दिल्लीत भलेभले चुकतात, राजधानीचं हे शहर लोकांना चकवा देणारंच आहे. या शहरात तुम्ही गोलगोल फिरत राहाल, लोकही तुम्हाला गोलगोल फिरवत राहतील. त्यामुळं वेळेवर कुठं पोहोचायचं असेल तर हातात थोडा वेळ ठेवूनच दिल्लीत यावं लागतं. तसं दिल्ली बाबू लोकांचं शहर असल्यामुळं वेळेत कार्यालयात पोहोचण्याची तेवढी घाई असते. बाकी दिल्ली म्हटलं तर निवांत असते. पण, इथं काही गोष्टींची शिस्तही पाळावीच लागते. ती नसेल तर तुमचा भ्रमनिरास होऊ शकतो. काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीला तुम्हाला वेळेवर नव्हे वेळेच्या आधी पोहोचावं लागतं. याचं भान अनेकांना नसतं, त्यामुळं असे लोक विनाकारण तक्रारीचा सूर लावतात. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मंत्री अशा वैधानिक वा घटनात्मक पदावरील व्यक्तींना भेटण्यासाठी तरी निदान वेळेचं भान असायला हवं. दिल्लीतील उपराष्ट्रपतींच्या नव्या निवासस्थानी मराठी साहित्य संमेलनाशी निगडित सदस्यांना उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना भेटण्याची दुपारी चारची वेळ दिलेली होती. त्यासाठी उशिरात उशिरा साडेतीन वाजता हजर राहा, असं सांगण्यात आलेलं होतं. काही मंडळी वेळेत आली, सुरक्षेच्या चक्रातून गेल्यावर ते इष्टस्थळी पोहोचले. कार्यक्रम काही कारणांमुळे थोडा उशिरा सुरू झाला, त्यामुळं काही लेटलतिफांना फारशी अडचण आली नाही. पण, काही मंडळी कार्यक्रम जवळजवळ संपल्यावर संध्याकाळी पाच वाजता पोहोचली. त्यांचं निमंत्रितांच्या यादीत नावही होतं. पण, सुरक्षारक्षकांनी त्यांना आत सोडलं नाही. उपराष्ट्रपतींच्या निवासाबाहेर या मंडळींचा तक्रारीचा सूर होता. काही नियोजन नाही असं ते बोलत होते. पण, चूक ना आयोजकांची होती ना उपराष्ट्रपतींच्या सुरक्षारक्षकांची. वेळ निघून गेली होती, त्यानंतर कोणालाही आत सोडणं शक्य नव्हतं. राष्ट्रपती-उपराष्ट्रपतींनी दिलेल्या वेळेला निमंत्रित व्यक्ती उपस्थित राहिली नाही तर ती भेट रद्द केली जाते. हा राजशिष्टाचाराचा भाग असतो. खरंतर या लेटलतिफ मंडळींनी या सगळ्याचा विचार करून दिल्ली विमानतळावर किमान चार तास आधी उतरायला हवं होतं. दिल्ली विमानतळावरील अनेक अडचणींतून वाट काढून उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी पोहोचायचं होतं, ही गोष्ट त्यांच्या ध्यानीमनीही नव्हती. विमानतळावर आमचा खूप वेळ गेला, नाहीतर साडेतीनला इथं पोहोचलोच असतो असंही त्यातील काहींचं म्हणणं होतं. कार्यक्रमानंतर शरद पवार कारमधून बाहेर पडले, या मंडळींना बघून पवारांनी कार थांबवली, त्यांची विचारपूस केली. या लेटलतिफांनी पवारांकडेही, आम्हाला आत जाता आलं नाही, असा सूर लावला होता. कार्यक्रम तर संपला होता, पवार तरी काय करणार?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भान म्हणतात ते हेच!

दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या सोहळ्याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. कारण तिथं मोदी येणार होते. त्यांचं स्वागतही अपेक्षेप्रमाणे उत्साहात आणि टाळ्यांच्या गजरात झाले. अनेकदा मोदींच्या कार्यक्रमात अतिउत्साह दिसतो, तसाही दिसला. मोदींचं भाषणही उपस्थितांना भावलं. ते मराठी बोलले, त्यांच्यासाठी मराठी भाषा मधासारखी आहे असंही ते म्हणाले. त्यांचं भाषण प्रभावी होणार होतं, तसंच ते झालं. पण, त्याआधी संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर यांचं भाषण झालं, तेव्हा वाटलं की आता खऱ्या अर्थाने दिल्लीच्या संमेलनाला उंची लाभली! तारा भवाळकर सुरुवातीलाच म्हणाल्या, इथं फार बोलायचं नाही असं मला सांगितलं गेलं आहे… पण त्या जे थोडं बोलल्या तेच इतकं प्रभावी होतं की त्यांनी दिलेलं शहाणपण उमगलं तर किती बरं होईल असंही वाटलं. भवाळकरांनी त्यांच्या भाषणातून अनेकांना भान दिलं असं म्हणता येईल. त्यांनी भाषणाची सुरुवात केली ती व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांना अभिवादन करून. त्यांनी सगळ्यांची नावे घेतली. अपवाद होता दोघांचा. त्या म्हणाल्या, ‘या संमेलनाचे उद्घाटन या देशाचे पंतप्रधान करत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे…’ त्यानंतर त्या म्हणाल्या, ‘आवर्जून उपस्थित राहिलेले राज्याचे मुख्यमंत्री…’ तारा भवाळकरांनी ना मोदींचं नाव घेतलं ना देवेंद्र फडणवीस यांचं. त्यांनी असं का केलं असावं?… त्यांनी आपल्याला भान दिलं ते हेच! दिल्लीत सात दशकांपूर्वी दिल्लीत झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांच्या हस्ते झाले होते. त्या वेळी त्यांचं नाव घेऊन उल्लेख केला की नाही हे माहीत नाही पण, यंदा अत्यंत लोकप्रिय पंतप्रधानांच्या समोर बोलताना ‘ते पंतप्रधान म्हणून सन्माननीय आहेत. त्यांचं पद महत्त्वाचं, त्यावर बसणारी व्यक्ती नव्हे’, असा संदेश संमेलनाध्यक्षांच्या या भाषणातून कोणी घेतला तर तो योग्य असेल.

एसी बंद आहे का?

दिल्लीच्या तख्तावर मराठी माणूस कधी बसेल तेव्हा बसेल. पण, मराठी माणूस दिल्लीत येऊन पुणेरी स्पष्टवक्तेपणा दाखवेल हे नक्की. झालं असं की, उपराष्ट्रपतींची सगळेच वाट पाहात होते. त्यांच्या कार्यालयातील दोन महिलांची लगबग सुरू होती. उपस्थितांबरोबर उपराष्ट्रपतींचं फोटोसेशन होणार होतं. यथावकाश ते झालंही. पण, त्यादरम्यानच्या पंधरा-वीस मिनिटांमध्ये गमती-जमतीचे प्रसंग घडले आणि हशाही पिकला! या दोन महिलांपैकी एकीला सगळ्यांना शिस्तीत उभं करायचं होतं. तिचं बरोबर होतं, एका रांगेत, उंचीनुसार उभं राहिल्यास फोटोचं संतुलन नीट राखलं जाईल हा उद्देश होता. त्यामुळं दोन टप्प्यांमध्ये फोटोसेशन होणार होतं. वर्गातल्या बेशिस्त मुलांना ती सातत्यानं रांगेत उभं राहा, गर्दी करू नका, खूप गोंधळ करत आहात, बाहेर आवाज जातोय, वर्गात शांत राहा असं सगळं अतिशय नम्रपणे समजावून सांगत होती. तेवढ्यात वर्गातील एका बहाद्दरानं मोठ्या आवाजात, अहो तुमचा एसी बंद आहे का, असा हिंदीतून प्रश्न विचारला. या प्रश्नावर ही महिला खूपच वैतागली असावी असं तिच्या चेहऱ्यावरून तरी दिसत होतं. पण, या मराठी बाण्यासमोर तिचं काहीच चाललं नाही. तिनं तिचा सर्व राग गिळून, सर एसी सुरू आहे, माणसं खूप असल्यामुळं कदाचित तुम्हाला गारवा जाणवत नसेल, असं म्हणत दहा-पंधरा मिनिटं ताटकळत उभ्या असलेल्या मंडळींना पुन्हा शिस्त लावण्यास सुरुवात केली. मग, फोटोसेशन उत्तम पार पडलं. कार्यक्रमही उत्तम झाला. हाय-टीही झाला. उपराष्ट्रपतींनी पाहुणचारात कुठलीही कमतरता भासू दिली नाही. अल्पोपाहार रुचकर होता. तुमच्यासाठी सगळे पदार्थ घरी बनवले आहेत बरं का, असं म्हणत उपराष्ट्रपतींनी निरोप घेतला.

