श्रीरंजन आवटे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नियतीशी करार करून ७५ वर्षांपूर्वी ज्या देशाने स्वातंत्र्य मिळवलं, तो देशच आता पूर्णपणे बदलला आहे, मिस्टर नेहरू.. त्याला कारणीभूत तुम्हीच आहात.. त्यामुळे ईडी, सीबीआय तुम्हाला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात..

प्रिय जवाहरलाल नेहरू, कसे आहात? सब खैरियत? साहिर लुधियानवीने सांगून ठेवलं आहे ना- ‘जिस्म की मौत कोई मौत नहीं होती / जिस्म मिट जाने से इन्सान नहीं मर जाते.’ तुम्ही जिवंत आहात. तुमच्याविषयी इतके गैरसमज पसरले आहेत की तुमचा मृत्यू झाल्याची अफवा पसरणं यात मला बिलकूल आश्चर्य वाटत नाही.

खरं तर तुम्ही असे पंतप्रधान होता की ज्यांच्याशी असा पत्रसंवाद होऊ शकत होता. आता तुमच्यासोबत भेट होणं तर शक्य नाही. मग किमान पत्रातून तरी भेट होईल, असं वाटलं. पत्र ही अर्धी भेट! शिवाय तुमची लाडकी गोष्ट. त्यामुळे आज हा पत्रप्रपंच.

तर सांगायचं म्हणजे, नुकताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. आम्ही निवडून दिलेल्या सरकारने मोठा जल्लोष साजरा केला. स्वातंत्र्योत्सव कसा साजरा करायचा, याचे आदेश त्यांनी आम्हाला दिले. वर्तमानपत्रात पानभर जाहिराती आल्या. स्वातंत्र्याची मस्त जाहिरात झाली. बापूजी, सरदार, बाबासाहेब, सुभाषबाबू असे सर्वाचे फोटो एका रांगेत होते. फक्त नव्हता तुम्ही. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना?

तुम्ही आलाच या नव्या भारतात तर गोंधळून जाल. बरीच वर्षे शहरात राहिलेला माणूस जेव्हा आपल्याच गावात जातो तेव्हा एखाद्या अनोळखी व्यक्तीसारखी त्याची अवस्था होते. ओळखीची कोणतीच खूणगाठ सापडत नाही. एकदम चुकीच्या पत्त्यावर आल्यासारखं वाटून तो भांबावून जातो. या नव्या भारतात तुम्हीही असेच भांबावून जाल.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना तुमची प्रकर्षांनं आठवण झाली. अर्थातच स्वातंत्र्याच्या उंबरठय़ावर, रात्रीच्या गर्भात शिरून उष:कालाला आर्त हाक देणारं तुमचं भाषण माझ्या डोळय़ासमोर आलं. कित्येक वर्षांपूर्वी आपण नियतीशी करार केला होता. त्या कराराला अर्थ देण्याची वेळ आली आहे. घडय़ाळात मध्यरात्रीचे ठोके पडत असताना, सारं जग झोपलेलं असताना भारत नव्या पहाटेच्या किनाऱ्यावर जागा होतो आहे. तुमच्या भाषणातली ही वाक्यं ऐकतानाही अंगावर रोमांच उभे राहात, नेहरू.

या उत्सवाच्या प्रसंगीही तुम्हाला किती नेमकं भान होतं, याचं मला विशेष वाटतं. तुम्ही म्हणालात, एक पर्व संपलं आहे आणि खूप काळ शोषित असलेल्या आपल्या देशाला ‘आवाज’ मिळाला आहे. भारताच्या अव्याहत शोधयात्रेचा हा प्रारंभबिंदू आहे. सत्ता आणि स्वातंत्र्यासोबत आपल्यावर आता जबाबदारी आली आहे.

