पंकज भोसले
आधी भारतात प्रकाशित झालेलं हे पुस्तक करोनाकाळात पुनर्लिखित होऊन ब्रिटनमध्ये नव्या नावानं आलं, बुकरयादीतही गेलं. पण आधीच्या रूपाशी त्याचे सूर कसे जुळतात?
श्रीलंकी लेखक शेहान करुणातिलक यांच्या ‘सेव्हन मून्स ऑफ माली अल्मेडा’ या पुस्तकाची ग्लोकल होण्याची कहाणी थोडी गमतीशीर आणि करोनालाभातून आलेली आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये ‘पेंग्विन इंडिया’ प्रकाशनाने भारतात त्यांची ‘चॅट्स विथ डेड’ या नावाची कादंबरी प्रसिद्ध केली. साधारणत: त्याआधीपासून पश्चिम-पूर्वेतील राष्ट्रांकडून महासाथीवर टाळेबंदीचा उपाय योजला जात होता. हे पुस्तक प्रकाशित झाले आणि काहीच दिवसांत भारतच नव्हे, तर दक्षिण आशियातील बहुतांश देशात आजाराची लाट धुमाकूळ घालू लागली. पहिल्या ‘चायनामॅन’ कादंबरीसाठी राष्ट्रकुल पुरस्कारापासून इतर बऱ्याच आशियाई गौरवांचा मानकरी असलेल्या या लेखकाचे दहा वर्षांचे संशोधन आणि लेखन मेहनत ‘चॅट्स विथ डेड’मधून समोर येणार होती. मात्र या कादंबरीला करोनाचे ग्रहण लागले. या महासाथीदरम्यान १७-१८ महिन्यांच्या ‘अडकित्त्या’त ‘चॅट्स विथ डेड’ या प्रकाशित झालेल्याच कादंबरीचे करुणातिलक यांनी पुनर्लेखन केले. त्यातील थोडय़ा अतिउग्र भाषेला सौम्य केले आणि श्रीलंकेचा हिंसक इतिहास-भूगोल माहिती नसलेल्या वाचकालाही सामावून घेईल, इतकी कादंबरी टापटीप केली. या वर्षी ऑगस्टमध्ये ब्रिटिश प्रकाशनाने ‘सेव्हन मून्स ऑफ माली अल्मेडा’ नावाने केलेले पुस्तकाचे बाळंतपण बुकरच्या लघुयादीमुळे जगभर पोहोचले. पण भारतात ‘सेव्हन मून्स ऑफ माली अल्मेडा’चे आधीचे ‘चॅट्स विथ डेड’ हे रूपही नव्या पुस्तकासह उपलब्ध आहे.
सध्या आर्थिक- राजकीय- सामाजिक अस्थैर्यामुळे अभूतपूर्व कोलाहल माजलेल्या श्रीलंकेतील हिंसेचा इतिहास सलग दुसऱ्या वर्षी काल्पनिकांद्वारे बुकरच्या लघुयादीत दाखल झालाय. गेल्या वर्षी ‘ए पॅसेज नॉर्थ’ या अनुक अरुदप्रगासम यांच्या कादंबरीने ईशान्य श्रीलंकेतील एका भागाचा अर्वाचीन भूतकाळ गोळा केला होता. ‘सेव्हन मून्स ऑफ माली अल्मेडा’मध्ये १९८९-९० या वर्षांत झालेल्या हिंसेच्या उद्रेकाचा परिणाम आपल्या मृत नायकाद्वारे दाखवून दिला आहे. माली अल्मेडा या नायकाच्या आपल्या भवतालच्या हजारो मृत फौजेशी चालणाऱ्या संवाद मैफलीने ही कादंबरी भरली आहे. जिवंतपणी हिंसेचा नरक अनुभवताना मुंग्यांसारखे चिरडून मेलेल्या हजारो मृतांची शून्यत्वात विलीन होण्याआधीची परवड यात आहे. जागतिक साहित्यातील, संगीतातील संदर्भ पेरत आणि दु:खाला अतितिरकस व्यंगात रूपांतरित करीत चालणारा इथला वाचनप्रवास या देशाबद्दल असलेली आपली वरवरची माहिती बाद करीत जातो.
