अमृत बंग
..युवांचा आयुष्याचा प्रवास हवा अभिमन्यू ते अर्जुन व्हाया सिद्धार्थ!
मित्रांनो, गेले वर्षभर या सदरातून युवामानस समजून घेण्याचा प्रयत्न केला. युवा व त्यांच्या पालकांच्या मनातील कळीचा प्रश्न म्हणजे करिअर. आजच्या या शेवटच्या लेखात त्याविषयी काही विचार व्यक्त करतो आहे.
बारावीनंतर काय करावे, कुठल्या कोर्सला ‘स्कोप’ आहे, इ.बाबत माहिती मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. पण करिअर म्हणजे केवळ डिग्री नाही, तर जीवनात काय करायचे आहे याचा विचार. प्रसिद्ध जर्मन समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांच्या ‘वर्क कॉन्ट्रिब्युट्स टू साल्व्हेशन’ या धर्तीवर आपले करिअर म्हणजे समाजाशी (काहींसाठी देवाशी) असलेली आपली नाळ. जीवनातला सर्वाधिक वेळ ज्यात जाणार, ज्यातून समाजावर आपला काहीएक परिणाम होणार, अपत्यांव्यतिरिक्त काही ‘लेगसी’ राहणार आणि आयुष्यात काही केल्याचे आपल्याला समाधान मिळणार अशी बाब म्हणजे करिअर! करिअर निवडीसाठीचे निकष आणि करिअरच्या सुरुवातीला युवांची मनोभूमिका याबाबतचा ऊहापोह मी करणार आहे.
१. शिक्षणाने काय साध्य व्हावे याबाबत विनोबांनी म्हटले आहे आर्थिक, बौद्धिक व मानसिक असे त्रिविध स्वावलंबन! सर्वात पहिली बाब म्हणजे स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहू नये म्हणून प्रत्येक तरुणाने आर्थिकदृष्टय़ा स्वत:च्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे. सध्याचा १० टक्के बेरोजगारीचा दर चिंताजनक आहेच. पण काम मिळत नाही म्हणून एका डिग्रीनंतर दुसरी, एका परीक्षेनंतर दुसरी (स्पर्धा) अशा न थांबणाऱ्या ट्रेडमिलवर आपले अनेक युवा आहेत हे काळजीदायक वास्तव आहे. निव्वळ पदव्यांच्या मागे न लागता काही कौशल्ये अंगी बाणवून स्वत:च्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी स्वयंपूर्ण होणे हा युवांच्या करिअरच्या वाटेवरील प्राधान्यक्रम असावा. पालकांनीही पाल्याला स्वावलंबी बनण्यास प्रोत्साहन द्यावे.
२. दुसरी बाब म्हणजे बुद्धी स्वयंभू बनणे आणि स्वतंत्रपणे विचार करू शकणे, नवी आवश्यक ज्ञानप्राप्ती करू शकणे. एकविसाव्या शतकातील सातत्याने आणि वेगाने बदलणाऱ्या काळात खरा ‘स्कोप’ व ‘सिक्युरिटी’ त्यांनाच राहील जे वेळेनुसार सतत शिकून नवीन गोष्टी आत्मसात करू शकतील. आता करिअर म्हणजे ‘एकदाचा सेटल हो’ असा मामला राहणार नाही. म्हणून युवांनी कामाच्या संधी शोधताना ‘कमी काम, बक्कळ दाम आणि जादा आराम’ असा विचार न करता भरपूर मेहनतीच्या, नवीन कौशल्ये शिकण्याच्या, विविध जबाबदाऱ्या व आव्हानांना सामोरे जाण्याचा अवकाश मिळेल अशा पर्यायांचा शोध घ्यावा. कामाव्यतिरिक्त वाचन व ‘ऑनलाइन लर्निग’ करावे. गरजांपुरते आर्थिक स्वावलंबन साधल्यानंतर जादा कमाईच्या मागे धावण्यापेक्षा लांब पल्ल्याचे ‘करिअर कॅपिटल’ विकसित होईल अशा बाबींवर लक्ष केंद्रित करावे. यामध्ये कौशल्यप्राप्ती, सामाजिक वास्तवाचे आणि जग कसे चालते याचे आकलन, ‘कनेक्शन्स व मेंटरशिप’, विश्वासार्हता, नैतिकता व रोल मॉडेल्सचे ‘बेंचमार्क्स’, इ. गोष्टींचा समावेश होतो. या काळात युवा कोणाबरोबर, कसा वेळ घालवतात हा त्यांच्या वैयक्तिक वाढ आणि चारित्र्याला कारणीभूत ठरणारा प्रमुख घटक असतो.
