रवींद्र महाजन

गरिबी, विषमता, बेरोजगारी, पर्यावरण ऱ्हास, मानसिक तणाव, ढासळती कुटुंब व समाजव्यवस्था इत्यादी आजच्या जगाचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जीवनादर्श सुसंगत ठरू शकतो. त्या दिशेने प्रयत्न करण्याची गरज आहे.

chaturang article
स्थलांतरातून बहरलेली खाद्यसंस्कृती
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
ruhcir sharma
२०२५ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कशी असेल?
lokmanas
लोकमानस: उपभोग, गुंतवणूक, निर्यातीत वाढ आवश्यक
India GDP growth rate
भारताचा जीडीपी विकासदर मंदावण्याचा अंदाज चिंताजनक, पण धक्कादायक नाही! असे का?
Loksatta editorial on Goods and Services Tax GST Collection
अग्रलेख: अल्पात अडकणे अटळ?
recession in grains market recession still hangs over agricultural economy
क कमॉडिटीचा – कडधान्य मंदीच्या विळख्यात
state bank of india poverty rate
देशात अतिदारिद्र्याचे नाममात्र अस्तित्व, स्टेट बँक संशोधन टिपणाचा दावा

एकात्म मानव दर्शन मानवासंबंधी केवळ ‘आर्थिक मानव’ अशी एकांगी दृष्टी न ठेवता, जीवनाच्या सर्व पैलूंचा विचार करून समृद्ध, सुखी व कृतार्थ जीवनाच्या वाटचालीची दिशा दाखविते. शरीर, मन, बुद्धी व जीवात्मा यांनी युक्त असलेला; धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थाची साधना करणारा आणि एकाच वेळी कुटुंब, समाज, राष्ट्र, मानवजात आदी विविध एकात्म समष्टींचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता असलेला मानव हा या जीवनदर्शनाचा केंद्रबिंदू आहे. 

एकात्म मानव दर्शन या लेखमालेतील हा शेवटचा लेख आहे. तेव्हा काही प्रमुख मुद्दय़ांची उजळणी करणे योग्य होईल :

१- देशाला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या विकासाची वाटचाल समाजवाद किंवा साम्यवाद व भांडवलशाही यांच्या मिश्रित आधारावर पाश्चात्त्य विचारांप्रमाणे चालू झाली. आजही ती भांडवलशाहीकडे जास्त झुकत चालू आहे. म. गांधींचे विचार व सर्वोदय अशांना अपेक्षेप्रमाणे मध्यवर्ती महत्त्व मिळाले नाही.

२- भांडवलशाही साम्यवाद यांना पर्याय म्हणून १९६५ मध्ये पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी राष्ट्रव्यवहारासाठी एकात्म मानव दर्शन या राष्ट्रीय जीवनदर्शनाची मांडणी केली. हा केवळ त्यांचा स्वत:चा वा जनसंघाचा विचार नसून या देशातील चिंतनावर आधारित सनातन धर्माचा कालानुरूप आविष्कार आहे अशीच दीनदयाळजींची नम्र भूमिका होती. एकात्म मानव दर्शनावर राष्ट्रीय सहमती होऊ शकते, कारण तो अशाच गांधी व विनोबा विचार वा सर्वोदय या विचारांशी ढोबळमानाने सुसंगत आहे.

३- राष्ट्रजीवनाच्या विविध क्षेत्रांची रचना ही राष्ट्रीय सांस्कृतिक दृष्टीशी अनुरूपच असायला हवी. तसे नसेल तर त्याअभावी विकसित होणाऱ्या समाजजीवनातील कोणतीही व्यवस्था, रचना इ. आत्मविसंगत होऊन व्यक्तिसापेक्ष हेलकावे खाते व उपकारक होत नाही. शोषणमुक्त, न्याययुक्त, समरस समाजरचनेसाठी आग्रह हवा. कुटुंबसंस्था सुदृढ राहिली पाहिजे.

४- केवळ राजकीय, शासकीय सत्तेद्वारा समाजपरिवर्तन वा केवळ सुशासनातून सर्वागीण विकास होत नाही. प्राचीन परंपरेतील आंतरिक सत्त्व, आत्मश्रद्धेतून निर्माण होणारी जनचेतना व समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेतील समाजाची स्वयंप्रेरणा यांचा उपयोग करूनच सर्वहितकारी, न वाहवणारा, गतिशील, सर्वागीण, सर्वसमावेशक विकास होईल.

