जगात धर्म व राजकारण अशा दोन सत्ता कार्यरत असतात असे सांगून, धर्म व राजकारणाविषयी आपले विचार मांडताना महाराज म्हणतात, ‘ज्यावेळी एकीकडून धर्मसत्ता व दुसरीकडून राजकीय सत्ता यांचे प्रवाह एकत्रित होतात, त्यावेळी राष्ट्रात क्रांती होते. मी हा एक फार मोठा सुयोग समजतो की, गुरुदेव सेवामंडळ धर्मक्षेत्रातून कार्य करीत असले, तरी राजकीय क्षेत्रात रामराज्य स्थापन करणारे वीर पुरुषही सेवामंडळाला अत्यंत प्रिय आहेत. कारण धर्माचा अर्थही हाच आहे ना की, ज्याची उपासना आपण करतो त्याचे राज्य निर्माण करणारे शिपाई तयार करायचे! केवळ देवळातील मूर्तीच्या डोक्यावर पाणी ओतत बसल्याने अथवा मूर्तीसमोर घंटानाद करीत बसल्याने भक्ती होत नाही, असे सांगून महाराज ग्रामगीतेत म्हणतात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंदिरी बैसोनी नाक दाबावे।
त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे।
दु:खितासि प्रेमे पाणी पाजावे।
हे श्रेष्ठ तीर्थस्थानाहुनि।।

भारतवर्षांत धर्माचा, भक्तीचा लावण्यात आलेला विपरीत अर्थ दूर सारण्यासाठी, भिन्न-भिन्न पंथ आणि संप्रदाय यांच्यातील द्वेष नष्ट करण्यासाठी आदर्श मानव तयार करण्यासाठीच गुरुदेव सेवामंडळ ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. आज जनता अत्यंत भित्री, आळशी व संशयी झाली आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची एकदम सक्ती केली तर फारच थोडे लोक ती करण्यास तयार होतील वा तयार केले जातील. बहुसंख्य लोक भीतीने त्यापासून दूर राहाण्याचाच प्रयत्न करतील. त्यासाठी त्यांच्या भावना हळूहळू या मार्गाने तयार कराव्यात असा मंडळाचा उद्देश आहे.

साधू- संत, क्रांतिवीर अथवा समाजसुधारक अशा थोरांचे दर्शन घेणे म्हणजे त्यांच्या चेहेऱ्याकडे पाहणे नव्हे. त्यांच्या चेहेऱ्याचे ध्यान करणे हा त्यांच्या दर्शनाचा वा सहवासाचा हेतू नसतो. त्यांच्या ध्येयाविषयी व मार्गाविषयी जाणून घेणे, आपल्यातही ते तेज व शक्ती निर्माण करावी आणि त्यांना मदत करावी हाच दर्शनाचा खरा अर्थ होय. थोरांच्या कार्याची ओळख हेच दर्शन असल्यामुळे आपणही म्हणजेच श्रीगुरुदेव सेवा मंडळानेही असेच करून महात्म्यांच्या कार्याला आपापल्यापरीने मदत केली पाहिजे, अशी अपेक्षा महाराज आपल्या कार्याविषयी व्यक्त करतात.

राजेश बोबडे
rajesh772 @gmail. com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintan dhara national revolution through religion and political power amy
Show comments