३. विनोबांनी सांगितलेली तिसरी बाब म्हणजे स्वत:च्या मनावर व इंद्रियांवर ताबा मिळवण्यास शिकणे. व्यवस्थापनशास्त्रात म्हण आहे की ‘यू गेट हायर्ड फॉर युअर अॅप्टिटय़ूड अँड फायर्ड फॉर युअर अॅटिटय़ूड’. एक जबाबदार युवा, कार्यकर्ता, नागरिक म्हणून मी माझ्या वृत्तीला आणि वर्तनाला योग्य वळण कसे देतो हा अत्यंत महत्त्वाचा विषय बव्हंशी दुर्लक्षित राहतो. यावर लक्ष देणे, गरजेनुसार इतरांकडून अभिप्राय घेणे आणि आवश्यक ते बदल करणे हे युवांच्या यशस्वी करिअरसाठी अत्यावश्यक आहे.
४. माझे मेंटॉर, एमकेसीएलचे संस्थापक विवेक सावंत यांनी मला ‘मी इथे देण्यासाठी आहे, घेण्यासाठी नाही!’ हा अत्यंत उपयुक्त सल्ला दिला होता. अनेक तरुण-तरुणी जे करत असतात त्यात सतत ‘मला काय मिळेल’ अशा मानसिकतेत दिसतात. आणि कदाचित म्हणूनच बऱ्याचदा दु:खी वा चिंताग्रस्त असतात. सध्याची एकूणच व्यक्तिवादी विचारपद्धती, स्वकेंद्री शिक्षण, व कधी कधी पालकांचे अवास्तव प्रेम हे सगळेच युवांमध्ये एक प्रकारची ‘चाइल्ड मेंटालिटी’ भरवत असते. त्यामुळे जगाकडे, कामाकडे, करिअरकडे, नातेसंबंधाकडे बघताना, जोडीदाराची निवड करताना ‘यामध्ये माझ्यासाठी काय? मला काय मिळेल?’ असा दृष्टिकोन दिसतो. जणू मी सगळय़ाच्या केंद्रस्थानी आहे आणि माझ्या अपेक्षा, आकांक्षा, आवडी पूर्ण करण्याची जबाबदारी ही इतरांची, समाजाची आहे हा भाव युवांच्या ‘अॅडल्ट’ बनण्याच्या मार्गात अडथळा तर ठरतोच पण सोबतच सततच्या असमाधानालाही कारणीभूत ठरतो. त्यापेक्षा मी इतरांना काय देऊ शकतो असा विचार केल्यास केवळ तक्रारी करण्यापेक्षा आपल्या हातात काय यावर लक्ष देता येते, उपाय-केंद्रित भूमिकेतून विचार होतो, उत्साही वाटते आणि आपण सकारात्मक अशी कृती करण्यात गुंततो. वाढत्या वयानुसार हे संक्रमण होणे हे जबाबदार तरुण बनण्याचे महत्त्वाचे लक्षण आहे.
५. यापुढचे आव्हान म्हणजे डिग्रीच्या, सोशल मीडिया फॉलोअर्सच्या आणि पुरस्कारांच्या यशाला न भुलता कर्तृत्व दाखवणे आणि निव्वळ ‘सेल्फ प्रमोशन’ न करता प्रामाणिकपणे आपल्या कामाचा परिणाम तपासणे. यशाच्या या ‘अॅसिड टेस्ट’कडे लवकरात लवकर वळून त्याचा गंभीरपणे अवलंब करणे हे ज्यांना ‘लंबी रेस का घोडा’ व्हायचे आहे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. सध्याच्या जॉब मार्केटमध्ये रेझ्युमेची आणि लिंक्डइन प्रोफाइलची चलती आहे. मला अनेक तरुण मुला-मुलींच्या बाबतीत जाणवतं की त्यांची निवडप्रक्रिया व निर्णय हे त्यांच्या मनातल्या एका काल्पनिक रेझ्युमेवर त्यांचं आयुष्य कसं दिसेल या पद्धतीने होतात. जगण्याची प्रत्येक पायरी किंवा पुढचा टप्पा त्या रेझ्युमेवर पुढची ओळ कशी दिसायला हवी या रीतीने आखला जातो. इथे मग सामाजिक कामदेखील एक ‘एक्झॉटिक व्हॉलंटियिरग एक्सपिरियन्स’ बनतो. इतका ‘शॉर्ट सायटेड’ विचार मला फार संकुचित आणि दु:खद वाटतो. ‘समाजाला कशाची गरज आहे, मला काय जमतं आणि मी काय देऊ शकतो’ असा विचार करून प्रत्यक्ष जीवनात कुठला प्रश्न सोडवायला घेतला, त्यात काय परिणाम साध्य केला यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. भारताचे युवा स्वत:च्याच रेझ्युमेचे ‘कंझ्युमर’ बनतात की समाजासाठी योगदान देणारे ‘प्रोडय़ुसर’ बनतात हा कळीचा मुद्दा राहील.
