डॉ. मीरा कुलकर्णी – निवृत्त वैद्यकीय व्यावसायिक
आयुष्याची लांबी वाढली आहे, पण दर्जा सुधारला आहे का? तो सुधारण्यासाठी हुकमाचे चार पत्ते हाती देणारं पुस्तक…
“म्हतारी व्हय, हिंडती फिरती ऱ्हाय, हसती खेयती ऱ्हायजो.” असा लांब आशीर्वाद मला मिळायचा, जेव्हा जेव्हा माझ्या विदर्भातल्या बहिणाआत्याला मी नमस्कार करत असे. लहानपणी मला वाटायचं की ही आत्या “म्हातारी हो” असं का म्हणते? मोठं झाल्यावर ‘म्हातारं होणं’ यातला गर्भितार्थ कळला. या आशीर्वादाचा अन्वयार्थ मात्र डॉ. पीटर अटिया आणि बिल गिफोर्ड यांनी लिहिलेलं ‘ऑउटलिव्ह द सायन्स अँड आर्ट ऑफ लाँजेविटी’ हे पुस्तक वाचताना उमजला.
आपल्या आजूबाजूला आपण अनेक दीर्घायुषी माणसं पाहतो. पण त्यांच्या वयाच्या शेवटच्या दशकात त्यांना स्वतःचं स्वतः उठता येत नाही. ते बाथरूमपर्यंत एकटे जाऊ शकत नाहीत. तर कधी तोल जाऊन बाथरूममध्ये पडतात, पायाचं हाड मोडतं, बिछान्याला जवळ करावं लागतं. हे परावलंबित्व खूप क्लेशकारक असतं. त्या माणसासाठी आणि त्या घरासाठीही. असं दीर्घायुष्य डॉ. अटियांना अभिप्रेत नाही. माझ्या आत्यालाही नव्हतं. यासाठी लेखक इथे दोन संकल्पनांचा ऊहापोह करतात. ‘लाइफ स्पॅन’ म्हणजे जगण्याची लांबी, ‘हेल्थ स्पॅन’ म्हणजे आपल्या आयुष्यातला कुठलाही आजार नसलेला काळ किंवा जगण्याची गुणवत्ता. शरीराच्या आणि आकलनाच्या क्षमता कमी झाल्या की गुणवत्ता घसरते. संपूर्ण पुस्तकभर लेखक ही गुणवत्ता जास्तीत जास्त टिकवून ठेवण्याबद्दल विस्ताराने सांगतात त्यामुळे जगण्याची लांबीही आपोआपच वाढेल असं त्यांना वाटतं.
हेही वाचा >>> लेख: ‘या’ कायद्यातील दुरुस्तीमागचा हेतू काय?
जगभरातले ८० टक्के मृत्यू साधारण चार प्रकारच्या आजारांमुळे होतात. रक्तवाहिन्यांच्या काठिण्यामुळे होणारे आजार (स्ट्रोक, हार्ट अटॅक), चेतासंस्थेचे आजार (स्मृतिभ्रंश), चयापचयाचे आजार (टाइप टू डायबेटिस) आणि कर्करोग. लेखक या आजारांना चार घोडेस्वार म्हणतात. हे घोडेस्वार जेव्हा चाल करून येतात तेव्हा ती पुढे येणाऱ्या महाभयंकर संकटाची नांदी असते.
या चारही प्रकारच्या आजारांना ते एका सामायिक सूत्रात गुंफून त्यांच्या मागचे विज्ञान आपल्यासमोर रंजकतेने मांडतात. वरवर पाहता हे वेगवेगळ्या अवयवांचे आजार दिसत असले तरी यांच्या मुळाशी चयापचयाचे अनारोग्य असते. बिघडलेल्या चयापचयाचे दृश्य स्वरूप म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स आणि टाइप टू डायबेटिस. एकदा का या दोघांनी आपल्या शरीरात पाया घातला की उरलेले आजार त्यावर आपले इमले भराभर चढवतात. लेखक पुस्तकात जागोजागी आपल्याला सांगतात- ‘सावध ऐका पुढल्या हाका’.
