‘टोल नाक्यांवर मनसेचे कार्यकर्ते उभे राहतील आणि चारचाकी आणि छोटय़ा वाहनांकडून टोल वसूल करून देणार नाहीत. विरोध झाल्यास टोल नाके जाळून टाकू’ या शब्दांत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी इशारा दिल्यामुळे मनसे आणि टोल हे विषय पुन्हा चर्चेत आले आहेत. जाळपोळ किंवा हिंसाचार कधीच समर्थनीय ठरू शकत नाही. मात्र वाहनचालक, नागरिक आपल्याच बाजूने असणार याची खात्री हा इशारा देणाऱ्या संघटनेला वाटू शकते, याचे कारण काय? रस्तेबांधणीच्या खासगीकरणामुळे वाहनचालकांवर २००० सालापासून टोलचा बोजा आला. रस्ते व अन्य पायाभूत सुविधा चांगल्या मिळत असल्यास टोल भरण्यास कोणाचा विरोध असण्याचे कारण नव्हते. टोलची दरवाढ कोणत्या वर्षी- कोणत्या महिन्यात होणार हे ठरलेले असते, टोल नाक्यांवर किती वसुली झाली याची माहिती देणारा फलक झळकत असतो, पण प्रत्यक्षात टोलवसुली किती होते हे फक्त ठेकेदारालाच ठाऊक असते. टोलवसुलीत प्रचंड फायदा असल्याने राजकीय नेतेही या व्यवसायात भागीदारी करू लागले. ठेकेदार, राजकारणी आणि अधिकारी यांची अभद्र युती तयार झाली. यामुळेच महाराष्ट्रात टोलवसुलीच्या नावाखाली लुबाडणूक सुरू आहे, टोलमाफिया बोकाळले आहेत, या भावनेला सहज भडकावता येते. भूसंपादनास विरोध करणाऱ्या एका नागरिकाच्या हत्येप्रकरणी टोल ठेकेदारच आरोपी होता, यांसारख्या घटनांतून हीच भावना दृढ होते. टोल ठेकेदारांकडून दरमहा स्थानिक नेतेमंडळींना ठरावीक रक्कम दिली जात असल्याची चर्चा असते. राज ठाकरे यांनीही तसाच आरोप केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा