गिरीश कुबेर

बोटीतनं, रस्त्यावर मधेच थांबलेल्या मोटारीतून, उंच-सखल वाळूच्या लाटांमधल्या वाहनातून एक अत्यंत लोकप्रिय खेळाडू उतरतो आणि त्या भूप्रदेशाचा आनंद घेतो. आणि ही जाहिरात संपता संपता अक्षरं येतात.. अरेबिया.

‘‘सिरीयस स्पोर्ट्स इज वॉर विदाऊट शूटिंग’’ असं जॉर्ज ऑर्वेल म्हणून गेला त्याला कित्येक वर्ष झाली. आणि तेव्हा प्रायोजक कंपन्या, त्यांचं अर्थकारणामागचं राजकारण आणि राजकारण्यांचं राजकारणासाठीचं खेळकारणङ्घ असं काही नव्हतं. ते सर्व आता आहे. त्यामुळे ऑर्वेल म्हणून गेला त्यापेक्षा कितीतरी पट अधिक ‘अर्थ’ खेळकारणात दडलाय. उदाहरणार्थ उद्या, रविवारी, १८ डिसेंबरला उद्यापन सोहळा असलेला फुटबॉल विश्वचषक. खरं तर ही स्पर्धा प्रथमच आशियात भरली. तीसुद्धा इस्लाम धर्म-प्रतिपालक अशा कतारमधे. आखातातल्या वाळवंटी देशात. एरवी युरोप, रशियातल्या वगैरे प्रसन्न हवेत हा खेळ खेळला जातो. आशियात तो आल्यानं स्पर्धेचा पोतच बदलला. त्यात परत कतारचे ते नियम. अंगप्रत्यांगांचं प्रदर्शन नाही, गळा-मिठी नाही, बिअरप्राशन नाही इत्यादी.

खरं तर या स्पर्धेची प्रायोजकच मुळात जगातली ‘बडवायझर’ ही बलाढय़ बिअर-कंपनी. गेली ३६ वर्ष बडवायझर ही फुटबॉल विश्वचषकाची पुरस्कर्ती आहे. कतारी अधिकाऱ्यांना स्पर्धेआधीही हे माहीत होतं. पण तरी शेवटच्या क्षणापर्यंत बिअर-बंदी जाहीर केली नाही. कारण? आधीच ते उघड केलं असतं तर परदेशी प्रेक्षकांची संख्या आटण्याचा धोका होता. तो टाळण्यासाठी वाच्यताच केली नाही बिअर-निर्बंधांची. ‘बडवायझर’ला हा मोठा फटका होता. लक्षावधी लिटर्स बिअर त्यांनी बनवून ठेवली होती फुटबॉल विश्वचषकासाठी. त्या बिअरवर पाणी पडणार..!  असं म्हणतात की एक आख्खं बिअर-वाहू जहाजच म्हणे कतारच्या किनाऱ्यावर लागणार होतं फुटबॉल-प्रेमींची बिअरासक्ती पुरवण्यासाठी ! या बिअर-पुरवठय़ासाठी कंपनीनं ५० लाख डॉलर्स एव्हाना खर्च केले होते. आणि अचानक बिअर-बंदी जाहीर केली गेली. कोटय़वधी बिअर-प्रेमींसाठी देखील ही बातमी तोंडाची चव घालवणारीच तशी. बिच्चारी बडवायझर असं म्हणत अनेकांनी हे दु:ख आपापल्या हातातल्या कशा-कशात रिचवलं. असो. पण तरी बडवायझर बधली नाही. कतार-विरोधात आरडाओरडा केला तर उगाच राजनैतिक संबंधांना तडा जायचा.          

बडवायझर ही अमेरिकी कंपनी ! अमेरिकी, इस्रायली वगैरे म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे गुर्जरबांधव. तिकडे जन्माला येणारा प्रत्येक जीव रक्तात विक्री कला घेऊनच जन्मतो. त्यामुळे बडवायझरनं बिअर-बंदी विरोधात आकांड-तांडव केलं नाही. कतारच्या नावानं आरडाओरडा केला नाही. आणि बिअर-बंदीनं स्वत:चं नुकसानही करून घेतलं नाही. ते कसं ? टीव्हीवर हे फुटबॉलचे सामने बघणाऱ्या अनेकांना हा प्रश्न पडला असेल की.. सामन्यावेळी प्रेक्षकांत अनेक जण हातात बिअरचे ग्लासेस वागवताना दिसतायत, अनेक जण ते तोंडाला लावताना दिसतायत..आणि तरी बिअर-बंदी कशी ? त्याचं उत्तर हे बडवायझरच्या चातुर्यात आहे.