जगण्याची गुणवत्ता कायम ठेवत आयुर्मर्यादा वाढवायची तर आपल्याला वर उल्लेखलेल्या आजारांपासून स्वतःला जास्त काळ दूर ठेवावे लागेल. यासाठी सध्याची आरोग्य व्यवस्था फारशी कामाची नाही, असं त्यांचं मत आहे. आजार झाल्यावर काय करायचं यात ती निष्णात आहे. ती आयुर्मर्यादा वाढवते पण उरलेलं आयुष्य ते आजार आपल्या सोबत राहतात आणि असंख्य प्रकारच्या गोळ्या घेत अप्रत्यक्षपणे फार्मा कंपन्यांचा फायदा करून देत आपण जगतो. आपलं ध्येय जर आजाराविना जास्त काळ जगण्याचं असेल तर आपल्याला यासाठी दूरदृष्टी ठेवून या आजारांनी नेहमीच्या तपासण्यांच्या आरशात आपला चेहरा दाखवण्यापूर्वीच स्वयंप्रेरणेने बरीच वर्षं आधीच उपाय सुरू करावे लागतील.
याच संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा, वेगळा आणि आधी आपल्याला कोणीही न विचारलेला प्रश्न लेखक या पुस्तकातून विचारतात. अशी कोणती दहा दैनंदिन शारीरिक कामं आहेत जी तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या दशकातदेखील करता यावीत असं वाटतं. जसं की कुणाच्याही मदतीशिवाय खालून उठणं, उकीडवं बसणं, नातवंडाला उचलणं, दोन जिने न थांबता चढणं, सामान आणणं, छोटी सुटकेस उंचावरच्या कप्प्यात ठेवणं, सीलबंद जार हाताने फिरवून उघडणं वगैरे. ही यादी प्रत्येकाची वेगळी असेल. या १० कृतींना लेखक ‘सेंटेरियन डेकॅथलॉन’ असं म्हणतात. ऑलिम्पिक खेळांमध्ये दहा वेगवेगळे खेळ एकत्रितपणे खेळण्याला ‘डेकॅथलॉन’ म्हटलं जातं. आयुष्यातही टिकून खेळणं महत्त्वाचं. म्हणून ही दहा कामांची यादी आवश्यक. आपण विचारच केलेला नसतो की आयुष्याच्या शेवटच्या दशकात माझा फिटनेस कसा असेल. कुठल्यातरी दीर्घकालीन आजाराने ग्रस्त राहून थकत जाऊ असाच विचार आपण करतो. पण डॉक्टर अटिया आपल्याला हा दृष्टिकोन बदलण्यासाठी, वेगळा विचार करण्यास प्रवृत्त करतात. हे या पुस्तकाचं महत्वाचं फलित. या १० गोष्टींची यादी तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी, जगण्याच्या गुणवत्तेसाठी एक ठोस ध्येय ठरवायला प्रेरित करते. पानोपानी या प्रवासासाठी उपयुक्त सूचना देत, हे पुस्तक तिथे पोहोचण्यासाठी आपल्याला एक चालण्याजोगा मार्ग सांगतं.
हेही वाचा >>> अन्वयार्थ : मंदिर-विकासाचा वसा; पण पालिकांचा खिसा?
दर वर्षागणिक आपली स्नायूंची शक्ती कमी होत जाणार हे कटू सत्य ध्यानात ठेऊन वयाच्या ऐंशीच्या दशकात जर मला स्वतःच स्वतः उठायचं आहे. म्हणजे गुरुत्वाकर्षणाला विरोध करून स्वत:च्या शरीराचं वजन उचलायचं आहे, वर नमूद केलेल्या कृती करायच्या आहेत तर मग त्यासाठी आपण आज काय करायला हवं या विषयी हे पुस्तक सांगू पाहतं. आयुष्यात हा ‘आज’ महत्त्वाचा आहे, मग तुम्ही कितीही वयाचे असलात तरी.
“तुम्ही असंच करा, तुम्ही १०० वर्षं जगाल” किंवा “हेच खा मग फिट राहाल” असं कुठलंही पोकळ आश्वासन हे पुस्तक देत नाही. तुमचं उद्दिष्ट आणि तुमचेच प्रयत्न यावर भर देतं. कारण आपण प्रत्येकजण आपली आनुवंशिकता, सवयी, सध्याची स्थिती यात पूर्णपणे वेगळे आहोत. मला एक जुनी कविता आठवली. चित्रकला शिकवणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षकांबद्दलची.
काही शिक्षक म्हणतात मी काढलेलं गिरव.
काही सांगतात मी रंग वापरलेत तसेच वापर
पण खरा शिक्षक मात्र कोराच कॅन्व्हास हातात देतो.