श्रीलंकेत मार्क्सवादी-लेनिनवादी ‘जनता विमुक्ती पेरमुना’च्या (जेव्हीपी) बंडखोरांनी १९८७ पासून सरकार उलथून टाकण्यासाठी उघडलेल्या दोन वर्षांच्या मोहिमेमुळे देशात ६० ते ८० हजार नागरिकांचा बळी गेला आणि २० हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता झाले. इथल्या नायकाच्या शब्दांत, त्या वर्षांत देशावर वर्चस्व राखणाऱ्या शक्तींचे विडंबनी वर्णन पाहा : ‘‘स्वतंत्र तमिळ राष्ट्राची मागणी करणाऱ्या ‘लिट्टे’ दहशतवाद्यांचा (द लिबरेशन टायगर ऑफ तमिळ ईलम) सामान्य नागरिकांना मारण्याचा घाणा सुरू आहे. युनायटेड नॅशनल पार्टी हा सत्ताधारी पक्ष आपल्या स्पेशल टास्क फोर्सचा वापर करून लिट्टे आणि जेव्हीपीचे सदस्य असल्याच्या संशयावरून कुणाच्याही अपहरण-मारहाण आणि क्रूर शिक्षांचा राष्ट्रीय कार्यक्रम राबवत आहे. भारत सरकारने तिथे पाठविलेली शांतीफौज आपल्या उद्देशांपासून भरकटत भडकलेल्या आगीत तेल ओतायच्या म्हणजे गावेच्या गावे जाळण्याच्या कामांत निष्णात झाली आहे. भारतीय गुप्तचर संघटना ‘रॉ’देखील तिथल्या हिंसाकारणात लक्ष घालत आहे आणि अमेरिकेची ‘सीआयए’ यंत्रणा हिंदी महासागरातील दिएगो गार्सिया बेटावरून सर्वोत्तम दुर्बीण घेऊन श्रीलंकेवर नजर ठेवून बसली आहे.’’
एकमेकांना गाडण्याच्या कामांत सक्रिय असलेल्या या वातावरणात शेहान करुणातिलक आपल्या नायकाला, माली अल्मेडा याला मृतोत्तर जगात जागे करतात. आदल्या दिवशी घेतलेल्या अमली गोळय़ांचा प्रतिसाद म्हणून आपल्याला भवताली मृतकांचा सैरावैरा झालेला जथा दिसतोय, असे त्याला आधी वाटते. पण स्फोटांत, गोळीबारांत, सूडहत्येत किंवा आत्मघातकी हल्ल्यांत धडाच्या चिंधडय़ा आणि अवयवांचे वेटोळे रूप घेऊन फिरणारी मृतके, आत्महत्या केलेल्या व्यक्ती त्याला दिसू लागल्यानंतर आपण जिवंत जगापासून लांब फेकले गेल्याची जाणीव त्याला होते. आपण मेलो कसे आणि आपल्याला मारले कुणी, याची त्याची आठवण पूर्णपणे पुसली गेलेली असते.
कथानकात जिवंतपणी हा माली अल्मेडा भुरटा छायाचित्रकार आहे. तीन मिनिटांत १३ लाख रुपये फुंकून टाकण्याइतपत तो जुगारही खेळतो. त्याशिवाय त्याची खासियत ही ‘अट्टल फोमणेश्वर’ असण्याची. सुंदर तरुण आणि पुरुषासोबत झोपण्याची त्याची हौस व्यसनात परावर्तित झाली आहे (वांग्याची उपमा देत अंडकोशाच्या वर्णनाचा एक छोटा भागही येथे आहे.). हा माली अल्मेडा माणसांना कापण्याच्या स्पर्धेत उतरलेल्या सर्वच संघटनांबरोबर छायाचित्र काढण्याच्या उद्योगानिमित्ताने एकरूप झाला आहे. तो असोसिएट प्रेस आणि आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनाही वैध-अवैधरीत्या छायाचित्रे पुरवून भरपूर मलिदा मिळवितो आणि दारू-जुगार आणि छंदोव्यसनांत तो सारा उडवतो.
मृत झाल्यानंतर तेथील यंत्रणेने या माली अल्मेडासमोर सात रात्रींचा पर्याय ठेवलेला असतो. त्या सात रात्रींमध्ये त्याला शून्यत्वात विलीन व्हायचे की जिवंत जग पाहात बसण्यासाठी भूत बनून शेकडो-हजारो रात्री मधल्या स्थितीत तळमळत राहायचे, हे ठरवायचे असते. त्या सात रात्रींतच त्याच्या पूर्वायुष्याच्या आठवणी, आप्त-नातेवाईक इतकेच नाही, तर स्वत:चीही ओळख राहाणार असते. जिवंत असताना लपून काढलेल्या काही प्रक्षोभक- स्फोटक घटनांत जबाबदार व्यक्तींचा छायाचित्रसाठा त्याने आपल्या घरातील पलंगाखाली पेटाऱ्यात दडवून ठेवलेला असतो. सरकार उलथून टाकण्यास मोठा पुरावा असलेली ही छायाचित्रे जगाला उपलब्ध करून देण्यासाठी त्याच्या ओळखीच्या जिवंत व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी त्याच्याकडे त्या सात रात्री उरलेल्या असतात. मृतभान झाल्यानंतर आपल्याला कुणी-कसे मारले याच्या शोधापासून सुरू होणाऱ्या पहिल्या रात्रीपासून सात चंद्ररात्रींमध्ये इतर मृतकांशी चालणारा संवाद म्हणजे ही कादंबरी. या सात रात्रींमध्ये छायाचित्रणाच्या निमित्ताने जिवंत जगात संबंध आलेल्या आणि नाहक मृत्यू झालेल्या ढिगांनी भुतांची भेट होते. ही अडकलेली भुते आपल्या मृतदेहाची विल्हेवाट लावलेल्या ठिकाणांजवळपासच हवेद्वारे मुक्त पर्यटन करू शकतात. भूतयोनीत गेले असले, तरी त्यांच्या दळणवळण मर्यादा ठरवणारी अजब यंत्रणा इथे आहे.
