गांधीवाद
तारक काटे
‘नयी तालीम’च्या नंतरचे प्रयोग आजही सुरू आहेत, ते कोणते?
गांधीजींचे ‘नयी तालीम’विषयक विचार स्पष्ट होते. त्या काळातील ग्रामीण भागात सार्वत्रिकपणे दिसणारे दारिद्रय़, अज्ञान, अस्वच्छता, बेरोजगारी यांसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी श्रममूल्य जपणारी, प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञानप्राप्ती करणारी, समाजातील सर्व घटकांप्रति सद्भाव जपणारी, स्वतंत्रपणे विचार करणारी निर्भय पिढी घडावी हा त्यांच्या ‘नयी तालीम’ या शिक्षण पद्धतीचा उद्देश होता. अशा रीतीने तयार झालेल्या या नव्या पिढीने ग्रामीण भागात काम करून तिथे आवश्यक ते परिवर्तन करण्यासाठी स्वत:ला झोकून द्यावे आणि नवा भारत घडवावा हे त्यांचे स्वप्न होते. गांधीजींच्या या शिक्षण संकल्पनेत बहुजनांच्या श्रममूलक ज्ञानाची सांगड औपचारिक बौद्धिक ज्ञानाशी घातली गेली होती. त्यामुळे या शिक्षणव्यवस्थेला व्यावसायिक शिक्षणाची जोड देणे हा अनिवार्य भाग होता. गांधीजी स्वत: कुठल्याही विपरीत परिस्थितीसमोर हार न मानणारे एक निर्भय व्यक्तिमत्त्व होते आणि हे त्यांनी स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात उभारलेल्या विविध लोकलढय़ांमधून दिसून येते. अिहसेचा आधार घेऊनही इंग्रजांच्या निर्मम सत्तेपुढे निर्भयपणे उभे राहण्यासाठी त्या काळात त्यांनी जनसामान्यांना प्रेरणा दिली आणि सामान्य जनतेनेही त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे शिक्षणातून हे गुण विद्यार्थ्यांमध्येही सहजरीत्या झिरपावेत ही त्यांची अपेक्षा समजून घेता येते. स्वातंत्र्यानंतरच्या काळात नवा समाज घडविण्यासाठी पुढील पिढीकडून काय अपेक्षा असाव्यात याविषयी त्यांचे विचारदेखील अगदी स्पष्ट होते.
स्वातंत्र्योत्तर काळात अशा पर्यायी शिक्षण पद्धतीच्या प्रसारास वाहून घेण्याचे जरी गांधीजींचे स्वप्न होते तरी त्यांच्या अकाली हत्येमुळे ते अपूर्णच राहिले. शासनाने ‘नयी तालीम’चा प्रसार होण्यासंदर्भात काही प्रयत्न केले तरी तेही अनेक कारणांनी सोडून द्यावे लागले. गरिबांना वाटले की या पद्धतीमुळे त्यांच्या मुलांना प्रचलित शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे तर अभिजन वर्गाला त्यांच्या मुलांनी श्रममूलक शिक्षण घ्यावे यात रुची नव्हती. त्यासोबतच अशा शिक्षणासाठी वेगळय़ा प्रकारची क्षमता असणारे जे ध्येयवादी शिक्षक लागतात त्यांचीही उणीव होती. त्यामुळे हा प्रयोग एक प्रकारे फसलाच. पण तरीही गुजरातमध्ये काही प्रमाणात अशा प्रकारचे शिक्षण ‘गांधी विद्यापीठा’च्या अंतर्गत गांधीवादी संस्थांनी चालविलेल्या ग्रामीण भागातील बऱ्याच शाळांमध्ये सुरू होते; आता मात्र अशा फारच थोडय़ा शाळा उरल्या आहेत.
असे असले तरीही देशातील आजच्या संदर्भातील आव्हाने विचारात घेऊन गांधीजींच्या शिक्षण विचाराशी जवळीक साधणाऱ्या पर्यायी शिक्षणाचे प्रयोग महाराष्ट्रात आणि देशात इतरत्रही सुरू आहेत. अशा काही शिक्षण प्रयोगांचा आपण इथे विचार करू.
