हीनाकौसर खान
मुलांना शिक्षणासाठी परगावी जाऊ दिलं जात नाही. आई मुलाला नॉनव्हेजचा डबा देत नाही. काळय़ा पिशवीची, स्वत:चं नाव सांगण्याची त्यांना भीती वाटते..
मार्केट यार्डातला रात्री दहानंतरचा रस्ता. सुनसान. किर्र अंधारात बुडालेला. पावसाळी ढगांनी आणखीच गडद काळा झालेला. त्यात रस्त्यावरची बंद दुकानं आणि दारातल्या मोठय़ा ट्रकमुळे परिसर तीक्ष्ण भयाण झाला होता. मन फार अस्वस्थ आणि अस्थिर होतं. काही तासांपूर्वी कोर्टात बघितलेल्या झुंडींचं आणि कोर्टाबाहेरच्या नफरतभरल्या घोषणांचं दडपण होतं. आणि त्यात हे वातावरण अंगावर चाल करून येत होतं. न जाणो कुठून एखादा जमाव येईल आणि.. ही भीती स्वत:पेक्षा घरात जन्मणाऱ्या मुलग्यांसाठी होती. काय राखून ठेवलंय त्यांच्यासाठी? उद्या त्यांच्यापैकी कुणाला दाढी ठेवावी किंवा टोपी घालावीशी वाटली तर..
दुसऱ्या दिवशी काही पत्रकार मित्रमैत्रिणींना मनाची अवस्था सांगितली. म्हणाले, ‘रिपोर्टिग करताना तटस्थ राहायचं. बातमीत इतकं गुंतायचं नाही.’ मला ते पटत होतं. पण माझ्याइतका ताण कुणालाच होत नसल्यानं मी अधिकच अस्वस्थ झाले. रिपोर्टरच्या पलीकडेही मी माणूस होते. वाटय़ाला येणाऱ्या अनुभवांवर माझ्या परवानगीशिवाय मेंदू प्रोसेस करणारच होता. त्या प्रोसेसचा परिणाम शून्य कसा राहणार होता? कोर्ट रिपोर्टिगला बऱ्यापैकी रुळले होते तरीही मला कळत नव्हतं, मी जेवढी बेचैन आहे तेवढं अन्य कुणीच का नाही? माझीच काय इतकी उलघाल होतेय? आणि मग एका क्षणी उत्तर मिळालं. मेला तो मुस्लीम होता. नव्हे, मारला गेला तो मुस्लीम होता आणि ते तेवढंच नव्हतं तर त्याच्या मारल्या जाण्याचं कारणही ‘मुस्लीम असणं’ एवढंच होतं. त्या क्षणी माझं मुस्लीम असणं इतक्या वेगळय़ा तऱ्हेनं, इतक्या क्रूरसंदर्भात उमजून किती विचित्र वाटलं होतं, कसं सांगू?
पावणेनऊ वर्ष झाली या घटनेला. त्याचा परिणाम संपलाय असं म्हणता येणार नाही. वेगवेगळय़ा अनुभवांची भर मात्र त्यात पडलीये. पुण्यात हडपसर भागात २ जून २०१४ रोजी मोहसीन शेख २८ वर्षांच्या तरुणाचं ‘लिंचिंग’ झालं होतं. नमाजची टोपी आणि दाढी या त्याच्या मुस्लीम खुणा हल्ला करणाऱ्या जमावासाठी संकेत ठरल्या आणि जमावानं त्यांचं तापलेलं रक्त त्याच्या शरीराची धग थंड करून शांत केलं. त्याचा दोष इतकाच होता की तो मुस्लीम होता. ते कुठंही सिद्ध करावं लागलं नाही.. मात्र त्याचं ‘लिंचिंग’ झालं हे सिद्ध व्हावं लागणार होतं. पुराव्याचा अभाव राहिला. साधा एक वकील पूर्णवेळ मिळाला नाही. साक्षीदार टिकू शकले नाहीत. मग पुणे विशेष न्यायालयानं हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंसह २० जणांची निर्दोष मुक्तता केली. कदाचित आता मोहसीनचा भाऊ निकालाविरोधात उच्च न्यायालयात जाईल; पण या अशा दडपशाहीचा ट्रॉमा घेऊन फिरणाऱ्या जुन्या-नव्या पिढीची सुटका कशी करायची? या प्रकारच्या ट्रॉमाची उत्तरं शोधण्यासाठी मुस्लीम समाज संघटितरीत्या सनदशीर- कायदेशीर मार्ग कधी अवलंबणार आहे?
आजही आठवतंय – त्या दिवसांत हडपसर-कोंढवा भागात प्रचंड भीती पसरली होती. नातेवाईक सांगायचे की संध्याकाळी सातनंतर सगळीकडे शुकशुकाट व्हायचा. स्मशानशांतता! त्याला भीतीचं कोंदण. हक्काचं घर सोडून कोंढव्यात (मुस्लीमबहुल वस्ती, सांगावं लागलं का!) घर मिळेल का म्हणून नातेवाईक चौकशी करू लागले. काय मिळणार होतं त्यांना कोंढव्यात? आपणच टार्गेट होणार नाही हा दिलासा फक्त. कोंढव्यातल्या लोकांना तरी कुठे सुरक्षित वाटत होतं? का नाही होणार मग घेट्टो, कोण भाग पाडतं अशा वस्त्या करायला? किती सहज मिनीपाकिस्तान म्हणून मुस्लीम वस्त्यांना हिणवलं जातं. हे हिणवणारे पाकिस्तान कधी बघून आले, असा प्रश्न पडतो मला तर अनेकदा.
