दिल्लीवाला

सध्या बिहार राजकीय हालचालींचं केंद्र झालं आहे. २३ जून रोजी पाटण्यात विरोधी पक्षांच्या महाआघाडीची बैठक होणार आहे. त्यात भाजपेतर पक्ष भाजपशी लढण्याचं कोणतं सूत्र काढतात याची उत्सुकता असेल. अर्थात त्यांनी सूत्र ठरवलं तरी ते पाळलं जाईल याची हमी कोण देणार, हा प्रश्न आहेच. विरोधी पक्षांमधली भांडणं कमी झालेली नाहीत आणि मध्य प्रदेश-राजस्थान या राज्यांतून काँग्रेसला थोडीफार ताकद मिळाली तर आक्रमक काँग्रेसवाले इतर विरोधी पक्षांचं ऐकतील असंही नाही. हे सगळं गृहीत धरून भाजपनं मित्रांची जोडणी सुरू केली आहे.

yogi Adityanath told mahavikas aghadi problem
काँग्रेस आघाडी ‘समस्या’; तर भाजपा महायुती ‘समाधान’ – योगी आदित्यनाथ
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Congress Priyanka Gandhi road show today in West Nagpur and Gandhi Gate, Mahal in Central Nagpur
प्रियंका गांधी यांची प्रतीक्षाच, पण बघ्यांची मोठी गर्दी
Congress Priyanka Gandhi held road show in two constituencies in Nagpur on Sunday
प्रियंका गांधींचा आज नागपुरात या दोन ठिकाणी ‘रोड-शो’
pune bjp fight
पुणे: प्रचार फेरीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, संगमवाडीतील घटना
tumsar assembly constituency
तुमसर विधानसभेत जात, पक्ष अन् चिन्ह दुय्यम स्थानी; उमेदवारच केंद्रस्थानी !
Mumbai traffic routes marathi news
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल

भाजपसाठी बिहार महत्त्वाचं राज्य आहे. दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात बिहारसंदर्भात पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत मोठी बैठक झाली. बिहारमधल्या बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं तिथल्या छोटय़ा प्रादेशिक पक्षांना जवळ करण्याचं ठरवलं आहे. विरोधकांची बैठक झाली की, दुसऱ्याच दिवशी २४ जूनला नड्डांची जाहीर सभा होईल. मग, २९ तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही जाहीर सभा होईल. पुढील सहा महिन्यांत इतर राज्यांत विधानसभा निवडणुका होणार असल्या तरी, बिहारकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता भाजपनं घेतली आहे. पुढच्या काळात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे वारंवार दौरे होताना दिसतील. चिराग पासवानचा लोकजनशक्ती पक्ष पुन्हा भाजप आघाडीत आलेला दिसू शकतो. एके काळी नितीशकुमार यांचे विश्वासू जीतनराम मांझींनी भाजपशी जवळीक केली आहे. त्यांचा हिंदूस्थानी आवामी मोर्चाही भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. पासवान, मांझी हे नेते नितीशकुमार यांच्या विरोधात हल्लाबोल करून महाआघाडीच्या संभाव्य नेतृत्वामधील विश्वासार्हतेबद्दल शंका निर्माण करू शकतील. भाजपच्या नेत्यांनी नितीशकुमार यांच्या काळातल्या भाजपच्या युती सरकारच्या चांगल्या गोष्टी लोकांसमोर मांडायच्या आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतं मागायची अशी रणनीती आखली जात आहे.

