देशाच्या प्रथम सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी राष्ट्र, सत्ता व सत्ताधीशाबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबांमध्ये झालेली चर्चा चिंतनीय आहे. तुकडोजी महाराज म्हणतात, आज आम्ही पाहतो की जो तो मीच सत्ता चालवीन, मीच अधिकारी बनेन, आमचे राज्य असे असावे, असे मोठमोठय़ाने व्याख्याने झोडून स्वत:ला मात्र वगळून लोकांनी असे करावे, तसे करावे म्हणतो. पण आपल्या घरातील अंधाराची व्यवस्था काय हे मात्र विसरतो. अशी माणसे गावात कितीही विद्वानपणाने वागली तरी गावाची सेवा करणारा, प्रत्येक माणसावर प्रेम करणारा नागरिक नसेल तोपर्यंत गाव सुधरेल कसे? ठगाशी ठगाचाच धंदा जोरात चालू आहे, त्याची चढाओढ चालली आहे. प्रत्येक जण पाप करून नेता, साधू, पुढारी, श्रीमंत, सत्ताधीश बनतो. ते सर्वानी बघावे व कुणालाही मोठे बनायचे असेल तर याच पापाच्या, भ्रष्टाचाराच्या दुर्जनतेच्या, गुंडगिरीच्या मार्गानी बनावे असाच आदर्श घालून देण्याची भाऊगर्दी चाललेली आहे. लोकांना नागरिकत्वाचे हक्कच कळत नाहीत अन् पुढाऱ्यांना स्वत:शिवाय जनतेचे हित समजत नाही! मात्र पुरस्कार तर प्रजातंत्राचा केला जातो.
निवडणुकीबाबत संत गाडगेबाबा म्हणतात, ‘‘हे पहा! पुढारी घ्या वा इलेक्शनवाले घ्या. त्याहिले आज दार नसलं तरी उद्या घर येते अन् परवा महाल होते! पाच एकरांची जमीन पंचवीस तिफणा होते! पहा कसा सेवाभाव आहे! कोणी कारखाना उघडतो तर कोणी मिल काढतो, कोणी मोटारी घेतो तर कोणी लाखो रुपयांचा व्यापार करतो! हे सारं येते कुठून? लोकाइले आता हे समजलं पायजे.’’ यावर तुकडोजी महाराज म्हणतात, निवडणुकीमध्ये जर पंथाला, पक्षाला, संस्थेला अथवा जातीला नजरेसमोर ठेवून कोणाच्या धाकाने, पैशाच्या वा सत्तेच्या लोभाने नागरिकत्वाचे हक्क खोवून मतदान केले तर- पुरस्कार करण्यात येणाऱ्या लोकशाहीचा मागमूसही शिल्लक राहणार नाही. रामराज्य हे एक कल्पित स्वप्न ठरेल. अन् असा प्रयत्न कोणाकडूनही होत असेल, तर ते खरे देशरक्षक नसून देशभक्षक समजले पाहिजेत; देशद्रोही म्हटले पाहिजेत. अशा महत्त्वाच्या सर्वच बाबतीत सर्व संतांकडून जनतेला योग्य मार्गदर्शन होणे जरुरीचे आहे. प्रत्येक पुढारी आपापल्या भोवती घरकुल रचून त्यात राजासारखा डामडौलाने नांदण्याचा विचार करत असल्याचे दिसते. अनेक जण जनतेची कळकळ दाखवतात, पण ती दाखविण्यापुरतीच. लोकांच्या जीवनात जी आग पसरली आहे, दारिद्रय़ाचे जे भयानक दृश्य पदोपदी दिसत आहे आणि निरपराध जनतेला जे कष्ट सोसावे लागत आहेत, त्यांच्या निवारण्यासाठी कोणीही पुढे पाऊल घ्यायला तयार नाही. काही कर्तृत्ववान पुढाऱ्यांनी देशाची सेवाही केली. पण या सेवेसह त्यांच्या ठिकाणी अहंकार निर्माण झाला आहे.
बेशुट आया जमाना, शासकों का पाप है।
ये तो भले मर जायेंगे, दुनिया को संताप है।।
लोहा अगर तप जाय,
तो जल्दी न ठंडा होयगा।
वैसी ही दुनिया बिगड जाये तो,
पता लग जायगा।।
– राजेश बोबडे