आभासी वास्तवाच्या जगात आभास कोणता आणि वास्तव काय, हे समजून घेणे किती आव्हानात्मक आणि तरीही अपरिहार्य आहे, याचा अदमास बांधणारी ‘द लाइट अॅट द एन्ड ऑफ द वर्ल्ड’ ही सिद्धार्थ देब यांची कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली. ती भारताच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या टप्प्यांचा मागोवा घेते, वर्तमानामागची कारणपरंपरा स्पष्ट करू पाहते आणि त्याचे सूत्र पकडून भविष्यात काय वाढून ठेवलेले असू शकते, यावर विचार करण्यास भाग पाडते.
देब यांच्या या तिसऱ्या कादंबरीची सुरुवात भारतातील एका ‘सुपरवेपन’च्या वर्णनाने होते. भारताने तंत्र ज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आहे आणि या प्रगतीचीच देणगी असलेल्या ‘महाअस्त्रा’मुळे खोटी माहिती पसरून देशभर दंगली सुरू झाल्या आहेत. या साऱ्या गदारोळात बीबी नावाच्या एका पत्रकारावर आपल्या जुन्या सहकाऱ्याला- संजितला शोधून काढण्याची जबाबदारी सोपविण्यात येते. कोणीतरी बीबीच्या जुन्या बातम्या शोधून काढल्या आहेत. या बातम्यांमुळे स्थानबद्धता छावण्या, कीटकनाशक कंपन्या व अनेक कटांची स्फोटक माहिती चव्हाटय़ावर येण्याची ‘भीती’ निर्माण झाली आहे. साहजिकच यात सरकारला अडचणीत आणू शकतील, असे अनेक मुद्दे आणि पुरावे आहेत, त्यामुळे बीबी जिथे काम करते, त्या कंपनीचे धाबे दणाणले आहे. संजितला अशाच स्फोटक बातम्यांमुळे भूमिगत व्हावे लागले आहे. त्याच्या शोधात बीबीच्या आयुष्यात विचित्र घटना घडतात.
पुढे कादंबरी कल्पनेतून वास्तवात येते आणि थेट १९८४ मधील भोपाळ दुर्घटनेकडे घेऊन जाते. ‘युनियन कार्बाइड कंपनी’तील सुरक्षा नियमांच्या पायमल्लीचे वास्तव उघड करण्याची धमकी देणाऱ्या ऑपरेटरची सुपारी घेतलेली एक व्यक्ती कथानक पुढे घेऊन जाते. या अमेरिकी कंपनीची आणि पर्यायाने अमेरिकेचीच बदनामी करण्याचे हे कम्युनिस्टांचे कारस्थान आहे, असे या मारेकऱ्याला सांगण्यात आले आहे, मात्र त्याचा यावर पुरेसा विश्वास बसलेला नाही. वास्तवाच्या शोधाच्या त्याच्या प्रवासात त्यालाही अनेक विचित्र अनुभव येतात, विशिष्ट प्रकारे रचलेल्या कथा सर्वत्र कानी पडू लागतात. तिसरा भाग १९४७ मधील कलकत्त्यात (कोलकाता) घेऊन जातो. फाळणीमुळे देश पेटला आहे आणि दास नावाच्या एका पशुवैद्यकाला असे वाटते आहे, की एका गुप्तचर समितीने त्याची ‘वेदिक विमान’ चालविण्यासाठी निवड केली आहे. पुढे दासला खरोखरच असे विमान सापडले आहे, असेही वाटू लागते. चौथ्या भागात १८५७च्या उठावाची कथा येते. यात सैनिकांना एक ब्रिटिश अधिकारी भेटतो. त्याने पडक्या बंगल्यात वस्तुसंग्रहालय थाटल्याचे सैनिकांना कळते. त्यांनाही अनपेक्षित अनुभव येतात व त्यांच्या विवेकालाच आव्हान निर्माण होते.
पुस्तक वेगवेगळय़ा काळांतून आणि सत्य-असत्याच्या उंबरठय़ांवरून फिरवून आणते. काळाच्या प्रत्येक टप्प्यावर अनेक आभास निर्माण करण्यात आले. आभास आणि वास्तव यातील फरक जाणून घेण्याचे, तो परखडपणे मांडण्याचे आव्हान त्या त्या पिढय़ांनी पेलले. आजच्या आभासी वास्तवाच्या जगात, जिथे कोणतीही कपोलकल्पित गोष्ट कोणा एकाच्या स्वार्थासाठी वास्तव भासवून अनेकांपर्यंत पोहोचवणे कोणालाही शक्य झाले आहे, तिथे हे आव्हान अधिकच खडतर झालेले दिसते. कान, डोळे उघडे ठेवून आभासाचे धुके दूर सारून वास्तवाचा मागोवा घेत राहणे आणि सत्य स्पष्टपणे मांडत राहणे, पुढच्या वाटचालीत किती महत्त्वाचे आहे, याचे भान देणारी ४५८ पानांची ही कादंबरी
‘सोहो प्रेस’ने प्रकाशित केले आहे.