नामांतराचं वास्तव

तीन मूर्ती भवन म्हणजे पं. नेहरूंचं निवासस्थान ही ओळख गेली ७५ वर्ष टिकून होती. पंतप्रधानपदाच्या संपूर्ण कार्यकाळात नेहरूंचं वास्तव्य याच वास्तूत होतं. तिथंच इंदिरा गांधींना राजकारणाचं बाळकडू मिळालं. नेहरूंचं हे निवासस्थान काँग्रेसच्या काळात संग्रहालय झालं. तिथं या कुटुंबाच्या जगण्याच्या अनेक खुणा दिसतात. जगण्यातला अभिजातपणा आणि साधेपणा यांचं एक विलक्षण मिश्रण जाणवतं. नेहरूंबद्दल प्रेम असो वा नसो, तिथं जाणाऱ्याला तिथल्या वातावरणाशी नातं जोडता येऊ शकतं. नेहरू योग करत होते की नाही हे माहिती नाही, पण तिथल्या पुस्तकांचे रकाने पाहिले तर, देशाचा पहिला पंतप्रधान ग्रंथप्रेमी होता आणि भरपूर वाचन करत होता हे पटू शकतं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंनी मध्यरात्री केलेलं ऐतिहासिक भाषण नेहरूंनी स्वत: लिहिलं होतं. त्या लेखी भाषणात काही विशिष्ट शब्द नेहरूंनी वेगळे समाविष्ट केले आहेत. या भाषणाची हस्तलिखित प्रतही तिथं पाहता येते. नेहरूंच्या निवासस्थानी पंतप्रधान संग्रहालयाच्या अत्याधुनिक खुणा दिसत नसतील, पण इथून देशाचा कारभार हाकला गेला याचं भान मिळतं. या निवासस्थानाला हात लावला गेलेला नाही. त्याच्या मागे पंतप्रधान संग्रहालय नावाची नवी इमारत बांधली गेली आहे. तिथे नवीन तंत्रज्ञानाचा वापर आहे, पण तीन मूर्ती भवनाचा अभिजातपणा नाही. तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केलेल्या या नव्या दालनांमध्ये पर्यटकांसाठी मनोरंजनात्मक गोष्टी आहेत. कुठल्याही पंतप्रधानासोबत आभासी छायाचित्र काढा, त्यांच्यासोबत आभासी चाला, अशी काहीही गंमत तिथं करता येईल. तिथं पाच मिनिटांची आभासी हेलिकॉप्टर सवारीही आहे. या आभासी हेलिकॉप्टरमध्ये बसून भारत दर्शन होईल अशी प्रेक्षकांना अपेक्षा असते, पण त्यात बघायला काय मिळतं, तर या सरकारच्या काळातले दोन-चार मोठे पायाभूत प्रकल्प. ते बघवण्यासाठी पैसे मात्र मोजून घेतात. सर्व पंतप्रधानांची वेगवेगळी दालनं पाहून थक्क व्हायला मात्र होत नाही. कारण तिथली सगळी माहिती इंटरनेटवरही मिळते. मग कशासाठी केला हा सगळा अट्टहास या प्रश्नाचं उत्तर नव्याने झालेल्या नामांतरात कदाचित मिळू शकेल.

