हिनाकौसर खान

आपल्या देशातील अल्पसंख्याक समाजाला बहुसंख्याकांसोबत राहताना असुरक्षित वाटतं आणि बहुसंख्याक समाजाला अल्पसंख्याक समाजाची भीती वाटते. हे किती रोगट सामाजिक वातावरण आहे!

BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
Shortage of buses at Yeola and Lasalgaon depots Chhagan Bhujbal demands to action
येवला, लासलगाव आगारांना बसेसचा तुटवडा, कार्यवाही करण्याची छगन भुजबळ यांची मागणी
Citizen Centered Leave Protection Digital Personal Leave Protection Right to Privacy
‘विदा संरक्षण’ नवउद्यामींना मारक!
bjp membership registration campaign target to add 50 lakh new members in maharashtra
भाजप सदस्यनोंदणी ! ‘ हे ‘ आमदार अव्वल तर ‘ हे ‘ पिछाडीवर
Loksatta editorial on allegations on dhananjay munde in beed sarpanch santosh Deshmukh murder case
अग्रलेख: वाल्मीकींचे वाल्या!
Savitribai Phule Pune University rule challenged in High Court
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमाला उच्च न्यायालयात आव्हान

अलीकडे आलेला एक अनुभव. बहीण तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत रोड ट्रिपला चालली होती. प्रवास रात्रीचा होता. तिचे मित्रमैत्रीण तिला पिकअप करण्यासाठी गाडी घेऊन आमच्या मुस्लीम वस्तीत पोहोचले. रात्रीचे साडेअकरा वाजले होते. नेमकी त्याच वेळेस आमच्या सोसायटीच्या आवारात पुरुषांची गर्दी झाली. इतके सारे पांढरे कुर्ते आणि पांढऱ्या टोप्या पाहून त्या गाडीतला एक मित्र अनकम्फर्टेबल होऊ लागला. तो चिंताग्रस्त होत विचारू लागला की, ‘‘हे एवढे लोक या वेळेला जमून काय करतायत? हे रोज गोळा होतात का?’’ त्याच्या मनातल्या असंख्य शंका त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. कुठलीही गर्दी दिसल्यावर मनात प्रश्न उभं राहणं स्वाभाविक होतं. बहिणीने त्याला सोसायटीत एकाचा मृत्यू झाल्यामुळे गर्दी जमली असल्याची माहिती दिली. त्याचं त्या उत्तरानं समाधान झालं नाही. तो नाना चिंता व्यक्त करत राहिला. ‘‘मी जर एकटा त्यांच्या तावडीत सापडलो, तर ते मला मारतील का?’’ असा असंबद्ध प्रश्नही त्याने केला. तो त्या वेळेस मुस्लीम वस्तीतल्या गर्दीत स्वत:च्या तीनेक मित्रांसोबत होता. स्थिती पाहता तो त्या क्षणी अल्पसंख्याक होता आणि ती गोष्ट त्याला प्रचंड एकटेपणा देत होती.

अल्पसंख्याक व्यक्तीला लिंग, जात, धर्म, वर्ग किंवा वर्ण अशा कुठल्याही प्रकारच्या बहुसंख्याकांमध्ये काही काळापुरती भीती वाटणं, असुरक्षिततेची जाणीव होणं किंवा नुसतंच असहज होणं हे किंचित नैसर्गिक आहे. मात्र त्यांना दीर्घकाळ तसं वाटत असेल तर ती बहुसंख्य वर्गाची मानहानी ठरते. मात्र आपल्याकडे चित्रच उलटं आहे. जिथं ‘हिंदू खतरे में है’ असं म्हणत बहुसंख्याक हिंदू समाजालाच भयभीत आणि असुरक्षित असल्याची जाहीर वाच्यता करावी लागते, वाहनांवर ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असं स्वत:चं हिंदू असणं ठळक करून सांगावं लागतं, अशा आपल्या समाजात अल्पसंख्याकांची मानसिक अवस्था काय असेल? जिथं बहुसंख्याक समाज मोठय़ा संख्येत असूनही स्वत: घाबरलेला आहे, तिथं अल्पसंख्याक समाजाला भीती वाटणं ओघानं आलंच. घरात मोठय़ा भावंडाला बेचैन वाटत असेल, तर लहान भावंडालाही तेच जाणवणार. कारण घरातलं एकूण वातावरणच नॉर्मल नाहीये. अशा घरात आश्वस्त कसं वाटणार? आपल्या सामाजिक सहजीवनात परस्पर भरवसा आणि इमान घटत आहे का?

