अमृत बंग

कॉलेज-कट्टय़ांवर तरुण-तरुणींच्या गटातील गप्पांत सहसा नैतिक मुद्दय़ांवर चर्चा होत नाहीत. कधीमधी एखाद्या विषयाबद्दल योग्य-अयोग्य काय यावर वादविवाद झालाच तर बहुतांश वेळा त्याचा शेवट कसा होतो? ‘तू तुझ्याजागी आणि मी माझ्याजागी योग्य आहोत’, ‘इट डिपेण्ड्स ऑन द सिच्युएशन’, ‘सबका अपना अलग अलग पस्र्पेक्टिव्ह होता है, सभी अपनी जगह ठीक है’, ‘छोड ना.. क्यूँ टेन्शन लेता है?’ ही अथवा अशा वाक्यांचे विविध प्रकार आपल्याला वारंवार ऐकू येतात. हे कशाचे द्योतक आहे?

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
pm modi rally in pune pm modi mega roadshow in pune ahead of maharashtra assembly elections
पंतप्रधानांची मध्यमवर्गाला साद ; ‘मध्यमवर्गाची प्रगती होते, तेव्हा देशाचा विकास’; पुण्यातील सभेत विधान
state govt form committee to study implementation sub classification in sc reservation sparks controversy
दलित मतदारांत दुभंग? आरक्षण उपवर्गीकरणाच्या हालचालींचे पडसाद निवडणुकीत उमटण्याची शक्यता
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास

वैयक्तिक आवडीनिवडीच्या पलीकडे नैतिक मुद्दय़ांवर विचार व भाष्य करताना, त्याबाबत आपली काही भूमिका ठरवताना अनेक युवांना अडचण येते. यापुढे जाऊन स्वत:च्या जीवनात जेव्हा प्रत्यक्ष काही निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा एक तर त्यांचा फार गोंधळ उडतो किंवा काही एका विशिष्ट पद्धतीनेच (फायदा/तोटा) बहुतांश निर्णय घेतले जातात. युवांची ‘मॉरल डेव्हलपमेंट/ नैतिक विकासाची’ प्रक्रिया काय असते? ते नेमका कसा विचार करतात? ‘निर्माण’मधील आमचा अनेक युवांसोबतचा अनुभव तसेच या विषयाच्या वैज्ञानिक शोधसाहित्याच्या अभ्यासातून काही मुद्दे पुढे येतात :

(१) बऱ्याचशा तरुण-तरुणींनी नैतिक मुद्दय़ांविषयी फारसा विचारच केला नसतो. परीक्षा, कॉलेज, पी.जी./ प्लेसमेंट्स आणि मजा यांच्या गदारोळात मी जे काही शिकतो आहे किंवा पुढे जे काही करणार आहे, जसा जगणार आहे त्याचा नैतिक बाजूने विचार करण्याची त्यांना कधी गरज भासत नाही व उसंतही मिळत नाही. मेकॅनिकल इंजिनीअर म्हणून मी युद्धसामग्री व शस्त्रे बनविणाऱ्या कंपनीमध्ये नोकरी करणार की एखाद्या ‘इलेक्ट्रिक व्हेईकल्स’ अथवा ‘रिन्युएबल्स रिसर्च’ करणाऱ्या कंपनीत, हा निव्वळ कोणाचे पॅकेज किती एवढाच प्रश्न नसून नैतिकदेखील आहे हे सहसा तरुण मुला-मुलींच्या ध्यानीमनी नसते. आणि म्हणूनच कधी अशा विषयांविषयी चर्चा छेडल्यास त्यांच्या प्रतिक्रिया या ‘म्हणजे..?’, ‘माहीत नाही..’, ‘पण..’, ‘आय गेस..’ अशा अनिश्चिततापूर्ण असतात. या इमर्जिग अ‍ॅडल्ट्सना गुंतागुंतीच्या नैतिक प्रश्नांना कसे सामोरे जायचे, सुसंगत तर्क कसा करायचा यासाठीचे मार्गदर्शन व बौद्धिक साधने कोणी फारशी दिलेलीच नसतात. तशा विचारांना, संवादांना ते क्वचितच सामोरे गेले असतात. आणि म्हणूनच एक प्रकारचा ‘नैतिक सापेक्षतावाद’ (मॉरल रिलेटिव्हिजम) – ‘हर कोई अपनी जगह पे ठीक है’ बळावताना दिसतो. मग हिटलरही आपल्या जागी ठीकच होता असे म्हणावे का? पोस्टमॉडर्निझमच्या वाढत्या प्रभावात बळावलेला न-नैतिक व्यक्तिवाद नैतिक बाबींवर सामाजिक चर्चा, विवाद, संवाद व सहमती साध्य करण्याच्या जबाबदारीपासून मुक्तता देणारा, म्हणूनच अनेकदा सोयीस्कर वाटतो. पण म्हणून तो श्रेयस आहे का? बहुलता आणि विविधतेचा स्वीकार करणे, विरुद्ध नैतिकदृष्टय़ा सापेक्षतावादी असणे यात फरक आहे आणि तो कळणे महत्त्वाचे आहे.