शेवटच्या माणसाच्या डोळय़ातला शेवटचा अश्रू पुसण्याचं आव्हान तुम्ही सांगितलं आणि वाटलं की १५ ऑगस्ट १९४७ ला लाल किल्ल्यावर पडलेले स्वातंत्र्याचे सूर्यकिरण झोपडी-झोपडीपर्यंत पोहोचवण्याचं स्वप्नच तुम्ही तळहातात दिलं. गांधीजींचा ‘अंत्योदय’ प्रकल्प याहून वेगळा काय होता ! नेहरू, अरुण कोलटकर यांची ‘शेवटचा अश्रू’ आणि नामदेव ढसाळ यांची ‘माण्सानं’ या दोन्ही कविता अशीच प्रार्थना करतात जी आमच्या संत ज्ञानोबा माऊलींनी पसायदानात केली होती. तुम्ही भारतासाठीचं पसायदान मागितलं. भीतीशून्य मनानं आणि उंच, उजळ माथ्यानं राहता येईल असा गुरुदेव रवींद्रनाथांनी कल्पिलेला भारत तुम्ही सांगत होता.

तुम्ही हे सांगताना गांधीजी नौखालीतील हिंसा शमावी म्हणून जिवाचं रान करत होते. देश दुभंगला होता. रस्ते बेचिराख झाले होते. माणसं आतून तुटली होती. अशा उद्ध्वस्त, चिरफाळलेल्या भवतालात तुम्ही ड्रायिवग सीटवर बसला होतात. दु:ख, दारिद्रय़, विषमता, धर्माधता, निरक्षरता, कुपोषण अशा प्रचंड खाईत असतानाही, सर्वाच्या आशा तुमच्यापाशी येऊन एकवटल्या होत्या.

अशा वेळी ‘ढाई आखर प्रेम के’ म्हणणाऱ्या कबिराला तुम्ही साद दिली. दारिदय़्र, विषमतेत गाडं अडकलेल्या रथाला लोकशाही समाजवादाची दिशा दिली. अगदी पहिली घटनादुरुस्ती जमीन सुधारणेची असावी, हेदेखील किती प्रतीकात्मक! निरक्षरतेने ग्रासलेल्या देशासाठी उच्च शिक्षण संस्थांची पायाभरणी केली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साथीने, विवेकाच्या जोडीने, सम्यक वापराने तुम्ही विकासाची वाट प्रशस्त केली.

भारतासारख्या खंडप्राय देशाच्या शेकडो समस्यांचं शिवधनुष्य पेलत सुरुवात तर छान झाली; पण आज स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करताना तुमचा विश्वास बसणार नाही, इतकं चित्र बदललं आहे. स्वातंत्र्य फ्रॅक्चर झालं आहे. बलात्कारी लोक ‘संस्कारी’ ठरताहेत, ‘तडीपार’ ठरलेले लोक मंत्री होताहेत, दिवसाढवळय़ा शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली जाते आहे आणि आरोपपत्र दाखल न होता तुरुंगात असलेल्या ८२ वर्षांच्या म्हाताऱ्याला पाणी पिण्याकरता स्ट्रॉ हवा म्हणून न्यायालयात धाव घ्यावी लागते आहे आणि तडफडत तुरुंगातच प्राण सोडावा लागत आहे. धर्माधतेचा क्रोनिक आजार बळावत चाललाय. आता कोणत्या डॉक्टरला केस हिस्ट्री सांगायची या देशाची? किती आणि काय काय सांगू, नेहरू तुम्हाला!

नेहरू, मला गाणं आठवतं- ‘आयना मुझसे मेरी पहली सी सुरत मांगे’. आता अवघ्या देशाचा चेहरामोहरा इतका बदलला आहे की आरशासमोर उभं राहून भारतालाही आपलं मूळ रूप शोधावं लागेल. मूळ रूप शोधायचं म्हटल्यावर मला तुमची पुन्हा आठवण झाली. ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ आणि ‘ग्लिम्प्सेस ऑफ़ वर्ल्ड हिस्ट्री’ या दोन्ही पुस्तकांच्या साथीने पुन्हा या शोधयात्रेला आरंभ करायला हवा. जगणं समजून घेण्याची ही प्रक्रिया सुरू असली म्हणजे ‘नेशन इन मेकिंग’चा अन्वयार्थ आकळत जातो. तुमच्याकडून हे शिकत आलो आहे मी.

