श्रीरंजन आवटे

सहभाव, आस्था, प्रेम या मूल्यांवरची नेहरूंची निष्ठा आणि विश्वास यांचे प्रत्यंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच नव्हे तर प्रशासनातूनही दिसले..

upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची  तयारी : पदांचा पसंतीक्रम
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
response , students , Atal, initiative , CET cell ,
सीईटी कक्षाच्या ‘अटल’ उपक्रमाला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते?
Teachers unions oppose State Boards decisions with headmasters questioning IAS officers
शिक्षण मंडळाच्या सर्व परीक्षांवर बहिष्कार, आयएएस अधिकाऱ्यांना परीक्षा समजतात काय? शिक्षकांचा थेट सवाल…
competition between Ashok Chavan and Pratap Patil Chikhlikar over party defection
अशोक चव्हाण – चिखलीकरांमध्ये पक्षांतरावरून स्पर्धा
Nitish Kumar and Chandrababu Naidu on UGC
यूजीसीच्या मसुद्यावरून एनडीएमध्ये अस्वस्थता; जेडीयूची स्पष्ट नाराजी, तर टीडीपी, लोजपकडून सावध पवित्रा
Skill University , Tuljapur, Symbiosis Skills University ,
तुळजापुरात कौशल्य विद्यापीठ होणार, सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठ करणार तांत्रिक सहकार्य, राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

एक :  

भारताचे माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांना उच्च शिक्षणाकरता टाटांकडून फेलोशिप मिळाली होती आणि त्यामुळे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या प्रतिष्ठित शिक्षण संस्थेत ते प्रवेश घेऊ शकले. पदवी प्राप्त करून भारतात परतल्यावर, प्रख्यात अर्थतज्ज्ञ हॅरॉल्ड लास्की यांचे शिफारसपत्र घेऊन ते नेहरूंना भेटले. नेहरूंना के. आर. नारायणन यांची गुणवत्ता ध्यानात आली. भारतीय परराष्ट्र सेवेत (आयएफएस) त्यांची निवड सुकर झाली. म्यानमारच्या दूतावासात त्यांची नियुक्ती झाली. या सेवेत असतानाच मा तिंत तिंत या म्यानमारमधल्या तरुणीशी त्यांची ओळख झाली. पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.

मात्र अडचण अशी होती की, के. आर. नारायणन भारतीय परराष्ट्र सेवेच्या नियमांनुसार परदेशी व्यक्तीशी विवाह करू शकत नव्हते. नारायणन यांनी पं. नेहरूंना या संदर्भात पत्र लिहिले. आपल्या प्रेमविवाहातील प्रशासकीय नियमांचा अडथळा त्यांनी सांगितला. नेहरूंनी या नियमांमध्ये बदल करून ‘विशेष परवानगी’ म्हणून या विवाहाला मंजुरी दिली. या मा तिंत तिंत म्हणजे कालांतराने उषा नारायणन हे भारतीय नाव धारण करणाऱ्या, परकीय मूळ असलेल्या (पुढे राष्ट्रपतींच्या सहचरी म्हणून भारताच्या ‘फर्स्ट लेडी’ ठरलेल्या) पहिल्या भारतीय महिला. पुढे अनेक वर्षे स्त्रियांच्या संदर्भातील अनेक प्रश्नांविषयी त्या लढत राहिल्या. परकीय मूळ असलेल्या भारतीयांनीही देशासाठी अमूल्य योगदान दिले आहे!

दोन :

मत्प्रिय कृष्णा, अलाहाबादमधील हिंदी कवी निराला यांच्याबाबतचं प्रकरण तुम्हाला कदाचित ठाऊक असेल. याआधीही त्यांनी अतिशय चांगलं लिहिलं आहे आणि आजही ते काही वेळा प्रासादिक लिहीत असतात. त्यांची जुनी पुस्तकं अतिशय लोकप्रिय आहेत आणि मी चुकत नसेन तर, काही पाठय़पुस्तकंही आहेत. त्यांनी सर्व पुस्तकांचे अधिकार वेगवेगळय़ा प्रकाशकांना देऊन टाकले. अगदी २५-३० रु. किंवा फार तर ५० रु. प्रति पुस्तक या प्रकारे त्यांना पैसे मिळाले. खरं म्हणजे पुस्तकांवरच्या संपूर्ण स्वामित्वहक्काच्या हिशेबानं हा व्यवहार व्हायला हवा होता. आता प्रकाशक या पुस्तकांतून रग्गड पैसा कमावताहेत आणि निराला यांना छदाम मिळत नाहीये. लेखकाचं निर्लज्जपणे शोषण करण्याचं हे प्रकाशकाचं कृत्य अत्यंत लांच्छनास्पद आहे. माझ्या मते, कायद्याच्या काटेकोर चौकटीतही या प्रकरणाला आव्हान दिलं जाऊ शकतं. कॉपीराइट कायद्यातही तात्काळ बदल करण्याचा विचार अकादमीनं करावा. मी स्वत:च एक-दोन वर्षांपूर्वी कायदे मंत्रालयाला पत्र लिहिलं होतं. तुम्ही यावर एक नोंद तयार करावी.

