अमृत बंग
‘‘आता माझी मुलाखतीकरिता निवड झाली नाही तरी चालेल, पण हा फॉर्म भरूनच मजा आली. असले प्रश्न आजवर मला कोणी विचारलेच नव्हते!’’
‘‘ही कुठेही फॉर्मल मुलाखत वाटली नाही, कुठले दडपणदेखील जाणवले नाही. तुम्ही जे प्रश्न विचारलेत, जे मार्गदर्शन केले, ज्या असाइनमेंट्स सुचवल्यात, त्यावर मी नक्की काम करेन. आता कार्यशाळेकरिता निवड झाली तर उत्तमच, पण नाही झाली तरी काही हरकत नाही.’’
जुलै ते ऑक्टोबर हे चार महिने म्हणजे निर्माण या आमच्या युवा उपक्रमाच्या नवीन बॅचसाठीच्या निवडप्रक्रियेचा काळ. ‘निवडप्रक्रिया ही विकासप्रक्रियादेखील असली पाहिजे’ या भूमिकेतून आम्ही करत असलेल्या प्रयत्नांना दरवर्षी हमखास मिळणारा हा सुखद प्रतिसाद!
पहिली ते बारावी, आणि पुढे बॅचलर्सची साधारण चार वर्षे, अशा एकूण १६ वर्षांत, दरवर्षी तीन तासांचे किमान दहा पेपर्स, म्हणजे जवळपास ५०० तास, प्रत्येक विद्यार्थी लेखी परीक्षा देण्यात घालवतो. यात प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांचा, आणि जर्नल कम्प्लिशनसारख्या तद्दन टुकार गोष्टीचा वेळ पकडलाच नाही आहे. ५०० तासांना आठने भागल्यास साधारण दोन महिने एवढे ‘वर्क डेज’ एका विद्यार्थ्यांचे व्यतीत होतात. भारतातील २६ कोटी युवांना हे गणित लागू केल्यास चार कोटी वर्षे एवढे ‘वर्क डेज’ / कार्य कालावधी हा निव्वळ परीक्षा देण्यात जातो. ही ढोबळमानाने केलेली आकडेमोड आहे हे मानले तरी ऐन तारुण्यातील एवढा मोठा काळ जी परीक्षा नावाची गोष्ट बळकावणार आहे तिच्यावर ‘निव्वळ विद्यापीठांसाठी मार्कशीट बनवण्याची सोय’ यापलीकडे जाऊन प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसाठी किमान काही उपयुक्तता असण्याची नैतिक जबाबदारी आहे असे मला वाटते. शिक्षणप्रक्रियेतील मूल्यांकन पद्धती हीदेखील एक शैक्षणिक अनुभव असायला पाहिजे ना? तो सगळय़ा विद्यार्थ्यांसाठी केवळ बिनडोक माहिती पुनरुत्पादनाचा आणि काहींसाठी तर आत्यंतिक दडपणाचा अनुभव होऊन कसे चालेल? ‘‘संपली परीक्षा, सुटलो बुवा एकदाचा’’ पेक्षा ‘‘मजा आली, बघूया काय होतयं’’ असा उल्हास नको का?
व्यापक बदल कधी होईल ते माहीत नाही पण किमान आम्ही चालवत असलेल्या निर्माण प्रकल्पामध्ये तरी हा विचार कसा अमलात आणता येईल याचा गेले दशकभर आम्ही सातत्याने प्रयत्न केला आहे. भारतीय तरुणांना ‘फ्लरिश’ होण्यास व त्यांचे ‘पर्पज’ शोधण्यास मदत व्हावी, आणि त्यांच्यात सामाजिक बदल घडवून आणण्याची प्रेरणा व कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने २००६ साली निर्माणची सुरुवात झाली. सर्च संस्थेचे संस्थापक डॉ. अभय व डॉ. राणी बंग आणि एम. के. सी. एल.चे विवेक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माणने भारताच्या २१ राज्यांतील हजारो तरुणांसोबत काम केलेले आहे. आम्ही चालवत असलेल्या विविध उपक्रमांपैकी गडचिरोलीला होणारी शिबिरे आणि त्यानंतरचा सातत्याने होणारा पाठपुरावा हा एक अतिशय सघन उपक्रम आहे. आमच्या वेळेच्या आणि संसाधनांच्या मर्यादा लक्षात घेता हे ‘इंटेन्स इनपुट’ कोणाला द्यायचे हे ठरविण्यासाठी आम्ही दरवर्षी एक निवडप्रक्रिया करतो आणि साधारण १५० युवा निवडतो.
