निशा शिवूरकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
महात्म्याच्या पत्नीचे आयुष्य कसे असेल, अवाढव्य वृक्षाच्या सावलीत वावरतानाचे आदर्श, आव्हाने काय असतील, याचे उत्तर देणारे पुस्तक..
काही वर्षांपूर्वी जळगावच्या ‘गांधी रिसर्च फाऊंडेशन’च्या कार्यकर्त्यांना इंदोरच्या कस्तुरबा आश्रमात माळय़ावर एक जुनी डायरी सापडली. ती चक्क कस्तुरबांची रोजनिशी निघाली. कस्तुरबांच्या हस्ताक्षरातील लिखाण पाहून सगळेच चकित झाले. जानेवारी ते सप्टेंबर १९३३ अशा नऊ महिन्यांच्या या रोजनिशीत कस्तुरबांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या काळाची नोंद आहे. दांडीच्या सत्याग्रहानंतर संपूर्ण स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय मी साबरमती आश्रमात परतणार नाही, असे गांधीजींनी जाहीर केले होते. त्यानंतर काही वर्षे कस्तुरबांना घर नव्हते. त्यांना भटके आयुष्य जगावे लागले. या काळात कस्तुरबा आणि त्यांचे कुटुंबीय म्हणजे पती, मुले आणि सहकारी अनेक वेळा तुरुंगात होते. या रोजनिशीत नोंदवलेला बराच काळ कस्तुरबांच्या तुरुंगातील वास्तव्याचा आहे. कस्तुरबा फारशा शिकलेल्या नव्हत्या. गांधीजींनी त्यांना गुजराती लिहायला आणि वाचायला शिकवले होते. त्यांना इंग्रजी थोडेफार बोलताही येत असे. गुजराती भाषेत लिहिलेल्या या रोजनिशीचा कस्तुरबांचे पणतू तुषार गांधी यांनी इंग्रजीत ‘द लॉस्ट डायरी ऑफ कस्तुर, माय बा’ या शीर्षकाने अनुवाद केला आहे. ‘हार्परकोलिन्स पब्लिशर्स इंडिया’ या प्रकाशन संस्थेने जूनमध्ये या डायरीचे प्रकाशन केले.
तुषार गांधी हे गांधीजींचे पुत्र मणिलाल यांचा मुलगा अरुण व सून सुनंदा गांधी यांचा मुलगा या नात्याने गांधीजींचे पणतू आहेत. ते महात्मा ‘गांधी फाऊंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष तसेच जळगावच्या ‘गांधी रिसर्च फाऊंडेशन’चे संचालक आहेत. त्यांचे ‘लेट्स किस गांधी’ हे पुस्तक २००७ मध्ये प्रकाशित झालेले आहे. सार्वजनिक कार्यक्रमांत मी त्यांची भाषणे ऐकली आहेत. गांधी विचार व मानवी हक्कविषयक प्रश्नावर ते सातत्याने लिहितात. कस्तुरबांची ही रोजनिशी तुषार गांधींनी आपल्या पूर्वज स्त्री – पुरुषांना, आपल्या कुटुंबाला अर्पण केली आहे. यातील स्त्रियांनी आपल्याला घडवले असे तुषार गांधींनी नमूद केले आहे. पुस्तकाचे स्वरूप अतिशय देखणे आहे. कस्तुरबांची मुले, नातवंडे, सहकारी यांच्यासह स्वदेशीच्या प्रचारासाठी निघालेल्या मिरवणुकीची, सूत काततानाची, ‘हरिजन’ दैनिकाचे वाचन करतानाची व विविध आंदोलनांतील सहभागाची छायाचित्रे या पुस्तकात आहेत. मागे चरखा असलेले कस्तुरबांचे छायाचित्र सुरेख आहे. त्यावर त्यांची स्वाक्षरी आणि तारीख आहे. तिरंग्यात गुंडाळलेल्या कस्तुरबांच्या मृतदेहाजवळ दु:खी अंत:करणाने बसलेल्या गांधीजींचे छायाचित्रही यात आहे. मुखपृष्ठावरील फोटो सत्याग्रही कस्तुरबांचे दर्शन घडवितो तर मलपृष्ठावरील फोटो त्यांच्या रचनात्मक कार्याची साक्ष देतो.