स्वातंत्र्यानंतर सेवाग्राम आश्रम परिसरात ‘नयी तालीम’चे कार्य पुढे नेण्याचे काम डॉ. एडवर्ड व आशादेवी आर्यनायकम या दाम्पत्याने बरीच वर्षे केले. मात्र पालकांचा योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ते बंद पडले. २००४ साली आशादेवी आर्यनायकम यांची जन्मशताब्दी साजरी करण्याच्या निमित्ताने अशा संस्थांच्या प्रतिनिधींची सेवाग्राम आश्रमात बैठक झाली. त्यात ‘नयी तालीम’चे कार्य पुन्हा पुढे नेण्याचे ठरले. त्यानुसार २००५ साली सेवाग्राम आश्रम परिसरात ‘आनंद निकेतन’ या नावाने गांधीजींच्या संकल्पनेवर आधारित परंतु आताच्या काळातील आव्हानांचा विचारात घेऊन काम करणारी शाळा सुरू झाली. व्यक्तीमधील सर्वोत्तम गुणांचा विकास आणि अिहसा व न्याय यांवर आधारित समाजाची स्थापना हे शाळेचे ध्येय ठरले. यासोबतच मुलांमध्ये मन, बुद्धी व शरीराचा एकात्म विकास, सांविधानिक मूल्यांची जपणूक, स्नेहमय मानवी नातेसंबंध आणि पर्यावरणाविषयी जागरूकता या गुणांचा विकास व्हावा हे ध्येयधोरण ठरले. यासाठी योग्य शिक्षकांची निवड, त्यांचे आवश्यक ते प्रबोधन आणि जडणघडण ही आवश्यक बाब होती. ती स्थानिक पातळीवरील शिक्षकांच्या निवडीतून आणि त्यांच्या योग्य त्या तयारीतून पूर्ण करण्यात आली. शाळेचे माध्यम मातृभाषा, म्हणजे येथे मराठी, असे ठरले. या शाळेत मुलांना शारीरिक श्रम आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देण्यावर भर आहे. यासाठी जे विविध उपक्रम राबविले जातात त्यात बागकाम, शेतीकाम, वस्त्रकाम, काही उद्योग यांचा अंतर्भाव आहे. स्वयंपाकघरात पाककलेचाही अनुभव मुलांना दिला जातो. शाळेची स्वच्छता मुले व शिक्षक मिळून करतात. यातून स्वावलंबनाचे धडे मिळतातच शिवाय या प्रत्येक अभिक्रमात अंतर्भूत असलेले विज्ञान, इतिहास, भूगोल इत्यादींविषयीची माहितीही मुलांना दिली जाते. या शिक्षणात कलेचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यामुळे मुले चित्रकला, हस्तकला व संगीत यातही रमतात. मुलांना प्रयोगशाळेत प्रत्यक्ष केलेल्या प्रयोगांमधून तसेच परिसर भ्रमणातून शिक्षणाची व्यापक संधी मिळते. या बालकेंद्री शिक्षणात स्वयंप्रेरित होऊन अभ्यास करण्यास प्रोत्साहन दिले जाते. त्यासाठी येथील ग्रंथालयाचा उपयोग केला जातो. शिवाय मुलांचे सामाजिक भान जागृत राहावे यासाठी विविध सामाजिक प्रश्नांवरील चर्चा घडवून आणली जाते व त्यांत त्यांची स्वत:ची मते मांडली जावीत याला प्राधान्य दिले जाते. अशा प्रकारच्या शिक्षणातून सभोवतालच्या प्रश्नांचे सूक्ष्म आकलन करण्याची सवय मुलांना लागते. या शाळेत येणारी ८० टक्के मुले गरीब कुटुंबातील, १५ टक्के मुले निम्नमध्यमवर्गीय कुटुंबातील तर ५ टक्के मध्यमवर्गीय कुटुंबांतून आलेली असतात. येथे शिक्षण घेणाऱ्या मुलांचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे आणि तो जागवण्यामागील शिक्षकांची भूमिका अतिशय मोलाची आहे.
