अमृत बंग
युवांच्या बाबतीतली आपली समज वाढवणे आणि त्यांच्या सर्वागीण विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे ही येत्या दशकातली कळीची बाब ठरणार आहे! ‘चतु:सूत्र’मधले हे तिसरे सूत्र, युवक-विकासाचा सैद्धान्तिक दृष्टिकोनही मांडणारे..
‘भारत हा युवांचा देश आहे’ हे वाक्य आता वापरून वापरून गुळगुळीत झाले आहे. पण ‘युवा’ म्हणजे नेमके कोण याची कोणतीही सर्वमान्य व्याख्या नाही. ‘युवा’ या संज्ञेखाली अनेक वयोगट खपून जातात. संयुक्त राष्ट्रे असोत वा भारत सरकार, वय वर्षे १३ ते ३५ दरम्यानचे अनेक कालखंड (१३ ते ३५, १५ ते ३४, १५ ते २९, १८ ते २४, १८ ते २९ इत्यादी) हे युवावस्था म्हणून गृहीत धरले जातात, मात्र यावर अद्याप एकमत झालेले नाही. व्याख्याच निश्चित नसेल, तर भारतात नेमके युवा किती याच्या उत्तरातदेखील तफावत दिसणारच. काही तरी नेमकेपणा हवा म्हणून आमच्या ‘निर्माण’ या तरुणांसाठीच्या उपक्रमात आम्ही १८ ते २९ या वयोगटातील व्यक्तींना युवा म्हणून संबोधण्याचा निर्णय घेतला. (त्यामागची काही वैज्ञानिक व व्यावहारिक कारणे पुढे येतीलच.) या सदरासाठी आपण हीच व्याख्या कायम ठेवू या.
भारताची २२ टक्के लोकसंख्या १८ ते २९ या वयोगटातील आहे. म्हणजे एकूण २६ कोटी लोक! आवाका समजून घ्यायचा तर ही संख्या पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येहूनही अधिक आहे. या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाला (डेमोग्राफिक डिव्हिडन्ड) पाया समजून त्यावर मजबूत उभारणी करणे अत्यावश्यक आहे, कारण हा युवा वर्गच देशाचा चेहरा असणार आहे. देशाची ताकद आणि देशाचे भविष्यही असणार आहे. २०२१ साली भारताचे ‘मिडियन’ वय हे २८ वर्षे होते, म्हणजेच भारताची साधारण अर्धी लोकसंख्या ही २८ वर्षांपेक्षा कमी वयाची आणि उरलेली साधारण अर्धीअधिक वयाची होती. त्याच सुमारास चीनचे ‘मिडियन’ वय हे ३७, पश्चिम युरोपचे ४५ व जपानचे ४९ वर्षे होते. जगातील सर्वात तरुण देशांपैकी भारत हा एक आहे. पण सोबतच हे समजून घेणेदेखील गरजेचे आहे की, ही अमर्यादित काळासाठी उपलब्ध असलेली संधी नाही.
२०३१ साली भारताचे ‘मीडियन’ वय हे ३१ वर्षे होणार आहे आणि त्यापुढे ते अधिकाधिक वाढत जाणार आहे. आपण कोणीच आज जितके तरुण आहोत तितके भविष्यात नसणार, हे जसे आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत वैयक्तिकरीत्या खरे तसेच ते देशाच्या पातळीवरदेखील खरे आहे. म्हणूनच युवांच्या बाबतीतली आपली समज वाढवणे आणि त्यांच्या सकारात्मक वाढीला, कर्तृत्वाला खतपाणी घालणे ही येत्या दशकातली कळीची बाब ठरणार आहे. हे नीट साध्य करता यावे यासाठी युवावस्था म्हणजे नेमके काय, ती कशी उदयाला येते, तिची प्रमुख लक्षणे (फीचर्स) कोणती, त्यादरम्यानच्या प्रमुख समस्या काय याबाबत समाज म्हणून आपले आकलन विस्तारणे आवश्यक आहे.
जन्मल्यापासून पुढे माणसाची वाढ टप्प्याटप्प्याने कशी होते, याबाबत मानसशास्त्रात एरिक एरिक्सन यांची ‘लाइफस्पॅन थिअरी’ महत्त्वाची मानली जाते. बालपण ते प्रौढावस्था यांच्यामध्ये पौगंडावस्था (ॲडोलेसन्स) ही एक पायरी येते. जी. स्टॅन्ली हॉल हे पौगंडावस्थेच्या वैज्ञानिक अभ्यासाचे जनक मानले जातात. त्यांनी १९०४ साली या विषयावर दोन खंडांचे पुस्तक लिहिले. त्यानंतर हळूहळू ॲडोलेसन्स हा घरोघरी वापरला जाणारा शब्द झाला. (हॉल यांची इतर दोन वैशिष्टय़े म्हणजे ते मानसशास्त्राचे अमेरिकेतील पहिले पीएचडी आणि ‘अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन’चे संस्थापक!)