आणि हो, आता सध्या निराला यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. त्यांना थेट मदत करण्यात अर्थ नाही कारण ते लगेच ती परत करतात किंवा इतरांना देऊन टाकतात. अक्षरश: स्वत:चे कपडे- अगदी सदरेही त्यांनी इतरांना दिले आहेत. महादेवी वर्मा आणि अलाहाबादमधील साहित्य वर्तुळातील काही मंडळी निरालांना सहकार्य करत आहेत. मला वाटतं आपण त्यांना दरमहा १०० रुपये मिळतील, अशी व्यवस्था करायला हवी आणि हे पैसे महादेवी वर्माकडे पाठवायला हवेत. शिक्षण मंत्रालयातल्या निधीतूनही हे पैसे दिले जाऊ शकतात. अशा कारणांसाठी पैशांची तरतूद केली गेली आहे. तुम्ही मौलाना साहेबांकडे (मौलाना आझाद) या प्रकरणाविषयी बोलाल का, जेणेकरून त्यांची सहमती असेल तर त्यांच्या खात्यातून याकरता प्रक्रिया सुरू होईल.

निराला यांच्याविषयीची आणखी नेमकी माहिती तुम्हाला महादेवी वर्माकडून मिळेल.

आपला विश्वासू,

जवाहरलाल नेहरू

    साहित्य अकादमीचे सचिव कृष्णा कृपलानी यांना नेहरूंनी लिहिलेले हे पत्र. डी. एस. राव यांनी साहित्य अकादमीच्या इतिहासविषयक लिहिलेल्या पुस्तकात या पत्राचा समावेश आहे.

तीन :

२०१५-१६ मध्ये केंद्र सरकारने १९५२ पासूनच्या काही प्रशासकीयदृष्टय़ा गोपनीय ठेवलेल्या फायली सार्वजनिक केल्या. नेहरूंनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर कसा अन्याय केला, याच्या सुरस कथा आधीच सुरू असताना आणखी काही इंधन मिळेल, अशी अपेक्षा असताना झाले उलटेच.

१२ जून १९५२ रोजी पं. नेहरूंनी वित्त मंत्रालयाला एक पत्र लिहिले. या पत्रात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ऑस्ट्रियन पत्नीकरता आर्थिक मदत करण्याच्या संदर्भात लिहिले. वित्त मंत्रालयाकडून ही मंजुरी घेऊन व्हिएन्नामध्ये असलेल्या नेताजींच्या पत्नीपर्यंत आर्थिक मदत पोहोचवण्याची तजवीज करण्यात आली. एवढेच नव्हे, तर काँग्रेस समितीमध्ये या अनुषंगाने एक ट्रस्ट स्थापन करण्याचा विचार झाला. त्यानुसार पं. नेहरू व पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बी. सी. रॉय यांनी विश्वस्त म्हणून या ट्रस्टचे काम केले. सुमारे दोन लाख रुपयांचा ट्रस्ट बोस यांची कन्या अनिता बोस हिच्याकरता स्थापन झाला. अनिता बोस विवाहबद्ध होईपर्यंत या ट्रस्टने त्यांना मदत करावी, अशी योजना आखण्यात आली होती.

चार :

‘‘स्वत:च्या भावना, वैयक्तिक भाग किती व्यक्त करायचा, याविषयी माझ्या मनाला लगाम घालणं मी शिकत आलो आहे. मी एक एकाकी जीवन जगतो आहे. माझ्या या खासगी आयुष्यात अधूनमधून कमला डोकवायची. फार मोजक्या लोकांना कल्पना आहे कमलाविषयी माझ्या काय भावना होत्या ते. लग्नानंतरच्या इतक्या साऱ्या वर्षांत आमचं नातं तसंच पूर्वीसारखं ताजंतवानं होतं, असं म्हणता येणार नाही; पण आयुष्यभर मी तिच्यावर प्रेम करत राहिलो. प्रेमाचं हे कारण मला फारसं उमगलं नाही. आमच्या सहजीवनामध्ये एकमेकांविषयीचा जिव्हाळा होता. काही तरी विलक्षण, रोमांचित करणारं आणि काहीसं वेदनादायी असं या प्रेमाचं स्वरूप होतं. प्रेम करण्याकडे कुणी ‘कर्तव्य’ म्हणून पाहात असेल तर.. प्रेमात अशी सौदेबाजी मला पसंत नाही.

