‘ईश्वरी राज्य हेच खरं आणि शाश्वत राज्य’ हा मध्ययुगीन मूलमंत्र ११ व्या शतकापर्यंत इतका रुजला की, लोकप्रिय सम्राटालाही गुडघे टेकावे लागले… ‘समोरच्याचं अधिपत्य स्वीकारून शरण जाणं’, अशा अर्थानं ‘Road to Canossa’ हा वाक्प्रचार अनेक युरोपीय भाषांत प्रचलित आहे. पण या वाक्प्रचाराला एक ऐतिहासिक संदर्भ आहे. हा वाक्प्रचार पाश्चात्त्य जगातल्या राजकीय सत्तासंबंधातल्या स्थित्यंतराचं निर्देशक आहे. मध्ययुगाचा संबंध सरळसरळ कॅथोलिक चर्चच्या अधिपत्याशी जोडला गेला असला तरी मध्ययुग एकजिनसी नसून बहुजिनसी आहे. इसवी पाचव्या शतकात रोमन साम्राज्याच्या पतनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी कॅथोलिक चर्चला ११व्या शतकापर्यंत पोषक वैचारिक आणि सांस्कृतिक वातावरणाची निर्मिती करावी लागली. ११व्या शतकापर्यंत युरोपीय समाजाच्या ख्रिास्तीकरणाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली. सामूहिक स्मृतिभ्रंश घडवून आणला गेला. त्यामुळे मध्ययुगीन अंधारयुगात ख्रिास्ती धर्मगुरू आणि सर्वसामान्य जनता पॅस्टोरल (मेंढपाळ – मेंढरं असा) संबंध निर्माण झाला. अशा पोषक परिस्थितीत कॅथोलिक चर्चकडून ग्रेगोरियन सुधारणांची घोषणा झाली. या ग्रेगोरियन सुधारणा म्हणजे चर्चच्या प्रत्यक्ष राजकीय हस्तक्षेपाला सुरुवात. तत्कालीन होली रोमन सम्राट चौथा हेन्रीला चर्चचा हा राजकीय हस्तक्षेप मान्य नव्हता. तो चर्चच्या या कृतीला नकार देतो. त्यामुळे तत्कालीन पोप सातवा ग्रेगरी त्याला बहिष्कृत करून धर्माबाहेर करतो. चौथा हेन्री लोकप्रिय राज्यकर्ता असल्याने सुरुवातीला या बहिष्काराची फार दखल घेत नाही. त्या काळी कॅथोलिक चर्च म्हणजे शिक्षित लोकांची एकमात्र प्रचारयंत्रणा होती. हेन्रीचं धर्मबाह्य साम्राज्य म्हणजे नरकाची तयारी असा प्रचार सुरू होतो. कॅथोलिक धर्मसत्तेची समाजावर इतकी दहशत असते की हळूहळू सम्राटाच्या विरोधातच बंडखोरी सुरू होते. त्याच्या लक्षात येतं की धार्मिक पाठबळाशिवाय त्याला राज्य करताच येणार नाही. शेवटी तो पोपची क्षमा मागून शरण जातो.

पण ही शरण जाण्याची प्रक्रिया समग्र ख्रिास्ती जगाला माहिती व्हावी आणि कॅथोलिक धर्मसत्तेचं अधिपत्य निर्विवादपणे प्रस्थापित व्हावं यासाठी पोप हेन्री कडून ‘कानोसाची प्रायश्चित्त यात्रा’ घडवून आणतो. ही यात्रा हेन्रीला पुत्र, पत्नी आणि दरबारासोबत उत्तर इटलीतील कानोसा या ठिकाणी करावी लागते. त्यासाठी हेन्रीला अपमानजनक पोशाख परिधान करावा लागतो. बर्फात पायी प्रवास करून हेन्री कानोसा इथं, पोपच्या निवासस्थानी सन १०७६ मध्ये पोहोचतो. पण तब्बल तीन दिवस पोप त्याच्या कॅसलचं प्रवेशद्वार उघडत नाही. तीन दिवस हेन्रीला बाहेर बर्फात प्रतीक्षा करावी लागते. त्यानंतर पोप दार उघडतो आणि सम्राट हेन्रीला क्षमा करतो. थोडक्यात, कानोसाची प्रायश्चित्त यात्रा म्हणजे ऐहिक सम्राटाची मानखंडना करणारी धिंड आणि सगळ्या राज्यकर्त्यांना संदेश की पारलौकिक धर्मसत्ता हीच सर्वोच्च सत्ता आहे.