बिअर-बंदीचा निर्णय आल्या आल्या या कंपनीनं दोन गोष्टी केल्या. एक म्हणजे नवी कोरी घोषणा दिली. ‘‘िब्रग होम द बड’’. अलीकडच्या भाषेत सांगायचं तर याचा अर्थ ‘‘भावा.. घरी घेऊन ये’’ असा काहीसा असेल. पण काय घरी घेऊन ये? तर अर्थातच विश्वचषक. म्हणजे तुम्ही विश्वचषक जिंका.. असा या कंपनीचा सहभागी देशांना सल्ला. आणि तसा तो जिंकला की ही कंपनी काय करणार? तर आनंदोत्सव साजरा करण्यासाठी बिअर फुकट पुरवणार. ‘‘ब्रिंग होम द बड.. सेलिब्रेशन ऑन अस’’.. अशी ती जाहिरात. तुम्ही विश्वचषक जिंका.. आम्ही मज्जा करायला फुकट बिअर पुरवू, असा हा संदेश. (तो वाचून तरी भारतीय फुटबॉलपटूंना काही प्रेरणा मिळेल, ही आशा. असो) यातून कतारकडे वळवलेला बिअरचा साठा ‘रिचवला’ जाण्याची अतिरिक्त सोय कंपनीनं करून टाकली. आणि दुसरं म्हणजे ‘बडवायझर झिरो’ अशी एक नवीच बिअर या विश्वचषकाच्या उन्मादी गर्दीत सोडून दिली. सांगायला ही ‘शून्य अल्कोहोल’ बिअर. कंपनी म्हणते ‘जवळपास’ शून्य अल्कोहोल आहे या बिअरमधे. कतार या इस्लामी देशात अल्कोहोलला बंदी आहे. पण शून्य अल्कोहोलला नाही. म्हणजे धर्ममरतडांची नजर चुकवून ही बिअर खुलेआम विकण्याची मुभा बडवायझरला मिळाली. धंदाही बुडला नाही आणि प्रेक्षकांनाही ‘किक’ मिळाली. ज्यांनी ज्यांनी ही बिअर प्यायली, त्या सर्वाची प्रतिक्रिया अशीच: चवीत काही म्हणजे काही फरक नाही. पण तरीही झिरो अल्कोहोल! याला काही कतारी सरकारनं नाही म्हटलं नाही. फुटबॉल स्टेडियममधे बिअर वहात राहिली. शेवटी धंदे की बात असतेच ना..

हे सामने सुरू झाले तेव्हा नव्हती पण आता अचानक एक जाहिरात या सामन्यांच्या प्रक्षेपणात टीव्हीवर दिसायला लागलीये. जागतिक राजकारण, अर्थकारण आणि खेळकारण या तिन्हीत रस असणाऱ्या अनेकांच्या भुवया ही जाहिरात पाहून उंचावल्या असणार. या जाहिरातीत, बोटीतनं, रस्त्यावर मधेच थांबलेल्या मोटारीतून, उंच-सखल वाळूच्या लाटांमधल्या वाहनातून.. एक अत्यंत लोकप्रिय खेळाडू उतरतो आणि त्या भूप्रदेशाचा आनंद घेतो. अतिशय उच्च दर्जाचं कलात्मक मूल्य असलेली ही जाहिरात. ती पाहिल्या पाहिल्या कळतं.. जगातल्या प्रचंड श्रीमंत ग्राहकासाठी तेव्हढय़ाच श्रीमंती जाहिरात कंपनीनं अत्यंत श्रीमंतपणे ही जाहिरात केली असणार. तर या जाहिरातीत दिसतो तो खेळाडू आहे लिओनेल मेसी आणि त्याची ही जाहिरात संपता संपता अक्षरं येतात..अरेबिया. म्हणजे ज्याच्यासाठी ही जाहिरात आहे तो देश आहे सौदी अरेबिया. त्यातही या देशाचा आगामी सम्राट महम्मद बिन सलमान. ऊर्फ एमबीएस. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या दिवशी जणू काही आपणच कतारचे मालक आहोत अशा टेचात एमबीएस होता आणि त्याच्याशी तसंच ‘फिफा’चे प्रमुख ग्यानी इन्फिन्टिनो वागत होते. तेच असं नाही.. सगळेच लवलवून एमबीएसला मान देत होते. यात काय एव्हढं असा प्रश्न पडेल काहींना हे वाचून.

