चीनचे संरक्षणमंत्री ली शंगफू हे गेले काही दिवस लुप्त झाल्याची चर्चा प्रथम चिनी आणि नंतर आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये झळकू लागली. चिनी मंत्र्यांचे आणि उच्चाधिकाऱ्यांचे अशा प्रकारे दिसेनासे होणे अलीकडच्या काळात नित्याचे बनले आहे. हे प्रारूप बरेचसे सोव्हिएत काळातील रशियाची आठवण करून देणारे असेच. त्या काळातही पोलादी आणि प्रभावी कम्युनिस्ट राजवटींमध्ये वरकरणी शक्तिशाली वाटणारे कम्युनिस्ट वा लष्करी अधिकारी, मंत्री अचानक लुप्त व्हायचे. फरक इतकाच, की सोव्हिएत काळातील अशा अनेक प्रभावशालींचे अस्तित्वच कायमचे मिटवले गेले. आधुनिक काळातील चीनमध्ये अद्याप तरी तेथील दोषी उच्चपदस्थ आयुष्यातून उठल्याचे समोर आलेले नाही. तरीदेखील तेव्हाही उपस्थित झाला होता नि आताही उपस्थित होतोच असा प्रश्न म्हणजे : इतक्या बंदिस्त, आदेशाधीन, नियंत्रित व्यवस्थेमध्ये अशा प्रकारे भ्रष्टाचारी, बेशिस्त उच्चपदस्थ निपजतातच कसे?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अन्वयार्थ: खासदार-आमदार कायद्यापेक्षा मोठे?

ताजे उदाहरण आहे संरक्षणमंत्री ली शंगफू यांचे. त्यांचे शेवटचे ‘जाहीर दर्शन’ २९ ऑगस्ट रोजी बीजिंगमध्ये झाले. त्या महिन्याच्या सुरुवातीस ते रशिया आणि बेलारूसच्या दौऱ्यावर जाऊन आले. परंतु ३ सप्टेंबरपासूनचे त्यांचे सगळे दौरेच रद्द झाले हा तपशील अधिक महत्त्वाचा. त्यानंतर त्यांचा ठावठिकाणा समजू शकलेला नाही. चीनच्या राजकारणात, आणि विशेषत: क्षी जिनपिंग यांच्या अमदानीत अशा प्रकारे उच्चपदस्थांचे लुप्त होणे याचा अर्थ संबंधितांविषयी भ्रष्टाचार किंवा इतर दुराचाराबाबत चौकशी सुरू झाली आहे, असा घेतला जातो. भारतासारख्या लोकशाही व्यवस्थेमध्ये अशा व्यक्तींचा राजीनामा घेणे, त्यांनी तो स्वत:हून देणे किंवा त्यांच्या जाहीर हकालपट्टीची पद्धत आहे. चिनी व्यवस्थेमध्ये असा खुलेपणा संभवत नाही. चीनच्या सध्याच्या विस्तारवादी भूसामरिक अवतारामध्ये शंगफू यांच्यासारख्या संरक्षणमंत्र्याकडे अत्यंत मोक्याची जबाबदारी असू शकते. परंतु मोक्याची जबाबदारी म्हणजे मोठय़ा प्रमाणात निधी आणि या निधीचा बेहिशेबी ‘मलिदा’ होण्याची शक्यताही मोठी. चीनमध्ये उच्चपदस्थांच्या भ्रष्टाचाराची चौकशी ‘सेंट्रल कमिशन फॉर डिसिप्लिन इन्स्पेक्शन’ या कम्युनिस्ट उपसमितीमार्फत होते.

हेही वाचा >>> समोरच्या बाकावरून : निवडणुकीसाठी भाजपचा नवा ‘जुमला’!

भ्रष्टाचारापासून विवाहबाह्य संबंधांपर्यंत साऱ्या प्रकरणांची चौकशी हीच उपसमिती करते. तिच्याकडे एकदा एखादे प्रकरण वर्ग झाले, की संबंधिताच्या निर्दोषत्वाची शक्यता जवळपास शून्य उरते. काही महिन्यांपूर्वी चिन गांग हे चीनचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री अचानक लुप्त झाले आणि पुढे त्यांना पदच्युत करण्यात आले. आता संरक्षणमंत्री ली शंगफूही त्याच मार्गावर आहेत. क्षी जिनपिंग यांनी गतवर्षी तिसऱ्यांदा चीनच्या सर्वोच्च नेतेपदी स्वत:ची नेमणूक करून घेतली. ते चीनच्या सेंट्रल मिलिटरी कमिशन या सर्वोच्च लष्करी संघटनेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. पण गेल्या काही महिन्यांमध्येच परराष्ट्रमंत्री चिन गांग, संरक्षणमंत्री ली शंगफू, तसेच चीनच्या क्षेपणास्त्र दलाचे प्रमुख आणि आणखी एक उच्चाधिकारी, लष्करी न्यायालयाचे उपप्रमुख यांची हकालपट्टी झालेली आहे. सुरुवातीस या बहुतेकांच्या अनुपस्थितीचे कारण ‘प्रकृती अस्वास्थ्य’ दिले जाते नि कालांतराने रीतसर हकालपट्टी झाल्याचे स्पष्ट होते. जिनपिंग कधी नव्हे इतके शक्तिमान झाल्याचे बोलले जात असतानाच्या या घडामोडी त्यांच्या प्रभावाविषयी प्रश्न उपस्थित करतात.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China s defence minister li shuangfu goes missing not seen in weeks zws