दिल्लीवाला
केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार बोलायला लागले तेव्हा, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार याची उत्सुकता होती. पण, ते बोलले फक्त हिमाचल प्रदेशबद्दल. गुजरातसाठी आता त्यांना आठ-दहा दिवसांनी ‘विज्ञान भवना’त पुन्हा यावंच लागणार आहे. हिमाचल प्रदेशमधील मतदान आणि मतमोजणी यामध्ये २६ दिवसांचं अंतर आहे. तोपर्यंत हिमाचल प्रदेश बर्फाआड दडलेलं असेल. मतदान करताना हवामान बघितलं गेलं तसं मतमोजणीसाठी का नाही, याचंही उत्तर खरंतर राजीव कुमार यांच्याकडं नव्हतं. मतमोजणी करताना थंडीचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊ, असं त्यांचं म्हणणं होतं. खरंतर याच २६ दिवसांमध्ये गुजरातमध्ये मतदान होणार आहे. पण, ही बाब उघडपणे सांगता येत नाही. कधी कधी गोष्टी अडचणीच्या ठरतात त्या अशा. असो. राजीव कुमार यांनी एक गोष्ट चांगली सांगितली. अधिकाधिक मतदारांनी मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा असा केंद्रीय निवडणूक आयोगाचा प्रयत्न असतो. मतदारांना सुविधा उपलब्ध करून देणं हे आयोगाचं कर्तव्य आहे. उदाहरणार्थ; मतदारांना मतदानाच्या वेळी त्रास होऊ नये म्हणून मतदान केंद्र तळमजल्यावरच असतील याची काळजी घेतली गेली आहे. सर्व सुविधा पुरवल्यानंतरदेखील काही मतदान केंद्रांवर कमी मतदान होतं. नीचांकी मतदान झालेली मतदान केंद्रं कोणती आहेत, हे बघून तिथं कमी मतदान का होतं, याची कारणं शोधली जाणार आहेत. निवडणूक प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा ‘उपक्रम’ उपयुक्त ठरू शकेल. आयोगाचा दुसरा उपक्रमही स्वागतार्ह म्हणता येईल. १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुण-तरुणींची मतदार म्हणून नोंदणी करून घेणं. १८ वर्षे पूर्ण होण्याआधीही नोंदणी करता येऊ शकते. १८ वर्षे पूर्ण झाली की, ‘प्रथम मतदार’ म्हणून आयोगाकडून स्वागत केलं जाईल, नव्या मतदारांना ‘वेलकम किट’ही पाठवलं जाईल. वर्षभरात कधीही नोंदणी करता येते आणि नजीकच्या आगामी निवडणुकीत ‘प्रथम मतदारां’ना मतदानही करता येऊ शकते. हिमाचल प्रदेशमध्ये नोव्हेंबरमध्ये मतदान होईल, त्यामध्ये ऑक्टोबपर्यंत १८ वर्षे पूर्ण होणारे ‘प्रथम मतदार’ सहभागी होऊ शकतात. राजकीय दबावापुढं हतबल होण्याची वेळ येत असली तरी, लोकोपयोगी उपक्रमातून प्रतिमा टिकवता येते.
असा हा तटस्थपणा!
काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणूक होत आहे, हेच कितवं तरी आश्चर्य मानलं जात आहे. मल्लिकार्जुन खरगे हे गांधी कुटुंबाचे उमेदवार नाहीत, असं सतत सांगितलं जातंय पण, कोण-कोणाचे उमेदवार हे काँग्रेसमध्ये प्रत्येकाला माहिती आहे. जिंकून कोण येईल, याचीही कल्पना कार्यकर्त्यांना आहे. पण, पक्षाध्यक्षपदाची लढत एकतर्फी होईलच असं नाही. त्यामुळं निदान वरवर तरी तटस्थ असल्याचं दाखवलं जात आहे. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यांच्या अंत्यसंस्कारासाठी बहुतांश ज्येष्ठ नेते उपस्थित राहिले होते. शरद पवार, के. चंद्रशेखर राव, नितीश कुमार हे सगळेच होते. काँग्रेसकडून तिथे कोण जाणार, हा प्रश्न निर्माण झाला. सोनिया गांधींनी काँग्रेसचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून कमलनाथ आणि भूपेश बघेल यांना पाठवलं. जुनी मैत्री म्हणून अशोक गेहलोतही गेले होते आणि मल्लिकार्जुन खरगेही होते. खरगे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून उपस्थित होते पण, ते सोनियांचे प्रतिनिधी नव्हते. पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळं कदाचित हे अंतर राखलं जात असावं. मग, खरगे शनिवारी बेल्लारीमध्ये ‘भारत जोडो यात्रे’त झालेल्या जाहीर सभेत कसे उपस्थित राहिले? इथे तर राहुल गांधी सहयात्री आहेत आणि ही यात्रा काँग्रेसला मजबूत करण्यासाठी काढलेली आहे. तिथे खरगेंनी व्यासपीठावरून भाषण केले, हा ‘आचारसंहिते’चा भंग नव्हे का? कदाचित शशी थरूर केरळमध्ये यात्रेमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांना खरगेंच्या सहभागावर आक्षेप घेता येणार नाही. प्रचार संपायला आता एकच दिवस शिल्लक राहिला आहे, सोमवारी मतदान होईल, राहुल गांधींसह काँग्रेसच्या अन्य यात्रेकरूंना मतदान करता यावं यासाठी ‘भारत जोडो यात्रे’लाही एका दिवसाची विश्रांती देण्यात आली आहे. या यात्रेकरूंना चार-पाच तासांचा प्रवास करून मतदान केंद्रापर्यंत पोहोचावं लागणार आहे. तेवढंच अंतर पुन्हा मागे येऊन यात्रास्थळी पोहोचावं लागणार आहे. मंगळवारी पुन्हा सकाळी साडेसहा-सात वाजल्यापासून यात्रेचा आंध्र प्रदेशमधील टप्पा सुरू करावा लागणार आहे.