मोहसीन मूळचा सोलापूरचा. पुण्यात नोकरीसाठी होता. जन्मगाव आणि कामाचं ठिकाण यांतल्या अंतराचा परिणाम मुस्लीम कुटुंबांवर इतका झाला की कित्येक कुटुंबांनी आपल्या मुलांना गावातून बाहेर पडू दिलं नाही- ना शिक्षणासाठी, ना नोकरीसाठी. आपलं मूल आपल्या डोळय़ांदेखत असू दे.. करिअर गेलं चुलीत! एका मैत्रिणीच्या चुलतभावाला त्याच काळात बेंगळूरुमध्ये उच्चशिक्षणाची संधी होती. कुटुंबीयांनी तिथे पाठवलं नाही. त्यांनी हैदराबाद निवडलं. का तर तो मुस्लीमबहुल भाग. असंच कदाचित एखादा मुस्लिमेतर- कोंढव्यात नावाजलेलं कॉलेज असेल तरी येणार नाही. कुठल्या आरोग्यदायी समाजाचं हे लक्षण आहे?
त्या दिवसांतला मिनाज लाटकर या मैत्रिणीनं सांगितलेला किस्सा डोक्यातून हलतच नाही. तिचा भाऊ पुण्यात हॉस्टेलवर राहायचा. मुस्लीम मित्र-मैत्रिणींकडे मांसाहाराचा आग्रह ही फारच सर्वसामान्य बाब. अशा मेहमाननवाजीचा कुटुंबीयांनाही आनंद! तो घरी गेला की दरवेळी नॉनव्हेजचा डबा हॉस्टेलवर घेऊन जायचा पण या घटनेनंतर आई काय त्याला नॉनव्हेजचा डबाच देईना. काय असेल त्या आईची अवस्था! काही नातेवाईकांनी तर काळय़ा पिशवीचाच धसका घेतला. माणसं बाहेरगावी फिरताना नाव सांगण्यापूर्वी समोरच्याचा अदमास घेऊ लागली. हळूहळू माणसाची भीती निवत जाते पण नेणिवेत जाऊन बसणारी भावनिक गुंतागुंत नष्ट होते? – हे उलट बाजूनेही असणारच आहे.
आपल्या समाजातला एक समूह भयग्रस्त आहे याचा काहींना आसुरी आनंद वाटतो तर काहींना हे ‘इतकं?!’ भयग्रस्त नाहीये असा भाबडा विश्वास वाटतो. अहो, इतकं नसेल पण आहे ना हे कधी मान्य करणार आहोत. बऱ्याचदा ‘सर्वसामान्य माणसांच्या शहाणपणावर विश्वास आहे,’ असं म्हणून सुलभीकरण केलं जातं पण या प्रकारची मांडणी करताना डोळय़ांसमोर ‘व्यक्ती’ असते. एकेकटय़ा माणसाला कदाचित कुणाच्याही जातिधर्माचं आणि त्यातून ‘घडवलेल्या’ प्रश्नांचं काहीएक देणंघेणं नसेल, मात्र समूह पातळीवर, जमावाच्या स्तरावर तसं नसतं. समूहानं विचार करण्याची प्रथा कुठंय? समूहाला फक्त कृती करता येते. आणि आता तर ‘आम्ही हिंदूत्ववादासाठी लव्ह जिहादविरोधी आणि (ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या विरोधात) धर्मातरविरोधी काम करू,’ असंही देसाई म्हणालेत. म्हणजे ते नेमकं काय करणार आहेत? याच मुद्दय़ांना घेऊन जागोजागी हिंदू जनआक्रोश सभा/ मोर्चे निघत आहेत; तिथं काय प्रेमाची भाषा केली जात असेल.. काय वसुधैव कुटुंबकमचा जयघोष होत असेल? तिथे जर ‘हेटस्पीच’ होत असतील, तर त्याची सुमोटो (स्वत:हून) कारवाई होणार आहे का? बहुसंख्य हिंदू समाजाला मुस्लीम/ ख्रिश्चन अल्पसंख्य समुदायाकडून कसला धोका वाटतोय? कसं सांगायचं कुणाही कट्टरपंथीयांना की, द्वेष केल्यानं रक्त जळतं ते आपलंच आणि पिढय़ा बरबाद होतात त्याही आपल्याच.
एक मुस्लीम तरुण सांगत होता. अलिगड मुस्लीम युनिव्हर्सिटीत शिकताना त्याची एक गर्लफ्रेंड होती. मुस्लीम वस्तीत राहणारी; मात्र हिंदू. २०१४ नंतर हळूहळू तिची भाषा बदलली. राहत्या वस्तीचा, माणसांचा तिरस्कार करू लागली. आधी तिनं घर बदललं. ‘आमच्यात-तुमच्यात’ करू लागली, हळूहळू संताप. ज्या समविचारांनी ते एकत्र आले होते तो पायाच हलला आणि त्यांचं सात वर्षांचं नातं तुटलं. हे सांगताना त्याला आतून किती यातना झाल्या असतील. समकाळाचे न दिसणारे असे घाव आपण कुठल्या इतिहासात आणि कधी नोंदवणार आहोत?
अशा वेळी पोटातून ओरडून सांगावंसं वाटतं, जिगर लागते ती फक्त प्रेम करायला. पण आपल्याला कशा प्रकारच्या समाजाची अपेक्षा आहे त्यावर हे अवलंबून आहे आणि ते ‘समूहाने’ (जमावाने नव्हे) ठरवण्याची वेळ आली आहे!