दिल्लीवाला

‘भारत जोडो’ यात्रेला प्रसारमाध्यमांनी चांगली प्रसिद्धी दिली आहे. अगदी भाजपकडं ओढा असणाऱ्या वृत्तवाहिन्यांनीही यात्रेच्या बातम्या दिल्यामुळं काँग्रेसला आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. प्रसारमाध्यमांचं काँग्रेसला इतकं कौतुक वाटू लागलं आहे की, पक्षाचे नेते सातत्याने प्रसारमाध्यमांचे आभार मानू लागले आहेत. आठवडाभर भारत यात्रा करून एका दिवसासाठी दिल्लीत आलेल्या पक्षाच्या माध्यम विभाग प्रमुख जयराम रमेश यांनी भर पत्रकार परिषदेत कौतुकाचा वर्षांव केला. सत्ताधारी पक्षावर प्रसारमाध्यमाचं लक्ष असतंच, त्यांना कव्हरेज मिळतंच. पण, विरोधी पक्षांकडंही प्रसारमाध्यमांनी लक्ष दिलं पाहिजे. आठ वर्षांमध्ये ते गायब झालं होतं. पण, ‘भारत जोडो’ यात्रेमुळं पुन्हा प्रसारमाध्यमं काँग्रेसकडं बघू लागली आहे. आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला आहे, असं रमेश म्हणत होते. रमेश यांनी कुणाचं तरी कौतुक केलं हे ऐकून काँग्रेसमधील अनेक नेते गारद झाले असतील. काँग्रेसमधील लोक मिश्कीलपणे म्हणतात, आमच्याकडं बुद्धिजीवी एकच, जयराम रमेश!.. त्यात हे रमेश अधूनमधून खान मार्केटचं नाव घेतात. मोदी पंतप्रधान झाल्यापासून खान मार्केट बदनाम झालंय. मोदी-भाजपविरोधी डाव्यांचा अड्डा म्हणजे खान मार्केट, अशी टिंगलटवाळी केली जाते. खान मार्केटला ‘तुकडे तुकडे गँग’ हे आणखी तीन शब्द जोडले गेले आहेत. रमेश यांनी मोदींचे हे नावडते पाचही शब्द एका दमात उच्चारले. झालं असं की, राहुल गांधींच्या टी शर्टवरून भाजपने वाद निर्माण केल्यावर, रमेश यांना प्रश्न विचारला गेला की, हा टी शर्ट नेमका किती रुपयांचा ते तरी सांगा. त्यावर, रमेश म्हणाले की, टी शर्ट, चड्डी-बनियन वगैरे इतकी चर्चेची पातळी खाली आणू नका. हा टी शर्ट कुठल्या मार्केटमधून घेतला आणि किती रुपयांना घेतला हे सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण, मी सांगणार नाही. भाजपमध्ये कोण किती महागडे चष्मे घालतं हे तुम्हालाही माहिती आहे. मी तर स्वस्तातील चष्मा वापरतो, माझा चष्मा खान मार्केटमधील आहे.. खान मार्केटचं नाव घेतल्यावर त्यांना तुकडे तुकडे गँग हे शब्दही आठवले. अरे, खान मार्केट म्हणजे तुकडे तुकडे गँग. हो, माझा चष्मा तिथलाच!.. असं म्हणत रमेश यांनी टी शर्टचा मुद्दा उडवून लावला आणि सोयीस्करपणे टी शर्टची किंमत सांगायलाही ते विसरून गेले.

सोनिया गांधींचं नाव कशासाठी?

पक्षाध्यक्ष निवडणुकीची जबाबदारी असलेल्या काँग्रेसच्या बहुचर्चित मधुसूदन मिस्त्री यांना विचारलं की, प्रदेश काँग्रेसच्या ठरावांमध्ये सोनिया गांधींचं नाव कशासाठी?.. पण, हा प्रश्न त्यांनी एकदम बुद्धिवादी ठरवून टाकला. ते म्हणाले की, तुम्ही फार बुद्धिवादी प्रश्न विचारला आहे. आता सांगा काँग्रेसमध्ये इतकं बुद्धिवादी कोण आहे? सामान्य कार्यकर्त्यांला समजावं म्हणून ठराव केले जात आहेत.. खरं तर विचारलेल्या शंकेला मिस्त्रींनी दिलेल्या प्रत्युत्तराचा काहीही संबंध नव्हता. पण, अडचणीच्या मुद्दय़ाला बगल कशी द्यायची हे काँग्रेसच्या नेत्यांकडून शिकण्याजोगं असतं. प्रदेश काँग्रेसच्या ठरावांची भानगड अशी आहे की, पक्षानं निवडणूक अधिकाऱ्यांना (पीआरओ) एक ठराव संमत करायला सांगितला आहे, मिस्त्रींच्या म्हणण्यानुसार हा ठराव नव्या पक्षाध्यक्षाला लागू होतो. या ठरावामध्ये प्रदेशाध्यक्ष, पक्षाध्यक्ष आणि कार्यकारी समितीतील सदस्य नियुक्तीचा अधिकार पक्षाध्यक्षाला असेल. हे ठराव यथावकाश संमत होतीलच. पण, असे ठराव निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेल्या ‘पीआरओ’ने का करायचे? या प्रश्नाचं मिस्त्रींनी उत्तर दिलं नाही. त्यात, आता केरळ प्रदेश काँग्रेसने ठराव मंजूर करून त्यात सोनिया गांधींच्या नावाचा उल्लेख केला असं म्हणतात. केरळ काँग्रेसने पक्षातील नियुक्तीचे सर्वाधिकार सोनिया गांधींकडे दिले आहेत. मिस्त्री तर म्हणतात, ठराव नव्या पक्षाध्यक्षांना लागू असेल. मग, सोनियांचं नाव आलं कुठून? हा प्रश्न मिस्त्रींनी बुद्धिवादी ठरवला हा भाग वेगळा. काँग्रेसनं केरळ प्रदेश काँग्रेसच्या कथित ठरावावर अधिकृतपणे भाष्य केलेलं नाही. काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुकीत काय होईल कोणाला माहिती नाही, पण किल्ला मात्र मिस्त्री एकटे लढवताना दिसताहेत.