गजबज..
‘राजपथ’ गुलामगिरीतून पूर्ण मुक्त झालेला आहे, तो आता ‘कर्तव्यपथ’ झालेला असल्याने कुतूहलाने लोक इथं येऊ लागलेले आहेत. काही मंत्री आपलं कर्तव्य बजावायलाही इथे येतात हे अतीच झालं. केंद्रीय मंत्र्यांना त्यांच्या घरातून चंद्र दिसत नव्हता का, हे माहिती नाही. पण, करवा चौथ साजरी करायला त्यांना कर्तव्यपथच हवा होता. तिथून कदाचित चंद्राचं दर्शन चांगलं होत असेल. राजपथाचं नामकरण झाल्यामुळं काय लोकांच्या मानसिकतेत काय फरक पडला याची कल्पना नाही पण, हा परिसर पुन्हा गजबजून गेला हे बघून कोणीही उत्साहित होईल. या संपूर्ण पथाच्या रक्षणासाठी पोलीस ठाणंही असेल, कदाचित याच महिन्यामध्ये ते अस्तित्वात येईल. दिल्लीत थंडीची चाहूल लागली आहे, आता हा परिसर दिवसभर लोकांच्या गर्दीने फुललेला असेल. दोन वर्ष इंडिया गेटसमोरून जाताना नाकातोंडात धूळ खात जावं लागत होतं. तिथं उभं राहिलं तर वाहनांच्या प्रदूषणामुळं तीच अवस्था होईल. पण, कर्तव्यपथावरचं बहुतांश सुशोभीकरण झालेलं असल्यामुळं लोकांना विजय चौकापासून इंडिया गेटपर्यंतच्या टेकडीवर मोकळेपणाने भटकता येऊ लागलेलं आहे. पुन्हा खाण्या-पिण्याची रेलचेल सुरू झाली आहे. अजून तरी इथं स्वच्छता दिसतेय पण, भारतीय ‘सवयी’ कदाचित नंतर पाहायला मिळतील, आता तिच्या खुणा कुठं कुठं पाहायला मिळत आहेत. इंडिया गेटच्या परिसरात दिल्लीकर येतातच पण, दिल्लीबाहेरून आलेल्या पर्यटकांची गर्दीही इथे भरपूर असते. करोनामुळं ही गर्दी गायब झाली होती. पण, आता ट्रॅव्हल बसेस भरभरून येताना दिसतात. या वर्षी थंडीच्या मोसमात इंडिया गेटवर आल्हाददायक वातावरण असेल.
दक्षिणेकडचा अवघड प्रवास
जिथं जिथं भाजपला विस्तार करायचा आहे, तिथून काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ प्रवास करत आहे किंवा तिचा प्रवास झालेला आहे. कर्नाटकनंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा या दक्षिणेकडील दोन राज्यांमध्ये तिचा प्रवास होईल. राजस्थान वगळलं तर यात्रेच्या मार्गात कुठल्याही राज्यात काँग्रेसचं सरकार नाही. खरंतर भाजप आणि काँग्रेसचा उलटा प्रवास सुरू आहे. ही यात्रा कर्नाटकात आणखी दोन दिवस असेल. इथं मात्र भाजपचं सरकार आहे आणि निवडणुकाही होणार आहेत. त्यामुळं कन्नडिगांच्या प्रदेशात दोन्ही राष्ट्रीय पक्ष एकमेकांना भिडलेले आहेत. पुढच्या टप्प्यांत आंध्र आणि तेलंगणामध्येही भिडतील. इथं दोघांचंही सरकार नाही. पण, दोघांना तिथल्या प्रादेशिक पक्षाशी आणि एकमेकांशी संघर्ष करायचा आहे. इथं काँग्रेसला थोडा जास्त फायदा आहे. या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसचं अस्तित्व आहेच, यात्रेमुळं विधानसभा निवडणुकांमध्ये लाभ मिळतो का, याची चाचपणी काँग्रेस करू लागला आहे. भाजपला काही करून तेलंगणा जिंकायचं आहे, तिथं भाजपनं ‘आप’चा डाव खेळलेला आहे. ‘काँग्रेस संपली, आम्हीच विरोधी पक्ष’, असं तिथं जाऊन भाजपचा प्रत्येक नेता सांगू लागला आहे. तेलंगणापाठोपाठ आंध्र प्रदेशमध्येही विस्तारवादाचं भाजपचं धोरण आहे. पण, आंध्रमध्ये पाय रोवणं भाजपला अवघड झालेलं आहे. त्यात आता काँग्रेसची यात्राही तिथून जाणार आहे. नाही म्हटलं तरी, यात्रेनं वातावरण बदलायला मदत केलेली आहे. आंध्रमध्ये जगनमोहन रेड्डी यांना ‘आप’ला मित्र असं म्हणता येत नाही. पण, दिल्लीत त्यांना मित्रत्वाची वागणूक द्यावी लागते. भाजपनं तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा आढावा घ्यायला सुरुवात केलेली आहे. तमिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकमध्ये फूट पाडून आता भाजपनं हिंदूत्वाच्या अजेंडय़ावर लक्ष केंद्रित केलं आहे. दक्षिण भारतातील भाजपच्या विस्तारावर लोक बोलू लागले आहेत.