महापुरुषांच्या पश्चात त्यांचे कार्य अपुरे राहून पुढे त्यांचा संप्रदाय होऊन अनेक संस्था नामशेष होताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पाहिले होते. महाराजांनी श्रीगुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली व संचालक मंडळाची नेमणूक करून निर्वाणाच्या तीन वर्षे आधी (१९६५ मध्ये) संचालकपदाचा राजीनामाही दिला. याबाबत त्यांचा दृष्टिकोन त्यांनी व्यक्त केलेल्या मौलिक चिंतनातून प्रतीत होते.
महाराज म्हणतात, ‘‘‘मुक्ती आणि बंधन’ यांचा हा सुरेख संगम आहे! संचालकपदाच्या राजीनाम्याचा निर्णय सर्वतोपरी विचार करूनच मी घेतला. त्याबरोबरच संचालक मंडळाची माळ कोणाच्या गळय़ात घालावयाची हेही ठरवून टाकले. श्रीगुरुदेव सेवामंडळ ही काही बापजाद्यांनी सट्टय़ात मिळविलेली दौलत नव्हे, की तिची वासलात नादान पिढय़ांनी लावून टाकावी! ती निढळाच्या घामाने समाजाच्या सर्वागीण सेवेसाठी केलेली सुंदर रचना आहे. सर्व मानव जातीची मंगलमय साधना आहे. सेवामंडळ म्हणजे तुकडोजी बुवाचा संप्रदाय नाही. मला व्यक्ती महात्म्य व संकुचित संप्रदायाची क्षुद्र वृत्ती यांचा मनस्वी वीट येतो. सेवामंडळाने संप्रदायचे रूप धारण केले तर मला अत्यंत दु:ख होईल,’’ असा इशारा देऊन महाराज म्हणतात, ‘‘वास्तविक सेवामंडळ ही संस्था नाही. ती वृत्ती आहे. सर्वच सेवा करणारे सेवामंडळाचे आहेत, असे मी मानतो. मानव्याची सेवा करण्याची धडाडी ज्या माणासामध्ये आहे तो कोणत्याही पंथाचा नसतो. सेवामंडळाने संकुचित विचार कधीही करू नये म्हणून सेवामंडळाचे क्षेत्र मी संचालक मंडळाच्या स्वाधीन केले.’’
‘‘नामस्मरणाचा घोष करत असतानाच परचक्राचे अरिष्ट उधळून लावण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा व प्राणाचे मोल देण्यासही मागेपुढे पाहू नये अशीच माझी सेवामंडळाविषयीची धारणा आहे. म्हणूनच अन्यायाचा प्रतिकार करण्याचे ब्रीद त्यांनी आपल्या उराशी बाळगले आहे. श्रीगुरुदेव सेवामंडळ हा काही केवळ बोके संन्यासी बनविण्याचा कारखाना नाही. हे एक ईश्वरी पवित्र कार्य आहे. त्या कार्याची प्रेरणा देण्यासाठीच एक आदर्श असावा या दृष्टीने गुरुकुंजाची, श्रीगुरुदेव सेवाश्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. कामाची कळकळ आपल्यात नसेल तर वाद जास्त होतात. कामांचे व अहंकाराचे ओझे कमी करा. वेगवेगळय़ा खात्यांचा अभ्यास केलेले लोक त्या त्या कार्याने पुढे येऊ द्या. कसेही नेमू नका. ‘संचालक’ नाव कागदावरच राहू द्या; माझ्या नाही तर तुमच्याच प्रांजळ कल्पना तुम्ही आचरून दाखवा. प्रसंगी अलग होऊनही कार्य करून दाखवा! सेवामंडळाला बुवांच्या अखाडय़ाचे स्वरूप येऊ नये. अखाडय़ात मोठमोठे गाथा लिहून पडल्या आहेत; पण त्यांचा उपयोग राष्ट्राला व्हावा यासाठी कार्य करणारे कोणीच दिसत नाहीत. समाज केवळ ग्रंथांनी बदलत नसतो. आम्हाला लोकापर्यंत पोहोचता आले पाहिजे; त्यांच्यात समरस होऊन त्यांना शिकविता आले पाहिजे. वळण देता आले पाहिजे.
राजेश बोबडे