मध्ययुगातील राजकीय सत्तासंबंधामधील ही उलथापालथ आणि कॅथोलिक चर्चचा हा राजकीय अवतार समजून घेण्यासाठी परत ऑगस्टीनच्या पोलादी चौकटीचा आणि त्याआधारे निर्माण करण्यात आलेल्या मध्ययुगीन समाजरचनेचा परामर्श घ्यावा लागेल. इ. स. पाचव्या शतकात रोमन साम्राज्याच्या पतनानंतर पूर्वाश्रमीच्या रोमन वसाहतींमध्ये अनेक मध्ययुगीन राज्यं जन्माला आली होती. दुसऱ्या बाजूला कॅथोलिक चर्च एक मध्यवर्ती धर्मसत्ता म्हणून उदयास येऊन तिचा प्रतिभावंत, उद्यामशील पण कट्टरवादी ‘डॉक्टर’ सेंट ऑगस्टीननं ख्रिास्तीपूर्व धर्मश्रद्धा आणि ख्रिास्ती धर्मातीलच इतर प्रवाहांचा बीमोड करून अपरिवर्तनीय तात्त्विक चौकट आखून दिली. या चौकटीनुसार ‘सिटी ऑफ गॉड’ आणि ‘सिटी ऑफ मेन’ अशी स्पष्ट फारकत करून सिटी ऑफ गॉड अर्थात ईश्वरी राज्याच्या अधिपत्याचा शास्त्रोक्त पुरस्कार केला. परिणामी, ईश्वरी राज्य हेच खरं आणि शाश्वत राज्य असल्यानं तिथं प्रवेश कसा मिळेल यासाठी सतत प्रयत्नरत असलं पाहिजे, हा मध्ययुगीन मूलमंत्र खोलवर रुजला. थोडक्यात, व्यावहारिकदृष्ट्या लौकिक आणि पारलौकिक गोष्टींचं विभाजन असलं तरी धार्मिक पातळीवर मात्र कॅथोलिक चर्चकडे अंतिम नियामक सूत्रं होती.

मध्ययुग म्हणजे राजेशाहीचा काळ असल्यानं राजा हा साक्षात ईश्वराचा अंश समजला जात असे. मात्र त्यासाठी त्याचा धार्मिक रीतीनं अभिषेक होणं गरजेचं होतं. शास्त्रोक्त अभिषेक होत नाही तोवर तो साधा माणूसच ठरत असे. राज्यभिषेकानंतर ईश्वराचा प्रतिनिधी म्हणून राजा घोषित झाल्यावर त्याच्या खालोखाल असणाऱ्या ड्यूक, काउंट, बॅरन, नाईट्स आदी राज्यकर्त्यांच्या उतरंडीलाही धार्मिक अधिष्ठान प्राप्त होत असे. त्यासाठी सर्वांना ईश्वराला साक्ष ठेवून, ‘‘संकटकाळी आणि राजा आदेश करेल तेव्हा राजाच्या आदेशाचं पालन धर्मकर्तव्य असेल,’’ अशी राजनिष्ठेची शपथ घ्यावी लागे. ही उतरंड स्वामी-सेवक या तत्त्वावर आधारित होती. पुरोहितवर्ग आणि राज्यकर्ता उमराववर्ग यांच्याखेरीज, सुमारे ९० ते ९५ पंच्याण्णव टक्के कष्टकरी जनसामान्यांना कुठलाही अधिकार नव्हता.

