आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पंचावन्नावी पुण्यतिथी (तिथीनुसार) आहे. आपल्या निर्वाणानंतरही श्रीगुरुदेव सेवा मंडळाचा दीप अखंड तेवत राहावा म्हणून महाराजांनी श्रीगुरुदेव सेवा मंडळाची घटना तयार करण्यापूर्वी मध्यवर्ती सभेत कार्यकर्त्यांना दाखविलेला मार्गपथ अतंर्मुख करणारा आहे. महाराज म्हणतात, ‘‘आपला मार्ग व उद्देश एवढा उज्ज्वल आहे, म्हणूनच त्यासाठी त्याग, कार्यतत्परता, कर्तव्यनिष्ठा व तत्त्वनिष्ठा यांची तेवढीच आवश्यकता आहे. केवळ संस्थेच्या घटनेची पूजा करून नव्हे, तर कार्य करून तुम्ही पुढचा सल्ला वरिष्ठांकडे मागत चला. छत्रपती शिवरायांनी आपली घटना काही वहीखात्या मांडून ठेवली नव्हती. नुसत्या नियमांनी व कायद्यांनी कार्य वाढते असे नाही. मुख्य गोष्ट आहे हृदयातील प्रामाणिक कळकळ व कार्योत्साह! याला धक्का बसता कामा नये! अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांअभावी, प्रचाराच्या उच्च व सक्रिय तंत्राच्या अभावी अनेक संस्था नामशेष झाल्या आहेत; त्यांच्या टापटीप घटना वाया गेल्या आहेत. गंगेचा प्रवाह घटना न करताच पाषाण फोडीत झर-झर पुढे जातो, त्याप्रमाणे आम्हाला आपले कार्य बेफामपणे पुढे नेता आले पाहिजे. लोक आमची वाट पाहात आहेत आणि आम्ही निष्क्रियपणाने घटनाच करीत बसलो आहोत, असे होऊ नये. गुण-पूजा विसरू नका’’
‘‘जीवनाचे दीप उजळले पाहिजेत. आम्ही सेवकांना जे काही सांगतो ते आधी आपल्यात असले पाहिजे. अन्यथा तुमची मोठी नावे केवळ नावापुरती राहतील. तुम्ही कमजोर ठरलात तर कसला प्रभाव पडणार? त्यापेक्षा, आपणास साधत नसेल तर बाजूला निघून जाणे बरे; पण पापाचे भागीदार होऊ नये! नाहीतर, नियम निष्ठेने पाळू, हा निर्धार ठेवला पाहिजे. जे आपण आचरू शकत नाही ते इतरांना शिकविण्याचा आपल्याला अधिकार तरी काय राहणार व त्याचा परिणाम तरी काय होणार? विचार करा, तुमचा तुकडोजी बुवा हा बुवा का ठरला? त्यात काही शहाणपण, ज्ञान आहे, उपदेशाचे तारतम्य आहे आणि चारित्र्य आहे म्हणूनच ना? मग या कृतीच्या मार्गानेच तुम्ही जायला नको का? लोकांना गुण-पूजेचा पाठ देण्यापूर्वी त्याची सुरुवात स्वत:पासूनच केली पाहिजे. आपले गुण वाढवून लोकसंग्रही झाले पाहिजे आणि त्याच्या कार्यास पोषक ठरले पाहिजे हे विसरता कामा नये. राजकारणात कुटिलतेने निवडून येणे कदाचित योग्यही ठरेल. पण तुम्हा धार्मिकांना ते जुळणार नाही व शोभणारही नाही. तुम्हाला आपल्या कार्यानेच झळकले पाहिजे. नुसते ‘सेवा मंडळ’ पाठ करूनही चालणार नाही; दंभ नको. प्रामाणिकपणे, जिव्हाळय़ाने काम केले पाहिजे; नाहीतर ‘पायाची वहाण पायी बरी’ ही भूमिका तरी घेतली पाहिजे. असे करण्यातच आपले, संस्थेचे व जनतेचे कल्याण होऊ शकते.
राजेश बोबडे