गेल्या महिन्यात हारुकी मुराकामी हा जपानी लेखक ७४ वर्षांचा झाला. पण लेखनाबाबत सदैव ‘तरुण’ राहिलेल्या या वृद्धाच्या जगभरातील चाहत्यावर्गासाठी त्याने चर्चेची ठरावी अशी ‘बुकबातमी’ दिली. त्याच्या जपानी प्रकाशनाने १३ एप्रिलला मुराकामीची नवी कादंबरी प्रकाशित होणार असल्याचा मुहूर्त ठरवून दिला. खरेतर नव्या कादंबरीच्या १००२ पानांचे जपानी हस्तलिखित प्रकाशकाच्या हाती आल्यानंतर तिचे कुतूहल जगभरात पसरावे आणि जगातील इतर भाषक वाचकांच्या मागणीबरहुकूम तिचा तातडीने इंग्रजीत अवतार यावा, यासाठी केलेली ही एक सहजक्लृप्ती. या कादंबरीचे जपानी नाव अद्याप ठरलेले नाही. कादंबरीचे कथानक काय आहे, याविषयीचा तपशीलही फुटलेला नाही. इंग्रजी अनुवाद केव्हा होणार (तातडीने की वेळकाढूपणा साजरा करीत) याचाही पत्ता नाही. पण सहा वर्षांनी भली मोठ्ठी नवी कादंबरी येते, हाच मुराकामी याच्या चाहत्यांसाठी वृत्ताकर्षक भाग आहे.

‘नॉव्हेलिस्ट अ‍ॅज ए व्होकेशन’ नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात मुराकामी याने कादंबरी लेखनाबाबत १९८० सालापासून चाललेला शिरस्ता मांडला आहे. कादंबरी लिहायला घेतली की दररोज जपानी भाषेतील किमान १० पानांचा मसुदा (इंग्रजीतील १६०० शब्द) तो कागदावर उतरवतो. कथानक बोट धरून त्याच्या लेखनासह फुलत जाते. कादंबरी पूर्ण होईस्तोवर सहा महिने-वर्ष इतका काळ त्या लेखनाची वाच्यता मुराकामी कुठेही करीत नाही. प्रकाशकालाही खबरबात लागू देत नसल्याने ‘डेडलाइन’ची भीती न बाळगता आपल्याच तब्येतीत ती पूर्ण होते. पूर्ण झाल्यावर काही दिवस विश्रांती घेऊन दोन महिन्यांहून अधिक काळ पुनर्लेखन सुरू राहते. दुसऱ्या पुनर्लेखनानंतर आणखी एक विश्रांती आणि तिसरा खर्डा. त्यानंतर मन मानेल तितके पुनर्लेखनाचे पुढचे टप्पे. या टप्प्यांतील यशानंतर कादंबरीची पहिली वाचक असलेल्या पत्नीचा सल्ला. त्या परीक्षेतून कादंबरीची चाचणी पूर्ण झाल्यानंतर ती प्रकाशक आणि संपादकांकडे सुपूर्द केली जाते. कादंबरी लेखन काळात मेंदूपेशींना व्यायाम देण्यासाठी मुराकामी इंग्रजीतून जपानीत कथा-कादंबऱ्या अनुवादाचा श्रम करतो. त्याव्यतिरिक्त कसलेही लेखन नाही. हा लेखनाचा तपशील इथे यासाठी की, १२०० पानांचे नवे हस्तलिखित प्रकाशकाकडे सुपूर्द करण्याआधी गेल्या सहा वर्षांतील १२० दिवस लेखनावर आणि वर्ष ते दोन वर्षे पुनर्लेखनात घालवून ही नवी कादंबरी तयार झाली आहे. १३ एप्रिलला ती पुस्तकरूपात जपानीत आली, की वायुवेगातच तिचा इंग्रजी अनुवाद खूपविका होण्यासाठी जगभरातील पुस्तक दालनांत हजर असेल.