खरंतर, मध्ययुगात पुरोहित वर्ग आणि उमराव वर्ग यांच्यात शतकानुशतकं संगनमत होतं. आध्यात्मिक पातळीवर ख्रिास्ती धर्मात समता असली तरी कॅथोलिक चर्चनं ऐहिक व्यवहारात विषमतावादी समाजरचनेला धार्मिक अधिष्ठान दिलं होतं. ‘राजद्रोह हा धर्मद्रोह आहे’ असं राजकीय तत्त्वज्ञान रुजवण्यात आल्यानं मध्ययुगीन पापभीरू आणि देवभीरू समाज राज्यकर्त्यांविरुद्ध बंड करत नसे. त्यामुळे मध्ययुगीन ऐहिक सत्ता आणि पारलौकिक सत्ता यांच्यात बहुतेकदा सहयोगाचे संबंध होते. पण एखादा प्रबुद्ध राजा किंवा सम्राट धर्मसत्तेची ढवळाढवळ आणि अधिपत्य नाकारत असे, तेव्हा मात्र द्वंद्वात्मक परिस्थिती निर्माण होत असे. थोडक्यात, पुरोहितवर्ग-उमराववर्ग परस्परावलंबी आणि परस्परपूरक असले तरी मध्ययुगीन धार्मिक चौकटीनुसार धर्मसत्तेचं अधिपत्य निर्विवादपणे स्वीकारण्यात आलं होतं.

आध्यात्मिक चळवळ ते ११व्या शतकातील राजकीय महाशक्ती या वाटचालीमागे कॅथोलिक चर्चचं कैक शतकांचं विचारप्रणालीत्मक (ideological) नियोजन आणि अंमलबजावणी आहे. कारण राजकीय सत्तेला आधारभूत अशा वैचारिक आणि सांस्कृतिक परिस्थितींची निर्मिती ही सत्तेच्या निर्मितीची आणि पुनर्निर्मितीची पूर्वअट असते. त्यामुळे मध्ययुगाच्या सुरुवातीला कॅथोलिक चर्चनं लौकिक व्यवहारात ढवळाढवळ टाळून विचारप्रणालीत्मक कामावर भर दिला. ‘पॅस्टोरल तर्का’चा अवलंब करून समाजमनाचं काटेकोर इंजिनीअरिंग करण्यात आलं. स्वत:च्या बुद्धीचा वापर करणंच पाप आहे, एवढी भीती सर्वसामान्यांमध्ये निर्माण करण्यात आली होती. त्यामुळे सामान्यजन सर्वच बाबतींत चर्चच्या अधीन झाले होते.

आपण पुढे पाहणार आहोत की धर्मसत्तेची ही जरब १५व्या शतकापर्यंत टिकून होती. मात्र बदलत्या भौतिक परिस्थितींसोबत १६व्या शतकाच्या सुरुवातीला नवीन विचारांचे वारे वाहू लागतात. चर्चच्या पॅस्टोरल तर्काचे अंतर्विरोध स्पष्ट होतात. त्यामुळे कॅथोलिक चर्चच्या पोलादी चौकटीला तडा जातो. एका बाजूला मार्टिन ल्यूथर कॅथोलिक चौकटीला आतून सुरुंग लावतो; तर दुसरीकडे आठवा हेन्री कॅथोलिक चर्चलाच बाहेरचा रस्ता दाखवून चर्चची संपत्ती जप्त करतो. कारण त्याच्या घटस्फोटामुळे कॅथोलिक चर्चने त्याला बहिष्कृत केलं होतं. पुढे जाऊन अठराव्या शतकाच्या शेवटी फ्रेंच राज्यक्रांती होते. मध्ययुगीन विषमतावादी समाजरचनेचं धार्मिक अधिष्ठान औपचारिकपणे संपुष्टात आणून स्वातंत्र्य, समता, बंधुता या मानवतावादी आधुनिक तत्त्वांवर नव्या जगाची उभारणी करण्याची शपथ घेतली जाते. मात्र ११व्या शतकातल्या चौथ्या हेन्रीच्या कानोसा इथल्या मानखंडनेचा सार्वजनिकपणे सूड जर कुणी उगवला असेल तर तो आहे नेपोलियन बोनापार्ट.

