‘आवडतो मज कण-कण इथला, न सुटे प्रेम मनाचे- मज वेडची गुरुकुंजाचे’ या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या भजनातून त्यांचे गुरुकुंज आश्रमाविषयीचे प्रेम लक्षात येते. सामुदायिक प्रार्थना व ध्यान या उपासना पद्धती महाराजांनी सुरू केल्या. महाराज म्हणतात, ‘‘चोवीसही तास या उपासनेतच घालवावे असा आग्रह नाही. आसपासच्या गावांतील लोक रोज गुरुकुंजात येऊ शकणार नाहीत; मात्र मोझरी आणि गुरुदेव नगरवासीयांनी ध्यान-प्रार्थनेला तरी जरूर यावे आणि शक्य झाले तर येथे अध्ययनसुद्धा करावे. यातून जे सुविचार पुढे येतील ते त्यांनी इतरांनाही दिले पाहिजेत. हे भगवंताचे विधानच आहे, की जो काही देतो त्यालाच घेण्याचा हक्क मिळतो आणि जो काही घेतो त्याचे देणे हेच कर्तव्य ठरते. आश्रमापासून तुम्ही काही घ्या आणि तुमच्याकडूनही आश्रमाला काही सहकार्य द्या; जे तुम्ही आश्रमात प्राप्त कराल ते इतरांनाही शिकवा; यातच सर्वाचे कल्याण आहे.’’
‘‘गुरुकुंजातील आश्रम हे सहकार्याचे तसेच संशोधनाचे केंद्र व्हावे असे मला वाटते. संशोधकबुद्धीचे चिकित्सक विचार आश्रमवासीयांनी स्वीकारले पाहिजेत आणि भारत सरकार ज्याप्रमाणे एखादे संशोधक मंडळ नियुक्त करते त्या मंडळाप्रमाणे बाहेरच्या लोकांनी स्वयंप्रेरणेने आश्रमात येऊन संशोधन केले पाहिजे. सर्व धर्म व पंथांचे तत्त्वज्ञान, मानव समाजाच्या विकासाची खरीखुरी तत्त्वे, मानवी जीवनाचे रहस्य, वेगवेगळय़ा वादांचा तुलनात्मक अभ्यास, जगात शांती नांदविण्याचा मार्ग इत्यादी संशोधनाचे अनेक विषय असू शकतील. त्यांचे हे संशोधन जगाला उपकारक ठरेल. श्रमिकांचे श्रम हलके होतील आणि शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळू शकेल. आरोग्य सोयी सुगम होतील आणि आर्थिक विकासासाठी नवे उद्योग हाती घेतले जातील, अशा गोष्टींचेही संशोधन झाले पाहिजे.’’
‘‘आवश्यक विचार-आचार, समाजजीवनात पोहोचविता यावेत, रुजविता यावेत, हाच सेवामंडळाचा उद्देश आहे. उद्या कदाचित मी अन्य एखाद्या संस्थेचे सहकार्य घेईन. परंतु हे कार्य केल्याखेरीज मला स्वस्थ राहता येणार नाही. माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही सर्वानी हे कार्य उचलून धरले पाहिजे. हे केंद्र छोटे असले तरी इतर सर्वापेक्षा माझा यावर अधिक भरवसा आहे. दिल्ली- मुंबई- कलकत्ता यांसारखी शहरेही माझीच आहेत; पण त्यांच्यापेक्षाही मी तुमच्यावर विशेष विसंबून आहे. माणूस आपल्या घरावर भरवसा ठेवतो. हा आश्रम माझे चिमुकले घर आहे. सर्व जग हा माझा परिवार असला तरी तुम्ही माझे निकटचे कुटुंबीय आहात. विद्यार्थी- शिक्षक, नागरिक प्रचारक, सेवाधिकारी- सेवक, आजूबाजूच्या खेडय़ांतील लोक आणि गावोगावचे भाविक या सर्वावर माझी भिस्त आहे. सर्वानी निष्ठेने सेवामंडळाचे कार्य करावे.’’
राजेश बोबडे