बऱ्याचदा फुटीरतावादी मंडळी ‘देशाची लोकसंख्या मुस्लिमांमुळे वाढत आहे. ते आपल्या देशाचं इस्लामी राष्ट्र करतील. याविरुद्ध आपण वेळीच जागं व्हायला पाहिजे.’ अशी हाक देत बहुसंख्याकांच्या भीतीत भर घालतात. आश्चर्य म्हणजे आपला देश ‘इस्लामी राष्ट्र’ होऊ नये म्हणून धडपडणाऱ्या मंडळींना देशाचं ‘हिंदूुराष्ट्र’ होणं चालणार आहे. (तसंही, ते आज या देशात असं काय करू शकत नाहीत, जे त्या ‘हिंदूुराष्ट्रात’ करणार आहेत?) स्वत:च्या वागण्यातील या विरोधाभासाची त्यांना ना जाणीव असते, ना अपराधगंड. किंबहुना; ही मंडळी स्वत:च्या अजेंडय़ासाठी सत्य दडवून खोटी आणि चुकीची माहिती संघटितपणे संक्रमित करतात.

आता हेच पाहा, बहुसंख्याकांच्या कुटुंबात दोन अपत्ये अन् मुस्लिमांच्या कुटुंबात आठ अपत्ये असा समज सर्रास दिसून येतो. मात्र ते मिथक आहे. निवडणूक आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. एस. वाय. कुरेशी यांनी त्यांच्या ‘पॉप्युलेशन मिथ’ या पुस्तकात मुस्लीम लोकसंख्येबद्दलच्या या धास्तीचा सखोल परामर्श घेतला आहे. त्यांनी या पुस्तकात गेल्या चार दशकांतील जनगणनेचा, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणांचा अभ्यास केला आहे. मुस्लीम आणि हिंदूंच्या अपत्यसंख्येतील फरक १९५१ मध्ये निव्वळ १.१ इतका होता आणि तोच फरक २०११ च्या जनगणनेनुसार ०.४८ इतका आहे. सोप्या पद्धतीने सांगायचं तर १९५१ मध्ये हिंदू कुटुंबात जर तीन मुलं असतील तर समकालीन मुस्लीम कुटुंबात चार अपत्ये असणार. आता तो फरक त्याहूनही निम्म्यावर आला आहे. अलीकडे मुस्लीम समुदायात कुटुंब नियोजनाच्या पद्धतींचा मोठय़ा प्रमाणात स्वीकार होत असल्याचा अभ्यासही पुस्तकात नमूद आहे. देशातील मुस्लिमांची लोकसंख्या १९५१ च्या जनगणनेनुसार ९.८ टक्के होती. ती २०११ ला १४.२ टक्के झाली. मुस्लिमांच्या लोकसंख्येत ४.२ टक्क्यांनी वाढ झालेली दिसत असली, तरी हा वेग गेल्या ६० वर्षांतील आहे, हेदेखील लक्षात घ्यायला हवं. ही संख्या मुस्लिमांना आजही अल्पसंख्याकच ठरवते. याचा अर्थ, देशाची लोकसंख्या केवळ मुस्लीम वाढवू शकत नाहीत. त्यात बहुसंख्याक समाजाचा मोठा वाटा आहे. मुस्लिमांची लोकसंख्या आणि तिच्या वाढीचा वेग पाहता या देशात पुढील १००० वर्ष तरी ते बहुसंख्याक होऊ शकणार नाहीत हे डॉ. कुरेशी यांनी त्यांच्या पुस्तकातील संख्याशास्त्रीय अभ्यासाने दाखवून दिलं आहे. या मांडणीवरून फुटीरतावाद्यांची भीती निराधार असल्याचं स्पष्ट होतं. खरं तर त्याची जाण त्यांना आहेच. मात्र ही माहिती दडवून किंवा अर्धवट सत्य सांगून सर्वसामान्य माणसांची दिशाभूल केली जाते. त्यांना एकमेकांविरुद्ध पेटवून त्यांची झुंज लावली जाते. अशा भयग्रस्त समाजातून काय निष्पन्न होणार?

बहुसंख्य समाज स्वत: घाबरलेला असला तरीही त्यांच्याकडून अत्यंत सहजपणे मुस्लिमांना वाटणाऱ्या भीतीची सतत टवाळकी केली जाते. ‘आपल्याला इथं वावरताना भय वाटतं, सतत विशिष्ट पद्धतीची काळजी बाळगून जगावं लागतं’ हा रोजचा अनुभव उघडपणे सांगण्याचा मोकळेपणादेखील मुस्लिमांना या समाजात मिळत नाही. तसं कुणी व्यक्त झालंच तर ‘मग जावं त्यांनी पाकिस्तानात’ असं म्हणून काही बहुसंख्याक मोकळे होतात. मात्र तसं म्हणताना आपण आपल्याच देशाचा अपमान करतोय ही साधी गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही. आपल्या देशबंधूला धर्मावरून अन्य देशात जाण्यास सागणं, हे सभ्य आणि सुसंस्कृत मुळीच नाही. जर उद्या हिंदू किंवा इतर समाजातील एखाद्या गटाला अशीच एखादी भीती वाटली तर त्यांना कोणत्या देशात जायचा सल्ला देणार? अशा भीतीवर आपण उपाययोजना करायला नको?