बाजूला नुसता राहतो उभा,
तुमच्या कल्पनेला पूर्ण मुभा,
चुकल्या वळणावर करतो खूण,
तुमच्या प्रयत्नांना पूर्ण गुण.
अशी सोबत हे पुस्तकदेखील करतं. एकदा उद्दिष्ट ठरलं की ते मिळवण्यासाठी धोरण आखायचं आणि धोरण अमलात आणण्यासाठी साधे साधे उपाय सुरू करायचे अशी तरुण वयापासूनच सातत्याने चालण्याची एक वाट लेखक आपल्या दृष्टिक्षेपात आणून देतात. हे धोरण ठरवण्यामागे विज्ञान आहे आणि ते अमलात आणणं हे कौशल्य. म्हणून या पुस्तकाच्या नावात आहे ‘सायन्स’ अँड ‘आर्ट’ ऑफ लाँजेव्हिटी.
दीर्घयुष्याचा खेळ आरोग्यपूर्ण मार्गाने खेळायचा असेल तर हुकमाचे चार पत्ते डॉक्टर आपल्या हातात देऊ इच्छितात. व्यायाम, झोप, आहार काही औषधं. या गोष्टी काही नवीन नाहीत. पण या चारही बाबतीत हे पुस्तक जे मुद्दे मांडतं त्यांचा समावेश आपल्या डॉक्टरांच्या नेहमीच्या सल्ल्यात सहसा नसतो.
व्यायाम हा हुकमाचा एक्का. त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने व्यायाम का करायचा हे ते पहिल्यांदा सांगतात. एखाद्या गोष्टीमागचं ‘का’ समजलं तर ती गोष्ट आपण नेटाने करतो. व्यायाम ही एकमेव अशी गोष्ट आहे जी आपल्याला हृदयाचं, स्नायूंचं, मनाचं, चयापचयाचं असं साऱ्या प्रकारचं आरोग्य सहज बहाल करू शकते. पेशींच्या पातळीवर व्यायाम आपलं पॉवर हाऊस जास्त पॉवरफुल बनवतं. आपलं शरीर चालायला लागणारी शक्ती प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या मायटोकाँड्रिया नावाच्या पॉवरहाऊसमध्ये तयार होते. व्यायामामुळे नवीन सक्षम मायटोकाँड्रिया निर्माण होतात जे ग्लुकोज आणि चरबी दोन्हीपासून ऊर्जा तयार करतात, ज्यामुळे आपली मेटॅबॉलिक हेल्थ चांगली राखली जाते आणि अर्थातच उरलेले आजार फारसे जवळ येत नाहीत. शरीरात जुन्या पेशी मोडीत काढून त्यातल्या प्रथिनांची नीट सफाई व्हावी लागते नाहीतर त्यांचे गोळे बनतात. जे पार्किन्सन्स, अल्झायमरसाठी कारणीभूत ठरतात. ही सफाई व्यायामामुळे जलद गतीने होते.
साधारण तीन प्रकारचे व्यायाम गरजेचे असतात. हृदयाच्या क्षमतेसाठी, स्नायूंच्या शक्तीसाठी, स्थिरता अबाधित ठेवण्यासाठी. पहिल्या प्रकारात चालणं, सायकलिंग, पळणं, पोहणं असे व्यायाम येतात. ते किती तीव्रतेने करायचे याला लेखक फार महत्त्व देतात. “डॉक्टर म्हणतात म्हणून फिरतो थोडं मी. मग परत येताना कोपऱ्यावरच्या हॉटेलमध्ये नाश्ता पण करून येतो.” असं फिरणं काही कामाचं नाही. व्यायामाची तीव्रता काही झोन्समध्ये विभागली जाते. झोन टूमध्ये आठवड्यातले काही तास तरी व्यायाम करायला हवा. आपण झोन टूमध्ये आहोत का हे सांगणारी एक सोपी पद्धत म्हणजे टॉक टेस्ट. म्हणजे तुम्ही व्यायाम इतक्या तीव्रतेने करायला हवा की तो करताना तुम्ही दुसऱ्याशी बोलू शकता पण ते सहज नसतं. आणि तुम्ही असं बोलणं शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करता. जर तुम्हाला कुणाचा फोन आला तर तुम्ही उत्तर दिल्यावर पलीकडच्या व्यक्तीला कळायला हवं की तुम्ही व्यायाम करता आहात.