ही निवडप्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये असते. ‘अॅप्लिकेशन फॉर्म, इंटरव्ह्यू आणि असाइनमेंट्स’. निर्माणच्या वेबसाइटवर एक अतिशय सुंदर आणि आत्मनिरीक्षणात्मक असा अर्ज आहे. सगळय़ा युवा वाचक-मित्रांनी तो किमान एकदा तरी बघावा. यातील प्रश्न हे युवांना स्वत:च्या जीवनाबद्दल अंतर्मुख व्हायला तसेच बाह्य सामाजिक परिस्थितीविषयी विचार करायला भाग पाडणारे आहेत. त्यांचे कुठलेही एक ठरावीक योग्य उत्तर असे नाही, तर ते पूर्णत: ‘ओपन एंडेड’ आहेत. हे प्रश्न सोडवताना इतर ज्ञानस्रोतांचा वापर करायचीदेखील पूर्ण मोकळीक विद्यार्थ्यांना असते. यातील प्रश्न हे दरवर्षी काही प्रमाणात बदलत असतात. त्यामुळे त्यातली उत्सुकता व नावीन्य टिकून राहते.
वानगीदाखल यातील काही प्रश्न असे :
१. शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्ही काय काम करू इच्छिता/ सध्या काम करत असल्यास, काय काम करत आहात? हेच काम करावे असा निर्णय घेताना काय विचार केला?
२. आजच्या घडीला तुम्हाला स्वत:च्या आयुष्याबद्दल पडलेले असे कुठले प्रश्न आहेत ज्यांचा तुम्हाला शोध आहे?
३. तुमच्या जीवनातील असा एखादा प्रसंग सांगा जिथे तुम्ही सोय, फायदा किंवा इतरांचा विरोध याची चिंता न करता स्वत:च्या मूल्यांना सुसंगत अशी नैतिक भूमिका घेतली.
४. दर वर्षी, आरोग्यसेवेवरील खर्च न झेपल्यामुळे सुमारे पाच कोटी भारतीय जनता ही दारिद्रय़रेषेखाली ढकलली जाते. तुमच्या मते अशी परिस्थिती उद्भवण्याची काय कारणे आहेत?
५. कुठल्याही शासकीय संस्थेला अथवा कार्यालयाला भेट देऊन तिथे काही तास व्यतीत करा, आजूबाजूच्या लोकांशी बोला. तेथे येणाऱ्या लोकांना काय अडचणी जाणवतात याबद्दलची तुमची निरीक्षणे सांगा.
अशा प्रश्नांमुळेच आम्हाला अनेकदा ‘‘निर्माणच्या अर्जातील प्रश्नांची उत्तरे देणे हा एक आनंददायी अनुभव होता. माझ्या मनात नेमके काय चालले आहे ते समजून घेण्याची संधी मला यामुळे मिळाली’’ किंवा ‘‘माझे विचार खूप विखुरलेले आणि खंडित स्वरूपात होते. पण या फॉर्मने मला माझ्या स्वत:च्याच जीवनाशी संबंधित प्रश्नांचा ठोस व नेमकेपणे विचार करण्यास मदत केली.’’अशा प्रतिक्रिया मिळतात.
