तत्त्वनिष्ठ माजी सनदी अधिकारी आणि रोखठोक लेखक म्हणून ओळखले जाणारे अनिल स्वरूप यांचे ‘एन्काउंटर्स विथ पोलिटिशियन्स’ हे नवे पुस्तक येत्या २१ जानेवारी रोजी प्रकाशित होणार आहे. त्यांच्या याआधी प्रकाशित झालेल्या ‘नॉट जस्ट अ सिव्हिल सर्व्हट’, ‘एथिकल डायलेमाज ऑफ अ सिव्हिल सर्व्हट’ आणि ‘नो मोअर अ सिव्हिल सर्व्हट’ या तीन पुस्तकांतून त्यांनी वाचकांना सनदी अधिकाऱ्यांच्या जीवनातील आव्हाने उलगडून दाखविली होतीच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वरूप यांच्या या ३८ वर्षांच्या अनुभवाचे सार त्यांनी ‘नॉट जस्ट अ सिव्हिल सर्व्हट’मध्ये मांडले आहे. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी उत्तर प्रदेश सरकारमध्ये आणि पुढे केंद्र सरकारमध्ये सेवा दिली. भ्रष्टाचार, कोळसा माफियांचा बंदोबस्त, शिक्षण माफियांचा सामना, बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतरचा काळ, तेव्हा घ्यावे लागलेले कठोर निर्णय याचे वर्णन या पुस्तकात आहे. प्रशासकीय सेवेभोवती एक विशिष्ट वलय असते. स्वरूप यांचे ‘नो मोअर अ सिव्हिल सर्व्हट’ हे पुस्तक हे वलय किती भ्रामक आहेत, हे निदर्शनास आणते. उत्तम प्रशासनाचीही काही अनुकरणीय उदाहरणेही देते. ‘एथिकल डायलेमाज ऑफ अ सिव्हिल सर्व्हट’ हे पुस्तक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकाने वाचायलाच हवे. एका प्रशासकीय अधिकाऱ्याला किती पातळय़ांवर लढा द्यावा लागतो, प्रचंड राजकीय दबाव असताना योग्य काय आणि अयोग्य काय हे कसे ठरवावे, योग्य पर्यायांसाठी आग्रही राहणाऱ्यांना काय किंमत मोजावी लागते आणि ती मोजणे किती अपरिहार्य आहे, याची उत्तरे हे पुस्तक देते.

प्रशासकीय अधिकारी समाजात किती मूलभूत बदल घडवून आणू शकतात, याची जाणीव ही पुस्तके करून देतात. हस्तिदंती भासणाऱ्या या मनोऱ्यात विराजमान झालेल्या मूल्यनिष्ठ अधिकाऱ्यांच्या आयुष्यातील संघर्षांची झलकही दाखवितात. अनिल स्वरूप यांची रोखठोक शैली आणि त्यांचा प्रदीर्घ कारकीर्द पाहता नव्या पुस्तकात त्यांनी नेत्यांविषयीचे कोणते अनुभव सांगितले असावेत, याविषयी उत्सुकता आहे..

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chahul books that pierce the ring around administrative services amy