हिनाकौसर खान

अन्नदान केलं किंवा मदरसे-मशिदींना पैसे दिले तरच आपल्या जकातचे पैसे सत्कारणी लागतात अशा विचारातून मुस्लीम समाजाला बाहेर पडावं लागेल.

Senior advocate Iqbal Chagla passes away
अन्वयार्थ : गोड बोलण्यापेक्षा, न्यायाचे बोला!
dr ambedkar visited rss shakha opposed to buddhist councils organised by sangh parivar
पहिली बाजू : डॉ. आंबेडकरांची संघ शाखा भेट…
ulta chashma
उलटा चष्मा : शीर्षस्थांना खूश करण्याच्या नादात…
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : सत्ताधाऱ्यांच्या लांगूलचालनाचे उदाहरण
tarkteerth lakshmanshastri joshi expressed views on marriage age of girls
तर्कतीर्थ विचार : कन्या विवाह वय विचार
selection process for next chief election commissioner
अन्वयार्थ : सरकारी खातेच जणू…
bjp deciding direction of campaign for the delhi assembly elections
लाल किल्ला : दिल्ली निवडणुकीची सूत्रे भाजपच्या हाती?
readers feedback on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : उत्तर निसर्गकेंद्री विकासाचे…
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…

एका कार्यक्रमात मुलाखतीसाठी बोलावलं होतं. मुलाखतकर्ते मुस्लीम मुलींच्या शिक्षणाची स्थिती विचारत होते. ‘शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात मुली येनकेनप्रकारेण येत आहेत आणि पूर्वीपेक्षा चित्र बरचंसं बदललं आहे,’ यावर त्यांचं समाधान झालं नाही. ते वेगवेगळय़ा तऱ्हेनं तोच प्रश्न विचारत राहिले. ‘मग तिचं कुटुंबातलं स्थान बदललं का? ती पूर्वीपेक्षा अधिक स्वतंत्र झाली का? शिक्षणाने शहाणपण आलंय का?’ इत्यादी. त्या प्रश्नांचं सामान्य आणि सरळ रेषीय उत्तर ‘हो’ असं होतं. कोणतीही परिस्थिती सूक्ष्म स्तरावर, धिम्या गतीनं का होईना, पण बदलतच असते. पुन्हा; याच प्रश्नांची व्यक्तिसापेक्ष उत्तरं भिन्नच असणार. आणि म्हटलं तर आपल्या पितृसत्ताक व्यवस्थेत तिचं स्थान मोठय़ा प्रमाणात बदललेलं नाही, ती स्वतंत्रसुद्धा आखून दिलेल्या चौकटीत आहे. आणि शिक्षणानं शहाणपण येतंच असंही नाही. थोडक्यात उत्तर जटिल होतं. इकडे प्रश्नकर्ते ‘नाही, पण म्हणजे कसं..’ अशा टोनमध्ये तेच ते प्रश्न विचारू पाहत होते. मनात आलं, ‘इज ही जजिंग?’ की त्यांना हवं आहे तेच उत्तर ऐकायचंय त्यांना? म्हणून हे प्रश्नांचं एवढं वेटोळं?

मी अंतर्मुख झाले. भारतीय समाजघडणीत एकमेकांना जोखणं, ‘जज’ करणं ही अत्यंत कॉमन गोष्ट आहे. चटकन समोरच्याची मापं काढायची आणि पटकन लेबलं लावायची हा आपला जुना पिंड आहे. बऱ्याचदा धर्म आणि जाती यावरूनही ती लावली जातात. पण सध्याच्या बदललेल्या, तणावाच्या परिस्थितीत ती नेमकी कशावरून लागतायेत याचा विचार करण्याची गरजच वाटली. एखाद्याविषयी मत तयार करताना धर्माचं स्कॅनर वापरलं जाणार असेल तर आमचा अमुकतमुक धर्म किती महान आहे असं निव्वळ ओरडून चालणार नाही. कुठलाच धर्म वा धर्मग्रंथ वाचून लोक त्या-त्या धर्माच्या लोकांविषयी मतं तयार करत नाहीत. उलट लोकांच्या वागणुकीवरून त्यांच्या धर्माविषयी समजुती-मतं तयार केली जातात. भारतातल्या मुस्लीम समाजाला तर जगभरातल्या मुस्लीम समाजाच्या अनुषंगाने तपासलं जातं. अशा स्थितीत स्वत:च्या धर्माचं आणि धर्मग्रंथांचं गुणगान करण्यापेक्षा त्यात दाखवलेला समता-संयम-अन् परोपकाराचा मार्ग स्वीकारला तर समाजाचा विकास अधिक वेगानं करता येईल. ही तत्त्वं इस्लामी जगण्याच्या मार्गात आढळतात.  मुस्लीम समाजात रमजान ईद आणि बकरी ईद हे दोन महत्त्वाचे सण आहेत. त्यांच्या निमित्ताने इस्लामने सामाजिक उत्तरदायित्वाची जाण देणाऱ्या दातृत्वाचा मार्ग दाखवला आहे. रमजानमध्ये प्रत्येक व्यक्तीमागे फितरा किंवा जकातच्या (कमाईच्या रकमेवर दान केले जाणारे पैसे) रूपात इतरांना आर्थिक मदत करण्याची परंपरा आहे. बकरी ईदमध्येदेखील कुर्बानीच्या मांसामध्ये एकतृतीयांश वाटय़ावर गरिबांचा हक्क मानलेला आहे.

