वैशाली चिटणीस
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भांडवलसंचयाचा मार्क्सला चकवू शकणारा सिद्धान्त किंवा एकाधिकारी स्पर्धेचा सिद्धान्त स्त्रियांनी मांडला, किंवा ‘कल्याणकारी राज्या’चा पाठपुरावाही स्त्रीनं केला… एकोणिसाव्या शतकापासून स्त्रियांनी अर्थशास्त्रात दिलेलं हे योगदान कसं विसरता येईल?
प्रतीकरूपात स्त्री ही भूमी समजली जाते. शेतीचा शोधही स्त्रियांनीच लावला असं मानलं जातं. पण प्रत्यक्षात तिचा जमिनीवर मालकी हक्क नसतो. ही गोष्ट वेगवेगळ्या कौशल्यवाचक संसाधनांच्या बाबतीतही दिसून येते. स्वयंपाक, शिवणटिपण ही एकेकाळी परंपरेनं स्त्रियांकडे दिलेली कामं. एखाद्या घरात ती पुरुष अगदी स्वत:हून करत असतील तरीही चार जणांच्या भुवया उंचावतात, पण हाच स्वयंपाक व्यवसाय म्हणून करायचा असेल, तर तो पुरुषानं करण्यात कुणालाच चुकीचं, वावगं वाटत नाही. शिवणटिपण हे काम पुरुष व्यवसाय म्हणून स्वीकारून करतो तेव्हा ते कुणालाच- अगदी स्त्रियांनाही- वावगं वाटत नाही. आर्थिक संसाधनांवर पुरुषांचा ताबा आहे, तो या पद्धतीनं. आता दरवाजा थोडाफार उघडला जाऊन फट निर्माण झाली आहे. पण एकूण परिस्थिती ‘मजल बरीच बाकी आहे’, अशीच आहे. या पार्श्वभूमीवर अर्थकारणात वावरलेल्या, तिथे आपलं योगदान दिलेल्या पाश्चात्त्य (इंग्लंड तसंच अमेरिकेमधल्या) स्त्रियांच्या कामाची दखल द विमेन हू मेड मॉडर्न इकॉनॉमिक्स या पुस्तकात घेण्यात आली आहे. पुस्तकाच्या लेखिका रॅशेल जेन रीव्ह्ज या एक ब्रिटिश राजकारणी आणि अर्थतज्ज्ञ आहेत. भावी पिढीनं फक्त पुरुषांच्या नजरेतूनच अर्थशास्त्राकडे पाहू नये, या क्षेत्रात स्त्रियांनीही योगदान दिलं आहे, हे लक्षात घ्यावं आणि पुढची वाटचाल करावी म्हणून मी हे पुस्तक लिहिलं, असं लेखिका प्रस्तावनेतच सांगते.
हेही वाचा >>> बुकबातमी : मार्खेज मृत्यूनंतरही जिवंत… बळबंतबुवा थडग्यातच!
आपल्याला भेटलेल्या एका गरीब जोडप्याचा उल्लेख करून लेखिकेनं आपल्या या पुस्तकाचं प्रयोजन स्पष्ट केलं आहे. लेखिकेला एका बागेत भेटलेलं हे जोडपं वेगवेगळ्या पाच नोकऱ्या करतं, पण या काबाडकष्टातूनही त्याला पुरेसा पैसा मिळत नाही की कुटुंबासाठी फारसा वेळ मिळत नाही. ब्रिटनमधलं हे प्रातिनिधिक चित्र आहे, असं लेखिका सांगते. अर्थव्यवस्था कठीण वळणावर आहे, महागाई वाढते आहे, रोजगार नाहीत, प्रचंड असुरक्षितता आहे. त्यात जागतिक पातळीवर युक्रेनयुद्धासारखे संघर्ष सुरू आहेत. हवामान बदलाचे संकट आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा भस्मासुर आपल्या डोक्यावर उभा आहे. नव्या जगामधल्या या सगळ्या आव्हानांपासून सुटका करून घेण्यासाठी नवनवीन कल्पना शोधून त्यांचा अवलंब करावा लागणार आहे. आणि त्यासाठी स्त्रिया मोठ्या प्रमाणात हातभार लावू शकतात, असं लेखिकेला वाटतं. कारण या पुस्तकात नमूद करण्यात आलेल्या नेगवेगळ्या अर्थतज्ज्ञ स्त्रियांच्या मांडणीतून लेखिकेला असं दिसून आलं आहे की सर्वसामान्य, गरीब लोकांचं जगणं सुसह्य होऊ शकेल, अशा पद्धतीचा विचार स्त्री जास्त नेमकेपणाने, नेटकेपणाने करू शकते. या पुस्तकात नमूद करण्यात आलेल्या सगळ्याच अर्थशास्त्री स्त्रियांनी त्यांच्या मांडणीत व्यावहारिक अर्थशास्त्र अर्थात प्रॅक्टिकल इकॉनॉमिक्सवर भर दिला होता. यासाठी लेखिकेने ‘सिक्युरॉनॉमिक्स’ अशी संज्ञा वापरली आहे.