या पुस्तकाच्या सुरुवातीला ‘कस्तुर हर लाइफ’ या प्रकरणात तुषार गांधींनी कस्तुरबांचे जीवनचरित्र रेखाटले आहे. कस्तुरची कस्तुरबा होण्यापर्यंतच्या प्रवासाचा परिचय ते वाचकांना करून देतात. कस्तुर आणि मोहनदास यांच्या सहजीवनाच्या विविध छटा यात प्रतिबिंबित झाल्या आहेत. मोहनदासचे गांधीभाई आणि त्यानंतर महात्मा असा झालेला प्रवास व त्या प्रवासात कस्तुरचे बदलत जाणे वाचकांना समजून घेता येते. कस्तुरबांच्या आयुष्यातील सुख-दु:खाच्या घटना समोर येतात. कस्तुरबांच्या मनात हरिलाल व गांधीजी यांच्यामध्ये असलेल्या अंतराची वेदना सतत ठसठसती राहिली. हे अंतर दूर करण्याचे प्रयत्न आई म्हणून त्यांनी सतत केले, मात्र त्यांना यश आले नाही. गांधीजी आणि कस्तुरबा दोघांनाही हे दु:ख सहन करावे लागले. दु:खाला कवटाळून न बसता कस्तुरबा अनेकांची आई झाली. आगाखान महालात तुरुंगात असताना २२ फेब्रुवारी १९४४ रोजी त्यांचा मृत्यू झाला त्या वेळी श्रद्धांजली वाहताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कस्तुरबांना ‘राष्ट्रमाता’ म्हटले आहे. कस्तुर डायरी या प्रकरणात वाचकांना कस्तुरबा प्रत्यक्ष भेटतात. गुजरातीत लिहिलेल्या डायरीच्या तारखेप्रमाणे पानांची छायाचित्रे यात आहेत. छायाचित्राशेजारी गुजरातीत मजकूर व इंग्रजी अनुवाद आहे. अशी रचना असलेल्या डायरीच्या पहिल्या पानावर ‘माझा साष्टांग दंडवत स्वीकारावा’ अशी सुरुवात आहे. दि. २२/ ०१/ १९३३ पासून रोजनिशी सुरू होते. कस्तुरबा स्वदेशीचा, खादीचा प्रसार करायला निघाल्या आहेत. ठिकठिकाणी त्या स्त्री- पुरुष कार्यकर्त्यांना भेटतात. भेटीतील अनुभवांविषयी रोज लिहितात. तसेच बापूंचे पत्र आल्याची व बापूंना उत्तर लिहिल्याचीही नोंद आहे. त्यांच्या दिनक्रमात रोजची प्रार्थना, वर्तमानपत्र व गीता वाचणे, रोज किती सूत कातले याची नोंद आहे. कार्यकर्त्यां स्त्रियांशी झालेल्या गप्पा आहेत. कधी काहीच घडले नाही तर तसेही लिहिलेले आहे.
एका सत्याग्रही स्त्रीची रोजनिशी आपण वाचतो आहोत असे वाचकाला सतत जाणवत राहते. दि. ०४/०२/१९३३ च्या रोजनिशीत सात भगिनींसह ‘रास’ परिषदेसाठी निघालेल्या कस्तुरबांना पोलीस अटक करतात. सत्याग्रह चळवळीचा प्रचार करणाऱ्या कस्तुरबा यांची साबरमती तुरुंगात रवानगी होते. त्या तिथेही रोजनिशी लिहितात. मीरा बेनला अटक करून तुरुंगात आणले जाते तेव्हा तिच्याबरोबर राहता येण्याचा आनंद व्यक्त करतात. या तुरुंगवासात त्या बापूंनी लिहिलेली गुजराती गीता स्वत:जवळ बाळगतात. कस्तुरबा साबरमतीच्या तर गांधीजी येरवडय़ाच्या तुरुंगात होते. कस्तुरबांना वृत्तपत्रातून गांधीजींच्या उपोषणाविषयी कळले. त्या अस्वस्थ झाल्या. दि. १०/०५/१९३३च्या रोजनिशीत त्या लिहितात. ‘ Dear Manu came with him. This time I am of ill fate. Otherwise why am I not taken to be with him? I am Very worried. This time too I am sitting afar. Prayers at 4, read the Gita and did the morning rituals. Spun 500 strands.’ तुरुंगात बापूंची तब्येत बिघडते. कस्तुरबांना साबरमती तुरुंगातून मुक्त केले जाते. दि. १५/०५/ १९३३ ला त्या येरवडा तुरुंगात येतात. सोबत हरिलाल असतो. त्या दिवशी कस्तुरबा लिहितात, ‘ I met Bapu with joy, I did not cry. Although now Bapuji has become very weak,’ असे धैर्य कस्तुरबांनी आयुष्यभर दाखविले आहे. या रोजनिशीमध्ये अशा अनेक घटनांची नोंद वाचायला मिळते. कस्तुरबांच्या मातृहृदयाची साक्ष पटते. कस्तुरबांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवणाऱ्या या डायरीचा तुषार गांधी यांनी ओघवत्या इंग्रजी भाषेत अनुवाद केला आहे. त्यामुळे डायरी वाचनीय झाली आहे. आजच्या द्वेष पसरवणाऱ्या सांप्रदायिक वातावरणात ही डायरी सत्य, अहिंसा, प्रेम व सहिष्णुतेच्या मूल्यांवर विश्वास असणाऱ्या कार्यकर्त्यांना दिशा दाखविते. संयम व धैर्याचा विचार देते.
‘द लॉस्ट डायरी ऑफ कस्तुर – माय बा’
लेखक : तुषार गांधी
प्रकाशक : हार्पर कॉलिन्स इंडिया लि.
पृष्ठे : ४०६ , किंमत : ५९९ रुपये
advnishashiurkar@gmail.com