तुमच्या मृत्युपत्रात कोणत्याच धार्मिक विधींचा उल्लेख नाही. माझी राख गंगेत, हिमालयात आणि विमानातून खुल्या हवेत सोडून द्यावी, जी मिसळेल इथल्या मातीत आणि राबणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतातल्या पिकातून डोलत राहील, अशी इच्छा तुम्ही व्यक्त केलीत. किती काव्यात्म आणि आध्यात्मिक! आणि शेवटच्या प्रवासात रॉबर्ट फ्रॉस्टच्या ओळी निबिड अरण्यातून वचनपूर्तीच्या दिशेने धावू लागल्या. जास्तच सेंटी झालो का नेहरू?

गंमत बघा, साहिरपासून ते कैफी आजमीपर्यंत अनेक उर्दू कवींना क्रूस वाहून नेणारा ख्रिस्त तुमच्यामध्ये दिसला तर किलगाच्या रक्तपातानंतर अंतर्यामी परिवर्तन झालेला बौद्ध वाटेवरून जाणारा सम्राट अशोक तुम्हाला जवळचा वाटला. अली सरदार जाफरीला तर तुम्ही ‘वसंताचे प्रेषित’ वाटलात. प्रेषित म्हटलं की पैगंबर समोर येतो. तुमच्या आठवणीने प्रतिमांनी माझ्याभोवती फेर धरला आहे. धर्म, परंपरा, अध्यात्म, विज्ञान आणि तंत्रज्ञान या सगळय़ा वाटेवर तुम्ही किती कसरत करत चालत राहिलात! म्हणून तर तुम्ही गेलात तेव्हा कोण कुठला नारायण गंगाराम सुर्वे नावाचा फाटका माणूस उजेड घेऊन जाणाऱ्या हातगाडीवाल्याला म्हणाला, आता कशाला उजेड वाहतोस, पुढं काळोख दात विचकत असेल!

..आणि आज काळोख दात विचकत असल्यामुळेच तुम्हाला पत्र लिहितो आहे, डिअर नेहरू. तुम्हाला पत्र लिहायचं कारण हेच आहे की या साऱ्या दुर्दशेला तुम्हीच तर जबाबदार आहात. त्यामुळेच भर गर्दीत वाट चुकलेल्या, हरवलेल्या लहानग्यासारखे आम्ही भांबावून गेलो आहोत.

मुळात खरं सांगायचं तर तुम्ही या देशाला जे दिलं आहे, त्याचा बिलकूल हिशेबच लागत नाहीये, नेहरू. या बेहिशेबी योगदानाबद्दल तुम्हाला ईडी, सीबीआय कधीही अटक करू शकते. किंबहुना करायलाच पाहिजे. फाळणी असो की काश्मीर प्रश्न, आर्थिक विकास असो की धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा, हिंदूवरचा अन्याय असेल वा ईशान्य भारताची स्थिती सगळय़ा गोष्टींचं पातक तुमच्या माथी आहे. ज्यांच्या टोपलीत कोरभर भाकर नाही त्यांना कवितेची आणि आकाशात झेप घ्यायची भव्यदिव्य स्वप्नं दाखवणं हा गुन्हा नाही तर काय! नेहरू, प्लीज कैफियत मांडू नका. तुमची कैफियत ऐकण्यात आम्हाला रस नाही. बुलेट ट्रेनच्या वेगानं विकास सुरू असताना शांतपणे ऐकायला, समजून घ्यायला वेळ नाही आमच्याकडं. कृपया, गुन्हे कबूल करा.

डिअर नेहरू, यू आर अंडर अरेस्ट! हे स्वातंत्र्य मिळावं म्हणून नऊ वर्षे तुम्ही तुरुंगात काढलीत. आता त्या स्वातंत्र्यावर पुन्हा दावा करायचा तर तुम्हाला पुन्हा कारावास सोसावा लागेल, नेहरू. कधीही तुम्हाला अटक होऊ शकते. मी आपुलकीच्या, जिव्हाळय़ाच्या नात्यानं तुम्हाला पूर्वसूचना देतोय. तुम्ही फरार होणार नाही, याची खात्री आहे मला. रणांगणात आव्हान देत तुम्ही पुन्हा नियतीच्या कराराच्या गोष्टी सांगाल, हे पक्कं ठाऊक़ आहे मला. फक्त या कारावासाच्या वेळी मीही तुमच्यासोबत असेन, या खात्रीसह,

तुमचा विश्वासू, श्रीरंजन आवटे

(सूत्र समाप्त)