१८०४ मध्ये नेपोलियन बोनापार्टने व्यूहरचना आखून कॅथोलिक चर्चला शरण यायला भाग पाडलं. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर नेपोलियन युग सुरू होऊन फार कमी काळात नेपोलियननं युरोपवर अधिपत्य प्रस्थापित केलं, तेव्हाच अनेक ठिकाणी कॅथोलिक चर्चची संपत्तीही जप्त केली गेली. तेवढ्यावरच न थांबता, १८०४ मध्ये युरोपचा सम्राट म्हणून त्याच्या राज्याभिषेकाची भव्य योजना आखली गेली. प्रथेप्रमाणे सम्राटाला पोपकडून राज्यभिषेक करून घेण्यासाठी रोमला जावं लागे. मात्र नेपोलियन पोपलाच पॅरिसला बोलावतो. पोपचं दुय्यमत्व आणि परावलंबित्व जगाला कळावं म्हणून ही रणनीती. पोपचा दरबार दीर्घ प्रवास करून पॅरिसनजीक पोहोचतो; त्याच दिवशी नेपोलियन फोन्तेनब्लच्या जंगलात शिकारीसाठी जातो. कारण पोपचा काफिला त्याच वाटेनं येणार असतो. पोपला संदेश पाठवण्यात येतो की नेपोलियनची भेटायची इच्छा आहे. त्या दिवशी पाऊस पडत असल्यानं सर्वत्र चिखल असतो. अशा अनौपचारिक वाटणाऱ्या भेटीसाठी नेपोलियन पोपला चिखलात चालायला भाग पाडतो.

पोपला नमवण्याच्या रणनीतीचा दुसरा भाग म्हणजे पॅरिसमध्ये नोत्र-दाम या कॅथेड्रलमध्ये भव्य राज्यभिषेकाचा सोहळा ठरतो. प्रथेप्रमाणे पोप नेपोलियनच्या डोक्यावर सम्राटाचा मुकुट ठेवणार तेवढ्यात नेपोलियन पोपच्या हातातून मुकुट हिसकावून स्वत: आपल्या डोक्यावर ठेवतो. धार्मिक सत्तेचा हस्तक्षेप नाकारून ऐहिक सत्तेची स्वायत्तता आणि प्रतिष्ठा प्रस्थापित करणारा हा चित्तथरारक प्रसंग नेपोलियननं तत्कालीन प्रख्यात कलाकार जॅक-लुई डेव्हिडकडून ‘कॉरोनेशन ऑफ नेपोलियन’ या चित्रामधून नोंदवून घेतला आहे. हे तैलचित्र सध्या पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये आहे.

प्रस्तुत लेखांकात ‘रोड टू कानोसा’ या प्रसंगाच्या मदतीनं मध्ययुगातील राजकीय स्थित्यंतराचा परामर्ष घेतला; पण या दृश्य स्थित्यंतरामागे शतकांचं अदृश्य वैचारिक आणि सांस्कृतिक काम दडलेलं आहे- जे कॅथोलिक चर्चचे ‘डॉक्टर्स’ आणि त्यांचे असंख्य अनामिक सहकारी अतिशय चिवटपणे करत होते. त्यामुळे ख्रिास्तीपूर्व समाजाची सामूहिक स्मृती पुसून मध्ययुगीन समाजमनाच्या ख्रिास्तीकरणाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली. युरोपियन सांस्कृतिक क्षेत्राचंही ख्रिास्तीकरण कसं झालं, याची चर्चा पुढल्या सोमवारी करू.

फ्रेंच साहित्य-तत्त्वज्ञानाचे अभ्यासक

sharadcrosshuma@gmail.com