पदाचा भार

गेल्या आठ-दहा दिवसांत राज्यातल्या वेगवेगळय़ा पक्षांचे नेते दिल्ली दौऱ्यावर होते. राष्ट्रवादी काँग्रेसने २४ वा वर्धापन दिन दिल्लीत साजरा केला. त्यांचं साजरीकरण इतकं आवाजी होतं की, कार्यक्रमात अजित पवार डोळय़ांवर गॉगल लावून आणि कानांवर हात ठेवून बसले होते. हतबल झाल्यासारखेही दिसले. कार्यक्रम झाल्यावर न बोलता निघून गेले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार दिल्लीतच होते. अजितदादांची चर्चा सुरू झाल्यामुळं त्यांनी पत्रकार परिषद घेतली. औत्सुक्याचा प्रश्न एकच होता, कार्यकारी अध्यक्ष नजीकच्या काळात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील का? मुद्दा काय हे पवारांना लगेच कळलं. ते म्हणाले, हे पद रिक्त नाही. या पदावर मी आहे मग, दुसरं कोण कसं असेल? कार्यकारी अध्यक्ष नेमण्याच्या प्रक्रियेत अजित पवारही होते मग, त्यांना न कळवता हा निर्णय होईल कसा? हे दोन मुद्दे पवारांनी पत्रकारांना पटवून दिले. हे सारं सुरू असताना राज्यातल्या महाविकास आघाडीचे विरोधक असलेल्या शिंदे गट-भाजपने खरी गंमत आणली. जाहिरात छापून आल्यानंतर शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे दिल्लीत दाखल झाल्याने सगळय़ांच्या नजरा उंचावल्या. ते काश्मीरला गेले होते, तिथून दिल्लीला आले. एक रात्र इथं राहिले मग, दुसऱ्या दिवशी दुपारी मुंबईला परतले. एका रात्रीत त्यांनी कोणाच्या भेटीगाठी घेतल्या असतील, तर माहिती नाही. एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस मध्यरात्री वगैरे सगळय़ांचा डोळा चुकवून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटून जातात. त्यामुळं श्रीकांत शिंदेही शहांना भेटण्यासाठी आले असतील असा कयास होता. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या मैत्रीपूर्ण बैठकीनंतर शहांना न भेटताच युतीत आलबेल झालेलं दिसतंय. सध्या मुंबईत काँग्रेसच्या बैठका सुरू आहेत. राज्यात काहीही केलं की, काँग्रेसवाल्यांना दिल्लीत येऊन हायकमांडला रिपोर्टिग करावं लागतं. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दोन दिवसांपूर्वी दिल्लीत येऊन मल्लिकार्जुन खरगे आणि के. सी. वेणुगोपाल यांना भेटून गेले असं म्हणतात. लोकसभा निवडणुकीमध्ये जागावाटपाचं सूत्र ठरवलं जातंय, त्याची खबरबात पटोलेंनी खरगे-वेणुगोपाल यांना दिली असावी. राहुल गांधी एक-दोन दिवसांत दिल्लीत परत येतील, त्यांच्या भेटीसाठीही पटोले दिल्लीला येऊ शकतील. पटोलेंच्या आधी अशोक चव्हाण दोन दिवस दिल्लीत होते. त्यांनीही खरगेंची भेट घेतली होती. त्यांच्या दिल्लीवारीमुळे प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा मात्र झाली. पण, सध्या काँग्रेसचं लक्ष लोकसभा निवडणूक असून पक्षात फेरबदल होतील तेव्हा सगळय़ा राज्यांत होऊ शकतील, तोपर्यंत नेत्यांच्या दिल्लीवाऱ्या होत राहतील.

आपसे दोस्ती.. कभी नही!

काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी गुजरात, पुदुच्चेरी, मुंबई प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत. आता लक्ष काँग्रेसची कार्यकारी समितीची पुनस्र्थापना कधी होणार याकडं लागलेलं आहे. काँग्रेससाठी आम आदमी पक्ष दुखरी नस बनला आहे. आप राज्या-राज्यांत घुसखोरी करतोय आणि काँग्रेसची मतं खाऊन टाकतोय. गुजरातमध्ये आलेल्या अनुभवामुळं आपनं कितीही जवळ येण्याचा प्रयत्न केला तरी काँग्रेसनं या पक्षाला दूर ठेवण्याचं धोरण अवलंबलं आहे. आपचे सर्वेसर्वा अरिवद केजरीवाल कधीपासून खरगे आणि राहुल गांधींच्या भेटीसाठी प्रयत्न करत आहेत. पण, दोघेही केजरीवाल यांना वेळ देत नाहीत. आपसाठी काँग्रेसनं दिल्ली सोडली तर त्यांना केंद्रात नेतृत्व करता येणार नाही हे काँग्रेसच्या नेत्यांना समजतं. त्यामुळं एखाद्या मुद्दय़ावर अखेरच्या क्षणी काँग्रेस आपला पाठिंबा देईल, पण आपच्या विस्तारवादाला कडवा विरोध करेल असं दिसतंय. दिल्ली काँग्रेसचा प्रदेशाध्यक्षही बदलला जाणार आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांच्या जागी कन्हैया कुमार यांच्यासारखा आक्रमक तरुण नेता आणण्याचा विचार होत असल्याचं सांगितलं जातं. आपसमोर नांगी टाकली तर काँग्रेसचं नुकसान होईल असं दिल्ली काँग्रेसचे नेते अजय माकन, संदीप दीक्षित सातत्याने सांगत आहेत. पण, काँग्रेसला आपशी दोन हात करणाऱ्या तगडय़ा नेत्याची गरज असून त्याची शोधाशोध सुरू आहे. कोणी मिळालं नाही तर कन्हैया कुमारला संधी मिळूही शकेल.