देशाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांशी पंगा घ्यायचा तर हिंमत लागेल. ही हिंमत केलीच असेल तर तो कोण असेल? हैदराबादमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सुरू असताना, मोदी-शहांची उपस्थिती असताना असं घडावं हे आश्चर्यकारक म्हणायला हवं. अर्थात कोणा नारदाने कुजबुज केली. खरं-खोटं त्या नारदालाच माहिती असेल! शहानिशा कोणी केली नाही, कोणी करूही शकत नाही. तिथल्या माध्यम केंद्रातील कुजबुजीतून कळलं ते असं- राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अखेरच्या दिवशी दोन महत्त्वाच्या बैठका होत्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राजकीय प्रस्ताव मांडणार होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाने कार्यकारिणीच्या बैठकीची सांगता होणार होती. नियोजित कार्यक्रम नीट पार पडला, त्यामध्ये कोणतीही गडबड झाली नाही. पण, राजकीय प्रस्ताव कार्यकारिणीसमोर मांडण्याआधीच तेलंगणाचे मुख्यमंत्री ‘केसीआर’ यांना माहिती होता म्हणतात. हा दावा फक्त नारदाचा आहे. या नारदाचे म्हणणे होते की, लेखी प्रस्तावाची मोबाइल फोनवरून छायाचित्रं काढली गेली आणि ती व्हॉट्सअ‍ॅप केली गेली.. तंत्रज्ञानाचा वापर कधीही, केव्हाही, कुठेही होऊ शकतो हे खरेच. भाजपच्या या राजकीय प्रस्तावात नेमकं काय लिहिलं होतं हे बहुधा फक्त शहा आणि केसीआर यांनाच माहिती. शहांनी प्रस्तावातील मुद्दे भाजप नेत्यांसमोर मांडले असतील. या प्रस्तावाची लेखी प्रत वा क्रमवार ठरावांची माहिती पत्रकारांना दिली गेली नाही. नारदाच्या दाव्यावर भाजप बोलण्याची शक्यता कमीच, कदाचित, ‘केसीआर’च कधीतरी खुलासा करतील.

सोहळा सत्तेचा..

दोन दशकं सलग राज्याच्या तसेच देशाच्या सर्वोच्च सत्तास्थानी राहिलेले नरेंद्र मोदी हे जगातील एकमेव नेते आहेत. याबाबत त्यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनाही मागे टाकलं आहे. क्लिंटन यांनीदेखील २० वर्ष सत्ता पदे भूषवली होती. दोन वेळा ते सिनेट सदस्य होते. तर, दोन वेळा राष्ट्राध्यक्ष. मोदी २००१ पासून गुजरातचे मुख्यमंत्री होते. मग, २०१४ मध्ये ते पंतप्रधान झाले. २०१९ च्या लोकसभेत भाजपला बहुमत मिळाले तर, २०२४ मध्ये तसेच झाले तर ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ शकतील. पण, सध्या मोदींची सत्तेवरील २० वर्षे भाजपकडून साजरी केली जात आहेत. त्यानिमित्ताने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘मोदी @२०’ हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित झालं आहे, त्याच्या विविध भाषांमधील आवृत्त्याही निघतील. या पुस्तकाच्या अनुवादांचे काम सुरू आहे. ‘मोदी @२०’ या मोहिमेतून देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाजप दोन सभा घेणार आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये किमान एक हजार सभा घेतल्या जातील. त्यानिमित्त प्रत्येक केंद्रीय मंत्र्याला किमान चार मतदारसंघांचा दौरा करावा लागणार आहे, तसेच, या सभांनाही उपस्थित राहावं लागणार आहे. या मोहिमेअंतर्गत बेंगळूरु आणि गुवाहाटी या दोन ठिकाणी सभा झालेल्या आहेत. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये या सभांना अधिक गती दिली जाणार आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलै रोजी सुरू होत असून या काळात शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांमध्ये देशाच्या वेगवेगळय़ा भागांमध्ये सभा होतील. प्रत्येक जिल्ह्यातील दोन सभांपैकी एक सभा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी घेतली जाईल व दुसरी एखाद्या मोठय़ा सभागृहात बुद्धिजीवींशी चर्चा असेल. या सभांमधून मोदी सरकारच्या योजनांची माहिती लोकांना दिली जाईल. विद्यार्थ्यांचा राजकीय कल कोणत्या पक्षाकडं आहे, मोदींविषयी त्यांना काय वाटते अशी भाजपच्या राजकारणासाठी अत्यंत उपयुक्त माहिती या सभांमधून मिळू शकेल. भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. लोकसभा आणि राज्यसभेत मिळून भाजपचे सुमारे ४०० खासदार आहेत. प्रत्येक खासदाराला किमान एका लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली जाईल. त्या-त्या लोकसभा मतदारसंघात भाजपला कमीत कमी मतदान झालेल्या वा भाजपला मतदान न झालेल्या बूथवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. भाजपला मत न देणाऱ्या कुटुंबांशी वैयक्तिक स्तरावर संपर्क साधून त्यांचं भाजपबद्दल मत काय आहे, हे जाणून घेतलं जाणार आहे. भाजपने नुकताच तेलंगणामध्ये हा प्रयोग केला. तेलंगणाच्या सर्वच्या सर्व ११९ विधानसभा मतदारसंघांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्यांनी भेट देऊन मतदारांची मतं जाणून घेतली. आता देशपातळीवर भाजपची ही संपर्क मोहीम राबवली जाईल. ‘मोदी @ २०’ मोहिमेची जबाबदारी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांच्याकडे देण्यात आलेली आहे. या दोन्ही प्रचार मोहिमांची भाजपने फारशी चर्चा घडवून आणली नाही, हे आश्चर्यच!

