चंद्राच्या भ्रमणावर आधारित कालगणनांमध्ये ‘शुक्लपक्ष’ आणि ‘कृष्णपक्ष’ असतात. आली कुठून ही नावं? चला, आज याचं उत्तर शोधू.

‘शुक्ल’ म्हणजे पांढरा. मग ‘शुक्लपक्ष’ म्हणजे पांढरा पक्ष? काय पांढरं असतं या पक्षात? पांढरी असते रात्र. जसजसे हे पंधरा दिवस पुढे सरकतात तसतशी चंद्राची कोर अधिकाधिक मोठी होऊ लागते. त्यामुळे रात्र अधिकाधिक प्रकाशमान होते. म्हणून तो ‘शुक्लपक्ष’ असं अनेकांना वाटतं. पण हा अर्धा भाग झाला. त्याचा दुसरा आणि तितकाच महत्त्वाचा भाग असा आहे की रात्रीचा अधिकाधिक भाग प्रकाशमान होतो. म्हणजे चंद्राची अधिकाधिक मोठी कोर अधिक काळ रात्र प्रकाशमान करते म्हणून हा ‘शुक्लपक्ष’. हे समजून घ्यायचं तर सूर्यास्ताच्या वेळी चंद्राची नेमकी स्थिती काय असते ते पाहिलं पाहिजे.

चंद्राची भासमान गती सूर्याच्या भासमान गतीपेक्षा कमी असते. त्यामुळे तो दररोज सूर्याच्या सुमारे पाऊण तास मागे पडतो. अमावास्येला दोघेही हातात हात घालून उगवतात आणि एकत्रच मावळतात. त्यानंतर मात्र सूर्य मावळल्यानंतर काही काळाने चंद्र मावळतो.

शुद्ध प्रतिपदेला सूर्यास्तानंतर सुमारे पाऊण तासाने चंद्र मावळतो. ही कोर दिसण्याची शक्यता कमी. एक तर खूप नाजूक असते ती. दुसरं म्हणजे संधिप्रकाश असतानाच चंद्र मावळतो. पण यानंतर मात्र सूर्यास्तानंतर अधिकाधिक काळ चंद्र दिसतो. तो अधिकाधिक मोठा होऊ लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवर या चंद्रकोरीचा उल्लेख आहे ते यामुळेच.

शुद्ध अष्टमीला सूर्यास्तावेळी चंद्र माथ्यावर येतो. त्या वेळेपर्यंत कोर जवळजवळ निम्मी झालेली असते. त्यामुळे चंद्राचा प्रकाशही बऱ्यापैकी पडतो. या दिवशी चंद्रास्त साधारण मध्यरात्री होतो. कृत्रिम प्रकाशाने बरबटलेल्या रात्री अनुभवताना यातला चमत्कारही जाणवत नाही आणि यातलं सौंदर्यही. पण कधी जर या कृत्रिम प्रकाशापासून दूर जायची संधी मिळाली तर दिवसभर सूर्यप्रकाश, नंतर चंद्राचा प्रकाश आणि मग अचानक गुडूप काळोख हा चमत्कार अनुभवता येतो. तिथून पुढे तर सूर्यास्ताच्या सुमारास चंद्र माथ्यावरदेखील यायचा असतो. त्यामुळे तो मध्यरात्रीनंतरदेखील आकाशात दिसतो. आणि पौर्णिमेला तर पूर्ण चंद्र संपूर्ण रात्र त्याच्या शीतल प्रकाशाने उजळून टाकतो.

आता जरा शुद्ध द्वितीयेविषयी. त्या दिवशी सूर्यास्तानंतर सुमारे दीड तासाने चंद्र मावळतो. शिवाय ती कोरही आकाराने पुरेशी मोठी झालेली असते. त्यामुळे शुद्ध प्रतिपदेची कोर दिसली न दिसली तरी ही कोर निश्चितपणे दिसते.

पारंपरिक इस्लाम धर्मीय दिनदर्शिका चंद्राच्या भ्रमणावर बेतलेली आहे. त्यात नवा महिना सुरू कधी झाला हे प्रत्यक्ष चंद्रदर्शनावर ठरतं. म्हणजे नुसत्या गणिताने ‘आज चंद्र दिसला पाहिजे’ एवढं असणं पुरेसं नाही. तो डोळ्यांना दिसला पाहिजे. हे म्हणजे ‘चक्षुर्वैसत्यम्’ असं झालं! शव्वाल महिन्याच्या पहिल्या दिवशी ईद साजरी करतात. ईद ही बहुतेकदा द्वितीयेलाच का असते ते लक्षात आलं असेल आता.

पण शुद्ध द्वितीयेच्या चंद्राचं माहात्म्य शकसंवत्सरातदेखील आहेच. पंचांगामधे ‘चंद्रदर्शन’ असा उल्लेख असतो तो शुद्ध द्वितीयेलाच. या महिन्यातलं चंद्रदर्शन नेमकं आजच आहे. तेव्हा आज संध्याकाळी सूर्यास्ताच्या सुमारास फिरायला जा. सूर्यास्त तर पाहाच. पण लगेच निघू नका. थोडे रेंगाळा. जरा अंधार पडला की पश्चिम क्षितिजापाशी चंद्र दिसू लागेल. साधारण आठ-सव्वाआठला चंद्र मावळेल. हे चंद्रदर्शन अतिशय विलोभनीय असतं. त्याचा आनंद निश्चित घ्या. हे सगळं शुक्लपक्षातलं झालं. कृष्णपक्षात काय होतं? याच्या बरोब्बर उलट होतं. पण म्हणजे नेमकं काय ते पाहू पुढील लेखात.

Story img Loader