लेखिकेने जाताजाता याचीही नोंद केली आहे की, ब्रिटनमध्ये आजवर तीन स्त्रियांनी पंतप्रधानपद भूषवलं आहे. पण एकही स्त्री बँक ऑफ इंग्लंडची गव्हर्नर झालेली नाही. गेल्या ८०० वर्षांत ब्रिटनमध्ये एकही स्त्री अर्थमंत्री झालेली नाही. ‘ऑक्सफर्डमध्ये जाऊन या शाखेचा अभ्यास केला तेव्हा मला अर्थशास्त्र शिकवायला एकही स्त्री प्राध्यापक नव्हत्या’ असंही त्या सांगतात. अर्थशास्त्राचा उत्तम अभ्यास असलेल्या स्त्रिया असतात; पण या क्षेत्रातल्या महत्त्वाच्या पदांसाठी त्यांचा विचार होत नाही, असं लेखिकेचं म्हणणं आहे.
‘इफ यू आर नॉट ऑन द टेबल, यू आर अॅट मेन्यू’ (पंगतीला तुम्ही नसाल, तर तुमचाच घास घेतला जाऊ शकतो) या म्हणीचा हवाला देत त्या सांगतात की, आर्थिक धोरणं आखताना नेमकं हेच होतं. तिथं होणाऱ्या चर्चांच्या फेऱ्यांमध्ये स्त्रिया नसतात. त्यामुळे बहुतांश धोरणं पुरुषांसाठी, पुरुषांना हवी तशी आखली जातात आणि स्त्रिया नेहमीच गरजू/ लाभार्थी या स्तरात ढकलल्या जातात. याबाबतीत आपल्याकडचं राजकीय क्षेत्रामधलं एक अगदीच सामान्य पण महत्त्वाचं उदाहरण देण्यासारखं आहे. आपल्याकडे ७३ व्या घटनादुरुस्तीद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रक्रियेत स्त्रिया आल्या तेव्हा त्यांनी पाणी, शाळा, वीज या प्रश्नांना प्राधान्यानं हात घातला. कारण हे त्यांचे दैनंदिन जीवनातले महत्त्वाचे प्रश्न होते. त्याआधीच्या काळात काम केलेल्या पुरुषांना या प्रश्नांना प्राधान्य देण्याची गरजच वाटली नव्हती.
अर्थशास्त्रात मोलाचं योगदान देणाऱ्या स्त्रियांना त्यांच्या कामगिरीच्या तुलनेत फारशी ओळख कशी मिळाली नाही याबद्दल हे पुस्तक सांगतं. अर्थशास्त्रानंही अनेक वर्षं स्त्रियांना आपल्या कार्यकक्षेच्या बाहेरच ठेवलं. पण तरीही आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर काही स्त्रियांनी आर्थिक क्षेत्रात इतिहास घडवला आणि आजही या क्षेत्रात अशा स्त्रिया आहेत, ज्यांच्यामध्ये भविष्य घडवण्याची क्षमता आहे. अशा काही स्त्रियांचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे.
