शासकीय सेवकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यावर असलेली बंदी उठवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहेच; शिवाय संघ व भाजपमध्ये सध्या सुरू असलेल्या कथित ताणतणावाला नवे वळण देणारा आहे. मुळात ही बंदी घातली गेली १९६६ ला. म्हणजे ५८ वर्षांपूर्वी. त्यानंतर १९७० व ८०ला ती कायम ठेवण्याचा निर्णय झाला. याला पार्श्वभूमी होती ती महात्मा गांधींच्या हत्येची. यात सहभाग असल्याच्या संशयावरून १९४८ मध्ये सरदार पटेलांनी संघावरच बंदी घातली. ती नंतर मागे घेण्यात आली, पण घटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या चौकटीला छेद देणारा सरकारी बाबूंचा या संघटनेतील सहभाग योग्य कसा, या प्रश्नावर चर्चा होत राहिली व त्यातून हा निर्णय घेण्यात आला. मधल्या काळात संघाचे अपत्य असलेल्या जनसंघ व भाजपचा सहभाग असलेली सरकारे आली पण कुणीही या बंदीकडे लक्ष दिले नाही. मग आताच ती उठवण्याचे कारण काय? गेल्या दहा वर्षांपासून मित्रपक्षांच्या सहकार्याशिवाय चालणारे व पूर्णपणे भाजपचे वर्चस्व असलेले सरकार देशात होते. तेव्हा ती का मागे घेण्यात आली नाही? अपेक्षेप्रमाणे या निर्णयाचे संघाने स्वागत व काँग्रेसने टीका केली असली, तरी ९ जुलैच्या या निर्णयावर आधी टीका झाल्यावर नंतर स्वागत करण्याची संघाची भूमिका नेमके काय दर्शवते? नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात आता भाजपला संघाची गरज नाही असे विधान जे. पी. नड्डांनी केले होते. त्याचा थेट प्रतिवाद न करता निकालाची वाट बघणाऱ्या संघाने तो अपेक्षेप्रमाणे नाही हे दिसल्यावर एकूणच राजकीय नेतृत्वाच्या अहंकारावर तीव्र शब्दात भूमिका मांडली होती. यातून संघ व भाजपमध्ये सारे काही सुरळीत नाही अशी चर्चा सुरू झाली. यानंतरच हा निर्णय आल्याने भाजपने नाराज संघाला चुचकारण्यासाठी हे पाऊल उचलले का असा प्रश्न चर्चिला जाऊ लागला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा