श्रीकृष्णांचे तत्त्वज्ञान व त्यांच्या कार्याचा दृष्टिकोन लोकांना समजावून सांगताना कृष्णलीला सांगण्यावरच अनेकांचा भर असतो, असे सांगून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘भयाण अंध:कारमय परिस्थितीत श्रीकृष्णाचा जन्म काळोखात चमकणाऱ्या चंद्राप्रमाणे झाला व त्याने आपल्या तेजस्वी शीतल किरणांनी जगात शांती प्रस्थापित करण्याचे महत्कार्य केले. तोच गीतेच्या तत्त्वज्ञानाच्या रूपाने आजही जगापुढे हजर आहे आणि आपल्या भक्तांकडून सक्रिय पूजेची अपेक्षा करत आहे! त्याची गीता आज जागती ज्योत होऊन जगाचे डोळे दिपवू शकली नसती तर कोणी आणि का ओळखले असते त्याला की तो ‘गोकुळचा पाटील’ होता वा ‘द्वारकेचा राणा’ होता म्हणून? गीता समोर नसती तर असल्या विधानास कसला प्रतिबंध- कोणता अडथळा उरला असता? वास्तविक श्रीकृष्णाची स्मृती आणि भक्ती जी आजवर जगात ताजी आहे ती त्याच्या महत्कार्याचे, जगदुद्धारक चारित्र्याचे आणि अमोघ तत्त्वज्ञानाचेच फळ होय. निंदक लोक काहीही म्हणोत परंतु आश्चर्याची गोष्ट ही की श्रीकृष्णाच्या चरित्राचे विडंबन-नकळत का होईना-आमचे कीर्तनकार व पुराणिक भरसभेत लीलेने करीत आहेत आणि आमचे श्रोते डोळे लावून श्रद्धेने ते ऐकत आहेत; ही दु:खाची गोष्ट आहे. कित्येक तर आपल्या या कृतीचे समर्थन संतवचनांच्या आधारे करू पाहतात; परंतु ही गोष्ट चुकीची आहे. मला हे सांगायचे आहे की संतांचा भाव निराळा, उद्देश निराळा आणि काळही निराळा! एकच गोष्ट शब्दांचे वेश बदलून, अर्थाची रूपे पालटून कितीही ठिकाणी फिरवली तरी तिचा प्रत्यक्ष भाव बदलत नसतो. तो भाव जे जाणते लोक जाणत होते ते सर्वाना प्रिय होईल अशा दृष्टीने मांडत होते. दळणकांडणाच्या वेळीसुद्धा कृष्णचरित्र गाण्याचा प्रघात त्यांनी पाडला व अशा रीतीने सार्वत्रिक प्रचार केला; पण हे सर्व याच उद्देशाने की त्यांचे समाजरचनेचे व आत्मोन्नतीचे तत्त्वज्ञान भोळय़ाभाविकांच्या कानात, मनात व ध्यानातही यावे आणि जगात सर्वतोपरी योग्य परिवर्तन घडावे म्हणून!’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा