सीरिया या देशात सशस्त्र इस्लामी बंडखोरांनी घडवलेल्या उलथापालथीच्या बातम्या आता जरा कमी झाल्यानंतर ही बुकबातमी येते आहे… ८ डिसेंबर २०२४ रोजी सीरियाचे जुलै २००० पासूनचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद हे मायदेशातून गाशा गुंडाळून रशियाच्या आश्रयाला गेले, त्यांची जवळपास २४ वर्षांची राजवट होत्याची नव्हती झाली आणि आता पुढे काय हा प्रश्न जगाला पडला, या परिस्थितीचं विश्लेषण ‘सीरिया- सिव्हिल वॉर टु होली वॉर?’ या आगामी पुस्तकात चार्ल्स ग्लास यांनी केलं आहे.

ग्लास हे इतिहासकार आणि सीरिया/ लेबनॉन भागाचे अभ्यासक. १९८० पासून ते या भागात येताहेत, १९८७ मध्ये तर त्यांनाच लेबनॉनमध्ये ओलीस ठेवण्याचा प्रकार घडला होता. तेव्हापासून आजतागायत, सीरियाकडे लक्ष ठेवणाऱ्या ग्लास यांना अर्थातच २०१० मध्ये सीरियात झालेल्या लोकचळवळीनं आकर्षित केलं होतं. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांचं ‘सीरिया बर्निंग’ हे पुस्तकही आलं होतं आणि त्याचं स्वागत ‘गार्डियन’, ‘न्यू यॉर्क टाइम्स’सह अनेकांनी केलं होतं.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : क्रिकेटमधील पराभवाचे ‘कौटुंबिक विश्लेषण!

याला दशकही पुरं होत नाही तोच सीरियाबद्दल ग्लास यांना पुन्हा लिहावं लागतंय… विषयाला आता कलाटणी मिळालेली आहे, कारण ‘आयसिस’ला बऱ्यापैकी टक्कर देऊन देशाचा बराचसा भाग ताब्यात ठेवणारे बशर अल-असद आता परागंदा झालेले आहेत. ‘आयसिस’चीच एक शाखा असलेल्या गटानं सीरियावर कब्जा केलाय आणि हे राज्यकर्ते इस्लामीच असले तरी, ‘ख्रिास्ती आणि अन्य अल्पसंख्याकांना आम्ही पूर्ण अभय देऊ,’ असं ही नवी राजवट सांगते आहे. खरोखरच होईल का तसं? ‘शक्यता कमी’ – कारण साधनसामग्रीच्या अभावात जगण्यातून अंतर्गत संघर्ष पेटतच राहतात, हे सीरियातही दिसू लागेल, हेच कुणीही सांगेल. पण चार्ल्स ग्लास त्याहीपेक्षा सखोल उत्तर शोधतात. २०१० नंतर सततच सीरियात यादवीचं वातावरण असूनसुद्धा त्याला थेट धर्म-युद्धाचं स्वरूप आलेलं नव्हतं, ते आताच कसं आलं, हा प्रश्न ग्लास यांनी, नव्या पुस्तकात मध्यवर्ती मानला आहे. येत्या एप्रिलमध्ये हे पुस्तक प्रकाशित होईल, असं ‘ऑर बुक्स’ या प्रकाशकांनी म्हटलं आहे.

तेवढ्यात दुसरीकडे, ‘अॅमेझॉन’ या विक्रीस्थळावर चार्ल्स ग्लास यांच्या भलत्याच पुस्तकाची जाहिरात सुरू आहे. ‘सीरिया इन अॅशेस’ या शीर्षकाचं ते पुस्तक ‘आगामी’ आहे की ते ‘सध्या उपलब्ध नाही’, याचा थांगपत्ता अन्य संकेतस्थळांवर शोधलं तरीही लागत नाही. याही पुस्तकाचे प्रकाशक ‘ऑर बुक्स’ हेच आहेत. पण अॅमेझॉनवरला मजकूर असा की, आधीच्याच पुस्तकात भर घालून ‘सीरिया इन अॅशेस’ तयार झालं आहे. सीरियाबद्दल वाचण्याची इच्छा असेल, तर याच प्रकाशकांचं- याच लेखकाचं ‘सीरिया- सिव्हिल वॉर टु होली वॉर?’

हे पुस्तक येईपर्यंत थांबणं बरं. पण ते जे दुसरं ‘सीरिया इन अॅशेस’ नामक काहीतरी आहे, त्याच्या मुखपृष्ठावरलं चित्र लक्षात राहणारं, पाहणाऱ्याचा ठाव घेणारं आहे हेही खरं!

Story img Loader