बहुतांश वेळा बहुसंख्याक कुटुंबांमधून त्यांच्या मुलांना ‘मुस्लीम एरियात जाल तर मार पडेल, कत्तली होतील,’ असं सांगत मुस्लीम वस्त्यांपासून दूर राहण्यास सांगितलं जातं. (मात्र, वास्तव काय आहे अन् कुणाच्या कत्तली होत आहेत हे जगजाहीर आहे.) मुस्लीम घरांमध्ये शस्त्रास्त्रे, तलवारी ठेवलेल्या असतात अशा कल्पना बहुसंख्याकांच्या मनात रुजवल्या जातात. पण आपण कधी शांत बसून विचार केलाय का, की सकाळी उठून नोकरी-धंद्यावर जाणारी, बाजारात घासाघीस करून भाजीपाला आणणारी ही तुमच्या-आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं घरात तलवारी ठेवत असतील का? आपल्या या अशा कल्पना योग्य आहेत की नाही, याचा धांडोळा घेण्याची आपल्याला गरज कधीच वाटलेली नाही. आपण सारे समाज म्हणून किती आळशी आहोत आणि याच आळशीपणामुळे आपण पुढय़ात येणारा सगळा विद्वेष किती सहज पचवत चाललोय, याची आपल्याला अजिबात जाणीव नाही.

पाच महिन्यांपूर्वी नालंदा जिल्ह्यातील बिहार शरीफ या गावात रामनवमीनिमित्त यात्रा निघाली. त्यात यात्रेतील जमाव आक्रमक झाला. मुस्लीम घरे आणि दुकानांना त्यांनी आग लावली. लाठय़ाकाठय़ांनी मुस्लिमांना मारहाण केली. एवढंच नव्हे तर, यात्रेसाठी ठरवलेल्या वाटेपासून दूर अंतरावर असणारा ११० वर्षे जुना मदरसा जाळला. तिथली साडेचार हजार पुस्तकं आगीत भस्म झाली. त्यात काही हस्तलिखितंदेखील होती. ऑगस्ट महिन्यात त्या गावी जाणं झालं. तिथं मदरशाचे मुख्याध्यापक मोहंमद शाकीर कासमी भेटले. ते सांगू लागले, ‘‘पूर्वी हिंदू समाजाच्या यात्रा निघत तेव्हा आमच्या समुदायातील लोक त्या यात्रा पाहायला रस्त्यावर येत. आनंदित होत. मोहरममध्ये ताजिया निघत, तेव्हा हिंदू लोक रस्त्यावर ताजिया पाहायला येत. त्यांनाही आनंद वाटे. काही वर्षांपूर्वीपर्यंत एकमेकांच्या सांस्कृतिक परिवेशाची जपणूक करणं ही किती सहज कृती होती.’’

कासमीसाहेब पुढे म्हणाले, ‘‘पण आता सगळं बदललंय. आता आम्ही त्यांचे सण-यात्रा असल्या की घरात निमूट बसतो, मोठाले कपडे टाकून मशिदी झाकतो. दक्षता म्हणून दुकानं बंद ठेवतो. भीती वाटते. कुठल्याही प्रकारचं निमित्त होऊन कुणी मारला गेला तर?’’ अशी दक्षतेच्या नावाखाली भीती दडवून ठेवण्याची नामुष्की देशात जागोजागी आहे. हे किती दुर्दैवी आहे!

आपल्या देशातील अल्पसंख्याक समाजाला बहुसंख्याकांसोबत राहताना असुरक्षित वाटतं आणि बहुसंख्याक समाजाला अल्पसंख्याक समाजाची भीती वाटते. हे किती रोगट सामाजिक वातावरण आहे! हिंदू आणि मुसलमानांना आपापसात मिसळताना परस्परांविषयी प्रेम आणि विश्वास वाटण्याऐवजी जर एकमेकांविषयी शंका आणि द्वेष वाटत असेल, तर आपण सर्वानी मिळून आपल्या समाजाचं मातेरं केलेलं आहे.

अशा स्थितीत आपलं सामाजिक सहजीवन कशाच्या आधारावर आहे आणि आपण कुठल्या सहिष्णुतेच्या गप्पा मारतोय हे खरंच समजून घेण्यासाठी ‘जागं’ होऊयात का? ‘आपण जागेच आहोत’ या निद्रिस्त विचारावस्थेतून बाहेरही पडूयात का?

Story img Loader