म्हातारपणी माणूस पडला, मोठं हाड मोडलं की आयुष्य उतरणीला लागतं. म्हणून शरीराची आणि त्यासाठी मनाची स्थिरताही टिकवायला हवी. आपली पावलं, त्यांची बोटं जी आपल्याला जमिनीवर ठामपणे उभं ठेवतात. हाताचा पंजा आणि बोटं जी आपल्याला सशक्त पकड देतात. या दोघांच्या माध्यमातून आपला जगाशी खरा संपर्क येत असतो. दुर्दैवाने आपल्यापैकी अनेकांनी सतत मोजे, बूट किंवा फॅन्सी चपलांमध्ये राहून आपल्या पावलांची शक्ती आणि जाणीव हरवली आहे. पायांची बोटं चालण्यासाठी, पळण्यासाठी, पायऱ्या चढण्यासाठी, स्वतःला जमिनीवरून उचलण्यासाठी अत्यंत महत्त्वाची. ती तर अधिकच दुर्लक्षित. लेखक सुचवतात की तुमच्या पावलांना चार कोपरे आहेत असे समजून ते चारी कोपरे जमिनीवरती स्थिर राहतील, आपल्याला त्यांची नीट जाणीव होईल अशा पद्धतीने उभे राहा. चारी कोपऱ्यांवर वजन विभागून उभं राहायचा मी जेव्हा प्रयत्न केला तेव्हा ती जाणीव व्हायला थोडा वेळ लागला. पण मग खऱ्या अर्थाने समजलं की जमिनीत पाय रोवून उभं राहणं म्हणजे काय असतं ते. अजून एक व्यायाम लेखक सांगतात. पायाची सगळी बोटं पसरवून उभं राहायचं आणि मग दोन्ही पायांचे फक्त अंगठे खाली करायचे किंवा अंगठे तसेच वर ठेवून चारी बोटं खाली करायची किंवा एक एक बोट खाली करत जायचं. बापरे! हे सांगताना जितकं सोपं वाटतं तितकं करताना नाही. कारण मेंदूचा आणि तिथल्या छोट्या स्नायूंशी असलेला संपर्क आपण बऱ्याच अंशी घालवून बसलेलो आहोत. डोळ्यात अंजन घालणाऱ्या अशा अनेक गोष्टी पुस्तकात वाचायला मिळतात.
आपल्या हाताच्या बोटांचा उपयोग आपण स्वाइप आणि टाइप करण्यासाठी अधिक करतो. आपल्या हाताची पकड मजबूत होण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. नाहीतर काही ढकलताना किंवा ओढताना आपल्या हातामधून पुढे जाणारा फोर्स खांद्याला दुखापत करू शकेल. तुमच्या पंजांची शक्ती तुमचा तोल जाऊ लागला तर घट्ट पकडण्यासाठी उपयुक्त ठरते, पण ती आयुर्मर्यादेचं अप्रत्यक्ष द्योतकही आहे असं लेखकाचं म्हणणं आहे. हे पुस्तक वाचताना स्थिरतेबद्दल प्रकर्षाने जाणवलं की स्थिरता हीच सर्वाधिक गतिमान गोष्ट आहे.
स्नायूंची शक्ती आणि वजन हे म्हातारपणासाठी बँकेत ठेवलेल्या पुंजीइतकं महत्त्वाचं आहे. म्हणून वजनं उचलण्याचे व्यायाम ज्याला ‘स्ट्रेंथ ट्रेनिंग’ म्हणतात ते करायलाच हवेत. “मी ६० वर्षांची झालेय, मग मी काय उचलणार वजनं? आता कशी माझ्या स्नायूंची शक्ती वाढणार?” हा गैरसमज हे पुस्तक दूर करतं. लेखकाचं म्हणणं की तुम्ही कोणत्याही वयात व्यायाम सुरू करा, त्याचा फायदाच होईल आणि जितका जास्त कराल तितका जास्त फायदा होईल.
आहार आणि झोप यावरची पुस्तकातली प्रकरणं प्रत्यक्ष वाचायला हवीत. कमी खा आणि जास्त जगा हे महत्त्वाचं तत्त्व मांडतं, स्नायूंच्या शक्तीसाठी महत्त्वाची असलेली प्रथिनं किती आणि केव्हा खावीत हे सांगतात. नैसर्गिक झोप सात तासांपेक्षा कमी घेतली तर शरीरात काय काय घडतं हे वाचल्यावर तर आपण खडबडून ‘जागे’ होतो.