(२) याचाच दुसरा परिणाम म्हणजे स्वत:चे नैतिक विचार बोलून दाखवणे हेच जणू अनैतिक, असे वाटायला लावणारे पीअर प्रेशर! स्वत:चा नैतिक दृष्टिकोन व्यक्त करणे (मद्यपान असो वा रॅगिंग, कट प्रॅक्टिस असो वा विजेचा अपव्यय..) म्हणजे जणू इतरांवर वर्चस्व गाजवणे/ नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे असे भासवले जाते. यामध्ये काही नैतिक मूल्य नाही तर हा व्यक्तिगत मामला आहे असे मानले जाते. म्हणूनच अनेक युवा स्वत: कोणतेही भक्कम नैतिक दावे करणे पूर्णत: टाळण्याचा प्रयत्न करतात, तसेच इतरांच्या नैतिक मतांवर टीका करणे टाळतात. वास्तविक माझी मॉरल आयडेंटिटी, नैतिक ओळख काय आहे हे समजणे हा ‘यूथ फ्लारिशिंग’चा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या अभावात नैतिक निर्णय घेण्याची आणि नैतिकदृष्टय़ा सुसंगत जीवन जगण्याची असमर्थता ही युवांमधली एक प्रकारची निर्धनता व कुपोषण आहे.

(३) व्यक्तीच्या नैतिक विचारप्रक्रियेचा विकास कसा होतो याबाबात शिकागो विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ लॉरेन्स कोहलबर्ग यांची ‘स्टेज थिअरी’ प्रसिद्ध आहे. कोहलबर्गच्या मते व्यक्तीच्या नैतिक विचार व निर्णयक्षमतेचा विकास तीन पातळय़ांतून होतो. ‘प्रि-कन्व्हेन्शनल’ या पहिल्या पातळीत प्रामुख्याने ‘फायदा/तोटा काय’ (प्रोज अँड कॉन्स) या विचारसरणीतून निर्णय घेतले जातात. आई रागावेल म्हणून अमकी गोष्ट करू नये, काका चॉकलेट देतील म्हणून तमके वागावे असे लहान मुले ठरवतात ती ही पातळी. पुढची पातळी म्हणजे कन्व्हेन्शनल. आसपासचे लोक काय विचार करतात, कसे वागतात, ‘गुड बॉय – गुड गर्ल’कडून काय अपेक्षित आहे, समाजमान्य काय, त्यानुसार निर्णय घेण्याची ही पातळी. तिसरी आणि या थिअरीमधील सर्वात वरची पातळी म्हणजे पोस्ट-कन्व्हेन्शनल अथवा ‘मूल्याधिष्ठित’ पातळी. या टप्प्यावर इतर लोक काय म्हणतात किंवा फायदा/तोटय़ाचे हिशेब यापेक्षा व्यक्ती स्वतंत्ररीत्या आपला मूल्यविचार ठरवते, योग्य-अयोग्य कशाला म्हणायचे ते ठरवते आणि त्यानुरूप निर्णय व वर्तन करते. समजायला सोपे असे एक ठळक उदाहरण म्हणजे महात्मा गांधींची दांडी यात्रा! स्वत:ला अटक होऊ शकते या तोटय़ाचा विचार न करता आणि तत्कालीन समाजमान्यता व कायद्यालाही झुगारून त्यांना जे नैतिकदृष्टय़ा योग्य वाटले तो निर्णय घेऊन तद्नुसार वागणे ही म्हणजे कोहलबर्गची तिसरी पातळी. विविध समाजसुधारकांच्या जीवनात अशा प्रकारचे अनेक प्रसंग आपल्याला दिसतील. ज्यांच्याविषयी आपल्याला नैतिक आदर वाटतो असे लोक नजरेपुढे आणाल तर त्यांत या प्रकारे ‘मूल्याधिष्ठित’ विचार करणारे लोक दिसतील.