खोक्यात होते काय?

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी खोक्यांचा विषय काढल्यामुळे दिल्लीतही खोक्यांची चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनामध्ये येऊन दाखल झाले. त्यांच्या गाडीमधून हळूहळू खोकी बाहेर पडू लागली. सगळय़ांना प्रश्न पडला होता की, मुंबईहून मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी इतकी खोकी का आणली आहेत? या खोक्यांमध्ये नेमके काय दडलेले आहे? पण, या रहस्याचा उलगडा रात्री दहा वाजता झाला. एक खोके शिंदेंनी रात्री सदनाबाहेर जाताना कारमधून नेले असावे. शिंदे सदनातून थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी गेले. शिंदे आणि फडणवीसांनी शहा यांना विठ्ठल-रखुमाईची सुंदर मूर्ती भेट दिली. या भेटीची छायाचित्रे प्रसिद्ध झाली तेव्हा खोक्यांचं कारण समजलं. शिंदे-फडणवीसांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा या सर्वाना ही मूर्ती भेट दिली! शिंदे-फडणवीसांची दिल्ली वारीत प्रचंड धावपळ सुरू होती. शुक्रवारी रात्री हलका नाश्ता करून फडणवीस लगेचच निघून गेले. शिंदेही पाठोपाठ अमित शहांकडे गेले. मध्यरात्री तीनच्या सुमारास ते सदनात परत आले असावेत. त्यानंतर त्यांनी रात्रीचे जेवण घेतले. दुसऱ्या दिवशी, शनिवारी पुन्हा सकाळी नऊ वाजल्यापासून भेटीगाठी सुरू झाल्या. महाराष्ट्र सदनातील उजव्या कोपऱ्यातील खोली मंत्र्यांसाठी राखीव ठेवली जाते. तिथे उपमुख्यमंत्र्यांची निवासाची सोय करण्यात आली होती. शिंदे आणि फडणवीस यांच्या कक्षात कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. या गर्दीतून वाट काढून शिंदे-फडणवीस महाधिवक्ता तुषार मेहतांना भेटायला गेले. सदनामध्ये काही वकिलांनीही शिंदे-फडणवीसांची भेट घेतली. या गडबडीत दुपारचे पावणेतीन वाजले. साडेबाराच्या सुमारास पत्रकार परिषद होण्याची शक्यता असल्याने प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी ताटकळत होते. त्यांना दुपारी दोन वाजता शिंदे-फडणवीस प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील असे सांगितले गेले होते. सत्तांतरनाटय़ातील गोष्टी एकाच वेळी कशाला सांगायच्या, पुन्हा मी दिल्लीत येईन, त्या वेळी बोलू. सगळं आत्ताच सांगून टाकलं तर नंतर बोलायला काय उरेल, असं म्हणत शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला निघून गेले.

ऐकल्यासारखं वाटतंय..

केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी हे तेलंगणातील भाजप नेते. या माजी प्रदेशाध्यक्षांची छायाचित्रं केंद्रीय नेत्यांच्या बरोबरीने हैदराबादमध्ये लावण्यात आलेली होती. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी तेलंगणावर स्वतंत्र ठराव संमत करण्यात आला. त्याची माहिती देताना रेड्डी तेलंगणातील राजकीय परिस्थितीचं वर्णन करत होते. पण, त्यांची काही विधानं शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनीच जणू म्हटली असावीत असा भास होत होता. रेड्डींची सगळी टीका मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या विरोधातील होती. राज्याचा कारभार ‘केसीआर’ घरातून चालवतात. त्यांना बहुधा मंत्रालय कुठं आहे हे माहिती नसावं. ते मंत्रालयाकडं फिरकतच नसतील तर, राज्याचं काय होणार? करोना संपला तरी त्यांचं ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. ‘एमआयएम’चे ओवैसी वगळता  बाकी कोणी ‘केसीआर’च्या घरी जाऊ शकत नाही. पक्षाच्या नेत्यांना-कार्यकर्त्यांना ते भेटत नाहीत. आमदारांचे प्रश्न ‘केसीआर’ सोडवत नाहीत. तेलंगण राष्ट्र समितीमध्ये नैराश्य आलेलं आहे. जेवणाच्या टेबलावर बसून बाप, मुलगा आणि मुलगी निर्णय घेतात, हेच त्यांचे कॅबिनेट.. ही वाक्यं ऐकल्यासारखी वाटतात की नाही? गुवाहाटीतून कोणी तरी बोलतंय असंही वाटू शकेल. पण, ही वाक्यं हैदराबादमधून उमटत आहेत.