संधी चुकवू नका!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस भाजपनं समाजसेवा करून साजरा केला. पुढील दोन आठवडे देशभर रक्तदान वगैरे समाजोपयोगी कार्यक्रम घेतले जातील, ते पक्ष संघटना यशस्वीही करेल. पक्षाध्यक्ष नड्डांनी आधीच भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगून ठेवलं होतं की, केक वगैरे कापू नका. त्यापेक्षा मोदींच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या की नाही हे शोधून काढा.. पक्षाध्यक्षांच्या आदेशाचं पालन केलं जाईल! भाजपमध्ये कुठलाही ‘उत्सव’ साजरा करणं म्हणजे लोकांपर्यंत जाऊन मोदींच्या योजनांचा प्रचार करणं असं जणू समीकरण होऊन बसलेलं आहे. या वर्षी मे महिन्यामध्ये मोदी सरकारला केंद्रात सत्तेवर येऊन आठ वर्ष झाली. त्यानिमित्ताने सरकारी योजनांचा प्रचार करायला सांगितलं गेलं होतं. भाजपला हा ‘उत्सव’ साजरा करायचा होता. पण, नूपुर शर्मा प्रकरणानं त्यावर विरजण टाकलं होतं. देशवासीयांपर्यंत पोहोचण्याची नामी संधी भाजपनं वाया घालवल्याबद्दल मोदी खूप नाराज झाले होते असं म्हणतात. नूपुर शर्मानी काळवेळ तरी बघायला हवी होती, असं बोललं गेलं होतं. पण, या वेळी मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने हुकलेली संधी घेतली जात आहे. विनाकारण कोणाच्या डोळय़ात भरेल असं काही नको, शांतपणे मोदींच्या योजनांचा प्रचार करत राहा, असा संदेश भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला गेल्याचं म्हणतात.

लोकसभेचं नंतर बघू..

दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन भलत्याच कारणांसाठी गाजलं. अजित पवार नाराज झालेले नव्हते, पत्रकारांनी चुकीच्या बातम्या दिल्या होत्या आणि ही अगदी बेजबाबदार पत्रकारिता असल्याचं शरद पवार यांनीही ठरवून टाकलं. पण, या नाराजीनाटय़ात ‘बारामतीत भाजप’ हा मुद्दा बाजूला पडला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भाषणामध्ये खरं तर हा विषय आडवळणानं काढला होता. त्यांच्या भाषणातील मुद्दा होता की, लोकसभेची निवडणूक दोन वर्षांनंतर असेल. आता त्याची कशाला चिंता करायची? आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडं लक्ष देऊ, तिथं यश मिळवू. मग बघू, लोकसभेचं काय करायचं?.. भाषणातील मुद्दा इथं संपला. नंतर झालेल्या नाटय़ात या मुद्दय़ाची कोणी चर्चाही केली नाही. पण, सुळेंना खरोखरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक कौशल्याबद्ल, राज्य स्तरावरील आव्हानांबद्दल बोलायचं होतं की, भाजपच्या ‘मिशन १४४’बद्दल? भाजपनं राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघांमध्ये केंद्रीय नेते पाठवायला सुरुवात केली आहे. कल्याण मतदारसंघात अनुराग ठाकूर यांनी भेट देऊन ‘रस्त्यांची पाहणी’ केली आहे. बारामतीत निर्मला सीतारामन जाणार आहेत, तिथल्या विकासाचाही त्यांना आढावा घ्यावा लागणार आहे. सुळेंच्या भाषणातील लोकसभा निवडणुकीचा उल्लेख बहुधा सीतारामन यांना उद्देशून असावा. सुप्रिया सुळेंनी ना सीतारामन यांचं नाव घेतलं ना भाजपचं. पण, कार्यकर्त्यांना त्यांचं सांगणं होतं की, लोकसभा निवडणुकीचं नंतर बघू.. सुळेंनी सीतारामन यांना आव्हान दिलं असं म्हणता येईल का? तुम्ही माझ्या मतदारसंघात फिरलात तरी चिंता नाही. आधी राज्यातील निवडणुका उरकून मगच लोकसभेकडं वळणार, असा अर्थ निघूही शकतो. भाजपनं सुळेंच्या ‘आव्हाना’ला उत्तर दिलेलं नाही. कदाचित सीतारामन बारामतीत जाण्याची वाट पाहिली जात असावी.

Story img Loader