 कोहलबर्गचे संशोधन असेही सूचित करते की, बहुतांश लोक दुसऱ्या (कन्व्हेंशनल) टप्प्याच्या पलीकडे जात नाहीत. यदाकदाचित तिसऱ्या पातळीकडे वाटचाल झालीच तर ती सहसा वयाच्या विशीच्या दशकात होते. म्हणूनच या काळात युवांना ‘माझी नैतिक संहिता कोणती ज्यानुसार मला माझे जीवन जगायचे आहे’ ही स्पष्टता येण्यास मदत करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. माझ्या जीवनातील निर्णय आणि निवडींची क्रमवारी कशी लावायची? त्याला नैतिक आधार असू शकतो का? कुठला? याबाबत तरुणांना स्पष्ट विचार करण्याची, ओळखण्याची आणि निर्णय घेण्याचा सराव करण्याची (मॉरल जिमिंग) संधी मिळत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. मुळात मनाने चांगले असणारे अनेक युवा यामुळे मात्र अयोग्य विचार करताना दिसतात. नुकताच घडलेला एक प्रसंग : महाराष्ट्रातील एका वैद्यकीय महाविद्यालयातील एक निवासी डॉक्टर तेथील एमबीबीएसच्या अंतिम वर्षांला असलेल्या काही मुलींना त्रास देत होता. मात्र त्या मुली याविषयी ठामपणे बोलायला, तक्रार करायला घाबरत होत्या. का तर त्यांना भीती होती की तो निवासी डॉक्टर त्यांना परीक्षेच्या वेळेस अडचणीत आणेल. तुम्ही नापास व्हाल अशी त्याची धमकी! ‘क्यूँ रिस्क लेना’ असा पातळी एकवरील विचार किंवा ‘ऐसा थोडा बहोत तो होता ही है, पिछले बॅच वालोंनेभी सह लिया था’ असा पातळी दोनवरील विचार, दोन्हीनुसार मान खाली घालून अन्याय सहन करणे हा मार्ग होता. आमच्या निर्माण शिबिरात सहभागी झालेली अशी त्यांची एक वरिष्ठ होती. तिने हा मुद्दा लावून धरायचे ठरवले. तिने याविरुद्ध ठाम भूमिका घेतली. पीडित मुलींना एकत्र करून धीर दिला, कॉलेजच्या डीनकडे एकत्र तक्रार नोंदवली आणि शेवटी त्या निवासी डॉक्टरला रस्टिकेट करण्यात आले. इतर युवांमध्ये या प्रकारचे धैर्य कसे निर्माण होईल यावर विचार करणे गरजेचे आहे.

(४) फायदा/तोटा काय यानुसार निर्णय घेणे ही दैनंदिन, व्यावहारिक प्रसंगांत बऱ्याचदा उपयुक्त पडणारी पद्धत आहे. मात्र तिला तिथेच मर्यादित नाही ठेवले आणि जास्त महत्त्वाच्या निर्णयांसाठी तिचा वापर करायचा ठरवला तर मात्र अडचणी आणि संभ्रम सुरू होतो. उदाहरणार्थ, माझा हेतू काय, मी काय प्रकारचे काम करू, जोडीदार म्हणून कोणाला निवडू, अशा मूलभूत मुद्दय़ांसाठी ‘प्रोज अँड कॉन्स’ ही विचारपद्धती उपयोगी नाही. कारण आज एक गोष्ट चांगली वाटते तर उद्या तिचाच दुसरा पैलू चिंताजनक वाटतो. स्पष्टता आणि निश्चय याऐवजी गोंधळ, काळजी व सततची अस्वस्थता अनुभवास येते. म्हणूनच माझी मूल्ये काय, योग्य-अयोग्य ठरवण्याचे माझे निकष काय व त्यानुसार जगण्यातील निर्णय घेण्याची क्षमता विकसित होणे हे तरुण वयासाठी अत्यावश्यक आहे. तांत्रिक ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करण्यासोबतच, तरुणांना त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात मार्गदर्शन करणारी नैतिक मूल्ये शोधण्यात मदत करणे हेदेखील शिक्षणाचे, पालकांचे आणि समाजाचे कर्तव्य आहे. त्यातूनच युवांचा निर्णय-गोंधळ दूर होईल.