राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या गटाचे नेते अजित पवार यांनी दिल्लीत दिवाळी साजरी केली. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ही त्यांची पहिलीच दिवाळी आहे. नव्या घरात संसार थाटल्यावर वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावे लागतात. त्यांचा मान राखला नाही तर तिजोरीच्या चाव्या मिळत नाहीत. त्यामुळं दादा चाव्या मिळवण्यासाठी आशीर्वाद मागायला आले होते असं म्हणतात. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पक्षासंदर्भात सुनावणी असल्यामुळं त्यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आधीच दिल्लीला आले होते. दादांसोबत त्यांचे सहकारी प्रफुल पटेल होते. तेव्हाही प्रफुलभाई शरद पवारांसोबत सगळीकडे जात असत. त्यामध्ये भाजपच्या नेतृत्वाच्या भेटीगाठींचाही समावेश असे. आताही प्रफुलभाई त्यांच्या भेटगाठी घेत आहेत पण, दादांसोबत. व्यक्ती बदलली इतकंच. उपमुख्यमंत्री झाल्यापासून दादांची ही तिसरी दिल्लीवारी होती. प्रत्येक वेळी ते एकटेच आले. राज्याला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या एकत्रित दिल्लीवारीची सवय होती. आता दोन उपमुख्यमंत्री झाले असले तरी तिघे कधी एकत्र दिल्लीला आलेले दिसले नाही. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी मोदी-शहांशी वेगळी चर्चा केली. उपमुख्यमंत्री झाल्यावर आभार मानण्यासाठी दादा दिल्लीत येऊन अमित शहांना भेटून गेले होते. त्यानंतर एनडीएच्या बैठकीसाठी दादा आले होते. तेव्हा त्यांनी मोदी-शहा-नड्डांशी अशोका हॉटेलमध्येच वेगळी भेट घेतली होती. ऐन दिवाळीत दादा तिसऱ्यांदा दिल्लीला आले. अमित शहांशी झालेल्या भेटीची दोन छायाचित्रे दादांच्या गटाकडून प्रसिद्ध केली गेली. दुसऱ्या छायाचित्रामध्ये शहांच्या घरी प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि त्यानंतर अजित पवार बसलेले दिसतात. शहांच्या शेजारी प्रफुल पटेल बसलेले होते. दादा मात्र शहांपासून थोडं अंतर राखून बसलेले होते. छायाचित्रामध्ये प्रफुल पटेल, तटकरे यांचं स्मितहास्य करत असताना दादा मात्र गंभीरच दिसत होते. दादांना डेंग्यू झाला होता, ते आजारातून बरे होत आहेत. कदाचित थोडा थकवाही जाणवत असेल. ते काहीही असो दादांच्या दिल्लीवारीमुळं राज्यातील राजकीय दिवाळी तेजोमय झाली हे खरं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा