एक शाळकरी मुलगा एका पुस्तकाविषयीची वडिलांच्या संग्रहातील कात्रणे वाचतो आणि आयुष्याची तब्बल ३५ वर्षे त्या पुस्तकालाच समर्पित करतो. हे पुस्तक म्हणजे मलबार किनारपट्टीवरील वनस्पतीवैविध्याची सखोल माहिती असलेला ‘हॉर्टस मलबारीकस’ हा ग्रंथ आणि तो मुलगा म्हणजे वनस्पतीशास्त्रज्ञ पद्माश्री कुट्टुंगल सुब्रह्मणियम मणिलाल. सतराव्या शतकातील हा आशियाई वनस्पतींविषयीचा पहिला ग्रंथ लॅटिन भाषेतून इंग्रजी आणि मल्याळम भाषेत अनुवादित करून त्यातील ज्ञान सर्वांसाठी खुले करणाऱ्या के. एस. मणिलाल यांचे नुकतेच निधन झाले.
मणिलाल यांचा जन्म कोचिन येथे झाला. त्यांनी एर्नाकुलम येथील महाराजा महाविद्यालयातून वनस्पतीशास्त्राची पदवी संपादन केली आणि मध्यप्रदेशातील सागर येथून पदव्युत्तर पदवी व पीएचडी मिळवली. एम.एससी. करत असताना शैक्षणिक सहलीदरम्यान देहरादून येथील ‘फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट’मध्ये गेले असता तेथील ग्रंथालयात त्यांच्या हाती ‘ते’ पुस्तक लागले, ज्याविषयी ते बालपणापासून वाचत आले होते. संस्थेच्या संग्रहालयाने ब्रिटिश काळात मिळविलेला हा अनेक खंडांचा संच होता. हेन्ड्रिक अॅड्रियन व्हॉन ऱ्हीड या डच इस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नरने लिहिलेल्या या पुस्तकात ७४२ वनस्पतींची माहिती होती. मणिलाल यांनी १९६९ मध्ये ‘हॉर्टस मलबारिकस’च्या अनुवादाचे काम हाती घेतले. तीन शतकांत अनेकदा भारतीय आणि युरोपीय शास्त्रज्ञांनी त्या पुस्तकात नमूद वनस्पतींचे नमुने गोळा करण्याचे प्रयत्न केले होते, मात्र कोणालाही त्यात यश आले नव्हते. मणिलाल यांनी १९७५ ते १९८७ दरम्यान सातत्यपूर्ण प्रयत्न केले. सतराव्या शतकात जेथून हे नमुने गोळा केल्याचे पुस्तकात सांगितले होते, त्या भागांत जाऊन त्यांनी सर्व वनस्पतींचे नमुने गोळा केले. नमुना पुस्तकात वर्णन असलेल्या वनस्पतीचाच आहे, याची खात्री करून घेण्यासाठी सर्व गुणधर्म पडताळण्यात आले आणि युरोप व अमेरिकेतील संशोधन संस्थांच्या साहाय्याने त्यांची ओळख निश्चित करण्यात आली. त्याआधारे ‘अॅन इंटरप्रिटेशन ऑफ वॅन ऱ्हीडेज हॉर्टस मलबारिकस’ हे प्राथमिक स्वरूपातील पुस्तक बर्लिन येथील ‘इंटरनॅशनल असोसिएशन फॉर प्लॅन्ट टॅक्सॉनॉमी’ने १९८८ मध्ये प्रकाशित केले. या संस्थेने प्रकाशित केलेले भारतीय लेखकाचे आजवरचे हे एकमेव पुस्तक आहे. पुढे २००३मध्ये कालिकत विद्यापीठाने १२ खंडांचा सविस्तर आणि सखोल माहिती असलेला ग्रंथ प्रकाशित केला. त्यात वनस्पतींचे औषधी गुणधर्म, त्यांचे सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि राजकीय संदर्भही वर्णन केले. त्यांच्या पुस्तकाने केवळ शास्त्रज्ञांनाच नव्हे, तर कलाकारांनाही प्रेरणा दिली.
हेही वाचा : अन्वयार्थ : माफीने मणिपुरात सलोखा दिसेल?
याव्यतिरिक्त मणिलाल यांनी टॅक्सॉनॉमी आणि वनस्पतिशास्त्राचे १९८ संशोधनपर लेख आणि १५ पाठ्यपुस्तके लिहिली. १९८०मध्ये त्यांनी केरळच्या सायलेंट व्हॅलीमधील वन्यजीव आणि वनस्पतींविषयीच्या अभ्यासगटाचे नेतृत्व केले आणि त्यातूनच पुढे या भागातील वनसंपदेचे संरक्षण संवर्धन शक्य झाले. त्यांनी केरळ विद्यापीठ आणि कालिकत विद्यापीठात अध्यापन करताना अनेक विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन दिले, सहाय्य केले. ते ‘इंडियन असोसिएशन फॉर अँजिओस्पर्म टॅक्सॉनॉमी’चे संस्थापक होते. नेदरलँड्सने त्यांना तेथील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या निधनाने संशोधनक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.