राजेश बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मानवाच्या कल्याणासाठी साहित्याची आवश्यकता स्पष्ट करताना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज देशातील विषमतेचे उदाहरण देऊन म्हणतात, समाजातल्या रूढींनी आमचे जीवन बरबटले आहे. श्रीमंतांच्या घरी जेवणावळी सुरू असताना त्याच वेळी त्यांच्याच घराबाहेर भुकेली माणसे उष्टय़ा पत्रावळीवरील अन्न मिळविण्यासाठी आपसात भांडताना दिसतात, हे चित्र भयावह आहे. ज्या देशात, ज्या प्रांतात, ज्या गावात साहित्य संमेलने भरावी, त्याच गावातील, त्याच प्रांतातील, त्याच देशातील साहित्यात मात्र प्राण्यांपेक्षाही वाईट जीवन जगणाऱ्या दीन-दरिद्री भुकेकंगालांचे प्रतिबिंब उमटू नये, हा दैवदुर्विलास नव्हे तर काय? साहित्याने आता ही जाणीव करून घेतली पाहिजे. त्याशिवाय साहित्याची व्याख्याच होऊ शकत नाही.

महाराज म्हणतात काही साहित्यिकांचे साहित्य कदाचित वेगळे असू शकते. परंतु मला या देशात तरी तसे साहित्य नको आहे. मला मानव कल्याण साधणारे जीवनसाहित्य हवे आहे. समाजातील वैषम्याच्या भिंती, विषम स्थिती निवळणारे साहित्य व तसे साहित्य निर्माण करणारे साहित्यिक मला या देशात हवे आहेत. हे कार्य काही कीर्तनांनी करतील, काही भजनांनी करतील, काही कायद्यांनी करतील. आम्ही हे कार्य विचारांची पेरणी करून, साहित्याच्या माध्यमातून केले पाहिजे! साहित्याच्या शक्तीची जाणीव मला आहे. ही जगातील मोठय़ा शक्तींपैकी एक महान शक्ती आहे. त्यात बाणेदारपणा आहे. तेज आहे, ओज आहे.

या शक्तीचा उपयोग माझ्या समाजाला व्हावा, आमच्या देशाचा सर्वागीण विकास व्हावा, यासाठी ही शक्ती भक्तिभावाने वेचली गेली पाहिजे. समाजाचा विकास कोणत्याही साधनाने का होईना, शीघ्र गतीने व्हावा ही तळमळ आम्हाला लागली पाहिजे.

सर्व समाजाला पुढे न्यायला साहित्यिकांचे संमेलन हा एक स्तुत्य उपक्रम आहे. यातून समाजाला जीवनाचे साहित्य, जीवनाची सेवा मिळेल, सर्व काही मिळेल अशी विविधांगी दृष्टी साहित्यिकांची असावी! जनसंख्येवर कार्याचे मोजमाप होत नाही. काही थोडय़ा फार साहित्यिकांनी माझे विचार आत्मसात केल्यास मला समाधान वाटेल! दुसरा शिकलेलाही माणूस आम्ही उचलून धरू शकतो.

साहित्य हे जर सर्व समाजाला सामर्थ्य देऊन पुढे नेण्याचे, प्रोत्साहन देण्याचे साधन आहे, तर साहित्य संघाचे वा साहित्य संमेलनाचे क्षेत्र मूठभरांसाठीच मोकळे न राहता समाजव्यापी व्हायला हरकत नाही. म्हणूनच साहित्य संघात उपेक्षित कलावंतांनाही आता सदस्य करून घेतले पाहिजे. त्यांच्यासाठी साहित्याचे दरवाजे, साहित्याचे सारे रस्ते मोकळे व्हायला हवेत!

‘‘यारे यारे लहान थोर, भलते याती नारी नर’’ ही भावना साहित्य संघांनी ठेवून आपल्या क्षेत्राचा विस्तार करायला हवा; तरच ते साहित्य आणि तरच तो साहित्यिकांचा संघ! अशी अपेक्षा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यिकांकडून करतात.

rajesh772 @gmail. Com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintan dhara rashtrasant shri tukdoji maharaj explaining necessity of literature for human welfare zws
Show comments