समाजकार्य करायला कुठल्या पदवीची गरज नाही पण विचारांची, प्रेरणेची, क्षमतेची आणि सातत्यपूर्ण परिश्रमांची मात्र नक्कीच गरज आहे. या अनुषंगाने आम्ही या निवडप्रक्रियेत वेगवेगळे पैलू बघतो. या उपक्रमाचा उद्देश स्व:च्या पलीकडे जाणे असा असल्यामुळे केवळ स्वत:च्या आर्थिक प्रश्नांमध्ये गुरफटून न राहता त्याच्या पलीकडे जाता येणं, मी इतरांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं आतून वाटणं, हा निर्माणमध्ये निवड होण्यासाठीचा महत्त्वाचा निकष आहे. त्याबरोबरच सामाजिक कार्य हे निव्वळ हौसेखातर करायचे नसल्यास इतरांना उपयोग होईल, त्यांची काही समस्या दूर करता येईल असे काही ज्ञान, कौशल्य, क्षमता अंगी असणेदेखील आवश्यक आहे. आणि ते कृतीमध्ये उतरवण्याची धमक असली पाहिजे. भारतातल्या अनेकविध नामांकित कॉलेजेसमधून जसे विद्यार्थी निर्माणमध्ये निवडले जातात तसेच अनेक युवा असेही आहेत ज्यांचं फारसं औपचारिक शिक्षण झालेलं नाही, ज्यांनी जीवन-विद्यापीठातूनच शिक्षण घेतलं आहे मात्र प्रत्यक्षात काहीतरी करून दाखवलं आहे. अशी शैक्षणिक आणि भौगोलिक विविधता हा अनुभव अतिशय संपन्न करते. निवडप्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर आणि शेवटी निवडलेल्या गटातदेखील मुला-मुलींचे प्रमाण हे जवळजवळ अर्धे असते, कित्येकदा मुलीच जास्त असतात. समाज बदलासाठीच्या निर्माणसारख्या उपक्रमात मुली हिरिरीने भाग घेताहेत हे अत्यंत आश्वासक आहे.
पहिल्या टप्प्यानंतर मुलाखतीसाठी ५०० जणांची निवड होते. स्वत:ची मूल्ये, मनातील प्रश्न, पुढील दिशा, समाजातील समस्या, त्यांची कारणमीमांसा, त्यावरील संभाव्य उपाय, रोल मॉडेल्स, इ.बाबत युवांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल, आणि त्यांच्या भावना, संभ्रम ते मोकळेपणे सांगू शकतील असा हा विकासात्मक संवाद असतो. स्वत:च्या भविष्याविषयी ‘खुल के’ कल्पनारंजन होईल, स्वत:च्याच भूमिकांची चाचपणी करता येईल, त्यावर चर्चा आणि भिन्न मतांना सामोरे जाता येईल, व हे सर्व होताना एका अस्सल परस्परसंवादाचा अनुभव येईल असा हा विलक्षण प्रकार असतो. माझ्यासाठी तर वर्षांतील अत्यंत समाधानकारक असा हा भाग!
तासाभराच्या संवादानांतर आम्ही प्रत्येकाला असाइनमेंट्स देतो आणि मग त्यातून १५० जणांची निवड करतो. समाजातील खऱ्या गरजूंसोबत समोरासमोर येण्याची, त्यांचे जीवन, अडचणी समजून घेण्याची आणि शक्य असल्यास तात्काळ काही योगदान देण्याची संधी यानिमित्ताने अनेक युवांना प्राप्त होते. सामाजिक प्रश्नांविषयी जिज्ञासा, वंचित घटकांप्रती सहानुभूती आणि स्वत:च्या सामाजिक जबाबदारीची जाणीव अशी तिहेरी उद्दिष्टपूर्ती व्हायला यातून मदत होते. या संपूर्ण निवडप्रक्रियेतील महत्त्वाची गोष्ट अशी की यातील प्रत्येक टप्पा हा स्वत:मध्ये स्वयंपूर्ण आहे, आणि आज तो युवा जिथे आहे त्यापेक्षा त्याला काही पावलं पुढे जायला मदत करेल असा आहे.
युवा वाचक-मित्रांनी एकदा तरी हा अनुभव घ्यावा. निर्माणच्या पुढील बॅचची निवडप्रक्रिया आता सुरू झाली आहे. याविषयी https://nirman.mkcl.org/selection/selection-process या संकेतस्थळावर अधिक माहिती बघता येईल. निव्वळ अर्थप्राप्तीपेक्षा त्यासोबतच अर्थपूर्ण जगण्याच्या शोधात असलेल्या युवांना भेटायला आम्ही उत्सुक आहोत!