गेल्या आठवड्यात महाराष्ट्र सरकारच्या वतीने रा. रं. बोराडे यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता आणि त्यानंतर अवघ्या काहीच दिवसांनी त्यांच्या निधनाची बातमी आली. लेखकाचा ‘समयोचित’ गौरव करण्याच्या बाबतीत समाज म्हणून आपण नेमके कुठे आहोत याचा या निमित्ताने खरे तर सर्वच संबंधितांनी विचार करायला हवा. नेटाने शिकताना पुस्तके वाचून, त्यातही व्यंकटेश माडगूळकरांची ‘माणदेशी माणसं’ आणि ‘गावाकडच्या गोष्टी’ ही पुस्तके वाचल्याने त्यांच्यात लिहिण्याची आवड निर्माण झाली. मॅट्रिकला असताना लिहिलेल्या ‘वसुली’ या कथेला शालेय विद्यार्थ्यांच्या लेखन स्पर्धेत पहिले बक्षीस मिळाले आणि त्यानंतर बोराडे लिहीतच राहिले. त्यांच्या लेखनाचा परिसर ग्रामीण असला तरीही आशय आणि विषयांत कमालीचे वैविध्य होते. त्याचबरोबर नवनव्या स्थित्यंतराच्या नोंदी ते आपल्या कथात्म साहित्यातून घेत राहिले. ग्रामीण समाजातील नात्यागोत्यांचे संबंध, त्यातले ताणतणाव यातून त्यांचा ‘नातीगोती’ हा कथासंग्रह साकारला. ‘बोळवण’सारख्या कथासंग्रहातून ग्रामीण स्त्रियांच्या दु:खाचा तळठाव शोधण्याचे काम त्यांनी केले. बोराडे हे बाल मनोविश्वाचाही समर्थपणे वेध घेतात हे त्यांच्या ‘खेळ’, ‘अभ्यास’, ‘कोकरू’, ‘भेग’ या कथांमधून दिसून येते तर ‘पाणी’, ‘मेंदी’, ‘कोंडण’ यांसारख्या कथा दलित जीवनालाही स्पर्श करतात.
मराठी साहित्यात बोराडे यांची यथार्थ नोंद झाली ती ‘पाचोळा’ या कादंबरीच्या निमित्ताने. ‘बरं चाललं व्हतं’पासून ती सुरू होते. आत्मप्रतिष्ठा जपणाऱ्या एका कारागिराचा गावातल्या सरंजामी शक्तीशी संघर्ष सुरू होतो आणि या संघर्षात गंगाराम शिंप्याच्या कुटुंबाचीच वाताहत होते. त्यामुळे ही कथा भले एखाद्या छोट्या गावात घडलेली असेल पण श्रेष्ठ दर्जाची शोकांतिका म्हणून मराठी वाचकांच्या ती कायमच मनावर कोरलेली आहे. ‘पार्बती’च्या रूपाने सोशीक, समजूतदार अशा ग्रामीण स्त्रीचे अंत:करण खास मराठवाड्याच्या भाषेतून प्रथमपुरुषी निवेदनाने उलगडत जाते. या निवेदनाला अंगभूत अशी लय आहे. ग्रामजीवनाच्या अशा विविध स्तरांचा शोध बोराडे यांनी आयुष्यभर आपल्या लेखणीतून घेतला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘चारापाणी’, अतिरिक्त उसाच्या प्रश्नावर ‘रिक्त अतिरिक्त’, मराठवाड्यातील भूकंपाच्या वाताहतीवर ‘इथं होतं एक गाव’, जातीव्यवस्थेसंदर्भात खेड्यांच्या सामूहिक मानसिकतेचे दर्शन घडवणारी ‘वळणाचं पाणी’, सत्ताकांक्षी राजकारणाचा वेध घेणारी ‘मरणदारी’ अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्या येत राहिल्या. एक लेखक किती वेगवेगळ्या कोनांतून वास्तवाला भिडतो हेच त्यातून सूचित होते.
कथा, कादंबरी लेखनाबरोबरच त्यांनी नाट्य लेखनही केले याचे कारण त्यांच्या कथा-कादंबऱ्यांमध्ये असलेले संवादाचे बलस्थान होय. ‘चूक भूल घ्यावी, न द्यावी’,‘पिकलं पान हिरवं रान’ ही नाटके त्यांनी लिहिली. त्यांच्या ‘आमदार सौभाग्यवती’ या कादंबरीचे नाट्यरूपांतर झाले, ते रंगभूमीवर गाजलेदेखील. एका भेटीत शाहीर अमर शेख यांनी त्यांच्या कलापथकासाठी एखादे लोकनाट्य लिहावे अशी इच्छा बोराडे यांच्याकडे प्रदर्शित केली. ‘कशात काय अन् फाटक्यात पाय’ हा वग त्यांनी लिहावयास घेतला पण तो पूर्ण होण्याआधीच अमर शेखांचे निधन झाले. पुढे अमर शेख यांचाच वारसा चालवणाऱ्या कलापथकाने या वगाचे काही प्रयोग केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी असताना भूकंपग्रस्त भागातील वाचनालयांना त्यांनी केलेले ग्रंथसाह्य हे जसे महत्त्वाचे तसेच खेड्यापाड्यांतील लिहित्या हातांना बळ पुरवण्याचे त्यांचे कामही तेवढेच महत्त्वाचे. छत्रपती संभाजीनगरातील ‘शिवार’ हा त्यांचा बंगला हुडकत कितीतरी नवे लेखक येत. त्यांना आत्मविश्वास देण्याचे काम बोराडे यांनी केले. त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्य पुरस्कार मिळाले पण एका टप्प्यानंतर त्यांनी या पुरस्कारासाठी पुस्तके पाठवणे बंद केले. ‘नवी मंडळी इतकं चांगलं लिहीत आहेत तर आपण जागा अडवणे बरोबर नाही’ अशी त्यांची यामागची भूमिका होती. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अनेकदा त्यांचे नाव चर्चेत यायचे. त्या वेळी या पदासाठी निवडणूक हा प्रकार होता. निवडणुकीला त्यांनी उभे राहावे अशी त्यांच्या चाहत्यांचीही इच्छा असायची. मात्र ‘ही निवड सन्मानपूर्वक व्हावी, निवडणूक मला मान्य नाही. मी निवडणुकीला उभे राहून मतांचा जोगवा मागणार नाही,’ अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली. ‘पेरणी’ हे त्यांच्या एका कथासंग्रहाचे नाव. त्यांच्या जाण्याने नव्या उमेदीच्या तरुणांमध्ये आत्मविश्वासाची ‘पेरणी’ करणारा पाठीराखा तर काळाच्या पडद्याआड गेलाच पण एक ‘शिवार’च पोरके झाले आहे.