..लग्न आणि लैंगिकता या दोन्हीबाबत तुमच्याहून माझ्या धारणा वेगळय़ा आहेत. माझ्या व्यक्तिगत वैवाहिक जीवनातही एक अपवादात्मक बाब आहे असं मला वाटतं. मी आणि कमला कितीही भांडलो असू, मी तिच्यावर वैतागलो असेन पण इतक्या दीर्घकाळाच्या वैवाहिक आयुष्यात तिच्या स्पर्शाने मी शहारलो, मोहरलो आणि आकंठ प्रेमात राहिलो. खरं म्हणजे कोणत्याही स्त्रीकरता माझ्याइतका वाईट नवरा नसेल. कारण सभा, संमेलनं, बैठका, कार्यक्रम, निदर्शनं, तुरुंगवास या सगळय़ात माझा सर्वाधिक काळ गेला आहे. आम्ही दोघंही एकमेकांसाठी गूढ कोडं होतो आणि तरीही काहीसा जादूई अंश आमच्या नात्यात होता.’’

२४ जुलै १९४१ रोजी नेहरूंनी हे पत्र लिहिले आहे बापूजींना. कमलावर आपण अन्याय केला या अपराधबोधाने स्वत:ला ‘सर्वाधिक वाईट नवरा’ असं संबोधत नात्याचा, प्रेमाचा, जगण्याचा मूलभूत विचार करणारा हा नेहरू नावाचा माणूस!

अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. या सुटय़ा उदाहरणांमधून नेहरूंच्या प्रेमाचा, आस्थेचा परीघ किती मोठा होता, हे सहज लक्षात येते. प्रेमविवाहात कायदा आडवा येतो आहे म्हणून कुणी अधिकारी पंतप्रधानांना पत्र लिहू शकतो आणि तितक्याच सहजतेने पंतप्रधान त्या अधिकाऱ्याच्या पाठीशी उभे राहातात, हे केवळ अविश्वसनीय वाटते. कवी निराला यांना सक्रियपणे मदत करणारे नेहरू स्वत: उत्तम लेखक होते. अगदी तत्कालीन राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी लिहिलेले इंग्रजी गद्य हा साहित्याच्या आणि भाषाशास्त्रीय दृष्टीने अभ्यासनीय भाग आहे. साहित्य, नाटक, कला, संगीत या सगळय़ांविषयी त्यांच्या मनात कमालीची आस्था होती. साहित्य अकादमी, नाटक अकादमी, संगीत अकादमी स्थापन करण्यामागे नेहरूंच्या आध्यात्मिक बैठकीचा मोठा वाटा आहे आणि स्व-शोधाचा नेहरूंचा आध्यात्मिक आणि एकाकी प्रवास हा तर एक स्वतंत्र अध्याय आहे.

माणूस असा संवेदनशील असतो तेव्हाच तो लेकीच्या भविष्याकरता भूतकाळाचे उत्खनन करत पत्रभेटींतून नव्या क्षितिजाच्या खिडक्या उघडत राहातो. आपल्या वडिलोपार्जित संपत्तीच्या ९८ टक्के संपत्ती (सुमारे १९६ कोटी रुपये) देशासाठी देतानाही त्याचा गाजावाजा करत नाही. गांधींची विश्वस्तभावाची कल्पना कितीही अव्यवहार्य असली तरी त्यांचा वारस असलेला जवाहर सारे काही त्याग करण्यापर्यंत जातो, हा अवघा आध्यात्मिक प्रवासाचाही आलेख आहे.

बराक ओबामा म्हणाले होते, तुम्ही काव्यात्म प्रचार करू शकता; पण राज्यकारभार मात्र गद्य प्रकारेच करावा लागतो. मात्र नेहरूंनी मनोहारी स्वप्नही तळहातावर दिले आणि त्यासाठीच्या कारभारालाही मानवी, काव्यात्म स्पर्श दिला. माणूस इतर प्रजातींहून वेगळा आहे तो विचार करण्यामुळे, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात माणूस खरोखरच वेगळा असेलच तर तो सहभाव, आस्था, प्रेम या मूल्यांमुळे. त्यावरच्या प्रगाढ विश्वासामुळे. अशी निष्ठा, असा विश्वास व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यात असणे जरुरीचे असते. आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान संवेदनशील, आस्थावान होते त्यामुळे इथल्या राज्यकारभाराला, विकासाला आणि वाटचालीला मानवी चेहरा प्राप्त झालेला होता!

Story img Loader