आज इतिहासजमा झालेल्या घटना ज्यांनी अनुभवल्या, आपल्या देशाचा नकाशा बदलताना ज्यांनी पाहिला, त्यांच्यावर आधारित साहित्य नेहमीच वाचकांना भुरळ पाडत आले आहे. फाळणीवर आधारित कथा, कविता, चित्रपटांना उदंड प्रतिसाद देणारे भारतीय हे निश्चितच जाणून आहेत. दुसरे महायुद्ध ही जगाच्या इतिहासातील एक अतिमहत्त्वाची घटना. त्यानंतर तुकड्या-तुकड्यांत विभागलेला जर्मनी आणि या तुकड्यांचं पुन्हा एकत्र येणं अनुभवलेल्या पिढीची प्रातिनिधिक कथा मांडणारी कादंबरी- ‘कैरोस’. जेनी एरपेनबेक लिखित या कादंबरीच्या मायकेल हॉफमन यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादाला नुकतंच बुकर पारितोषिकाने गौरविण्यात आले. जर्मन कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाला बुकरने सन्मानित केले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रेम आणि द्वेष या दोन्ही भावनांचे चित्रण तर ही कादंबरी करतेच, मात्र त्याबरोबरच त्या काळातील सामाजिक, राजकीय स्थिती आणि तिचे समान्यांच्या जीवनावर झालेले सूक्ष्म परिणामही टिपते.
‘कैरोस’ १९८०च्या सुमारास बर्लिनमध्ये घडते. बर्लिनची भिंत कोसळण्यापूर्वीचा म्हणजेच अमेरिका आणि सोव्हिएत रशियातील शीतयुद्ध समाप्त होण्याच्या आसपासचा हा काळ…एक तरुण मुलगी आणि तुलनेने प्रौढ पुरुष यांच्यातील ही प्रेमकथा आहे. यातील नायकाची पार्श्वभूमी नाझी फॅसिझमची असून आता तो कम्युनिझमकडे वळला आहे. पूर्व जर्मनीतील घडामोडींचा या दोघांच्या मनांवर असलेला पगडा कादंबरीत चित्रित करण्यात आला आहे. स्वातंत्र्य, निष्ठा, प्रेम आणि ताकद याविषयी अनेक प्रश्न ‘कैरोस’ उपस्थित करते. कादंबरी जेवढी प्रेम आणि उत्कटतेविषयी आहे, तेवढीच ती सत्ता आणि संस्कृतीविषयीही आहे. दोन जीवांचे एकमेकांत गुंतणे, स्वत:लाच उद्ध्वस्त करणाऱ्या भावनिक भोवऱ्यात अडकून पडणे हे जर्मनीच्या तत्कालीन इतिहासाशी जोडले गेले आहे. हा इतिहास पानोपानी उपस्थिती लावतो. एका कम्युनिस्ट-सोशलिस्ट राजवटीचे मुक्त बाजारव्यवस्थेत होणारे स्थित्यंतर, त्यादरम्यान तिथल्या रहिवाशांच्या आजवरच्या समजांना आणि जाणिवांना बसणारे हादरे, त्यातून निर्माण होणारी भावनिक अस्थिरता, त्याचा त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर होणारा परिणाम अशी संपूर्ण साखळी जोडलेली आहे.
मूळ पुस्तकाच्या लेखिका जेनी यांच्या कुटुंबात सारेच लेखक. त्यामुळे जन्माला आलेल्या प्रत्येकाने लिहिले तर पाहिजेच, अशा वातावरणात त्या वाढल्या. केवळ त्यांची पणजी लेखिका नव्हती. ती शेतकरी होती. ‘पण खरेतर तीच आमच्या कुटुंबाचा सर्वांत महत्त्वाचा घटक होती,’ असे लेखिकेने एका पुरस्काराला उत्तर देताना नमूद केले आहे. जेनी यांचा जन्म १९६७मध्ये ‘जर्मन डेमॉक्रॅटिक रिपब्लिक’मध्ये झाला. त्या २२ वर्षांच्या झाल्या तेव्हा बर्लिनची भिंत पाडण्यात आली. ज्या देशात त्यांचा जन्म झाला, त्या वाढल्या, तो देश जगाच्या नकाशावरून अचानक नाहीसाच झाला. त्या आणि त्यांच्यासारखे लाखो लोक ‘फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी’चे नागरिक झाले. जेनी यांच्या मते पूर्व आणि पश्चिम जर्मनी खऱ्या अर्थाने कधी एकत्र आलेच नाहीत. पगडा कायम पश्चिम जर्मनीचाच राहिला. देश हरवल्याची पार्श्वभूमी या कादंबरीला आहे.
जेनी यांची ही चौथी कादंबरी आहे. त्यांच्या कादंबऱ्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. २०१८मध्ये त्यांची कादंबरी बुकरच्या लाँगलिस्टमध्ये समाविष्ट झाली होती, मात्र बुकरने सन्मानित होण्यापूर्वी जर्मनीतील साहित्यवर्तुळात त्यांना विशेष ओळख नव्हती. मात्र जेनी यांना आज ना उद्या नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल, असा विश्वास गेल्या वर्षभरापासून त्यांचे चाहते व्यक्त करू लागले आहेत.