अर्जेटिना विश्वचषकाचा दावेदार आहे आणि त्यात मेसीचा वाटा महत्त्वाचा असणार आहे आणि त्याचवेळी बरोब्बर ही जाहिरात आलीये इतकंच या ‘त्यात काय एव्हढं?’ याचं उत्तर नाही. तर २०३० साली होऊ घातलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदासाठी सौदी अरेबिया उत्सुक आहे.. हे समजलं की या योगायोगाचं महत्त्व लक्षात येईल. कल्पना करा.. अंतिम सामन्यात अर्जेँटिनाचा संघ अटीतटीच्या लढतीत वगैरे फ्रान्सवर मात करतोय, त्यात अर्थातच मेसीचा मोठा वाटा असणार आहे.. आणि हा मेसी त्याचवेळी सौदी अरेबिया ‘छान किती दिसतो’ अशी जाहिरात करतोय. आणि या वातावरण निर्मितीनंतर सौदी अरेबिया आणखी आठ वर्षांनी होणाऱ्या पुढच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धा भरवण्यासाठी दावा सांगतोय ! सगळे ठिपके जुळले की चित्र असं स्पष्ट होतं. या दाव्याच्या वातावरण निर्मितीसाठी ‘एमबीएस’नं तब्बल ४००० कोटी डॉलर्सची रक्कम बाजूला काढून ठेवलीये. एकटय़ानं स्वत:च्या बळावर किंवा इजिप्त वगैरेला बरोबर घेऊन एमबीएस ही विश्वचषक स्पर्धा भरवू इच्छितो. या सगळय़ासाठी आवश्यक ते अर्थबळ त्याच्याकडे आहे. कारण साधारण दोन लाख कोटी डॉलर्सची उलाढाल असलेली.. म्हणजे समग्र भारतीय अर्थव्यवस्थेच्या आकारापेक्षा काहीशी लहान..

‘अराम्को’ तेल कंपनी त्याच्या मालकीची आहे.  या अराम्को कंपनीच्या जाहिराती नुकत्याच संपलेल्या ‘आयपीएल’मधे अनेकांनी पाहिल्या असतील. सौदी सरकारच्या खासगी निधीतून उभ्या राहिलेल्या वित्तसंस्थेनं जगातली प्रमुख गोल्फ स्पर्धा आधीच सौदीत नेलीये. क्रिकेट झालं. गोल्फ झाला. आणखीही काही खेळ येतील. आणि मग फुटबॉलचा विश्वचषक. क्रीडा स्पर्धा आयोजनानं प्रतिमा उजळते हा धडा त्याला कतारनं दिलाय. तो एमबीएस गिरवू पाहतोय. गंमत म्हणजे यातल्या कोणत्याही खेळात सौदी वीर आघाडीवर आहेत असं नाही. एखादा अर्जेटिनाला हरवण्याचा या विश्वचषकातला अपवाद. पण एरवी सौदी क्रीडापटू देशाचं नाव काढतायत असं नाही. इतक्या क्रीडा स्पर्धा भरवण्यासाठी योग्य अशी क्रीडा-संस्कृती त्या देशानं जोपासलीये असं तर अजिबातच नाही. पण ऑलिम्पिक भरवण्याची स्वप्नं दाखवणाऱ्या गुजरातेत तरी कोणती क्रीडा संस्कृती आहे ? 

शेवटी धंदे की बात है..

girish.kuber@expressindia.com

      @girishkuber