मायकेल ए. गोन्झालेझ यांच्या शोधामुळे डाएन ऑलिव्हर या काळय़ा कथालेखिकेचा तिच्या मृत्यूपश्चात सहा दशकांनी ‘नेबर्स अ‍ॅण्ड अदर स्टोरीज’ हा पहिला कथासंग्रह येतो आहे. चिरडलेले आणि चिरडणारे यांना काळ आणि देशाची सीमा उरलेली नसल्याच्या वर्तमानात या कथा अधिकच वाचल्या जातील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मायकेल ए. गोन्झालेझ नावाचा एक आफ्रिकी-अमेरिकी लेखक गेली काही वर्षे हरवलेल्या आणि गतस्मृत झालेल्या कृष्णवंशीय नागरिकांच्या योगदानाबद्दल बहुतांश लोकप्रिय मासिका- साप्ताहिकांतून लिहीत आहे. तो स्वत: कथाकार. त्याच्या कथा ‘ब्लॅक पल्प’, ‘क्राइम फॅक्टरी’ या वाचकप्रिय मासिकांत सातत्याने झळकतात. पण ग्रंथ, संगीत यांबरोबर सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या शंभर वर्षांत खूप मोलाचे काम करूनही फक्त कृष्णवंशीय म्हणून बेदखल राहिलेल्या नागरिकांचा शोध ही त्याची लेखनहौस बऱ्याचदा चर्चेचा विषय होतो. ‘बिटर सदर्नर’ या मासिकासाठी गेल्या वर्षी त्याने डाएन ऑलिव्हर या १९६६ साली कार अपघातात मृत्यू झालेल्या काळय़ा तरुण लेखिकेवर लिहिलेल्या लेखाचा प्रचंड बोलबाला झाला. त्या एकटय़ा लेखामुळे या कथालेखिकेच्या संदर्भात आणखी माहिती मिळविण्यासाठी अनेक यंत्रणा जाग्या झाल्या. डाएन ऑलिव्हर या लेखिकेचे मृत्यूसमयी वय होते फक्त २३. मृत्यू ठिकाण होते ती ज्या ठिकाणी कथाअभ्यासाची पदवी घेत होती ती आयोवा सिटी. काळ होता नागरी हक्क चळवळीचा अंतिम टप्पा जवळ असतानाचा. म्हणजे ज्या काळात कृष्णवंशीयांना शिकण्यासाठी आयोवा सिटीत अल्पांशानेही स्थान नसण्याचा.

डाएन ऑलिव्हर विशीत असतानाच लोकप्रिय मासिकांत झळकून वर त्या कथा मिरवत लेखन शिकण्यासाठी तेथे दाखल झाली. वाहन अपघातात तिचे आयुष्य संपले आणि तिच्या मृत्यूनंतर तिने विद्यापीठात लिहून ठेवलेल्या आणखी दोन कथा प्रकाशित झाल्या. पण गेल्या साठ वर्षांत आयोवात शिक्षण घेणाऱ्या या (कदाचित) पहिल्यावहिल्या कथालेखिकेचे नाव पूर्णपणे विसरले गेले. मायकेल ए. गोन्झालेझ यांना सत्तर सालातील जुन्या एका संपादित कथासंग्रहात ‘नेबर्स’ वाचायला मिळाली आणि फारसा तपशील हाती लागत नसलेल्या लेखिकेचा शोध घ्यायचे त्यांनी ठरविले. त्यांना डाएन ऑलिव्हरच्या सहा कथा सापडल्याच. त्याशिवाय विलक्षण संदर्भाची खाणच त्यांच्या हाती लागली. या लेखिकेची ‘नेबर्स’ ही कथा १९६७ च्या ‘ओ हेन्री प्राइझ स्टोरीज’च्या खंडात निवडली गेली होती. म्हणजेच अमेरिकेत त्या वर्षांत लिहिल्या गेलेल्या सर्वोत्कृष्ट २० कथांमध्ये ही लेखिका कॉलेजात असतानाच पोहोचली होती. उत्तर कॅरोलिना प्रांतात शिक्षक दाम्पत्याच्या पोटी जन्मल्यामुळे तिच्या शिक्षणात अडथळे आले नाहीत. जवळच्या वाचनालयात अमेरिकी कथालेखकांचा फडशा पाडत तिने स्वत: लेखनाची शैली तयार केली. गोऱ्या भवतालाकडून काळय़ांना दिली जाणारी वागणूक हे विषय तिने कथांसाठी निवडले. वर्गात इतर मुले ‘कथा कशी लिहावी’ याचे धडे घेत असताना ही विद्यार्थिनी राष्ट्रीय पातळीवरच्या मासिकांत झळकली.