पूर्व जर्मनीविषयी बाहेरच्या जगाला फार काही माहीत नसते. तिथे एक भिंत होती आणि त्याच्या आतील क्षेत्रात सोव्हिएत युनियनप्रणित पोलिसांची दहशत असे, एवढेच जगाला ठाऊक आहे. पण ईस्ट जर्मनीत यापलीकडेही बरेच काही होते, हे या कादंबरीतून गवसते. ‘कैरोस’ ही प्रेमात आकंठ बुडून जाण्याची आणि नंतर विदीर्ण करणाऱ्या प्रेमभंगाची कहाणी तर आहेच, पण त्याचबरोबर ती आधी विभक्त होऊन नंतर पुन्हा परस्परांत विलीन झालेल्या राजकीय व्यवस्थांचीही गोष्ट सांगते. सुरुवातीला अतिशय सुंदर, योग्य भासणारी गोष्ट कुरूप आणि पूर्ण चुकीची कशी ठरू शकते, याचे वास्तव ‘कैरोस’ मांडते. पुस्तकाचे अनुवादक मायकल हॉफमन यांनाही लेखनाची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडील कादंबरीकार आहेत. ‘कैरोस’विषयी ते सांगतात की या कादंबरीत सदैव ईस्ट जर्मनीतील कोणते ना कोणते कॅफे, रस्ते, ऑफिसेस आणि तेथील खाद्यासंस्कृती दिसत राहते.
जेनी यांनी पूर्व जर्मनीतील आयुष्य नेमके रेखाटले आहे. ‘एमा’ या जर्मन नियतकालिकात २०१८मध्ये प्रसिद्ध झालेल्या लघुनिबंधात त्यांनी म्हटले होते की, स्वातंत्र्य ही काही भेटवस्तू नव्हती. तिच्यासाठी किंमत मोजावी लागली आणि ती किंमत होती, माझे पूर्वायुष्य. माझा वर्तमान रातोरात भूतकाळात जमा झाला. माझे संपूर्ण बालपण वस्तुसंग्रहालयात जमा झाले. ‘कैरोस’ अशा देश हरवलेल्या लाखो जर्मन व्यक्तींची प्रतिनिधी ठरते.
हेही वाचा
मिचिको काकुतानी या आधी ‘वॉशिंग्टन पोस्ट’ व ‘टाइम’च्या पत्रकार. मग १९८३ साली त्या न्यू यॉर्क टाइम्ससाठी पुस्तक परीक्षण करू लागल्या. निवृत्त होईपर्यंत म्हणजे २०१७पर्यंत फक्त त्यासाठीच ओळखल्या गेल्या. म्हणजे रॉजर इबर्ट या ‘शिकागो सन टाइम्स’च्या चित्रपट परीक्षणकर्त्यासारखाच त्यांनाही पुस्तक परीक्षणासाठी पुलित्झर वगैरे मिळाला. ‘खणखणीत’ आणि ‘सडेतोड’ ही विशेषणेही मचूळ वाटावीत अशी त्यांची परीक्षणे असत. नकारात्मक टिप्पणी असलेल्यांकडून सदोदित निंदाच त्यांच्या वाट्याला आली. ‘न्यू यॉर्कमधील सर्वात मूर्ख व्यक्ती’ ही एका प्रचंड गाजलेल्या लेखकाकडून झालेली टीका ही त्यांची सर्वात मोठी संभावना. मिचिको काकुतानी यांचे नवे पुस्तक आले आहे. त्यावरील परीक्षणानिमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर..
मिचिको काकुतानी यांच्याविषयी अधिक माहिती गूगल संशोधनातूनही होऊ शकते. त्यांनी ३८ वर्षांत कौतुक केलेल्या सर्वोत्तम पुस्तकांचे परीक्षण येथे एकत्रित करण्यात आले होते. ओबामांच्या मुलाखतींपासून ट्रम्प यांच्यावरील पुस्तकांची माहिती असलेला मजकूर अशी भरपूर मौज सापडेल.
https:// shorturl.at/8 jX3 n
‘माय नेम इज सीता’ नावाची कादंबरी. नेदरलँड्समध्ये १९६९ मध्ये प्रकाशित झालेली. तेथल्या साहित्यविश्वात सर्वाधिक गाजलेली. बिया वायनेन या कादंबरीच्या लेखिकेचा जन्म सुरिनाम देशातला. नेदरलँड्सच्या ताब्यात सुरिनाम १९५४ पर्यंत होता, वायनेन यांचे लिखाण डच भाषेतील. या कादंबरीचा अनुवाद इंग्रजीत झाला. त्यातील एक प्रकरण- शीर्षकाबाबत कुतूहल असल्यास.
https:// shorturl.at/FwImJ