सिद्धू मूसेवाला म्हणजे कोण हे जरी आठवत नसेल, तरीही त्याच्या खुनानंतर वर्षभरात पुस्तक आलं, इतपत ख्याती त्यानं तिशी गाठण्याच्या आत नक्कीच मिळवली होती. पंजाबखेरीज ब्रिटन आणि कॅनडात रॅपचे कार्यक्रम केले होते, पंजाबातल्या २०१९ च्या निवडणुकीतही तो उतरला होता. अनामत रक्कम जप्त झाली खरी, पण यापुढे हा राजकारणात मजल मारणार असं मत अनेकांचं होतं. अशा मूसेवालाची हत्या कोणी आणि का केली, याची उत्तरंही पंजाबपुरती राहात नाहीत. ती कॅनडात पोहोचतात. तिथल्या कुणा गोल्डी ब्रार ऊर्फ सितदर सिंगनं आपणच भारतातल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीकरवी ही हत्या घडवून आणल्याचा दावा केला होता. पोलिसांनी धरपकड केली ती पंजाबखेरीज उत्तराखंडातूनही. मात्र मूसेवाला याला नेमकं कोणी मारलं याचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. त्याआधीच चंडीगडच्या ‘द ट्रिब्यून’ या इंग्रजी दैनिकाचे गुन्हेविषयक बातमीदार जुपिन्दरजीत सिंग यांनी लिहिलेलं ‘हू किल्ड मूसेवाला?’ हे पुस्तक (वेस्टलॅण्ड बुक्स, पृष्ठे २००, किंमत ४९९ रु.) बाजारात आलं आहे. खरं तर त्याचं नाव ‘व्हाय मूसेवाला वॉज किल्ड’ असंही चाललं असतं.. अर्थात, ‘हू’ किंवा ‘व्हाय’ या दोन्ही प्रश्नांची थेट उत्तरं हे पुस्तक देत नाहीच, पण मूसेवालाचा जीवनपट मांडताना त्यात धोक्याची वळणं किती होती, याचं संयमित चित्रण वाचता येतं. काही कॅनडा आणि तिथल्या शिखांना हवं असलेलं खलिस्तान, पंजाबातलं राजकारण, पंजाबी तरुणांची हताशा याचाही संदर्भ या पुस्तकाला आहे. माजी पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांचं ‘हू किल्ड करकरे?’ हेही पुस्तक वर्षभरात (२००९) आलं होतं, हा एक योगायोग. पण आणि सुशांत सिंह राजपूतचं नाव घेण्याची हिंमत नसलेल्या कुणा श्री अय्यर नामक महिलेचं ‘हू किल्ड एसएसआर?’ अशा नावाचं पुस्तक मात्र महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर, २०२३ च्या जानेवारीत आलं. त्यातल्या काल्पनिक ‘एसएसआर’बद्दलच्या लिखाणात मविआ सरकारच्या काळात ‘मीडिया’नं ज्या ज्या कथा रचल्या त्यांची गोळाबेरीज असणार, हे काय सांगायला हवं?
बुकबातमी : वर्षभरात पुस्तक!
सिद्धू मूसेवाला म्हणजे कोण हे जरी आठवत नसेल, तरीही त्याच्या खुनानंतर वर्षभरात पुस्तक आलं, इतपत ख्याती त्यानं तिशी गाठण्याच्या आत नक्कीच मिळवली होती.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 24-06-2023 at 00:02 IST
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bookbatmi sidhu moosewala the book year after the murder ysh