जकात किंवा कुर्बानीमध्ये स्वत:चं कुटुंब आणि नातेवाईक यांच्यापलीकडे गरीब वंचितांचा विचार केला जातो. सामाजिक उन्नतीच्या या कृतिशीलतेकडे आपण आजच्या संदर्भातून पाहायला हवं. बहुतांश समस्यांवर उपाययोजना करण्याचे प्रयत्न पैशापाशी येऊन अडतात. त्याची तजवीज मुस्लीम समाजाच्या अंतर्गत उभी होऊ शकते. सध्या आपापल्या समजेनुसार जकातीचं विकेंद्रित वितरण होतं. पण त्या वितरणासह एक स्वतंत्र ‘जकात फंड’ निर्माण केला आणि वैयक्तिक जकातींपैकी काही हिस्सा त्यात जमा केला तर उपलब्ध निधीतून सामाजिक हिताचे निर्णय घेता येऊ शकतात. जकात फंड एकाच ठिकाणी गोळा व्हावा, असं गरजेचं नाही. लोकांनी आपापल्या गाव-शहरात तो गोळा केला तर, तो त्या-त्या भागासाठी वापरता येईल. त्यातून स्थानिक गरजेनुसार काही सोयी-सुविधा तर सहज उभ्या राहू शकतात. या पद्धतीने गरिबी, शिक्षण, रोजगार, आरोग्य असुविधा अशा विविध मूलभूत समस्यांनी ग्रस्त लोकांना मदतीचा हात देता येईल.

देशातल्या वंचित, गरीब, गरजूंसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वाची आहे. नागरिकांसाठी कल्याणकारी धोरणं आखण्याचं-राबवण्याचं काम नेतेमंडळी आणि नोकरशाहीने करणं अपेक्षित आहे. त्या पातळीवर हालचाल घडवण्यासाठी आपल्याला आपल्या मागण्यांचा आवाज बुलंद करावा लागेल. त्या जोडीनं समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर आपल्यालाही काही उपाय योजावे लागणार आहेत. रमजान महिन्यात श्रीमंत वर्ग खुल्या मनाने जकात देतो. त्यात प्रामुख्याने गरीब नातेवाईक, कर्जबाजारी नातेवाईक, गरजू परिचित, अनाथ आश्रम, मशिदी, मदरसे यांचा समावेश असतो. त्यातून गोरगरीब वा कर्जबाजारी नातेवाईक यांना मिळणारी मदत मोलाची ठरते. मात्र हा उपाय तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. तातडीच्या गरजेनुसार मदत होणं जसं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे गरजवंताला, त्याने इतरांना जकात द्यावी या तऱ्हेने सक्षम करणंही गरजेचं आहे. एकूणच जकातच्या रकमेकडे आणि तिच्या वापराकडे व्यापक सामाजिक दृष्टीनं पाहण्याची गरज आहे.

रमजान महिन्यात जकातच्या माध्यमातून होणारी लाखो रुपयांची उलाढाल समाजाच्या दीर्घकालीन विकासासाठी उपयोगात आणता येईल. मुस्लीम मुला-मुलींच्या शिक्षणावरून सतत खजील होत राहण्यापेक्षा परवडणारी शिक्षण व्यवस्था उभी करता येईल. चांगल्या शिक्षणसंस्था, चांगली ग्रंथालयं, अभ्यासासाठी कम्युनिटी हॉल्स, रोजगाराच्या संधी निर्माण करता येतील. बकाल वस्त्यांमध्ये दाटीवाटीने राहणाऱ्या आर्थिक दुर्बल लोकांसाठी परवडणारी घरं बांधणं, रोगराई, अस्वच्छतेविरुद्ध लोकमानस तयार करून सार्वजनिक यंत्रणा उभारणं, नव्या व्यवसायांसाठी आर्थिक साहाय्याच्या व्यवस्थांची निर्मिती, तरुणांमध्ये राजकीय जाणिवा निर्माण करणारी आणि त्यातून नेतृत्व उभी करणारी केंद्रं अशा अनेक पर्यायांचा विचार होऊ शकतो. नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीतून व्यक्ती आणि समूह यांचा विकास शक्य आहे.

