सर्वपल्ली राधाकृष्णन, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गुरुकुंज आश्रमाला भेट दिली, तेव्हा शैक्षणिक सुधारणांवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्याशी विचारविनिमय अनेकदा केला. नैतिक शिक्षणाचा ठरावीक तास आजच्या शिक्षणक्रमात समाविष्ट करण्यात आला असला, तरी केवळ त्याने विद्यार्थ्यांवर परिणाम होईलच असे म्हणता येत नाही असे स्पष्ट करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात : त्यासाठी अध्यापकाचा उज्ज्वल व प्रभावी आदर्शच विद्यार्थ्यांसमोर राहिला पाहिजे. म्हणूनच या दृष्टीने आधी शिक्षकांनाच शिक्षण देण्याची तीव्रतेने गरज भासत आहे. आजच्या शिक्षणात काही भाग चांगला असला तरी बराचसा भाग अनावश्यक आहे – जीवनास निरुपयोगी आहे. त्याऐवजी स्वीकाराव्यात अशा गोष्टी कोणत्या आहेत? गुरुदेवमंडळाने ठरवलेले कार्यक्रम यांचा या दृष्टीने उत्तम उपयोग होऊ शकतो; जरी त्यांचे खोल शास्त्र अद्याप लिहिले गेलेले नसले तरी जीवनावर संस्कार घडविणाऱ्या दिनचर्येवर जोर देणे प्रथम आवश्यक आहे. त्या गोष्टी लहान वाटतात, पण एकदा ते चुकले की सर्वच चुकत जाते, एवढे त्यांचे महत्त्व आहे! सरळपणा, सात्त्विक राहणी यांची शक्ती अशी आहे की, त्यांचा प्रभाव न बोलताच इतरांवर पडतो. शिवाय राष्ट्रजीवनावर त्याचे फार इष्ट परिणाम होतात. सध्या जगच उपभोगाकडे धाव घेत आहे. दुसरीकडे, उत्पादक व्हायला-श्रम करायला कोणीच तयार नाही. काही अर्थशास्त्रवेत्ते देखील या दृष्टीने चिंतेत आहेत.
एकीकडे ऐषआरामी मूठभर लोक त्याच मार्गाने सारखे वाढत जातील आणि दुसरीकडे बाकीचे असंख्य लोक अधिकाधिक गर्तेत उतरतील तर त्यांतून भयंकर स्वरूपाच्या समाजाची निर्मिती झाल्याखेरीज राहणार नाही. तेव्हा आजच्या समाजाच्या घटकांना समानता व कमी गरजांची राहणी याकडे वळविणारे शिक्षण दिले जाणे अत्यावश्यक ठरते. कल्पना कितीही विशाल असली तरी तिची सुरुवात घरातूनच करावी लागेल. आपल्या विद्यार्थ्यांनाच त्या कल्पनेची प्रतीके बनवावे लागेल. उच्च व्यवहार, आदर्श देशजीवन यासाठी योग्य प्रचार करण्याची शक्तीही त्यांच्यात भरावी लागेल. दहा प्रचारक मुद्दाम तयार करणे त्रासाचे आहे; उलट पाचशे विद्यार्थ्यांमार्फत प्रचाराचा आवाज सहज पसरविता येण्यासारखा आहे. एक मोठी राष्ट्रशक्ती शिक्षकांच्या हातात आहे. ‘पैशासाठी नोकर म्हणून आम्ही शाळेत आलो’ असे कोणी म्हणतात. विचार करा : माणूस शेवटी पैशासाठीच आहे का? नोकर म्हणवून पोटाचा प्रश्न सुटेल; पण जी राष्ट्रसंपत्ती तुमच्याजवळ आहे तिचा विकास सेवाभावनेशिवाय करता येईल का ? शिक्षकांनी चांगल्या संस्कारांची आच विद्यार्थ्यांना कोवळय़ा वयातच लावली नाही; त्यांच्यात तेज भरले नाही; तर सर्वाचेच मंत्र वावडे होतील. ती मुले तर बिघडतीलच, परंतु त्यातून उगवणारे शिक्षकही बिघडतील, नेते आणि शासकही बिघडतील; आणि या देशाचा धिंगाणाच होऊन बसेल. नात्यागोत्यांचे किंवा वशिल्याने वकूब नसलेले शिक्षक नोकरीवर लावून आजवर पिढय़ाच्या पिढय़ा बरबाद झाल्या आहे. आता तरी हे बंद करून ‘शिक्षक म्हणजे गुरू’ हे पावित्र्य आपण निर्माण केले पाहिजे.
राजेश बोबडे