१८०२ मध्ये इंग्लंडमध्ये जन्मलेल्या हॅरिएट मार्टिन्यू यांना मदर ऑफ सोशॉलॉजी असं म्हटलं जातं. त्या पहिल्या स्त्री समाजशास्त्री. त्यांनी सामाजिक बदलांसाठी सातत्याने सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. आपली मतं मांडण्यासाठी अनेक पुस्तकं आणि असंख्य लेख लिहिले. पैसा, व्यवसाय, अर्थशास्त्र, त्यातले सिद्धान्त लोकांनी नीट समजून घ्यावेत असा त्यांचा आग्रह असे. त्या काळात त्यांनी मुक्त व्यापाराचा पुरस्कार केला होता. आपल्या लिखाणातून त्यांनी सातत्यानं ब्रिटिशांच्या व्यापार धोरणाची समीक्षा केली. गरिबांच्या बाजूनं विचार करताना बालमजुरी संपली पाहिजे, कामगारांना जास्त वेतन दिलं पाहिजे या मुद्द्यांआधी त्यांचा भर असे, कामगारांनी संतती नियंत्रित ठेवली पाहिजे यावर. गुलामगिरीला विरोध, स्त्रियांचे हक्क यावरही त्यांनी सातत्यानं आवाज उठवला. सरकारविरोधी आणि मुक्त अर्थव्यवस्थेच्या बाजूनं लिखाण करणाऱ्या हॅरिएट यांच्यावर टोकाची टीकाही झाली. पण ही टीका त्यांच्या कामापेक्षाही स्त्री असून हे सगळं काम करत असल्याबद्दल जास्त होती. आजवर होऊन गेलेल्या स्त्री अर्थतज्ज्ञांमध्ये हॅरिएट त्यांच्या विचारसरणीमुळे उठून दिसतात, असं लेखिकेने नमूद केलं आहे.
१८५८ मध्ये इंग्लंडमध्ये जन्मलेल्या बिआट्रिस वेब यांचं ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’च्या उभारणीत मोठं योगदान होतं. गरिबांबद्दल विलक्षण कणव असलेल्या बिआट्रिस यांचा कल्याणकारी राज्य या संकल्पनेवर भर होता आणि इंग्लंडमध्ये १९४८ मध्ये जुने कायदे जाऊन बिआट्रिस यांच्या कल्पनेमधले- गरिबांचं शिक्षण, आरोग्य यांची जबाबदारी घेणारे नवे कल्याणकारी कायदे झाले.
१८५९ मध्ये जन्मलेल्या मेरी पॅले मार्शल यांनी केम्ब्रिज विद्यापीठाची परीक्षा दिली; पण स्त्री असल्यामुळे त्यांना पदवी दिली गेली नाही. पुढे त्या ब्रिस्टोल विद्यापीठात अर्थशास्त्राच्या प्राध्यापक झाल्या. अर्थशास्त्राच्या त्या पहिल्या महिला प्राध्यापक. त्यांचे पतीही तिथेच अर्थशास्त्र शिकवत; तर मेरी यांच्या वेतनाचे पैसे मेरी यांच्या पतीच्या पगारातून कापले जात असत, असं सांगितलं जातं. स्त्रियांना समान वेतन मिळावं यासाठी मेरी मार्शल यांनी आयुष्यभर लढा दिला. त्याशिवाय त्यांनी मांडलेलं औद्याोगिक धोरण आजही प्रमाण मानलं जातं.
१८७१ मध्ये जर्मनीत जन्मलेल्या रोझा लग्झेम्बर्ग यांच्याकडे डाव्या, क्रांतिकारी म्हणून बघितलं जात असलं तरी त्या मुळात अर्थतज्ज्ञ होत्या. त्या अर्थशास्त्रात पीएच.डी. मिळवणाऱ्या जगातल्या पहिल्या महिला होत्या. ‘अॅक्युम्युलेशन ऑफ कॅपिटल’ हे त्यांचं पुस्तक आजही तेवढंच महत्त्वाचं मानलं जातं. कार्ल मार्क्सचा भांडवलाविषयीचा विचार कुठे कमी पडतो, हे नेमकं सांगणाऱ्या रोझा लग्झेम्बर्ग फक्त आर्थिक चिंतन करणाऱ्या नव्हत्या तर आपले विचार प्रत्यक्षात यावेत यासाठी सक्रियही होत्या.
