स्वामी केवलानंद सरस्वती तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे गुरू. धर्मसंबंधी त्यांची धारणा पुरोगामी होती. धर्म म्हणजे वेगवेगळ्या संदर्भात काय करावे आणि काय करू नये, हे सांगणारे नियम. धर्माबाबतचा प्राथमिक दृष्टिकोन हा धर्मग्रंथाच्या शब्दप्रामाण्यावर अवलंबून होता. ही धर्मासंबंधीची रूढ, सनातन भूमिका होती. भारतात ब्रिटिश राज्यसत्तेची स्थापना पहिल्या स्वातंत्र्यलढ्यानंतर (१८५७) झाली. या स्थापनेनंतर भारतात ब्रिटिश कायद्यांचा अंमल सुरू झाला, त्यामुळे देशात शिक्षण प्रसाराच्या बरोबरीने समाज आणि धर्मसुधारणांना गती आली. १९२३ मध्ये वाई (जि. सातारा)मधील एका ब्राह्मण परिषदेत ब्राह्मण पोटजातींतील विवाह धर्मसंमत मानावेत, अशी पुरोगामी भूमिका स्वामी केवलानंद सरस्वती आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी हिरिरीने मांडली. त्याचा अनुकूल परिणाम समाजमनावर पडल्याचे दिसून आले. त्यातून सुधारणावादी धर्मविचारांची गरज अधोरेखित झाली.

देशकाल, परिस्थितीनुरूप कालौघात आपण धर्माचरणामध्ये बदल अनुभवत असतो; पण त्यांचा संगतवार इतिहास आपण लिहिला नाही. विशेषत: हिंदू धर्म आणि संस्कृतीचा विचार करता, असा इतिहास लिहिण्याची गरज धर्माची पुरोगामी व सुधारणावादी मांडणी करणाऱ्या धर्मपंडितांना त्याकाळी वाटत होती. यात स्वामी केवलानंद सरस्वती, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पंडित रंगनाथशास्त्री जोशी, डॉ. के. ल. दफ्तरी, प्रा. न. र. फाटक, प्रा. पी. आर. दामले, प्र. बा. गजेंद्रगडकर, पंडित वासुदेवशास्त्री कोनकर प्रभृती मान्यवरांचा समावेश होता. अशा समविचारी धर्मसुधारक मंडळींनी १९२५ मध्ये या दृष्टींनी विचार सुरू केला. पुढे १९३४ मध्ये विधिवत ‘धर्मकोश मंडळ’ स्थापन केले. त्यात इतरही अनेक मान्यवर होते. १९३४ मध्येच या मंडळींनी कृतिशील धर्मपरिवर्तन कार्यात सातत्य राखण्यासाठी ‘तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी परिषद’ स्थापली. १९३७ मध्ये तिचे नामांतर ‘धर्मनिर्णयमंडळ’ असे केले. धर्मकोश प्रकल्पास दिशा देण्यासाठी महामहोपाध्याय पां. वा. काणे यांचा ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ प्रमाण मानून कालरचना करण्याचे निश्चित केले गेले.

स्वामी केवलानंद सरस्वती संकल्पित ‘धर्मकोश’ संपादनाची जबाबदारी तर्कतीर्थांवर सोपविण्यात आली होती. या कोशाची खंड रचना ‘स्मृति’ग्रंथांचा कालक्रम निश्चित करून करण्यात आली. अकरा खंडांच्या योजनेनुसार, (१) व्यवहार, (२) वैदिक आत्मविद्या, (३) विवाहादी संस्कार, (४) राजनीती, (५) वर्णाश्रम धर्म, (६) शुद्धी व श्राद्ध, (७) प्रायश्चित, (८) शांतिकर्म, (९) पुराणगम धर्म, (१०) कालतत्त्व, (११) मोक्ष या विषयांची चर्चा या कोशात आहे. हा संस्कृत कोश आहे; पण त्याच्या काही प्रस्तावना इंग्रजीत देऊन या कोश सामग्रीच्या वैश्विक आकलनाचा मार्ग प्रशस्त केला आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या हयातीत पाच खंडांचे २० भाग (व्हॉल्युम्स) १९८८ पर्यंत प्रकाशित झाले होते. त्यांच्या पश्चात आणखी सहा भागांची भर पडली आहे असे कळते. प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या विद्यामान अध्यक्ष व संस्कृत विदुषी डॉ. सरोजा भाटे, ज्या तर्कतीर्थांच्या काळापासून धर्मकोश प्रकल्पात सक्रिय आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या प्रणव गोखले या कोशाचे प्रमुख संपादक म्हणून कार्यरत आहेत. आणखी २० भाग प्रकाशित करण्याची योजना आहे.

‘धर्मकोश’ प्रकाशित होत राहिल्यापासून आजवर फ्रान्समधील प्राच्यविद्या विशारद डॉ. लुई रेनॉ, लुड्विग स्टर्नबाख, ‘महाभारत’ संशोधित आवृत्तीचे संपादक व्ही. एस. सुखटणकर प्रभृती मान्यवरांनी या प्रकल्पाची प्रशंसा केली आहे. भावी काळात भारतीय संस्कृतीच्या कुणाही अभ्यासकाला संदर्भ म्हणून आवश्यकच ठरेल असे हे काम असल्याचा सुखटणकर यांचा अभिप्राय आहे. या प्रकल्पामुळे धर्मग्रंथांचे कालानुक्रमिक संकलन शक्य झाले. मूळ श्रुति-स्मृती वचने, त्यावरील भाष्य, टीका, शास्त्रार्थ इत्यादींचे संग्रहण झाल्याने त्याआधारे धर्म संकल्पनेचा सर्वसमावेशक विचार लोकांसमोर आणणे सुलभ झाले. धर्म ही केवळ उपासनापद्धती नसून, मानवी समाजातील नैतिक आचार पद्धती होय. संस्कृती विकासात तिच्यात बदल होतात, हे दाखवून देण्याचे कार्य धर्मकोशाने केले आहे. धर्म प्रत्येकास समान असल्याचे यातून स्पष्ट होते व भारतीय न्याय आणि शासनव्यवस्थेचा विकासपट यातून पुढे येतो, हे धर्मकोशाचे खरे योगदान होय.

drsklawate@gmail.com

Story img Loader