चर्चेतील नाव खट्टर

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवल्यामुळं आता भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल याकडं लक्ष लागलेलं आहे. ही निवड बहुधा पुढील महिन्याच्या अखेरीपर्यंत होईल असं दिसतंय. आधीच्या वेळापत्रकाप्रमाणं जानेवारीच्या मध्यात नवा अध्यक्ष नियुक्त केला जाणं अपेक्षित होतं. पण, हरियाणा, महाराष्ट्र आणि त्यानंतर प्रतिष्ठेची दिल्ली निवडणूक या गडबडीत अध्यक्षाची निवड मागं पडली. शिवाय, या राज्यांसह अन्य काही राज्यांतही सदस्यनोंदणीचं काम बाकी होतं. नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडायचा असेल तर निम्म्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती आणि मग त्यांची संमती लागते. ३६ पैकी ११ राज्यांमध्ये नवे प्रदेशाध्यक्ष नेमले गेले आहेत. इतर राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया होईपर्यंत राष्ट्रीय स्तरावर पक्षाध्यक्षाची निवडणूक होण्याची शक्यता नाही. त्यामुळं राष्ट्रीय अध्यक्षांची निवड लांबणीवर पडली आहे. पण, मावळते अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यानंतर कोण याची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा होत आहे. त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, शिवराजसिंह चौहान या नेत्यांबद्दल बोललं जात होतं. भाजपला दक्षिणेमध्ये विस्तार करायचा असल्यानं त्या राज्यांतून कोणाची तरी निवड होईल, अशीही चर्चा होती. महिला अध्यक्ष असेल असंही म्हटल जात होतं. पण, या चर्चांमध्ये एक नाव कायम राहिलेलं आहे ते म्हणजे मनोहरलाल खट्टर! अनेक नावं आली आणि गेली पण, खट्टर संभाव्य उमेदवारांच्या यादीत अढळ आहेत. गेल्या काही महिन्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीमध्ये संघाशी निष्ठा असलेल्या नेत्यांची निवड केली गेली. दिल्लीतही संघानं हिरवा कंदील दाखवल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं गेलं असं म्हणतात. हे पाहिलं तर भाजपच्या नव्या अध्यक्षाच्या निवडीमध्येही संघनिष्ठा महत्त्वाची असेल. या निकषामध्ये खट्टर अगदी फिट बसतात. १९९४ मध्ये भाजपमध्ये येण्याआधी खट्टर १७ वर्षे, १९७७ पासून संघाचे प्रचारक होते. आधी संघ, मग भाजप. शिवाय, खट्टर यांचे मोदींशी अत्यंत जवळचे संबंध आहेत. या दोघांची मैत्री इतक्या वर्षांनंतरही घट्ट आहे. संघ व भाजपच्या सर्वोच्च नेत्यांना खट्टर आपले वाटत असतील तर कदाचित खट्टरांच्या नावावरही शिक्कामोर्तब होऊ शकतं. पण, भाजपच्या धक्कातंत्रात एखादा नवा चेहरा पुढं आला तर मात्र खट्टरांना मंत्रीपदावर कायम राहावं लागेल.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandni chowkatun delhiwala political news political affairs in maharashtra amy 95