लोकशाही पद्धतीने निवडून आल्यानंतर निरंकुश सत्ता उपभोगायची आणि लोकशाही मार्गानेच पराभव झाल्यानंतर मात्र, या व्यवस्थेची प्रतीके उद्ध्वस्त करण्यास निघायचे, असे आधुनिक ‘टूलकिट’ गेल्या काही वर्षांमध्ये दोन नेत्यांनी ठळकपणे आचरले. यांतील एक आहेत अमेरिकेचे माजी आणि इच्छुक अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. दुसरे आहेत ब्राझीलचे माजी, पराभूत अध्यक्ष जाइर बोल्सोनारो. या दोघांच्या कृत्यामध्ये एक मूलभूत फरक मात्र आहे. ट्रम्प यांनी निवडणूक निकाल जाहीर होऊ लागताच आकांडतांडव केले. निकालांच्या आणि निवडणूक प्रक्रियेच्या पावित्र्याविषयी शंका उपस्थित करण्यास सुरुवात केली आणि पराभव सुनिश्चित झाल्यानंतर अमेरिकी कायदेमंडळाच्या इमारतीवर आपल्या समर्थकांना चाल करून जाण्यास चिथावले.

ब्राझीलची अध्यक्षीय निवडणूक त्या घटनेनंतर (६ जानेवारी २०२१) जवळपास वर्षभराने झाली. त्या निवडणुकीत पराभव होणार याची आधीच चाहूल लागल्यामुळे, ही निवडणूकच मोठा घोटाळा असल्याची बोगस माहिती बोल्सोनारो समर्थकांमार्फत पसरवली गेली. जेणेकरून त्या एका कारणास्तव निवडणूक प्रक्रियेतील लष्करी हस्तक्षेप समर्थनीय ठरावा. या प्रयत्नांमध्ये काही लष्करी अधिकारी, पोलीस अधिकारी, गुन्हेगारी टोळ्या सहभागी असल्याचा निष्कर्ष ब्राझीलच्या पोलिसांनी काढला. या पोलिसांना तपासाचा सर्वाधिकार ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाकडून बहाल झाला आहे. यासंदर्भात गेल्या आठवड्याभरात विविध ठिकाणी छापासत्र झाले, काही जणांना अटक करण्यात आली. उठाव करून ब्राझीलमधील लोकशाही व्यवस्था खिळखिळी करण्याचा कट होता. अशा अस्थिर वातावरणात त्यावेळी अध्यक्ष असलेले बोल्सोनारो यांचा प्रदीर्घकाळ सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा होणार होता.

equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!
The Karanja Sub Bazar Committees board was dismissed and an administrator appointed
महायुती एक्टिव मोडवर! बाजार समिती बरखास्त करीत खासदार गटास दिला झटका.
swearing ceremony in Mumbai left many political workers across state despairing
यवतमाळ : मंत्रिमंडळातील समावेशाचा मुहूर्त हुकल्याने महायुतीत अस्वस्थता
bitcoin price review bitcoin prices got a boost reaches 100000 usd
विश्लेषण : ‘बिटकॉइन’ पोहोचले १ लाख डॉलरवर… का आणि कसे? भारतात मान्यता मिळेल?

ऑक्टोबर २०२२मध्ये झालेली निवडणूक बोल्सोनारो हरले. ही निवडणूक प्रदीर्घ काळ लांबली आणि अंतिम निवडीसाठी फेरनिवडणुकीचा मार्ग अवलंबावा लागला होता. पण पराभव झाल्यानंतर काही दिवसांनी, विशेषतः ८ जानेवारी २०२३ रोजी राजधानी ब्रासिलिया शहरात बोल्सोनारो समर्थकांनी धुडगूस घातला. त्यांना लष्कराकडून अपेक्षित समर्थन मिळाले नाही. तरीदेखील अध्यक्षीय प्रासाद, कायदेमंडळाची इमारत, सर्वोच्च न्यायालयाची इमारत अशा महत्त्वाच्या ठिकाणांवर हे समर्थक चाल करून गेले.

हेही वाचा >>> पहिली बाजू : लोकानुनय नव्हे; देशाची उभारणी!

बोल्सोनारो या उठावखोरीमध्ये सकृद्दर्शनी दोषी आढळले आहेत. गुन्हा सिद्ध झाल्यास त्यांना २९ वर्षांचा कारावास होऊ शकतो. आपण निर्दोष असल्याचे आणि आपला छळ सुरू असल्याचे ते आजही सांगतात. मात्र पोलीस तपासास साह्य करण्याची भूमिका त्यांनी घेतली असून, पारपत्रही पोलिसांच्या हवाली केले आहे. गतवर्षी ब्राझीलियन काँग्रेसच्या एका समितीने त्यांना उठावखोरीप्रकरणी दोषी ठरवले. तत्पूर्वी एका न्यायालयाने याच कारणास्तव त्यांच्यावर २०३०पर्यंत कोणतीही निवडणूक लढवण्यावर बंदी आणली. बोल्सोनारो यांचे आदर्श डोनाल्ड ट्रम्प! गतवर्षी निवडणूक हरल्यानंतर ते अमेरिकेतच ट्रम्प यांचा पाहुणचार घेण्यासाठी गेले होते. रीतसर झालेल्या निवडणुकीच्या सत्यतेविषयी चुकीची माहिती पसरवायची, समर्थकांना चिथावून रस्त्यावर आणायचे आणि लोकशाहीच्या प्रतीकांवर चाल करून जायची हा धक्कादायक प्रकार अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच ६ जानेवारी २०२१ रोजी घडला होता. असे उठाव आणि जानेवारी महिना हे ट्रम्प यांच्याप्रमाणेच बोल्सोनारो यांनाही आदर्शवत वाटले असावेत. पण अमेरिकेइतकी ब्राझीलची न्याय व तपास यंत्रणा गोंधळलेली दिसत नाही.

अमेरिकेमध्ये तर विविध न्यायालयांमध्ये ट्रम्प यांच्याविरुद्ध उठावखोरीचा खटला दाखल करण्यावरच एकमत होत नाही. त्यांनी अशी कृती केली- म्हणजे चिथावणी दिली त्यावेळी ते अध्यक्ष होते. अशा व्यक्तीस काही स्वरूपाच्या गुन्ह्यांपासून पदसिद्ध संरक्षण मिळते किंवा कसे यावरच तेथे अजून खल सुरू आहे. तशात अमेरिकी अध्यक्षपदाच्या आगामी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून ट्रम्पच उतरवले जातील हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे तसे काही होण्याच्या आत ६ जानेवारीच्या उठावाबद्दल त्यांच्याविरोधात काही तरी आरोपपत्र किंवा खटला उभा राहावा, यासाठी अमेरिकेतील लोकशाहीवादी आणि न्यायप्रेमी मंडळींचा खटाटोप सुरू आहे. बोल्सोनारो यांच्या बाबतीत किमान तसे पुनरुत्थान संभवत नाही. कारण ते निवडणूकच लढवू शकत नाहीत. तरीदेखील ट्रम्प आणि बोल्सोनारो यांनी जन्माला घातलेले उठावखोरीचे ‘टूलकिट’ जगभरात इतर लोकशाही देशांसाठीदेखील अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे एक उठावखोर गोत्यात आला, तरी सकस लोकशाहीसाठी ते पुरेसे नाही.

Story img Loader