जोन रॉबिन्सन या विसाव्या शतकामधल्या सगळ्यात प्रभावी अर्थशास्त्रज्ञ महिला मानल्या जातात. ‘मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन’ हा त्यांनी मांडलेला सिद्धान्त आजही महत्त्वाचा ठरतो. त्यांच्या कामासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळेल असं अनेकांना अपेक्षित होतं. त्यांच्या समकक्ष अर्थतज्ज्ञांना ते मिळालं, पण जोन रॉबिन्सन यांना ते कधीच मिळालं नाही. अर्थकारणात मूल्यांचा विचार करणं- उदा. विकास घडवताना पर्यावरणाची हानीदेखील विचारात घेणं, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं.
१९१५ मध्ये जन्मलेल्या अॅना श्वार्ट्झ या अमेरिकन अर्थतज्ज्ञ होत्या. त्या देशाच्या नॅशनल ब्यूरो ऑफ इकॉनॉमिक्स रिसर्चमध्ये त्यांनी संशोधन केलं. ‘मॉनेटरी हिस्टरी ऑफ युनायटे़ड स्टेट्स’ या त्यांच्या पुस्तकानं आर्थिक मंदी आणि आर्थिक धोरण यांच्याबद्दलच्या समजुती बदलून टाकल्या. तर सामान्यांसाठीचं आर्थिक प्रशासन या विषयातील कामासाठी एलेनॉर ओस्ट्रॉम या अमेरिकी अर्थतज्ज्ञ महिलेला २००९ चे अर्थशास्त्रामधलं ‘नोबेल’ देण्यात आलं. अमेरिकी फेडरल बँकेच्या प्रमुखपदी विराजमान होणाऱ्या आणि तिथल्या अर्थखात्याचा कार्यभार सांभाळणाऱ्या जेनेट येलेन या पहिल्या महिला आहेत. इस्थर डफ्लो यांना २०१९ मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल मिळाले. दारिद्र्य संपवण्यासाठी जागतिक पातळीवर काय करता येईल, या विषयावरचं त्यांचं काम आहे. अॅनी क्रूझर, कार्मेन रेनहार्ट, न्योझी ऑकाँजो इवेला, जॉर्जिवा ख्रिास्तालिना, गीता गोपीनाथ आणि क्रिस्टीन लगार्द यांच्यासारख्या आजच्या काळात कार्यरत असलेल्या अर्थक्षेत्रातील धोरणकर्त्यांच्या योगदानाचीही नोंद लेखिकेनं घेतली आहे.
या सगळ्याच महिला अर्थशास्त्रज्ञांना स्त्रीद्वेष, लिंगवाद आणि स्त्रियांविषयीचे पूर्वग्रह यांना तोंड द्यावं लागलं. पण या गोष्टी त्यांच्या पायातल्या बेड्या ठरल्या नाहीत; कारण कधी जमवून घेत, कधी विरोध करत, कधी टीका सहन करत त्या आपलं काम करत राहिल्या. आजही परिस्थिती फार बदललेली आहे, असं नाही. आजही स्त्रीपुरुष असमानता, दोघांच्या वेतनात भेदभाव, पुरुषांना प्रथम आणि अधिक संधी, घरातल्या संपत्तीत निर्विवाद वाटा, आर्थिक संसाधनांवर अधिकार या मुद्द्यांवर जगभरात सगळीकडेच स्त्रियांना झगडावं लागतं आहे. पण कुणीतरी कुठेतरी या संघर्षाची सुरुवात केली होती, म्हणून आज आपण कुठेतरी पोहोचलो आहोत, याची कृतज्ञ जाणीव हे पुस्तक करून देतं!
द विमेन हू मेड मॉडर्न इकॉनॉमिक्स
लेखक: रॅशेल जेन रीव्ह्ज, प्रकाशक : बेसिक बुक्स
पृष्ठसंख्या : २८० ; किंमत : ७९९ रुपये
vaishali.chitnis@expressindia.com