लेखक शेवटी त्यांच्या भावनिक आरोग्याबद्दल बोलतात. तीव्र भावनांमुळे बिघडलेल्या नात्यांबद्दल सांगतात. हे वाचताना मला डॅनियल गोल्डमन आठवले. त्यांनी पहिल्यांदाच भावनिक बुद्धिमत्तेवरती सविस्तर लिहिलं होतं. काय असते भावनिक बुद्धिमत्ता? स्वतःच्या उणिवांचा आणि क्षमतांचा सहजपणे केलेला स्वीकार, आपल्या भावनांचं नियमन आणि इतरांच्या भावना समजून घेणं असतं. स्वतःशी आणि इतरांशी असलेलं नातं ज्यामुळे सुखद राहू शकतं.
अनेकांना वाटेल की अगदी तरुणपणापासून आहारावर, झोपेवर निर्बंध कशासाठी घालायचे. परवाच कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या इंजेक्शनची जाहिरात होती, लठ्ठपणा कमी करणाऱ्या गोळ्या आहेतच. आयुर्मर्यादा वाढवणाऱ्या काही गोळ्यांवर संशोधन सुरू आहे. मग काय एकेका गोष्टीसाठी एक एक गोळी घ्यायची, आणि फिट राहायचं. नजीकच्या भविष्यकाळात कदाचित हे होईलही.
आपण फीट राहूही, पण सुखी राहू का? कारण एकमेकांशी चांगले संबंध असण्याची गोळी नाही. वागण्यात आस्था निर्माण करणारी गोळी नाही. स्वतःचं स्वतःशी आणि इतरांशी असलेलं नातं टवटवीत ठेवण्याची गोळी नाही. दीर्घायुष्याच्या समीकरणात शेवटी प्रश्न उरतो की कशासाठी आणि कुणासाठी जगायचं? आपले नातेसंबंध चांगले नसतील, आपल्याला जगण्यासाठी काही उर्मी नसेल तर दीर्घायुष्याचा काहीच अर्थ नाही. श्रेयस महत्त्वाचं आहे लांब जगण्यासाठी… ‘आउटलिव्ह’ने दाखवलेल्या या वाटेवर आपण किती लांब चालत जाऊ माहीत नाही. अंतर किती कापलं यापेक्षा आरोग्याच्या किती गुणवत्तेसोबत कापलं हे महत्त्वाचं. माझ्या बहिणाआत्याच्या आशीर्वादातला अर्धा भाग हेच तर सांगतो.
‘ऑउटलिव्ह द सायन्स अँड आर्ट ऑफ लाँजेविटी’
लेखक – डॉ. पीटर अटिया आणि बिल गिफोर्ड
पृष्ठे ४९६
drmeerakulkarni@gmail.com
हे ही पाहा
‘द वंडरफुल स्टोरी ऑफ हेन्री शुगर’ या ऑस्कर विजेत्या ठरलेल्या लघुपटाच्या निर्मितीमध्य ‘रोआल्ड डाल म्युझियम’चा किती वाटा होता, चित्रपटात तो कसा साकारला गेला, याविषयीचा तपशील येथे वाचता येईल.
https://shorturl.at/hvBK8
‘इंटरनॅशनल बुकर’ म्हणजेच इतर भाषांतून इंग्रजीत अनुवादित होणाऱ्या कादंबऱ्यांना दिला जाणारा पुरस्कार. हिंदीतील गीतांजली श्री यांना जो मिळाला तोच. दक्षिण अमेरिकेतील लेखकांचा यंदाच्या ‘इंटरनॅशनल बुकर’च्या लांबोडक्या यादीत लक्षणीय सहभाग आहे. यात कोणते लेखक लघुयादीत जातील, ते आत्ता सांगता येणार नाही. तूर्त या दीर्घयादीबाबतचे वृत्त.
https://shorturl.at/jzH19
हारुकी मुराकामीची कादंबरी येऊ घातलीच आहे. पण त्याआधी कदाचित न्यू याॅर्कर किंवा ग्रॅण्टाच्या समर विशेषांकात त्याची कथादेखील येऊ शकते. एका दानयज्ञ सोहळ्यासाठी मुराकामीने नुकतीच त्याची ताजी कथा टोक्यो शहरात वाचली. ११०० नशीबवान तिकीटधारकांनाच त्याचा आस्वाद घेता आला. त्याविषयीची बातमी.
https://shorturl.at/kvxFS