५- वंचितांच्या सक्षमीकरणाचा विचार प्राधान्याने झाला पाहिजे. म्हणून अंत्योदयास प्राधान्य देऊन सुविधा व संधी मिळतील यांच्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.

६- राष्ट्रव्यवहारात धर्मोपासना, शिक्षण, उद्योग, व्यापार, कला अशा प्रत्येक समाजक्षेत्रात स्वायत्त व स्वावलंबी समाजसंस्थांची व्यवस्था असावी. राज्य ही अत्यंत महत्त्वाची संस्था आहे, पण ती सर्वोपरी नव्हे. राज्याने प्रामुख्याने संरक्षण, परदेशांशी संबंध, कायदा-सुव्यवस्था, भविष्यवेध, संकटकालीन यंत्रणा अशा क्षेत्रांतच मर्यादित असावे.

७- पर्यावरणाप्रति संवेदनशीलता व त्याच्या रक्षणासाठी मुळात उपभोग संयमित हवा.

८- व्यक्तीच्या व समाजाच्या संतुलित प्रगतीसाठी अध्यात्म व विज्ञान दोन्ही हवेत. अध्यात्म व विज्ञान यात मुळात विरोध नाही. युरोपात ज्याप्रमाणे बायबल व विज्ञान यांचा संघर्ष होता व आहे तसा भारतात अध्यात्म व विज्ञान यांचा संघर्ष नव्हता व नाही.

९- लोककल्याणकारी भारतीय चिरंतन जीवनदृष्टीचा सांधा आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाला जोडून समतोल साधला पाहिजे. केवळ वैज्ञानिक, तांत्रिक व पोटभरू शिक्षणावर एकांगी भर दिल्याने मानवी मूल्यांची हानी होऊन आत्यंतिक भोगवादामुळे आज पाश्चिमात्य देशांना जसे अनेक सामाजिक, नैतिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, तशीच पाळी आपल्यावरही आली आहे.

१०- एकात्म शासनपद्धतीत स्वायत्त शासनाच्या आधारावर गाव या आधारभूत घटकापासून प्रारंभ होऊन ग्रामांचे मंडल, जनपद आणि प्रांत यांच्या रचनेहून मोठे असे संपूर्ण राष्ट्राचे एकच एकक असेल. सध्याच्या युनियन ऑफ स्टेट्स या पद्धतीचे दोष आता दिसत आहेत. लोकशाही पद्धतीतील दोषांचे निराकरण करून तिचे भारतीयीकरण आवश्यक आहे.

११- भारतीय अर्थशास्त्राने धनाचा प्रभाव व अभाव दोन्हीही नष्ट करणारी संतुलित अर्थव्यवस्थेची ‘अर्थायाम’ कल्पना पुरस्कारली आहे. मानवी श्रमांच्या आधारे अधिकाधिक उत्पादन, सुयोग्य वितरण, संयमित उपभोग आणि बचतीतून पुनर्निर्माण हे ‘अर्थायामा’चे महत्त्वाचे घटक आहेत.

१२- स्वदेशी, स्वावलंबन, विकेंद्रीकरण, संपूर्ण रोजगार, समुचित तंत्रज्ञान धोरण, लहान उद्योगांवर भर अशा महत्वाच्या पैलूंवर सुयोग्य धोरणांतून अंमल करणे आवश्यक आहे. सहकार, सामंजस्य व समन्वय यांनाच समूहजीवनात प्राधान्य देणे, स्पर्धा निकोप ठेवणे तसेच परंपरागत सेंद्रिय शेतीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा संतुलित उपयोग करून शेती क्षेत्राकडे विशेष लक्ष द्यावयास हवे. कारण ते अर्थव्यवस्थेचा मूळ आधार आहे.

१३- पूर्णत्वाचा ध्यास हा आध्यात्मिक व व्यावहारिक अशा दोन्ही बाबतींत महत्त्वाचा आहे. अशा ध्यासामुळे व्यक्तीची क्रियाशीलता, उत्पादकता वाढते, सगळी कामे अधिक चांगली होतात.