समाजाच्या गरजांची पूर्तता करण्याचे मार्ग काळानुसार शोधले गेले पाहिजेत. अशा शोधमार्गावर एकटं-दुकटं चालून उपयोग नाही. तिथे समूहानं आणि एकजुटीनं उभं राहावं लागतं. तरच शाश्वत उपाययोजना राबवता येतात. लोकांना त्यांच्या पैशातून चांगलं काम उभं राहावं अशी इच्छा असते, मात्र त्यांना मदत करण्याजोग्या जागा माहीत नसतात. तशा जागांवर कृतिशील तरुण काम करू शकतात आणि समाजातल्या प्रश्न-उत्तरांमध्ये पूल सांधण्याचं काम करू शकतात. लातूरचं ‘माय फाऊंडेशन’ हे त्याचंच उदाहरण. ही संस्था रोजंदारीवर जगणाऱ्या तरुणांनी एकत्रित येऊन निर्माण केलीय. ते त्यांच्या कामातून वेळ काढून समाजाच्या आर्थिक-सामाजिक-राजकीय भूमिका सशक्त करण्यासाठी प्रयत्न करताहेत. मुंबईतली ‘परचम’ ही संस्था मुलींना फुटबॉल शिकवत त्यांच्यातील आत्मभान जागं करण्याचा प्रयत्न करते. पुण्यातील पैगंबर शेख हे ‘बकरी ईद’च्या निमित्तानं आर्थिक कुर्बानीचं आवाहन करतात. ते जमा होणाऱ्या मदतीतून शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य हवं असलेल्या तरुणांना मदत करतात. मुस्लीम वस्तीतल्या शाळांना आधार देतात. ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळ’ आणि ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ गेली कित्येक वर्षे बकरी ईदच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन करतात. ‘माय फाऊंडेशन’कडूनही पैगंबर जयंती आणि ईदच्या निमित्ताने रक्तदान शिबिरं घेण्यात येतात. पूर्वी रक्तदान करणं मुस्लीम समाजाला अयोग्य वाटे. सातत्यपूर्ण शिबिरांमुळे तो गैरसमज दूर झालाय.

अन्नदान केलं किंवा मदरसे-मशिदींना पैसे दिले तरच आपल्या जकातचे पैसे सत्कारणी लागतात असं लोकांना वाटतं. पण या प्रकारच्या विचारातून मुस्लीम समाजाला बाहेर पडावं लागेल. मदरसे आणि मशिदींसोबत ज्ञाननिर्मितीची आणि स्वावलंबनाची इतर केंद्रंदेखील निर्माण होणं आवश्यक आहे. इतिहासात होऊन गेलेले मुस्लीम राज्यकर्ते, तत्त्ववेत्ते, सुधारणावादी नेते, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या स्मरणार्थ अशी केंद्रं उभारता येऊ शकतात. त्यानिमित्ताने त्यांचा खरा-विस्मृतीत गेलेला इतिहासही समोर आणता येईल.

इस्लामच्या गाभ्यात अस्तित्वात असलेलं सर्वसमावेशक विकासाचं सामाजिक मूल्य खऱ्या अर्थानं स्वीकारलं, तर लोकांसाठी रीतसर आणि टिकाऊ योजना राबवता येतील. आर्थिक चणचणीत अडकलेल्या, संधीअभावी मागे पडलेल्या लोकांना त्याच समाजातून आर्थिक-मानसिक आधार मिळण्याची गरज आहे. सामूहिक पातळीवर प्रयत्न केले तर बदल घडतात. प्रयत्नांमध्ये सातत्य असेल तर अधिक काळासाठी त्यांचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. त्या प्रयत्नांना त्याच समाजातून दिशा मिळाली तर ही प्रक्रिया अधिक वेगाने घडते. आपल्याला धर्माचं स्कॅनर लावून कुणी ‘जज’ करणार असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी आपल्या समाजातला कृतिशील चांगुलपणा प्रतलावर ठेवूयात. तेच ते प्रश्न वेगवेगळय़ा प्रकारे विचारून आपल्याला केविलवाण्या अवस्थेतच पाहू इच्छिणाऱ्या लोकांची ‘नजर’ जरा साफ करूयात.

Story img Loader