द्वितीयपुरुषी असा विरळ आणि निवेदनाचा कठीण प्रकार इथे लेखकाने कादंबरीभर वापरला आहे. त्यामुळे कादंबरीच्या कथानकात शिरण्यासाठी वाचकास सुरुवातीला थोडे कष्ट घ्यावे लागतात. त्यानंतर पुढला भूतमैफलीचा आस्वाद सुकर व्हायला लागतो. स्थानिक नेत्याचा मुलगा डीडी याच्याशी छुपे प्रेमसंबंध आणि डीडीची दूरची बहीण जाकी हिच्याशी खुले मैत्रीसंबंध प्रस्थापित करणाऱ्या मालीच्या भूतकाळातील प्रेमत्रिकोणापासून कादंबरीची गाडी मालीचा खुनी कोण, या शोधवळणांनाही स्पर्श करते. भ्रष्ट पोलीस यंत्रणा, राजकारणी, खाटीक, कचरावेचक आणि श्रीलंकेत १९८९ साली कस्पटासमान जगणाऱ्या जनतेची वेगवेगळी रूपे या कथानकात विखुरलेली भेटतात.
कादंबरीतील अगदी त्रोटक संदर्भाचे संशोधन केले तरी फेब्रुवारी १९९० मध्ये श्रीलंकेत अपहरण करून मारण्यात आलेला पत्रकार, कवी आणि सामाजिक कार्यकर्ता रिचर्ड डी झोयझा यावर यातली कहाणी बेतल्याचे लक्षात येईल. कादंबरीत त्याचा उल्लेख आहे आणि त्याच्याच ‘गुड फ्रायडे’ या कवितेतील पंक्तीने कादंबरीला सुरुवात झाली आहे. कॉरमॅक मॅकार्थी, डेनिस लेहेन आदी लोकप्रिय लेखक-कवींच्या उद्धृतांनी पुढल्या प्रकरणांची आणि त्यातील घटनांची नांदी करण्यात आली आहे. ‘चॅट्स विथ डेड’मधील टी. एस. एलियट यांच्या पंक्ती बदलून ‘द सेव्हन मून्स..’मध्ये जॉर्ज बर्नाड शॉ यांचा लेखनउतारा वापरला आहे. तर आधीच्या कादंबरीतील पॉल केली यांच्या आरंभउताऱ्याला कर्ट वॉनेगट यांच्या नव्या वाक्यांनी सजविले आहे. शेहान यांची जागतिक साहित्याची आणि पॉप कल्चरमधील जाणकारी प्रचंड आहे. ‘माली अल्मेडाचा जन्म एल्विस प्रेसले या गायकाच्या पहिल्या हिट गाण्याआधी आणि मृत्यू फ्रेडी मक्र्युरी या कलाकाराच्या शेवटच्या लोकप्रिय गाण्याआधी झाला,’ हे सांगताना अमेरिकी-ब्रिटिश संदर्भ पेरत या दरम्यानच्या काळात घडलेल्या श्रीलंकेतील नरसंहाराचा मोठा पट शेहान यांनी साकारला आहे. साहित्याच्या खडतर वाचनानंतर कथात्म शैलीत उभा केलेला श्रीलंकेचा हा कटू भूतकाळ सर्वाना झेपणारा नाही. हत्या, स्फोट, बलात्कार, समिलगी संबंध, विल्हेवाट लावलेल्या प्रेतांची दुर्गंधी आदी कित्येक निंद्य घटक-घटनांचा समावेश असलेली ही कादंबरी बातम्यांमधून येणाऱ्या वाईट श्रीलंकेचे आणखी कभिन्न दर्शन आहे.
‘सेव्हन मून्स ऑफ माली अल्मेडा’
लेखक : शेहान करुणातिलक
प्रकाशक : पेंग्विन
पृष्ठे : ४००; किंमत : ३९९ रु.
pankaj.bhosale@expressindia.com