युरोपीय क्लब फुटबॉलच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी प्रशिक्षकांपैकी असलेले इटलीचे कार्लोस आन्चेलोटी, या खेळात सर्वाधिक जगज्जेतेपदे मिळवलेल्या ब्राझील संघाला पुढील वर्षांपासून मार्गदर्शन करणार आहेत. सध्या युरोप आणि एकूणच फुटबॉलविश्वात विरामकाल सुरू असल्यामुळे नवीन हंगामात कोणता खेळाडू कुठे जाणार याविषयीच्या बातम्याच प्रसृत होताना दिसतात. या वातावरणात आन्चेलोटी ब्राझीलचे भावी प्रशिक्षक बनणार, या वृत्ताने अर्थातच फुटबॉल जगताचे लक्ष वेधून घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाच वेळा जगज्जेतेपद पटकावलेल्या ब्राझीलच्या संघाला आणि या फुटबॉलप्रेमी देशातील असंख्य चाहत्यांना सहाव्या अजिंक्यपदाची प्रतीक्षा आहे. ती किमया आन्चेलोटी साधू शकतील, असे ब्राझीलच्या फुटबॉल संघटनेला वाटते. आन्चेलोटी सध्या स्पॅनिश फुटबॉल क्लब रेआल माद्रिदचे प्रशिक्षक आहेत. त्यांचा या क्लबशी असलेला करार नवीन हंगामाच्या अखेरीस म्हणजे जून २०२४ मध्ये संपुष्टात येईल. यानंतर ते ब्राझीलच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाची सूत्रे स्वीकारतील असा अंदाज आहे. क्लब फुटबॉलमधील सर्वोच्च मानली जाणारी युरोपियन चँपियन्स लीग स्पर्धा चार वेळा जिंकणारे ते एकमेव प्रशिक्षक. दोन वेळा इटलीचा एसी मिलान आणि दोन वेळा स्पेनचा रेआल माद्रिद यांनी आन्चेलोटी यांच्या मार्गदर्शनाखाली चँपियन्स लीग जिंकली. याशिवाय इटली (एसी मिलान), इंग्लंड (चेल्सी), जर्मनी (बायर्न म्युनिच), फ्रान्स (पॅरिस सेंट जर्मेन) आणि स्पेन (रेआल माद्रिद) अशा पाच देशांमधील मुख्य फुटबॉल लीग जिंकून देणारेही ते एकमेव प्रशिक्षक. अशी भारदस्त कारकीर्द असल्यामुळेच ब्राझिलियन फुटबॉलरसिकांना आन्चेलोटी यांच्याविषयी विलक्षण आशा वाटते.

आन्चेलोटी हे सहसा कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सदा तत्पर असतात. पाच देशांमध्ये फुटबॉल संस्कृती भिन्न असते. ब्राझीलसारख्या देशात तर ती आणखी वेगळी ठरते. आन्चेलोटी यांनी जवळपास प्रत्येक क्लब प्रशिक्षक कारकीर्दीमध्ये ठसा उमटवला. परंतु त्यांची सर्वाधिक वैशिष्टय़पूर्ण कारकीर्द इटलीतील एसी मिलान क्लबसाठी ठरली. मूळ इटालियन असल्यामुळे त्यांची सुरुवातीची शैली बचावात्मक खेळाकडे झुकलेली होती. कालौघात या शैलीत बदल करण्याची लवचीकता त्यांनी दाखवली. ही लवचीकता आणि कल्पकता त्यांच्या यशस्वीतेस कारणीभूत ठरली. फुटबॉल प्रशिक्षकाला मैदानावरील डावपेचांबरोबरच, वलयांकित फुटबॉलपटूंनाही काळजीपूर्वक हाताळावे लागते. शांत स्वभावामुळे ही अवघड जबाबदारी आन्चेलोटी यांनी नेहमीच योग्यरीत्या पार पाडली. गत हंगामात ब्राझील व रेआल माद्रिदचा युवा खेळाडू विनिशियस ज्युनियर याला स्पॅनिश लीगमधील काही सामन्यांमध्ये प्रेक्षकांतून वर्णद्वेषी टोमेणेबाजीचा सामना करावा लागला. त्यावेळी आन्चेलोटी यांनी त्यांच्या शांत व्यक्तिमत्त्वास पूर्णपणे विपरीत आक्रमक भूमिका घेतली आणि ते विनिशियसच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले. यासाठी प्रसंगी रेआल माद्रिद आणि स्पॅनिश लीगच्या व्यवस्थापनासही त्यांनी खडे बोल सुनावले. पेप गार्डियोला किंवा होजे मोरिन्यो यांसारख्या इतर वलयांकित प्रशिक्षकांसारखे आन्चेलोटी सतत प्रसिद्धिझोतात नसतात. तरीही ते सर्वाधिक यशस्वी प्रशिक्षक ठरले, ही त्यांच्या प्रतिभेला मिळालेली दाद ठरते.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Carlo ancelotti profile brazil football coach carlo ancelotti zws