनसंस्कृती आकाशाला भिडली असती. पण जगाला एका दर्शनलेण्यापासून वंचित राहावे लागले असते. तूर्त ‘लव्ह, पामेला’ हे आदेशरूपी शीर्षक असणारे पुस्तक किती खपतेय, याकडे ग्रंथजगताचे लक्ष आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Feb 2023 रोजी प्रकाशित
बुकबातमी : पामेला अॅण्डरसनची ‘गोलंदाजी’
साठोत्तरीत किंवा ऐंशीउत्तरीत जन्मलेल्या जगभरातील पुरुषांच्या नव्वदोत्तरीतील दृश्यनोंदींचे उत्खनन करायला घेतले, तर त्यात मॉडेल आणि अभिनेत्री पामेला अॅण्डरसनचा तपशील सहज आढळून येईल.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 11-02-2023 at 00:02 IST
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bookbatmi model actress pamela anderson writing skills star name novel ysh