यासारख्या इतरही शाळा महाराष्ट्रात आहेत. उदा.- पुण्याची अक्षरनंदन, नाशिकची आनंदनिकेतन आणि कोल्हापूरचे सृजनानंद विद्यालय. या शाळा सामाजिकदृष्टय़ा जागरूक असलेल्या पालकांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या आहेत. यातील काही पालक प्रत्यक्ष सामाजिक काम करणारे होते तर इतरांना आपली मुले सृजनात्मकदृष्टय़ा सक्षम व्हावीत असे वाटणारे होते. मातृभाषेतूनच शिक्षण मिळावे असा त्यांचा आग्रह होता. या सगळय़ा शाळांच्या व्यवस्थापनामध्ये पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. या शाळांमधून मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातात. शिकणे अर्थपूर्ण होण्यासाठी नवीनतेचा ध्यास महत्त्वाचा मानला जातो. त्यासाठी एखाद्या विषयातील बाहेरील तज्ज्ञाला बोलावून त्याच्या ज्ञानाचा व कौशल्याचा लाभ मुलांना मिळेल यासाठीही प्रयत्न केले जातात. या शाळांमधील व्यवस्थापन योग्य बदलांसाठी सदैव तयार असल्यामुळे शाळेत खुलेपणाचे वातावरण असते. मुख्य म्हणजे या शाळा मुलांना पुढील काळातील जबाबदार नागरिक बनविण्याचे उद्दिष्ट ठेवतात. त्यामुळे संविधानात्मक मूल्ये (समता, बंधुता, न्याय), सर्वधर्मसमभाव, लोकशाही, हक्कांसोबत कर्तव्यपालन, पर्यावरण जागरूकता या गुणांची मुलांमध्ये शालेय जीवनातच मशागत करण्याचे काम केले जाते. या शाळा शहरी भागातील असल्या आणि त्यात मुख्यत्वे मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांची मुले जात असली तरी यात गरीब आणि तळच्या वर्गातील मुलांना प्रवेश देण्यासाठीही विशेष प्रयत्न होतात. त्यासाठी अशा मुलांचे शालेय शुल्कसुद्धा इतर काही पालकच भरतात. मुलांना तळच्या वर्गाला जोडून घेण्यासाठी काही उपक्रमदेखील या शाळांद्वारे राबविले जातात. कोविडच्या काळात काही ओढग्रस्त गरीब कुटुंबांना मदत करण्याचे काम या शाळांनी केले आहे.
वरील सर्व शाळांमध्ये शिक्षकांचे उत्तम टीमवर्क आहे आहे आणि त्यांना शाळेच्या ध्येयधोरणाशी सुसंगत राहून आपल्या पद्धतीने काम करण्याची मोकळीक आहे. शिक्षण आनंददायी होणे व त्यासाठी सतत प्रयत्न करणे हा या शिक्षकांचा ध्यास आहे. त्यामुळे राज्य सरकारची शिक्षणविषयक चौकट स्वीकारूनही तीत आपल्याला अभिप्रेत असलेले शिक्षण गुंफणे हा येथील शिक्षकांचा प्रयत्न असतो. या कारणाने खूप मागणी असूनही संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीवर या शाळांचा भर आहे. या सर्व आणि यासारख्या इतरही शाळा आपसात संपर्क ठवून असतात व त्यातील शिक्षक आपले अनुभव, राबविलेले यशस्वी उपक्रम, त्यात आलेल्या अडचणी याविषयी आपसात चर्चा करून कामाची पुढील दिशा ठरवितात. या सर्व शाळा स्वयंअर्थसाहाय्यित आहेत. त्यांचे काम वैयक्तिक अथवा संस्थांच्या देणग्यांवर चालते. काही ठिकाणी पालकांचाही देणग्यांमध्ये सहभाग असतो.
याशिवाय नर्मदा बचाव आंदोलनाने प्रेरित ‘जीवन शाळा’ विस्थापित आदिवासींमध्ये शिक्षण प्रसाराचे जे काम करीत आहे ते अतिशय मोलाचे आहे. प्रसंगी बाहेरील साधन-व्यक्ती तिथे येऊन शिकविण्यास मदत करीत असल्या तरी मुख्यत: स्थानिक आदिवासी शिक्षकांच्या आधारेच अतिशय बिकट परिस्थितीत स्थानिक मुलांना त्यांच्या भाषेत शिक्षण देण्याचे कार्य चालते. त्या शिक्षणामध्येही स्थानिक कौशल्ये विकसित होण्यासोबतच वर उल्लेख केलेल्या लोकशाही व सांविधानिक मूल्यांच्या रुजवातीवर भर असतो. अशाच प्रकारे महाराष्ट्राच्या इतरही भागांत अगदी बिकट परिस्थितीशी झुंजणाऱ्या समाजगटांत शिक्षणाचे नाते जीवनाशी जोडण्याचे काम अनेक तरुण करीत आहेत.
एक महत्त्वाचे म्हणजे आजच्या चंगळवादी आणि आत्मकेंद्रित संस्कृतीतील फोलपणा जाणून मनाला आनंद देणाऱ्या कामासाठी जीवनाची वेगळी वाट धरणारे काही उच्चशिक्षित तरुण गांधीजींचे विचार समजून घेत त्या प्रकाशात आपल्या जीवनाची वेगळी वाट चोखाळताहेत. अशा तरुणांमुळे आजच्या संदर्भातील प्रश्नांना भिडणारे शालेय शिक्षणाचे नवे प्रयोग देशभर होताहेत ही बाब आशादायीच आहे.