राजेश बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेवा व सत्तेची महती विशद करताना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, ‘सत्ता ही दंडादी उपायांनी मानवसमाजाला व्यवस्थित ठेवण्यासाठी असून सेवा ही प्रेमाने समाजाला सन्मार्गाकडे नेण्यासाठी आहे. एखाद्याला मारणे शिकायचे असेल तर ती शाळा म्हणजे सरकार आहे, मरणे शिकायचे असेल तर ती शाळा म्हणजे सेवा! यापैकी तुला काय हवे आहे, ते सांग,’ असा प्रश्न महाराज ज्याला सत्तेची अपेक्षा आहे त्याला उद्देशून करतात. ते म्हणतात, ‘तुला हातात अंकुश घेऊन कार्य करावयाचे असेल तर राष्ट्राच्या, सरकारच्या योजनेत आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे व धडाडीप्रमाणे कार्य करण्यासाठी जाऊन बस आणि बहुजनांच्या हिताची आठवण ठेवून सरकारशी संलग्न हो. नाही तर, मी हातात झाडू घेऊनच सेवा करेन व तसे करण्यात मृत्यूचा प्रसंग आला तरी कुणावर अन्याय करणार नाही, या सेवेच्या मार्गाने पुढे जा! जे कार्य आवडत असेल, ते तू कर, परंतु आहे हे आणि करतो ते, असे होऊ न देण्याची काळजी घे,’ असा इशाराही महाराज देतात.

‘उत्तम असो की वाईट असो, परंतु कोणत्याही कार्याबाबत जनतेने सत्ता अंगी आणून, अर्थात कायदा हाती घेऊन अनावर वृत्तीने काम करणे, हे आपण निवडलेल्या सरकारला अडथळा करण्यासारखे आहे. आपले शत्रुत्व सिद्ध करण्यासारखे आहे; ही गोष्ट सेवा करतानादेखील तुला लक्षात ठेवली पाहिजे. तसेच सत्तेच्या रंगात जनतेच्या हृदयाची जाणीव न ठेवता स्वत:च्या इच्छेनेच कार्य करीत सुटणे हे सत्तेला शापदग्ध करण्यास कारणीभूत होत असते, हेही विसरता कामा नये. तेव्हा जे काय करशील ते स्वत:च्या अधिकाराची मर्यादा व जबाबदारीची जाणीव ठेवून कर, म्हणजे न्यायाला साजेसे व जनतेला सुखावणारेच संस्कार होतील! निष्कर्ष एवढाच आहे की, जनतेच्या कर्तव्यात तू जनतेला मदत कर आणि सरकारच्या कर्तव्यात तू सरकारशी सहकार्य कर. सेवेला सत्तेच्या मार्गातील अडथळा होऊ देऊ नकोस आणि जनसेवेपासून पराङ्मुखही होऊ देऊ नकोस. यातच देशाचे कल्याण व ईश्वराची सेवा आहे.’ म्हणूनच महाराज म्हणतात..

सत्ता की आयु न बडी।
सेवा की ध्वज सदा खडी।।

rajesh772 @gmail. com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintan dhara rashtrasant shri tukdoji maharaj article while detailing the importance of service and power amy
Show comments