तिच्या साऱ्याच कथांमध्ये गोऱ्या मालक-मालकिणींकडे कामाला असलेले पुरुष, मुली, बायका अशी मुख्य पात्रे दिसतात. त्यांच्या नजरेतून गोऱ्यांची मानसिकता स्पष्ट होते. नागरी हक्क चळवळीत सहभागी व्यक्तिरेखाही या कथांतून डोकावतात. या गोष्टींबद्दल गोन्झालेझ यांनी आपल्या लेखात विस्तृत तपशील दिले. पुढे या लेखाचा संदर्भ घेऊन आजच्या गाजत असलेल्या काही कृष्णवंशीय लेखिकांनी तिच्यावर चर्चासत्र घडवले आणि या कथांची महत्ता स्पष्ट केली. कृष्णवंशीयांना हक्क मिळाले असले, तरी भेदाची मानसिकता ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’ चळवळीपर्यंत अधिकच स्पष्ट झाली असल्याने या कथांचे आजच्या काळाशी संदर्भमूल्य जोडले गेले.

या सगळय़ांचा एकत्रित परिणाम म्हणजे इतकी वर्षे धूळ खात ग्रंथालयांत गडप झालेल्या सहा कथांचा जुडगा ‘नेबर्स अ‍ॅण्ड अदर स्टोरीज’ या नावाने ग्रूव्ह अटलांटिकतर्फे लवकरच प्रकाशित होणार आहे. पण तातडीने अनुभवायची असल्यास ताज्या पॅरिस रिव्ह्यूमध्ये ‘नो ब्राऊन शुगर इन एनीबडी्ज मिल्क’ ही ऑलिव्हरची एक कथा वाचायला मिळू शकेल. या कथेमध्ये नुकतीच अनाथ झालेली कृष्णवंशीय तरुणी आपल्या सतत खेकसणाऱ्या गोऱ्या मालकिणीच्या घरातील कामाचा तपशील किंवा दिनक्रम रंगवून सांगते. त्याबरोबर आपल्या घरातील कुटुंबसदस्यांचा आणि स्वत:च्या वाताहतीचा तपशील द्यायलाही ती विसरत नाही. ‘नो ब्राऊन शुगर इन एनीबडी्ज मिल्क’ वाचताना ही कथा आज २०२३ सालात लिहिलेली वाटते. म्हणून ऑलिव्हरने अल्पवयात कमावलेली भाषा आणि तिचा कथाविषय याविषयी आदर वाटायला लागतो. मायकेल ए. गोन्झालेझच्या लहरी शोधामुळे सापडलेल्या या काळय़ा कथालेखिकेचे मृत्युपश्चात सहा दशकांनी पहिले पुस्तक येणे, हे महत्त्वाचे. चिरडलेले आणि चिरडणारे यांना काळ आणि देशाची सीमा उरलेली नसल्याच्या वर्तमानात या कथा अधिकच वाचल्या जातील.

मायकेल गोन्झालेझ यांचा लेख या लिंकवरून वाचता येईल.
https:// bittersoutherner. com/ feature/2022/ the- short- stories- and- too- short- life- of- diane- oliver
डाएन ऑलिव्हर यांची गाजलेली नेबर्स ही कथा या लिंकवरून वाचता येईल.
http:// www. whatsoproudlywehail. org/ wp- content/ uploads/2013/06/ Oliver_ Neighbors. Pdf डाएन ऑलिव्हरवरील चर्चा येथील पॉडकास्टवरून ऐकता येईल.

https:// lithub. com/ the- life- and- stories- of- diane- oliver/

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chahul michael a gonzalez diane oliver searching for a black storyteller amy