६. सरतेशेवटी तात्कालिक फायद्या-तोटय़ाच्या पलीकडे जाणारं काहीतरी लांब पल्ल्याचं स्वप्न, ज्याच्या आधारावर जगण्याला काही दिशा प्राप्त होईल असा पर्पज/उद्देश्य शोधता येणं हे युवांपुढचं सगळय़ात मोठं आव्हान आणि जबाबदारी आहे. शिक्षण घेणे हे काही आयुष्यातलं अंतिम ध्येय नाही. ते एक साधन आहे, आणि म्हणूनच ते नेमकं कशासाठी वापरलं पाहिजे याविषयी चिंतन होणं आवश्यक आहे. स्वत:च्या नेमक्या आर्थिक गरजांची कल्पना येऊन त्याबाबत स्वावलंबी बनणे ही करिअरकडून असलेली प्राथमिक अपेक्षा. पण या पुढचा प्रश्न हा निव्वळ उपजीविकेचा नाही तर जीविकेचा आहे. निर्माणद्वारे युवांच्या केलेल्या अभ्यासात आम्हाला सापडले की ८५ टक्के युवा ‘माझ्या जीवनाचा उद्देश काय? माझा नेमका पर्पज काय?’ यावर आठवडय़ातून किमान एकदा विचार करतात मात्र केवळ ३७ टक्के युवांना असे वाटते की त्यांच्या कॉलेजच्या/कामाच्या ठिकाणचे वातावरण हे याचा शोध घेण्यासाठी अनुकूल आहे. या शोधासाठी नीट संधी न मिळाल्यामुळे बाहेरच्या जगात जी फॅशनेबल उत्तरे आहेत त्यांचाच अवलंब करायचा याव्यतिरिक्त दुसरा पर्याय बहुतांश युवांसमोर उरत नाही. आर्थिक असुरक्षिततेचा बागुलबुवा करून, सेटल होण्याच्या अवाजवी अपेक्षा आणि अमर्यादित उपभोगाच्या आकांक्षा तयार करून तरुण वयातील कृतिशीलता व जीवनाविषयक प्रयोगशीलता खुंटून टाकणे हे योग्य नाही. तरुणांचे जीवन म्हणजे निव्वळ अर्थव्यवस्थेत विकण्याचे उत्पादन नाही. मला असं वाटतं की या युवा पिढीला अर्थपूर्ण आणि समाधानी आयुष्य जगण्याचा हक्क आहे. मात्र ‘स्व:’ची आणि ‘स्वधर्मा’ची ओळख ही निव्वळ गुहेत बसून नाही तर समाजाच्या गरजांना सामोरे जाऊन होते.
निर्जीव माहितीचे भेंडोळे, परीक्षा व पदव्यांचा सुळसुळाट, रेझ्युमेची शर्यत, ‘सक्सेस’ची जीवघेणी स्पर्धा, अवाजवी आर्थिक अपेक्षांचे ओझे आणि आत्ममग्नता यांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या युवा अभिमन्यूंचा ‘माझा स्वधर्म काय’ हा शोध घेणारा अर्जुन व्हावा अशी आशा! आणि यासाठीचा मार्ग म्हणजे सिद्धार्थाप्रमाणे आपल्या महालाच्या बाहेर पडून समाजातील प्रश्न व आव्हाने काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करणे. निव्वळ अर्थप्राप्तीपेक्षा अर्थपूर्ण जगण्याच्या या वाटचालीसाठी शुभेच्छा!