आपण आपले आजी-आजोबा, पणजोबा यांच्या पिढीच्या जीवनप्रवासाकडे नजर टाकली तर असे लक्षात येईल की, काही दशकांपूर्वीपर्यंत माणसे पौगंडावस्थेतून सरळ प्रौढावस्थेत पदार्पण करीत. उच्च शिक्षणाचे प्रमाण फारसे नसे व त्यासाठी फार वर्षेदेखील लागत नसत. लग्न व मूलबाळ लवकर होत असे. एकूणच प्रौढ जीवनाच्या जबाबदाऱ्या विशीतच स्वीकारल्या जात आणि माणसे कुटुंब व काम यामध्ये चटकन ‘सेटल’ होत असत. मात्र हळूहळू हे स्वरूप बदलू लागले आहे.
पौगंडावस्था व प्रौढतेमधील टप्पा
आता पौगंडावस्था ते प्रौढावस्था असे संक्रमण लगेच होत नाही. या प्रवासाला बराच कालावधी लागतो. उच्च शिक्षण घेण्याकडे कल वाढला असून आजकाल अनेक जण २७-२८ वर्षांचे (अनेकदा त्याच्याही पुढे) होईपर्यंत औपचारिक शिक्षण घेत असतात. लग्न होण्याचे वय वाढत चालले आहे आणि साहजिकच मुलेदेखील उशिरा होत आहेत. तरुण-तरुणी ‘सेटल’ होण्याआधी विविध पर्याय (कामाचे, जागेचे, जीवनशैलीचे, जोडीदाराचे) ‘एक्स्प्लोअर’ करू इच्छितात व त्यासाठी वेळ घेतात. ज्या १८ ते २९ वयोगटाला आपण युवा म्हणत आहोत, त्यातील अनेक जण हे आता पौगंडावस्थेत तर नाहीत, पण पूर्णत: प्रौढदेखील नाहीत अशा एका मधल्या अवस्थेत आहेत.
अमेरिकेतील क्लार्क विद्यापीठातील संशोधन प्राध्यापक जेफ्री आर्नेट यांनी २००० साली ‘अमेरिकन सायकॉलॉजिस्ट’ या प्रख्यात शोधपत्रिकेत लिहिलेल्या निबंधात या मधल्या अवस्थेचे विस्तृत वर्णन करून तिला ‘इमर्जिग अॅडल्टहूड’ असे नाव दिले आहे. एरिक्सन यांच्या ‘लाइफस्पॅन थिअरी’मधील पौगंडावस्था ते प्रौढावस्था यांच्या दरम्यानची अशी ही नवीन पायरी मानली जात आहे. आर्नेट यांचा हा शोधनिबंध एक मैलाचा दगड ठरला असून इमर्जिग ॲडल्टहूड हा एक गंभीर अभ्यासाचा विषय झाला आहे. या विषयाला पूर्णत: वाहून घेतलेले आणि दर दोन महिन्यांनी प्रकाशित होणारे ‘इमर्जिग ॲडल्टहूड’ याच नावाचे एक जर्नलदेखील आहे. त्यात जगभरातून आलेले शोधनिबंध असतात. जगातील सर्वात जास्त इमर्जिग ॲडल्ट्स ज्या देशात आहेत त्या भारतातून मात्र या विषयावर फारच कमी (जवळजवळ नाहीतच) शोधनिबंध प्रकाशित होतात.
भारतासाठी महत्त्वाच्या अशा आरोग्याच्या अनेक प्रश्नांवर (उदा. मलेरिया, क्षयरोग) जसे भारतीयांनी नाही तर पाश्चिमात्य वैज्ञानिकांनी संशोधन केले, तसे याबाबत होऊ द्यायचे नसेल तर आपल्या देशातील संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, विद्यापीठे, सामाजिक संस्था, आदींनी आपल्या-कडील या २६ कोटी इमर्जिग ॲडल्ट्सबाबत संशोधन करणे, त्यांना समजून घेणे व त्यांच्या सुयोग्य वाढीसाठी विविध उपक्रम राबविणे अत्यावश्यक आहे. बालमृत्यूचा प्रश्न पूर्णत: सुटला नसला, तरीही भारतासाठी ते आता तेवढे मोठे आव्हान उरलेले नाही. जगण्याची संधी मिळून आता युवावस्थेत पोहोचलेल्या कोटय़वधी तरुण- तरुणींना आपण कसे घडवतो, घडायला मदत करतो हा आता आपल्यापुढचा सर्वात कळीचा मुद्दा असणार आहे.
युवावस्थेतील महत्त्वाची लक्षणे कोणती, यूथ फ्लरिशिंग म्हणजे नेमके काय, युवकांना पडणारे मुख्य प्रश्न कोणते, ‘पर्पज’ ही संकल्पना नक्की काय व युवांसाठी त्याचे महत्त्व काय, करिअरची निवड, मूल्यव्यवस्था, आर्थिक गरजा व आकांक्षा, भावनांविषयी जागरूकता व व्यक्त होता येणे, युवा व व्यसने, युवांची सामाजिक जबाबदारी व कृतिशीलता, इ. अनेक विषयांवर या सदरातील पुढील लेखांत आपण टप्प्याटप्प्याने विचार करणार आहोत. यातील माहितीचा उपयोग युवकांना समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या विकासात योगदान देण्यासाठी करणार आहोत.
१८ ते २९ वयोगट – युवा/ यूथ / इमर्जिग ॲडल्ट्स
लेखक ‘निर्माण’ युवा उपक्रमाचे प्रमुख आणि‘सर्च’ या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत.
amrutabang@gmail.com