१४- धर्म (मानवांच्या हितासाठी व उन्नत जीवनव्यवहारासाठी मार्गदर्शक सृष्टिनियम, नैतिक अंकुश, कर्तव्यसंकेत) हे समाजव्यवहाराचे नियामक तत्त्व असले पाहिजे. जीवनोद्देशाला अनुकूल अशी कर्तव्यांची, नीतिनियमांची एक सुसंवादी रचना आमच्या जीवनात काही प्रमाणात आजही धर्मरूपाने आहे. धर्मतत्त्वांतून समाजाचे नीतिशास्त्र तयार होते व त्याचे आजचे व्यावहारिक रूप म्हणजे राज्यघटना. त्या दृष्टीने राज्यघटना ही आज समाजजीवनाला लागू असणारी आचारसंहिता (स्मृती) आहे.

१५- एकात्म मानव दर्शन हे चिंतन आजही आपल्या व्यवहारात दिसते. समाजात दिसणारी समग्र दृष्टी, सहकारी भाव, सुदृढ कुटुंबपद्धती, शेजारधर्मपालन, अर्थव्यवहारातील नैतिकता, सरकारवर अवलंबून नसणारी सामाजिक सुरक्षा, बचतीची सवय, जनावरांप्रतिही आपुलकी, निसर्गाविषयी पूज्य भाव व जपणूक इ. ही एकात्म मानव दर्शनाचीच अभिव्यक्ती आहे. त्यावर आधारित विकासाचे नवे यशस्वी प्रयोग होत आहेत. पण समर्पित व्यक्तींवर अवलंबून असलेले प्रयोग पुरेसे नाहीत. हा विचार व भाव मुख्यधारा होणे आवश्यक आहे.

१६- वर्तमान व्यवस्थेत राजसत्ता धम्र्य राहण्यासाठी, तिच्यावर अंकुश कसा राखावा हा सर्वच समाजांपुढील जटिल प्रश्न आहे. सच्चरित्र, आदर्श व्यक्तींचा गट समाजात असेल तर लोक त्यांचे मार्गदर्शन घेतात, अनुकरण करू लागतात. अशा लोकांची आचार्य परिषद महत्त्वपूर्ण बाबींमध्ये सरकारला सल्ला देऊ शकेल. शासनाने या सल्ल्याचा योग्य तो आदर करून उपयोग करून घेतला पाहिजे.

१७- नव्या संरचनेत ‘पोषणक्षम अर्थतंत्र’, ‘धारणक्षम तंत्रज्ञान’ व ‘संस्कारक्षम समाज-तंत्र’ याकडे जावयाचे आहे. पण समाज संस्कारित झाल्याशिवाय पोषणक्षम अर्थतंत्र किंवा धारणक्षम तंत्रज्ञान येणार नाही.

आज साम्यवाद धराशायी झाला आहे व भांडवलशाही, दुसरा पर्याय पाश्चिमात्यांना दिसत नसल्याने, अडखळत संकटांमधून वाटचाल करीत आहे. जगाचे प्रमुख प्रश्न गरिबी, विषमता, बेरोजगारी, पर्यावरण ऱ्हास, मानसिक तणाव, ढासळती कुटुंब व समाजव्यवस्था इ.वर भांडवलशाहीपुढे कुठलीही परिणामकारक उपाययोजना नाही. उदाहरण म्हणून एप्रिल २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या फ्रान्सिस फुकुयामा यांच्या ‘लिबरॅलिझम अ‍ॅण्ड इट्स डिस्कन्टेन्ट्स’ या पुस्तकाचा उल्लेख करता येईल.      

सर्व जणच सुयोग्य तिसऱ्या पर्यायाच्या शोधात आहेत. सनातन धर्मावर आधारित आजच्या काळाला सुसंगत मांडणी केलेला भारतीय जीवनादर्श आपल्यापुढे आहे. तो जगालाही उपकारक ठरेल. पण आपण तो स्वीकारून आदर्श समाजपद्धतीकडे वाटचाल केली पाहिजे. हे करावयाचे असेल तर लोकमतपरिष्कारातून (समाजमानस परिवर्तन) राष्ट्रीय सहमती बनवावी लागेल.

आज समाजाची भारतीय जीवनादर्शाकडे मंद वाटचाल सुरू झालेली दिसते. याला गती देण्यासाठी देशातील सर्व समाजगटांतील, शिक्षण क्षेत्रातील व सर्व राजकीय पक्षातील सज्जनशक्ती एकवटून प्रयत्न करील तर नजीकच्या भविष्यकाळातच काही मोठे सर्वहितकारी बदल दिसू शकतील.

    (सूत्र समाप्त)

Story img Loader